Skip to main content

पुस्तक माझे सोबती

 


शुभंकरोति साहित्य परिवार
मंगळवार उपक्रम
विषय: पुस्तक माझे सोबती
उपक्रमप्रमुख: मा. अंजनाताई कर्णिक
शब्दांकन: योगेश गोगावेकर, माहीम, मुंबई

या गजबजलेल्या आणि संभ्रमित जीवनात तुमचा खरा सोबती किंवा मित्र कोण, असे जर तुम्ही मला विचारले, तर मी सांगेन की पुस्तकच माझा सर्वात विश्वासू मित्र आहे. कारण पुस्तकेच माझ्या मनावरील ताण हलका करतात आणि कमकुवत क्षणी मनाला धीर देतात. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहेत की ज्यातून मला जाणवले की निराशेच्या गर्तेत अडकलेल्या माणसाला पुस्तकच बाहेर काढू शकते. त्यातील असा एक प्रसंग खाली दिला आहे.

मी मुंबईतील वित्त पुरवठा करणाऱ्या गैर-बँकिंग कंपनीत अंतर्गत तपासनीस म्हणून कामाला होतो. आमच्या कंपनीच्या अनेक शाखा भारतभर आहेत. त्यामुळे मला बऱ्याचवेळा प्रवास करावा लागत असे. सुरुवातीला मला महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील शाखांमध्ये जाऊन तेथील व्यवहार तपासावे लागत असत. त्यामुळे प्रवास करणे जरुरीचे होते. बऱ्याचवेळा हा प्रवास मला एकट्यानेच करावा लागत असे.

असेच एकदा मला मुंबईवरून नागपूरला जावे लागले. वाचनाची आवड लहानपणापासून असल्यामुळे मी कुठेही प्रवासाला निघालो की माझ्याकडे कमीतकमी तीन-चार पुस्तके जवळ असतातच. मुंबईहून नागपूरला रेल्वेने जाणे म्हणजे जवळपास पंधरा-सोळा तासांचा प्रवास असतो. खिडकीतून दिसणारी शहराची धावपळ मागे पडू लागली आणि हिरवीगार शेते, लहान गावे, डोंगररांगा नजरेसमोरून सरकू लागल्या.

काही वेळ निसर्ग पाहण्यात गेला. मग हळूहळू कंटाळा यायला लागला. सहप्रवासी आपापल्या कामात गुंतले होते. काही जण मोबाईलवर बोलत होते, काही झोपले होते, तर काहीजण एकमेकांशी गप्पा मारत होते. माझ्याशी संवाद साधणारे कोणी नव्हते. मी एकटाच गाडीत बसलो होतो. खिडकीबाहेर अपरिचित गावं दिसत होती, अनोळखी चेहरे क्षणभर नजरेसमोर येत होते आणि पुढच्या क्षणी अदृश्य होत होते. वेळ जणू थांबून राहिल्यासारखा वाटत होता. मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती.

नंतर मी माझ्या बॅगेत ठेवलेले एक पुस्तक काढले आणि वेळ घालवण्यासाठी म्हणून मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. हळूहळू मी त्या पुस्तकाच्या विश्वात हरवून जाऊ लागलो. त्या पुस्तकाच्या कथेतली पात्रे माझ्याशी बोलू लागली. त्यांच्या सुख-दुःखांमध्ये मी सहभागी होऊ लागलो. लेखकाने मांडलेले विचार माझ्या मनाला स्पर्श करून गेले. बाहेरून रेल्वेचा आवाज येत होता, स्टेशन येत-जात होती, प्रवासी चढत-उतरत होते; पण माझे लक्ष मात्र पुस्तकातच गुंतले होते.

काही वेळापूर्वी जो प्रवास मला कंटाळवाणा वाटत होता, तो आता आनंददायी झाला होता. वेळ कसा जात होता हे कळत नव्हते. खिडकीबाहेरची दृश्ये बदलत होती, परंतु पुस्तकातील कथा आणि विचार माझ्यासोबत कायम होते. त्या पुस्तकाने केवळ माझा प्रवास सुखकर केला नाही, तर मला विचार करायला लावले, नवीन अनुभव दिले आणि एकटेपणाची जाणीवही दूर केली.

रात्री जेव्हा मी झोपण्याची तयारी करीत होतो, तेव्हा त्या शांत वातावरणात मला एक गोष्ट जाणवली—माणसे काही काळासाठी आपल्यासोबत असतात; त्यांच्या सहवासाला मर्यादा असतात. परंतु पुस्तकांचे तसे नसते. आपण जेव्हा त्यांची साथ शोधतो, तेव्हा ती तत्परतेने आपल्याजवळ येतात. आपल्याला ज्ञान देतात, मनोरंजन करतात, विचारांची नवी दालने उघडतात आणि प्रसंगी मानसिक आधारही देतात.

आज जेव्हा मी एखादे पुस्तक हातात घेतो, तेव्हा मला माझ्या कंपनीसाठी केलेल्या मुंबई नागपूर प्रवासाची आठवण येते आणि एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे, प्रवास कोणताही असो, आयुष्याचा किंवा रेल्वेचा; सर्वात विश्वासू आणि निःस्वार्थ सहप्रवासी म्हणजे पुस्तक. मुंबई नागपूर प्रवासात स्टेशन बदलत राहिली, सहप्रवासी बदलत राहिले, बाहेरची दृश्ये बदलत राहिली; मात्र पुस्तकाने माझी साथ सोडली नाही. त्या दिवसापासून माझा पुस्तकांवरील विश्वास अधिक दृढ झाला.

याच संदर्भात सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ Will Durant यांनी The Great Minds and Ideas of All Time या पुस्तकात पुस्तकांच्या मैत्रीबद्दल अत्यंत सुंदर विचार मांडले आहेत. ते म्हणतात, “जीवन हे साहित्यापेक्षा अधिक सुंदर आहे, मैत्री ही तत्त्वज्ञानापेक्षा अधिक मधुर आहे आणि मुले आपल्या हृदयात अशी गूढ स्वरमाधुरी निर्माण करतात की ती कोणत्याही सिंफनीपेक्षा अधिक गहन असते. तरीही या जिवंत आनंदांमुळे पुस्तकांमधून मिळणाऱ्या साध्या आणि दुय्यम आनंदांचे महत्त्व कमी होत नाही.”

जेव्हा जीवन कडू वाटू लागते, मैत्री हातातून निसटून जाते किंवा आपली नातेवाईक स्वतःच्या वाटेने निघून जातात, तेव्हा आपण राम गणेश गडकरी आणि सुरेश भट यांच्यासोबत एका टेबलावर बसू शकतो; पु ल देशपांडे किंवा आचार्य अत्रे यांच्यासोबत जगावर हसू शकतो; नरहर कुरुंदकर किंवा हमीद दलवाई यांच्यासोबत विचारविनिमय करू शकतो; आणि बोरकर किंवा मर्ढेकरांच्या नजरेतून जगाचे शरदातील सौंदर्य अनुभवू शकतो. कारण हे असे मित्र आहेत की जे आपल्याला नेहमी त्यांचे सर्वोत्तमच देतात, कधी उलट उत्तर देत नाहीत आणि आपल्या हाकेला सदैव प्रतिसाद देण्यासाठी तयार असतात. त्यांच्या सहवासात थोडा काळ चाललो, त्यांच्या विचारांना नम्रपणे ऐकले, तर आपल्या दुर्बलता दूर होतात आणि समजुतीतून येणाऱ्या शांततेचा अनुभव आपल्याला मिळतो.

खरेच, पुस्तके कधीही आपल्याला फसवत नाहीत, दुखावत नाहीत किंवा सोडून जात नाहीत. आपण त्यांना कधीही उघडावे, ती आपल्याशी संवाद साधण्यासाठी तत्पर असतात. दुःखात ती आधार देतात, संभ्रमात दिशा दाखवतात आणि आनंदात विचारांची भर घालतात.

शेवटी मी एवढेच म्हणेन की पुस्तकांनी मला जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत; परंतु त्या प्रश्नांकडे नव्या दृष्टीने पाहण्याची क्षमता दिली. त्यांनी मला विचार करायला शिकवले, स्वतःशी संवाद साधायला शिकवले आणि संकटांच्या काळात धीर दिला. कदाचित, कोणत्याही खऱ्या मित्राची हीच सर्वात मोठी देणगी असते. म्हणूनच माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक प्रवासात आणि प्रत्येक एकांत क्षणी पुस्तके माझे विश्वासू सोबती राहिली आहेत.

या लेखाचा शेवट करताना मला पुन्हा एकदा तेच वाक्य आठवते — प्रवास कोणताही असो, आयुष्याचा किंवा रेल्वेचा; सर्वात विश्वासू आणि निःस्वार्थ सहप्रवासी म्हणजे पुस्तक.

धन्यवाद
योगेश गोगवेकर


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...