शुभंकरोति साहित्य परिवार
सोमवारचा विषय
दिनांक; १८ मे २०२६
शब्दांकन: योगेश गोगवेकर
संकेतस्थळ:
नेणिवेचा डोह
मानवी
मन हे एक गूढ विश्व आहे. त्याच्या पृष्ठभागावर विचार, भावना आणि अनुभव
दिसतात; पण तळाशी अनेक न बोललेले अनुभव, दडवलेल्या भावना आणि स्मृतींचे
शांत तरंग दडलेले असतात. त्या गूढ तळालाच आपण नेणिवेचा डोह म्हणू शकतो.
नेणिवेचा
डोह” ही मानसशास्त्र आणि आध्यात्मिक साहित्यात वापरली जाणारी संकल्पना
आहे. नेणिव म्हणजे असा सुप्त भाग जो कुठेतरी अंधारात दडपलेला असतो आणि त्या
भागाची आपल्याला बहुतेकदा जाणीव होत नसते. मानसशास्त्रात त्याला अचेतन मन
म्हटले जाते तर आध्यात्मिक किंवा संत साहित्यात जाणीवेचा अभाव म्हटले जाते.
मराठी
साहित्यात नेणिवेचा डोह ही एक चांगली आणि सर्जनशील कल्पनाशक्ती मानली
जाते. ही संकल्पना विशेषतः कलाकार, कवी, लेखक किंवा चित्रकार यांच्या
सर्जनशील प्रक्रियेशी जोडली जाते. याचे कारण असे की, कलाकारांच्या अनेक
कलाकृती जाणीवपूर्वक नव्हे, तर नेणिवेच्या तळाशी साठलेल्या अनुभव, भावना
आणि संवेदनांमधून साकार झालेल्या असतात.
जेव्हा माणूस स्वतःला जसा
समजतो, तसा तो खरोखरच असतो का? हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. काही
प्रसंग अस्वस्थ करून जातात किंवा एखाद्या सुगंधाने जुनी आठवण नकळत डोळ्यांत
पाणी आणते. या अनुभवांचे स्पष्टीकरण तर्काने नेहमीच देता येत नाही. कारण
ते मनाच्या नेणिवेच्या डोहातून वर आलेले तरंग असतात.
नेणिवेच्या
डोहाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे माणसाच्या न सांगितलेल्या भावना. प्रत्येक
व्यक्तीच्या मनात अनेक भावना असतात ज्या कधी शब्दांपर्यंत पोहोचतच नाहीत.
अशा भावना मनात साचत जातात. यातील काही उदाहरणे म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून
झालेल्या उपेक्षेची जखम, व्यक्त न झालेली माफी, हरवलेल्या क्षणांची ओढ.
समाज
आपल्याला संयम, शिस्त, व्यावहारिकता शिकवतो; पण अनेकदा भावना व्यक्त
करण्यासाठी लागणारी मोकळीक देत नाही. म्हणूनच अनेक मनांमध्ये भावनांचा न
बोललेला इतिहास दडून राहतो. हा इतिहास वेळोवेळी आठवणींच्या स्वरूपात,
स्वप्नांत किंवा एखाद्या क्षणिक उद्वेगातून प्रकट होत असतो. आजच्या सामाजिक
आणि राजकीय वास्तवातही अशा अनुभवांचे प्रतिबिंब अनेकदा दिसून येते.
नेणिवेच्या
डोहात डोकावण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचा शोध घेण्यासारखे आहे. इथे
आपण स्वतःला प्रश्न विचारू लागतो, तेव्हा तो आपल्या अंतर्मनाचा प्रवास
असतो. हा प्रवास काही सोपा नसतो; कारण त्यात स्वतःच्या कमकुवतपणाशी,
अपूर्णतेशी, दडवलेल्या भावनांशी आणि अनेकदा कडू सत्यांशी सामना करावा
लागतो. मात्र या शोधातूनच माणूस अधिक परिपक्व, संवेदनशील आणि आत्मजागरूक
बनतो.
मानवी मन हे फार गूढ असते आणि अनेकदा शब्दांच्या पलीकडचे
असते. त्याच्या मनात काही दुःखांना भाषा नसते, तर काही आनंदांना स्पष्टीकरण
नसते आणि काही प्रश्नांना उत्तरेही नसतात. म्हणून माणूस या गोष्टी व्यक्त
करण्यासाठी साहित्य, कविता, संगीत, चित्रकला किंवा अध्यात्म या गोष्टींच्या
माध्यमांकडे वळतो. कारण तेथे त्याला स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधता येत
असतो. जेव्हा एखादा कवी कविता लिहितो तेव्हा त्या कवितेतील ओळी हजारो
लोकांना स्वतःच्या अनुभवांतून आलेल्या वाटतात कारण प्रत्येकाच्या
नेणिवेच्या डोहात समान स्वरांचे प्रतिध्वनी असतात.
नेणिवेचा डोह ही
केवळ वैयक्तिक संकल्पना नसून तिला सामाजिक स्वरूपही असते. समाजाच्या
सामूहिक स्मृती, परंपरा, भीती, पूर्वग्रह, सांस्कृतिक मूल्ये आणि सामूहिक
आशा या सुद्धा एका मोठ्या सामाजिक नेणिवेचा भाग असतात. जेव्हा आपण समाजातील
काही गोष्टी दीर्घ अनुभवांच्या प्रभावामुळे आहेत तशाच स्वीकारतो, तेव्हा
कधी हा प्रभाव सकारात्मक असतो, तर कधी अंधश्रद्धा, भेदभाव किंवा
अन्यायालाही खतपाणी घालतो. म्हणूनच सामाजिक नेणिवेचा शोध घेणे हे
समाजपरिवर्तनासाठी तितकेच आवश्यक ठरते.
आजचे मानवी जीवन वेगवान,
तंत्रज्ञानकेंद्री आणि सतत धावपळीचे झाले आहे. यश, प्रसिद्धी, सामाजिक
मान्यता यामागे धावताना माणसाची अंतर्मनातील शांत स्वर ऐकण्याची
संवेदनशीलता कमी होत चालली आहे. सोशल मीडियावर माणूस सतत दिसत असतो, पण
स्वतःशी त्याचा संवाद मात्र कमी झालेला असतो. अशा वेळी नेणिवेचा डोह ही
संकल्पना अधिक महत्त्वाची वाटते; कारण हीच संकल्पना आपल्याला स्वतःकडे
पाहण्याची आठवण करून देते.
माणसाच्या मनाचा खरा प्रवास बाह्य जगात
नसून अंतर्मनाच्या शांत डोहात सुरू असतो. त्या डोहात डोकावण्याचे धैर्य
ज्याने केले, त्यालाच स्वतःचा आणि समाजाचा खरा अर्थ उमगू लागतो. कारण
नेणिवेचा डोह जितका गूढ आहे, तितकाच तो आत्मशोधाचा आरसाही आहे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

यशोदा भागवत
ReplyDelete