विषय: आपण वार्ताहर आहोत आणि वर्तमानपत्रासाठी बातमी द्यायची आहे – बातमी अफलातून आणि अविश्वसनीय असली पाहिजे
शुभंकरोति साहित्य परिवार
सोमवार उपक्रम
विषय: आपण वार्ताहर आहोत आणि वर्तमानपत्रासाठी बातमी द्यायची आहे
उपक्रमकर्त्या: मा. सौ. राधाताई गर्दे
शब्दांकन: योगेश गोगवेकर, माहीम, मुंबई
संकेतस्थळ:
शीर्षक: स्वर्गीय रसिकांची गिरगाव चौपाटीवर अचानक उपस्थिती!
मुंबई, प्रतिनिधी — काल मध्यरात्री मुंबईतील गिरगाव चौपाटीवर घडलेल्या एका अविश्वसनीय घटनेने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रात्री साधारण बारा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत अचानक काही “विशेष” पाहुणे उपस्थित झाल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, गायक शंतनू परांजपे यांनी रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात राग काफी, त्यानंतर बागेश्री आणि पुढे मालकौंस यांचे सादरीकरण सुरू केले होते. मैफिल रंगात आली असतानाच प्रेक्षकांमध्ये अचानक कुजबुज सुरू झाली. कारण, पुढच्या रांगेत दोन परिचित चेहरे अत्यंत तन्मयतेने संगीताचा आस्वाद घेताना दिसले—एक होते शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आणि महान गायक पंडित कुमार गंधर्व आणि दुसरे विनोद, साहित्य व संगीताचे जाणकार पु. ल. देशपांडे!
“सुरुवातीला आम्हाला वाटले एखाद्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असावे,” असे एका नागरिकाने सांगितले. “पण मग आठवले की या दोघांनी इहलोक सोडून अनेक वर्षे झाली आहेत. तेव्हा आमचे पाय थरथरू लागले,” असे दुसरे एक प्रत्यक्षदर्शी म्हणाले.
घटनेची माहिती मिळताच काही जणांनी मोबाईल कॅमेरे काढले; मात्र आश्चर्य म्हणजे त्या छायाचित्रांमध्ये फक्त रिकाम्या खुर्च्या दिसत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. त्यामुळे गूढ अधिकच वाढले आहे.
दरम्यान, काही संगीतप्रेमींनी शंतनू परांजपे यांचे विशेष आभार मानले. “अशी मैफल होती की स्वर्गलोकातील रसिकांनाही पृथ्वीवर परत यावेसे वाटले,” अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ श्रोत्याने दिली.
या प्रकाराबाबत विचारले असता एका पोलीस अधिकाऱ्याने मिश्कील प्रतिक्रिया दिली—“स्वर्गलोकातून येणाऱ्या पाहुण्यांची नोंद आमच्या अखत्यारीत होत नाही. ते महसूल विभागाकडे विचारावे!”
हे वृत्त लिहीपर्यंत गिरगाव परिसरात “राग मालकौंस की चमत्कार?” यावर जोरदार चर्चा सुरू होती.
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment