Skip to main content

मला समजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर (वैचारिक लेख )

 


शुभंकरोति साहित्य परिवार
विषय क्रमांक: ३
विषय: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, मला समजलेले .... डॉ. बाबासाहेब आंबेडकर (वैचारिक लेख)
शब्दांकन: योगेश गोगवेकर, माहीम, मुंबई
परीक्षक: सौ. सपनाताई फुलझेले, नागपूर
संकेतस्थळ:

१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यादिवशी या महामानवाला त्रिवार सलाम करण्यात आला. या जयंतीनिमित्त ‘मला समजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा लेख लिहिताना त्यांच्या विचारांशी एकरूप होण्याची संधी मिळत आहे, असे मला वाटते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्ताने या महान व्यक्तीचे स्मरण करताना त्यांच्या कोणत्या पैलूंचे स्मरण करावे हे ठरवणे कठीण आहे; कारण ते विद्वान, तत्त्वज्ञ, राजकीय नेते, अर्थतज्ज्ञ, जागतिक दर्जाचे वकील आणि गाढे बौद्धिक लेखक होते. त्यांच्या आयुष्याने जातिभेदाच्या अडथळ्यांवर मिळवलेल्या विजयाची प्रेरणादायी गाथा उभी केली आहे.

महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, राजाजी, खान अब्दुल गफार खान आणि डॉ. आंबेडकर यांच्या चरित्रांविषयी मला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कितीही वाचले, तरी त्यांना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी सातत्याने विविध अंगांनी वाचन करत राहणे आवश्यक वाटते.

या सर्वांमध्ये बाबासाहेबांचे जीवन समजून घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते—ती म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये अनेकदा परस्परविरोधी वाटणाऱ्या प्रेरणा दिसतात. एका बाजूला त्यांनी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी कठोर संघर्ष केला. त्यामुळे त्यांचा हिंदू समाजावर रोष होता; पण दुसऱ्या बाजूला त्यांचे मन भारतीयत्वाशी नितांत जोडलेले होते. त्यांना भारतीय म्हणूनच जगायचे होते.

सायमन कमिशनसमोरील साक्ष असो किंवा गोलमेज परिषदेतली मांडणी—अनुसूचित जातींच्या हक्कांबरोबरच त्यांच्या विचारांमध्ये प्रखर राष्ट्रवाद स्पष्टपणे दिसतो. १९३८ मधील त्यांच्या एका भाषणात ते म्हणतात, “लोकांनी भारतीय आणि फक्त भारतीय राहावे, असे मला वाटते.” हे शब्द त्यांच्या अंत:करणातून आलेले होते. अशा प्रकारचा राष्ट्रवाद केवळ राजकीय नसून, तो मूल्याधिष्ठित आणि व्यापक होता.

बाबासाहेबांनी कधीही भारताच्या भूतकाळाचे किंवा परंपरांचे अंध महिमामंडन केले नाही. त्यांचे वाचन व्यापक प्रमाणावर होते. त्याशिवाय त्यांनी मराठी, हिंदी, गुजराती, पाली, फ्रेंच, जर्मन, पर्शियन, संस्कृत आणि इंग्रजी अशा नऊ भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्या सर्व लेखनात सखोल अभ्यास, चिंतन आणि वास्तवदर्शी दृष्टी दिसून येते आणि ते आजही तितकेच उपयुक्त आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे ते केवळ दलितांचे नेते नव्हते; तर महिला, मजूर आणि सर्व शोषितांचेही नेते होते. त्यांची ओळख फक्त संविधानकार म्हणून मर्यादित नव्हती. ते विचारवंत, कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक क्रांतिकारक तर होतेच; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते अर्थतज्ज्ञ होते.

आर्थिक क्षेत्रातही आंबेडकरांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी कायदे, औद्योगिक विकासाची गरज आणि संसाधनांचे न्याय्य वाटप यावर भर दिला. जलनीती, शेती सुधारणा आणि औद्योगिकीकरण याबाबत त्यांनी मांडलेले विचार आजही प्रासंगिक आहेत. त्यांनी ब्रिटिश भारतातील चलन व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेसारख्या केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली आणि आर्थिक संकटांमागील ब्रिटिश धोरणांचे विश्लेषण केले.

१४ एप्रिल १८९१ साली मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेल्या बाबासाहेबांनी बालपणापासूनच जातीय भेदभावाचा सामना केला. मात्र, त्यांनी शिक्षणाच्या जोरावर समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले आणि भारतात परतल्यानंतर सामाजिक बदलासाठी आयुष्य समर्पित केले.

त्यांनी ज्ञानाला आपल्या संघर्षाचे शस्त्र बनवले. अस्पृश्यतेचा अभिशाप सहन करावा लागूनही, त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले. त्यांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्धचा संघटित आणि तर्कशुद्ध संघर्ष. त्यांनी अस्पृश्यतेच्या वेदना अनुभवल्या, पण त्या वेदनांना केवळ भावनिक प्रतिसाद देण्याऐवजी त्यांनी त्याचे बौद्धिक विश्लेषण केले. त्यांना समजून घेताना हे लक्षात येते की, ते केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते एक मानवतावादी होते. त्यांनी शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हे केवळ घोषवाक्य नाही, तर सामाजिक परिवर्तनाची त्रिसूत्री होती.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेण्याचा प्रयत्न जितका सखोल केला, तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी असल्याची जाणीव झाली. “मला समजलेले बाबासाहेब” या दृष्टीने विचार करताना विविध अभ्यासकांचे लेखन आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आंबेडकर उलगडून दाखवते. त्यापैकी काहींचे विचार मी खाली मांडत आहे. त्यांच्या विचारातून मला समजले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नसून, एक विचारप्रवाह आहेत.

महात्मा गांधी यांनीदेखील डॉ. आंबेडकरांविषयी मोठा आदर व्यक्त केला होता. त्यांनी एका पत्रात नमूद केले की, आंबेडकरांचा काँग्रेस आणि तिच्या समर्थकांविषयीचा रोष स्वाभाविक आहे; कारण त्यांनी अस्पृश्यांवर झालेले अमानुष अन्याय प्रत्यक्ष पाहिले होते आणि स्वतः इतक्या शिक्षण व सन्मानानंतरही त्यांना अपमान सहन करावा लागला होता. यावरून स्पष्ट होते की, राजकीय मतभेद असूनही गांधीजींच्या मनात बाबासाहेबांविषयी आदर होता.

सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक नरहर कुरुंदकर यांनी त्यांच्या आकलन या पुस्तकात डॉ. आंबेडकरांविषयी लिहिताना एक अत्यंत महत्त्वाची बाब अधोरेखित केली आहे. कुरुंदकर म्हणतात की, आंबेडकरांना समजून घेण्यासाठी केवळ त्यांच्या राजकीय कृतींकडे पाहणे अपुरे आहे; त्यांच्या विचारसरणीची व्याप्ती समजून घेणे आवश्यक आहे. त्यांनी आंबेडकरांच्या लिखाणातील बौद्धिक कणखरता आणि सामाजिक वास्तवाची अचूक जाण यावर विशेष भर दिला आहे.

कुरुंदकरांच्या मते, आंबेडकरांचा संघर्ष हा केवळ एका समाजघटकासाठी नव्हता, तर संपूर्ण भारतीय समाजाच्या बौद्धिक मुक्ततेसाठी होता. त्यांनी माणसाला केंद्रस्थानी ठेवून समाजरचना पाहिली. म्हणूनच त्यांनी धर्म, परंपरा आणि रूढी यांचे अंधानुकरण न करता त्यांचा चिकित्सक दृष्टीने विचार केला. हीच दृष्टी आजच्या काळात अधिक आवश्यक वाटते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्याचा व्यापक संदर्भ लक्षात घ्यावा लागतो. त्यांनी भारतीय समाजातील सर्वात खोलवर रुजलेल्या समस्यांवर, विशेषतः जातिव्यवस्थेवर जोरदार प्रहार केला. त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले की, जातिव्यवस्था ही केवळ सामाजिक अन्यायाची नव्हे, तर राष्ट्रीय एकात्मतेच्या आड येणारा हा सर्वात मोठा अडथळा आहे.

याबाबतीत भारतीय इतिहासाचे अभ्यासक आणि प्रख्यात लेखक रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या Makers of Modern India या ग्रंथात आधुनिक भारत घडविणाऱ्या प्रमुख विचारवंतांचा सखोल अभ्यास मांडला आहे. इथे गुहा आंबेडकरांच्या विचारसरणीतील एक महत्त्वाचा पैलू अधोरेखित करतात. तो म्हणजे त्यांचा तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. आंबेडकरांनी अंधश्रद्धा, परंपरागत अन्यायकारक रुढी आणि सामाजिक विषमता यांना तर्काच्या कसोटीवर तपासले. त्यांनी समाजाला विवेक, समानता आणि मानवाधिकारांच्या आधारावर पुनर्रचना करण्याचा विचार मांडला. हेच आधुनिकतेचे मुख्य लक्षण आहे, असे गुहा मानतात.

महिलांच्या हक्कांबाबत आंबेडकरांचे कार्य फार महत्त्वाचे आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना संपत्तीचा अधिकार, विवाहातील समानता आणि स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला. त्या काळात हा विचार अत्यंत प्रगत आणि क्रांतिकारक होता. महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय आधुनिक भारताची कल्पनाच अशक्य होती आणि यासाठी आंबेडकरांचे योगदान अनन्यसाधारण आहे. म्हणून रामचंद्र गुहा यांच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे एक प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांनी दिलेले विचार, मूल्ये आणि संस्था या आजच्या भारताच्या अस्तित्वाचे आधारस्तंभ आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना एक गोष्ट लक्षात येत की त्यांनी महिला, मजूर आणि सर्व शोषित घटकांचे प्रतिनिधित्व अत्यंत व्यापक दृष्टीने केले. त्यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा आवाका एका समाजघटकापुरता मर्यादित नव्हता; तो संपूर्ण भारतीय समाजाच्या मूलभूत पुनर्रचनेसाठी होता.

फ्रेंच राजकीय शास्त्रज्ञ क्रिस्तोफ जॅफ्रेलो यांनी याच मुद्द्यावर भर देताना नमूद केले आहे की, आंबेडकरांचा लढा हा केवळ दलितांच्या हक्कांसाठी नव्हता, तर तो सामाजिक समता, न्याय आणि मानवी प्रतिष्ठा यांवर आधारलेल्या नव्या समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी होता. यावरून मला समजलेले बाबासाहेब म्हणजे—समाजाच्या कोणत्याही एका घटकापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण मानवमुक्तीचा विचार करणारे आणि त्या दिशेने अखंड संघर्ष करणारे एक व्यापक विचारवंत.

अजून एका विचारवंताचा उल्लेख इथे करावा लागेल. ते विचारवंत म्हणजे सुप्रसिद्ध राजकारणी आणि लेखक मधु लिमये. मधु लिमये यांनी  डॉ. आंबेडकर: एक चिंतन या ग्रंथात आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व केवळ ऐतिहासिक संदर्भात नव्हे, तर वैचारिक संघर्षाच्या दृष्टीने उलगडले आहे. लिमये यांनी आंबेडकरांच्या विचारातील प्रखरता, त्यांची तडफ, आणि समाजरचनेविषयीची त्यांची अस्वस्थता यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे.

मधु लिमये यांच्या मते, आंबेडकरांचे आयुष्य हे एका अखंड बौद्धिक संघर्षाचे उदाहरण आहे. त्यांनी केवळ बाह्य सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा दिला नाही, तर भारतीय समाजाच्या मानसिकतेतील जडत्वालाही आव्हान दिले. म्हणूनच त्यांचे विचार कधी कधी कठोर, कडवे वाटतात; पण त्या कठोरतेमागे समाजाला जागे करण्याची तीव्र तळमळ आहे. म्हणून मी इथे म्हणीन की मला समजलेले बाबासाहेब म्हणजे कोणत्याही स्थितीशी तडजोड न करणारा, सत्यासाठी ठाम उभा राहणारा आणि समतेच्या मूल्यांसाठी अखंड झगडणारा विचारवंत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि वर्तमानपत्रात लिहिलेले लेख जरूर वाचले पाहिजेत. त्याशिवाय त्यांचे विचार समजून घेता येणार नाही. कारण त्यांच्या लेखांमधून त्यांचे विचार स्पष्ट होतात. त्यांनी लिहिलेल्या २० पुस्तकांपैकी खाली दिलेली ११ पुस्तके तरी जरूर वाचा. म्हणजे तुम्हाला डॉ. आंबेडकर समजून घ्यायला वेळ लागणार नाही. ती पुस्तके खालील प्रमाणे आहेत.

१. Small Holdings in India and their Remedies

२. The Problem of the Rupee

वरील दोन पुस्तकांतून बाबासाहेबांचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेले विचार समोर येतात.

३. Castes in India: या पुस्तकात त्यांनी जातिव्यवस्थेची सामाजिक रचना स्पष्ट केली. हिंदू समाजातील सांस्कृतिक एकता, जातींची निर्मिती आणि त्यांची वाढ याचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला.

४. Annihilation of Caste: हे त्यांचे अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारी पुस्तक आहे. यात त्यांनी जातिव्यवस्थेच्या दुष्परिणामांवर कठोर टीका करत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याची आवश्यकता स्पष्ट केली.

५. Ranade, Gandhi and Jinnah: या तुलनात्मक अभ्यासातून त्यांनी न्यायमूर्ती रणाडे यांच्या महानतेवर भर दिला आणि सामाजिक उद्दिष्टांनी प्रेरित नेतृत्वाचे महत्त्व स्पष्ट केले.

६. Thoughts on Pakistan: भारताच्या फाळणीच्या संदर्भात लिहिलेले हे पुस्तक वास्तववादी दृष्टिकोन मांडते. हिंदू-मुस्लिम संबंध, राजकीय इतिहास आणि त्या काळातील परिस्थितीचे सखोल विश्लेषण यात आहे.

७. What Congress and Gandhi have done to the Untouchables: या पुस्तकात त्यांनी काँग्रेस आणि गांधीजींच्या कार्याचे विश्लेषण करत, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत, असे मत मांडले.

८. Who were the Shudras? शूद्रांच्या इतिहासाचा समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अभ्यास करून त्यांनी ते पूर्वी क्षत्रिय होते, असा निष्कर्ष मांडला.

९. States and Minorities: या पुस्तकात त्यांनी संविधानाच्या माध्यमातून समाजवादी व्यवस्था कशी निर्माण होऊ शकते, हे स्पष्ट केले आणि संसदीय लोकशाहीचे समर्थन केले.

१०. Thoughts on Linguistic States: भाषिक राज्यरचनेबाबत त्यांनी “एक राज्य–एक भाषा” या तत्त्वाचा विचार मांडला आणि राष्ट्राला एकत्र ठेवण्यासाठी समान राष्ट्रीय भाषेची गरज अधोरेखित केली.

११. The Buddha and His Dhamma: बौद्ध धर्मावरील हे सखोल आणि विचारप्रवर्तक पुस्तक आहे. विविध धर्मांचा अभ्यास करून त्यांनी बौद्ध धर्म विज्ञानाशी सुसंगत असल्याचे सांगितले आणि बुद्धांच्या शिकवणीचे वास्तवदर्शी विश्लेषण केले.

या सर्व ग्रंथांमधून बाबासाहेबांचा विचार अधिक व्यापक आणि सखोल स्वरूपात समोर येतो.

डॉ. आंबेडकरांचे आधुनिक भारताच्या इतिहासात स्थान निर्विवाद आहे. ते एक ज्ञानमार्गी बंडखोर होते. त्यांच्या ग्रंथसंपदेचा अभ्यास करताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते ती म्हणजे त्यांच्यासारखा विद्वान विचारवंत भारताला लाभला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.

डॉ. आंबेडकरांना संविधानकार म्हणून समजून घेताना त्यांनी लोकशाहीविषयी मांडलेले महत्त्वाचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. ते म्हणतात, “लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून, ती सहजीवनाची पद्धत आहे; परस्पर सन्मान, संवाद आणि बंधुत्व यावर आधारलेली जीवनशैली आहे.” ते पुढे म्हणतात की मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा प्रारंभ असला तरी तिचा आत्मा सामाजिक समतेत आहे, असे आंबेडकरांचे मत होते. जर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये सामाजिक व्यवहारात उतरली नाहीत, तर राजकीय लोकशाही टिकणार नाही, हा त्यांचा इशारा आजही तितकाच अर्थपूर्ण वाटतो. इथे डॉ. आंबेडकरांचा अजून एक महत्त्वाचा इशारा नमूद करावा लागेल. बहुसंख्याकांच्या संख्याबळावर चालणाऱ्या लोकशाहीतील संभाव्य धोका म्हणून त्यांनी न्यायालयीन पुनरावलोकन, संघराज्य रचना, मूलभूत हक्क आणि वंचितांसाठी प्रतिनिधित्व या घटकांना घटनात्मक संरक्षण देण्याचा आग्रह संविधान बनविताना धरला होता. म्हणून डॉ. आंबेडकरांनी मांडलेली “संविधानिक नैतिकता” ही संकल्पना प्रभावीपणे उलगडून समजून घेतली पाहिजे.

भारतीय संविधानाची निर्मिती करताना ते किती दूरदृष्टीचे होते याची जाणीव होते. त्यांनी केवळ त्या काळातील परिस्थितीचा विचार केला नाही, तर भविष्यातील भारताची गरज लक्षात घेतली. त्यांनी संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचा समावेश करून लोकशाहीला मजबूत पाया दिला. त्यांनी दिलेली मूलभूत हक्कांची संकल्पना आजही प्रत्येक नागरिकासाठी संरक्षण कवच ठरते. हे त्यांच्या दूरदृष्टीचेच प्रतीक आहे.

आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांचे ऋणी राहू; कारण त्यांनी केवळ आपल्याला संविधान दिले नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून संकुचित विचारसरणीचा त्याग करून शाश्वत विकासाचा मार्गही दाखवला.  म्हणून या लेखाचा शेवट करताना, त्यांनी राज्यघटना स्वीकारताना केलेल्या भाषणातील दोन अत्यंत महत्त्वपूर्ण विचार आठवतात—

“Do not submit yourself to charismatic authority which will lead to autocratic type of government. Bhakti in religion may be road to salvation of soul but in politics, Bhakti or hero worship is sure road to degradation and to eventual dictatorship.”

“Do not deny equality. If we continue to deny it for long, we will do so only by putting our political democracy in peril.”

हे विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि मार्गदर्शक आहेत. अशा या महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन.

मला समजलेले बाबासाहेब म्हणजे केवळ त्यांचे विचार जाणून घेणे नव्हे, तर ते आपल्या आचरणात उतरवणे—हीच त्यांना अर्पण केलेली खरी आदरांजली होय.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...