शुभंकरोति साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक: २१४
विषय क्रमांक: ४
विषय: जगी सर्व सुखी असा कोण आहे? (वैचारी लेख)
शब्दांकन: योगेश गोगवेकर
परीक्षक- मा. राधाताई गर्दे, कोल्हापूर
लहानपणापासून ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेले, ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’ हे जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गाणे आजपर्यंत ऐकत आलो आहे. या गाण्यात जीवनाचे मर्म सांगितले आहे. ते सांगताना कवी मानवी आयुष्याची तुलना एका वस्त्राशी करतो, जे सुखाच्या एका धाग्यावर आणि दुःखाच्या १०० धाग्यांनी विणले गेले आहे.
वरील गाण्यात कवी म्हणतो की आयुष्यात दुःखाचे प्रमाण सुखापेक्षा जास्त असते, पण तो एक सुखाचा धागा संपूर्ण आयुष्याला अर्थपूर्ण किंवा जरतारी बनवतो. याचाच अर्थ असा की सुखाची नेमकी व्याख्या करणे कठीण आहे, कारण ती व्यक्तीसापेक्ष असते. म्हणजेच प्रत्येकासाठी तिचे स्वरूप वेगळे असू शकते.
“जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे...” हा प्रश्न समर्थ रामदासांनी विचारला आणि शतकानुशतके माणूस त्याचे उत्तर शोधत राहिला. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणेपणा असतोच. कुणाकडे संपत्ती असते पण मनःशांती नसते, कुणाकडे प्रसिद्धी असते पण जवळची माणसे नसतात, तर कुणाकडे सर्व काही असूनही अंतर्मनात एक पोकळी कायम घर करून बसलेली असते.
म्हणूनच सुख ही केवळ बाह्य परिस्थिती नसून ती अंतर्मनाची अवस्था आहे, हे समजून घेणे आवश्यक ठरते.
माणसाचे मन नेहमी सुखाच्या भोवती फिरत असते आणि ते सुख मिळविण्यासाठी माणूस जगभर हिंडत असतो. त्यासाठी तो भरपूर मेहनतही करतो; पण तरीही त्याला खऱ्या अर्थाने सुखी झालेली माणसे फारशी दिसत नाहीत. कारण सुख म्हणजे नेमके काय, याचा तो शांतपणे विचारच करत नाही. प्रत्येक छोटी गोष्ट मनासारखी झाली नाही की तो अस्वस्थ होतो आणि नकळत सुखापासून दूर जातो.
भगवद्गीतेत सांगितलेला “सुख-दुःखे समे कृत्वा…” हा विचार इथे अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कारण जीवनात सुख आणि दुःख ही दोन्ही येणारच आहेत; परंतु त्यांच्याकडे समत्वाने पाहण्याची वृत्तीच माणसाला स्थिर आनंद देऊ शकते.
“सुख हे अनुभवांमध्ये असते, मालकीमध्ये नाही.” हे वाक्य जीवनाचा मोठा अर्थ सांगून जाते. समजा, एखादे पुस्तक शोधत आपण वाचनालयात जातो आणि तेच पुस्तक अचानक आपल्या समोर दिसते. त्या क्षणी मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. तिथे ना मोठी संपत्ती असते, ना प्रसिद्धी; पण मन मात्र भरून येते.
यावरून जाणवते की सुख फार मोठ्या गोष्टींमध्ये नसते, तर छोट्या क्षणांच्या अनुभूतीत दडलेले असते.
अनेकदा आपण मोठ्या व्यक्तिमत्त्वांविषयी आकर्षण बाळगतो. एखाद्या आवडत्या कलाकाराशी, लेखकाशी किंवा खेळाडूशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली, तर तो क्षण अविस्मरणीय ठरतो. त्या वेळी जाणवते की आनंद हा वस्तूंच्या मालकीत नसून अनुभवांच्या उबेत असतो.
तरीसुद्धा माणूस सतत आणखी काहीतरी मिळविण्याच्या मागे धावत राहतो. “आणि काय हवे?” हा प्रश्न तो स्वतःलाच सतत विचारत असतो. अलीकडेच एका मित्राशी बोलताना तो म्हणाला की त्याला यशाचीच भीती वाटते. कारण यश असेपर्यंतच अनेक नाती आपल्याभोवती राहतात, असे त्याला वाटत होते. त्याच्याकडे सर्व काही होते; पण समाधान नव्हते.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाह्य यश आणि अंतर्मनातील समाधान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पैसा, सत्ता, प्रसिद्धी यामुळे सुविधा मिळू शकतात; पण समाधान मिळेलच असे नाही. समाधानासाठी आत्मपरीक्षण आवश्यक असते.
आपण कोण आहोत? आपल्याला नेमके काय हवे आहे? आपल्याला कशाची खंत आहे? कोणत्या गोष्टीचा अभिमान आहे? हे प्रश्न स्वतःला विचारण्याची हिंमत लागते. माणूस जेव्हा स्वतःच्या अंतरंगाकडे पाहू लागतो, तेव्हाच त्याला खऱ्या सुखाची दिशा सापडते.
आपण जे काम करतो ते आवडीने आणि प्रेमाने केले, तर त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो. आपल्या कौशल्याचा उपयोग होताना माणूस आतून समाधानी होत जातो. अभिमान आणि गर्व बाजूला ठेवून जर माणूस कामात रमला, तर अपयशाची भीती कमी होते आणि नाती तुटण्याचीही चिंता राहत नाही. कारण मग यश हे केवळ लोकांच्या टाळ्यांमध्ये नसून आपल्या कामातील प्रामाणिकपणात सापडू लागते आणि यातच मोठे सुख असते.
काही वर्षांपूर्वी मी क्रिकेटवरील एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे एका ज्येष्ठ क्रिकेटपटूने जुन्या काळातील क्रिकेटच श्रेष्ठ होते, असे मत व्यक्त केले. डॉन ब्रॅडमन, किथ मिलर, गॅरी सोबर्स यांसारख्या महान खेळाडूंचा उल्लेख त्यांनी केला; पण त्याचवेळी नंतरच्या पिढीतील खेळाडूंमध्ये त्यांना तितके सौंदर्य दिसत नसल्याचेही सांगितले.
तेव्हा मला वाटले की खेळातसुद्धा प्रत्येक काळाचे स्वतःचे सौंदर्य असते. सुनील गावस्करने वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजीसमोर दाखवलेले धैर्य, कपिल देवची अष्टपैलू कामगिरी, सचिन तेंडुलकरची शारजातील वादळी खेळी, विराट कोहलीची चिकाटी—हे सारेही आनंद देणारे अनुभवच नाहीत काय? याचाच अर्थ असा होतो की सुख हे कणभर गोष्टीत दडलेले असते, फक्त ते शोधून उपभोगता यायला हवे.
क्रिकेटमध्ये जशी अनेक सौंदर्यस्थळे आहेत, तशीच ती नाटक, सिनेमा, संगीत आणि साहित्यातही आहेत. काही लोकांना चित्रपट, नाटके किंवा संगीत यासाठी वेळ देणे म्हणजे वेळ वाया घालवणे वाटते; पण प्रत्यक्षात ही कलाच माणसाला जगण्याची नवी दृष्टी देत असते.
चार्ली चॅप्लिनच्या Limelight चित्रपटातील तो उपेक्षित नट रंगभूमीकडे परत परत का जातो? कारण नाटक हे त्याचे केवळ काम नसते; ते त्याचे वेड असते. ज्या गोष्टीत माणूस पूर्णपणे झपाटून जातो, तिथेच त्याला आनंदाचे खरे रूप दिसते.
म्हणून इथे असे म्हणता येईल की, सुख येण्याची वाट पाहण्यापेक्षा, आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहून छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधला तर प्रत्येक क्षण सुखाचा होऊ शकतो.
संगीत आणि साहित्यही माणसाचे अंतर्मन समृद्ध करत असते. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी किंवा लता मंगेशकर यांचे स्वर ऐकताना माणूस काही क्षणांसाठी स्वतःला विसरून जातो. पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, इरावती कर्वे यांसारख्या लेखकांचे लेखन माणसाला अंतर्मुख करते. वाचनामुळे विचारांची बैठक पक्की होते आणि मन नकारात्मकतेपासून दूर राहते. त्यामुळे सुखी असणे हे बऱ्याच अंशी आपल्या हातात असते, हे जाणवू लागते.
माणूस अनेकदा इतरांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःला दुःखी समजतो. दुसऱ्याचे हसू दिसते; पण त्यामागची वेदना दिसत नाही. प्रत्येक जण आपापले ओझे घेऊन जगत असतो. कोणाला आर्थिक चिंता असते, कोणाला नात्यांची, तर कोणाला मानसिक अस्थिरतेची.
“दुःख हे जीवनाचे शिक्षण असते.” दुःख माणसाला परिपक्व बनवते. संकटे माणसाला स्वतःची खरी ओळख करून देतात. संघर्षातूनच सहनशीलता निर्माण होते. म्हणूनच दुःख हे केवळ वेदना नसून जीवन समजून घेण्याचा एक मार्ग असतो.
खरे तर प्रत्येक माणसाला शांती आणि आनंद दोन्ही हवे असतात. ज्ञान त्याला विचार देते, निष्ठा स्थैर्य देते आणि भक्ती आनंद देते. कुणी गातो, कुणी चित्र काढतो, कुणी कविता लिहितो, तर कुणी उत्तम स्वयंपाक करतो—या सगळ्या कृतींमध्ये आनंदाचे छोटे छोटे झरे वाहत असतात.
आजच्या धावपळीच्या जगात माणूस सुख बाहेर शोधत राहतो; पण ते प्रत्यक्षात त्याच्या अंतर्मनातच दडलेले असते. समाधान, कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा, आवडत्या कामात रमणे, कला-साहित्याचा आस्वाद घेणे आणि स्वतःला समजून घेणे, यांतूनच खरे सुख जन्माला येते.
म्हणूनच “जगी सर्व सुखी असा कोण आहे?” या प्रश्नाचे उत्तर कदाचित असे असू शकते की पूर्णपणे सुखी कोणीच नसते; पण जो माणूस सुख-दुःखांना समत्वाने स्वीकारतो, छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधतो आणि स्वतःशी प्रामाणिक राहतो, तोच खऱ्या अर्थाने समाधानी आणि सुखी असतो.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

यशोदा भागवत
ReplyDelete