शुभंकरोति साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक : २०२
विषय क्र. : ४
विषय : शिक्षण क्षेत्रातील मौलिकता मलीन होतेय का? (वैचारिक लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर
परीक्षक : मा. ऋचाताई पारेख, मुंबई
संकेतस्थळ :
शिक्षण क्षेत्रातील मौलिकता मलीन होतेय का? या प्रश्नाचे उत्तर जरी सकारात्मक वाटत असले, तरी वैचारिक दृष्टीकोनातून विश्लेषण करण्यापूर्वी आपल्याला मौलिकता या शब्दाचा अर्थ नीटपणे समजून घेतला पाहिजे. मौलिकता म्हणजे केवळ नवीन कल्पना मांडणे नव्हे, तर स्वतःच्या चिंतनातून, अनुभवातून आणि नैतिक जाणीवेतून तयार झालेला स्वतंत्र व चिकित्सक विचार, ज्यात दुसऱ्याची नक्कल नसते. याचा अर्थ, मौलिकता ही पाठांतराची पुनरावृत्ती नसून अर्थनिर्मिती आहे. मौलिक शिक्षण केवळ विद्यार्थी घडवत नाही; ते विचार करणारा मनुष्य घडवते. जर शिक्षणातून मौलिकता कमी झाली, तर ज्ञान जरूर वाढेल; पण विवेक कमी होईल. माहिती मिळेल; पण दिशा हरवेल.
शिक्षण हे कोणत्याही मानवी समाजाच्या यशाचे आणि विकासाचे मूलभूत अधिष्ठान आहे. समाजाच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि नैतिक प्रगतीसाठी सुदृढ शिक्षणव्यवस्था आवश्यक आहे, याबाबत कोणाचे दुमत नाही. कोणत्याही समाजाचा शैक्षणिक दृष्टीकोन न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित असायला हवा. म्हणूनच कोणत्याही देशाच्या शासनाने अशी शिक्षणव्यवस्था उभारली पाहिजे, जी समाजातील सर्व घटकांना त्यांची सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी काहीही असो, त्यांना समान संधी देणारी असेल. तरीसुद्धा या चर्चेत मौलिकता हा महत्त्वाचा घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय शिक्षणधोरण आखताना सामाजिक समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचारसरणी यांना केंद्रस्थानी ठेवले. कोणतेही शिक्षण विशिष्ट धर्म, श्रद्धा किंवा अंधपरंपरांच्या प्रभावापासून मुक्त असले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. म्हणूनच त्यांनी वैज्ञानिक शिक्षणावर भर देत समाजात टीकात्मक विचारकौशल्ये आणि चौकशीची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे, हे अधोरेखित केले. त्यांच्या दृष्टीने वैज्ञानिक शिक्षणाचा अर्थ केवळ तंत्रज्ञान नव्हता; तर चौकशीची वृत्ती, प्रश्न विचारण्याची सवय आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, म्हणजेच मौलिकता जपणे होय. अशा शिक्षणातूनच संशोधन, नवीन कार्यक्रम आणि समाजनिर्मिती शक्य होते, असे त्यांना वाटत होते.
आज भारतात शिक्षणाच्या संधी वाढल्या आहेत. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, ऑनलाइन अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणामुळे ज्ञानसंपादन अधिक सुलभ झाले आहे. साक्षरता वाढली, कौशल्याधारित शिक्षणाला चालना मिळाली आणि जागतिक स्पर्धेसाठी तरुण तयार होत आहेत. तरीही समाजात वाढती हिंसा, असहिष्णुता, भ्रष्टाचार, लैंगिक अत्याचार आणि आत्मकेंद्रित वृत्ती दिसून येते. मग प्रश्न उभा राहतो की इतके शिक्षण असूनही माणूस अधिक संवेदनशील का होत नाही? हा विरोधाभास सूचित करतो की शिक्षणाची वाढ झाली आहे; पण मौलिक नैतिक विचारांची वाढ झालीच असे नाही.
मौलिकता मलीन होण्याचे मुख्य कारण म्हणजे परीक्षाकेंद्रित शिक्षण. भारतीय शिक्षणाची मुख्य रचना अजूनही परीक्षा भोवती फिरते. विद्यार्थ्याला शिकविताना “योग्य उत्तर लक्षात ठेव, कारण गुण त्यावर मिळतात,” असा संदेश दिला जातो. या प्रक्रियेमुळे प्रश्न विचारण्याची किंवा वेगळा दृष्टिकोन मांडण्याची सवय हळूहळू कमी होत जाते. कोचिंग क्लासेस, गाईड्स, रेडीमेड नोट्स आणि ‘महत्त्वाचे प्रश्न’ यांच्या संस्कृतीने शिक्षणाला स्पर्धात्मक यंत्रणेत रूपांतरित केले आहे. यात विद्यार्थ्याला ज्ञानाचा शोधक नव्हे, तर उत्तरांचा ग्राहक बनवले जाते.
मौलिकता कमी होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आजचे शिक्षण मोठ्या प्रमाणावर रोजगारकेंद्रित झाले आहे. चांगली नोकरी, अधिक पगार आणि सामाजिक प्रतिष्ठा यांनाच अंतिम ध्येय मानले जाते. काय शिकायचे यावर भर असतो; पण का शिकायचे आणि कसे जगायचे हा प्रश्न मागे पडतो. त्यामुळे मध्यमवर्गीय पालक मुलांना जोखीम न घेता खात्रीचा मार्ग निवडण्याचा सल्ला देतात. वंचित घटकांसाठी शिक्षण हे अस्तित्व टिकवण्याचे महत्त्वाचे साधन असल्याने, त्यांनाही प्रयोगशीलतेपेक्षा निश्चित यश अधिक महत्त्वाचे वाटते. परिणामी समाजाच्या सर्व स्तरांवर एकच संदेश दिला जातो की “स्वतंत्र विचारापेक्षा सुरक्षित निकाल महत्त्वाचा.” त्यामुळे मौलिकता हा गुणधर्म न राहता धोक्याची गोष्ट वाटू लागते.
आजचे युग डिजिटल युग आहे. इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माहिती सहज उपलब्ध होते; पण त्याचबरोबर कॉपी-पेस्ट संस्कृती, तयार प्रकल्प आणि त्वरित उत्तरांवर अवलंबित्व वाढले आहे. विद्यार्थी माहिती पटकन मिळवतो; पण तिचे विश्लेषण किंवा स्वतःचे मत तयार करण्याची प्रक्रिया टाळतो. यात तंत्रज्ञान दोषी नाही; दोष त्या शैक्षणिक मानसिकतेचा आहे जी प्रक्रियेपेक्षा परिणामाला प्राधान्य देते. इथेच मौलिकता हरवताना दिसते.
नीतिमूल्ये, सहअस्तित्व, करुणा आणि सामाजिक जबाबदारी या संकल्पना अभ्यासक्रमात असल्या, तरी त्या अनेकदा पाठांतरापुरत्या मर्यादित राहतात. विद्यार्थ्यांना यश मिळवण्याचे मार्ग शिकवले जातात; पण सत्याशी प्रामाणिक राहण्याची ताकद शिकवली जात नाही. त्यामुळे बुद्धिमत्ता वाढते; पण भावनिक परिपक्वता मागे पडते. विवेकापेक्षा चलाखपणाला महत्त्व मिळते आणि हाच प्रवास मौलिकतेच्या जागी यांत्रिक यशाची संस्कृती निर्माण करतो.
सामाजिक माध्यमांनी मतप्रदर्शन सोपे केले; पण चिंतन करणे कठीण केले आहे. तात्काळ प्रतिक्रिया, आक्रमक आत्मप्रचार आणि घोषणाबाजी यांच्या वातावरणात सखोल विचाराला वेळ मिळत नाही. शिक्षणाने विचारशील नागरिक घडवायचे असताना आपण प्रतिक्रिया देणारे उपभोक्ते तयार करत आहोत. सत्यापेक्षा व्यक्तीचा प्रभाव आणि संवादापेक्षा ध्रुवीकरण या प्रवृत्ती मौलिकता मलीन करत आहेत.
ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नाही; अनेक देशांमध्येही असेच चित्र दिसते. अमेरिकन तत्त्वज्ञ Allan Bloom यांच्या The Closing of the American Mind या पुस्तकात उच्च शिक्षणाने नैतिक स्पष्टता आणि चिकित्सक विचार गमावल्याची टीका आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगले-वाईट ओळखण्याची क्षमता कमी होत असल्याचे ते दाखवतात. त्याचप्रमाणे जर्मन मानसतत्त्वज्ञ Erich Fromm यांच्या मते शिक्षणाचे उद्दिष्ट मानवी क्षमता विस्तारणे, प्रेम आणि स्वायत्तता जोपासणे हे आहे. म्हणजेच शिक्षणाने माहिती नव्हे, तर व्यक्तिमत्त्व आणि विवेक घडवला पाहिजे. आणि हे मौलिकता असल्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच इथे Martin Luther King Jr. यांचे वाक्य येथे अत्यंत समर्पक वाटते. ते म्हणतात, “नैतिकतेशिवायचे शिक्षण म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज.”
मौलिकता ही फक्त शैक्षणिक मूल्य नाही; ती लोकशाहीची पायाभूत गरज आहे. ज्या समाजात प्रश्न विचारण्याची सवय कमी होते, तिथे निर्णयांवर चिकित्सक चर्चा कमी होते. शिक्षण जर विद्यार्थ्यांना फक्त माहिती देत असेल, तर ते आज्ञाधारक समाज तयार करेल; पण विचारक्षम समाज नाही. म्हणून शिक्षणातील मौलिकता मलीन होण्यापासून वाचवली पाहिजे. त्यासाठी परीक्षांच्या पलीकडे जाऊन विचारप्रक्रियेला मूल्यमापनात स्थान द्यावे लागेल.
शिक्षकांना प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य आणि अपयश स्वीकारण्याची मोकळीक द्यावी लागेल. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा केंद्रबिंदू मानावे लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजाने वेगळा विचार करणाऱ्या तरुणांकडे संशयाने नव्हे, तर आदराने पाहायला शिकले पाहिजे. इतिहास विवेक शिकवू शकतो, विज्ञान जबाबदारीची जाणीव करून देईल आणि साहित्य संवेदना देईल. या सर्वातून मौलिकता विकसित होण्यास मदत होईल. त्यासाठी विद्यार्थांना अवांतर वाचन, चर्चा आणि प्रश्न विचारण्याची मुभा दिल्यास विद्यार्थ्यांची बौद्धिक व नैतिक शक्ती वाढते
आज शिक्षण क्षेत्रातील मौलिकता मलीन होताना दिसत आहे. ही केवळ नीतिमूल्यांची घसरण नाही किंवा शिक्षणव्यवस्थेची अपयशकथा नाही; तर ती समाजासाठी इशाराघंटा आहे. कारण शिक्षण हेच असे साधन आहे, जे माणसातील राक्षसी वृत्तीवर विवेक, करुणा आणि मानवतेच्या बळावर मात करू शकते. मात्र त्यासाठी शिक्षणात मौलिकता केंद्रस्थानी असावी लागेल. अन्यथा प्रगतीच्या झगमगाटात माहिती वाढेल, कौशल्ये वाढतील; पण माणूस हरवेल, आणि तोच शिक्षणाचा सर्वात मोठा पराभव ठरेल.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

अगदी बरोबर.
ReplyDeleteखूप छान चिंतन आणि विश्लेषण केलं आहे