विषय : इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता
शब्दांकन : योगेश गोगवेकर
आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात.
हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” असे सांगितले. अशा वेळी प्रश्न पडतो — मराठी भाषा, मराठी संस्कार आणि मराठी साहित्य किती काळ जिवंत राहणार?
“आम्ही मराठी माध्यमातून शिकलो म्हणून आमची प्रगती मर्यादित राहिली” किंवा “इंग्रजी बोलता येत नव्हते म्हणून मुलांना इंग्रजी माध्यमात घातले,” अशी कारणे अनेकदा पुढे केली जातात. पण येथेही एक प्रश्न विचारावासा वाटतो की इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुले खरोखरच इंग्रजी व्यवस्थित बोलू किंवा लिहू शकतात का? त्यांना इंग्रजी साहित्याची ओळख असते का? फक्त न घाबरता इंग्रजी बोलता येणे म्हणजे भाषेवर प्रभुत्व असे म्हणता येणार नाही.
माझा इंग्रजी माध्यमाला विरोध अजिबात नाही; परंतु आपल्या मुलांना स्वतःची मातृभाषा चांगली बोलता आणि लिहिता यावी यासाठी आपण प्रयत्न करतो का, हा खरा प्रश्न आहे. माझ्या एका मित्राच्या मुलाने मुंबईच्या इतिहासावर पुस्तकांची नावे विचारली. मी काही मराठी पुस्तकांची नावे सांगितली असता त्याने, “मला मराठी वाचता येत नाही, इंग्रजी पुस्तकांची नावे सांगा,” असे सांगितले. ही परिस्थिती विचार करायला लावणारी आहे.
आज अनेक तरुण “मी आली, मी गेली” किंवा “मला पेन भेटले” अशा चुकीच्या वाक्यरचना सहज वापरतात. त्याहून वाईट म्हणजे त्यांच्या पालकांकडून भाषेची दुरुस्ती करण्याऐवजी, “ही आजच्या पिढीची भाषा आहे,” म्हणून त्याचे कौतुक केले जाते. अशा वेळी कवी अनिलांची ओळ आठवते, "असे मराठी आमुची मायबोली, परंतु राज्यभाषा नसे.” ही कविता महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वी लिहिली गेली होती. आज मात्र थोडासा बदल करून म्हणावेसे वाटते, "असे मराठी आमुची राज्यभाषा, परंतु मायबोली नसे.”
मित्रहो, मराठी ही एक परिपूर्ण भाषा आहे. तिचे स्वतःचे व्याकरण आहे, वैचारिक सामर्थ्य आहे आणि सर्व प्रकारचे समृद्ध साहित्य तिच्यात उपलब्ध आहे. तरीही आपण मराठीला दुय्यम स्थान का देतो आहोत, हे समजत नाही. मी स्वतः मराठी माध्यमातून शिक्षण घेतले असून आज मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिहितो आणि बोलतो. सरावाने सर्व गोष्टी सहज साध्य होतात; त्यासाठी मेहनत आणि सातत्यपूर्ण वाचन आवश्यक असते. विद्वानांचे लेखन आणि भाषणे वाचल्याशिवाय भाषा समृद्ध होत नाही.
मी कधीही असे म्हणत नाही की इंग्रजी भाषा शिकू नये. उलट, ती सर्वांनी शिकावी, कारण ती ज्ञानप्राप्तीची एक महत्त्वाची खिडकी आहे. मात्र खिडकी म्हणजे घर नव्हे. इंग्रजीतून शिका, त्याचा उपयोग करा; पण मराठी भाषेलाही आपल्या दैनंदिन व्यवहारात योग्य स्थान द्या. कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि तिचे साहित्य अमूल्य आहे.
शेवटी कुसुमाग्रजांच्या ओळींनी हा लेख संपवतो.
“माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जगल्या, दऱ्या-खोऱ्यातील शिळा.”
धन्यवाद.
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment