Skip to main content

श्रद्धा आणि अंधश्रद्धा" माझी व्याख्या किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक (दीर्घ लेख)

 

शुभंकरोति साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक: २१०
विषय क्रमांक: ४
विषय: "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" माझी व्याख्या किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक (दीर्घ लेख)
शब्दांकन: योगेश गोगवेकर, माहीम, मुंबई
परीक्षक: मा. विद्याताई मलवडकर
संकेतस्थळ: https://yogeshgogwekar.blogspot.com/2026/04/blog-post_15.html

आपण देवावर विश्वास ठेवतो, पण तो विश्वास आपल्याला पुढे नेतो की थांबवतो? याचा कधी विचार केला आहे का? जेव्हा माणसाच्या जीवनात संकटे येतात तेव्हा त्या संकटांचा सामना करण्यासाठी जी ताकद आपल्याला मिळते ती एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असल्यामुळे आपल्याला मिळते असे आपण म्हणतो. इथे 'विश्वास' या घटकाला फार महत्त्व आहे. त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपण वैद्यकीय शास्त्राचे घेऊ. जेव्हा आपण आजारी पडतो, तेव्हा डॉक्टरांकडे जातो. कारण आपल्याला माहित असते की डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने आपल्याला आराम मिळतो आणि आपण बरे होतो. यालाच आपण श्रद्धा असे म्हणतो. कारण आपला डॉक्टरांवर विश्वास असतो की ते आपल्याला बरे करतील. याचाच अर्थ असा होतो की एखादी गोष्ट चांगली होईल यावरचा विश्वास असणे म्हणजे श्रद्धा. एखाद्या गोष्टीवर जाणीवपूर्वक विश्वास ठेवताना स्वतःला गमावत नाही म्हणजे श्रद्धा अशी श्रद्धेची व्याख्या करता येईल.

मग प्रश्न आपल्याला पडतो की ही श्रद्धा अंधश्रद्धा कशी बनते. जेव्हा श्रद्धेचा डोळस विश्वास तर्काला मूठमाती देऊन आंधळा बनतो, तेव्हा ती 'अंधश्रद्धा' बनते. या अंधश्रद्धेत विवेक हरवतो आणि कोणतीही गोष्ट आपण पुराव्याशिवाय किंवा तर्क न समजून घेता आंधळेपणाने स्वीकारतो. याची काही उदाहरणे म्हणजे चालताना मांजर आडवे गेले म्हणून आपला दिवस खराब होणे किंवा एखाद्या दिवशीच फक्त सकाळीच नखे कापणे अथवा घराला नजर लागू नये म्हणून घराच्या दारावर लिंबू-मिरची टांगणे.

याचाच अर्थ असा की अंधश्रद्धेच्या गोष्टींमध्ये भीती, अज्ञान आणि ऐकीव माहिती असते. त्यामागे कोणताही ठोस पुरावा किंवा तर्काधार नसतो. मानसिक असुरक्षिता, नशिबावर अति विश्वास आणि “असे केले नाही तर देव शिक्षा करेल” या भीतीतूनच अंधश्रद्धा निर्माण होते. परंतु अंधश्रद्धेचा परिणाम केवळ विचारांपुरता मर्यादित राहत नाही; तो व्यक्ती आणि समाजावर खोलवर परिणाम करतो.

अनेकदा अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांचे आर्थिक शोषण होते. बाबा, भोंदू आणि तथाकथित गुरू लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळतात. अनेक वेळा योग्य वैद्यकीय उपचार टाळून झाडफूक, ताईत किंवा गंडेदोरे यांवर अवलंबून राहिल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, आणि काही प्रसंगी जीवितहानीही होते.

याहूनही गंभीर म्हणजे अंधश्रद्धेमुळे समाजात मागासलेपणा आणि अज्ञान टिकून राहते. प्रश्न विचारण्याची वृत्ती कमी होते आणि प्रगतीचा वेग मंदावतो. त्यामुळे अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक अडथळा नसून समाजाच्या विकासालाही रोखणारी शक्ती ठरते.

माझे बालपण एका मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. माझे वडील नित्यनेमाने देवाची पूजा करीत असत. त्याप्रमाणे श्रावणात दर सोमवारी शंकराची तर मार्गशीर्षमध्ये गुरुचरित्राचे वाचन केले जात असे. इतर दिवशी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी देवाला नमस्कार करणे, सण-उत्सव साजरे करणे, चांगल्या कार्याची सुरुवात देवाच्या नावाने करणे, एखादी नवीन गोष्ट विकत घेतली की ती देवापुढे ठेवणे आणि देवाचा आशीर्वाद घेणे, वगैरे गोष्टी मनावर बिंबविल्या जायच्या. त्या बिंबविताना त्यात श्रद्धा दिसायाची. देवाचे कार्य म्हणून काही कर्मकांडेपण व्हायची. त्यात अंधविश्वासाच्या नावाखाली काही अनाकलनीय विधीही असायचे. म्हणजे लहानपनपासूनच श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे संस्कार आमच्या मनावर होत होते.

लहानपणी आपण या गोष्टींचा विचार आपण करत नाही; त्या आपल्यासाठी सत्य असतात. पण जसजसे वय वाढते, शिक्षण आणि अनुभव वाढतो, तसतसे आपण प्रश्न विचारायला लागतो. “हे खरंच का?” “यामागे काही तर्क आहे का?” अशा प्रश्नांमुळे आपल्या विचारांमध्ये बदल घडू लागतो. हाच बदल श्रद्धेला अंधश्रद्धेपासून वेगळा करतो.

या संदर्भात पन्नास वर्षापूर्वी दीवार नावाचा एक हिंदी सिनेमा आला होता. दोन भावांची कथा अत्यंत प्रभावीपणे हे भान देऊन जाते. त्यात एक दृश्य दाखविले आहे. त्या चित्रपटात रवी आणि त्याचा मोठा भाऊ विजय आपल्या आईबरोबर एका शंकराच्या देवळात जात असतात. धाकटा भाऊ रवी आईसोबत देवळात जातो; पण मोठा भाऊ विजय देवळात न जाता  देवळाच्या पायऱ्यांवर बसून राहतो. पुढे ही दोन्ही मुले मोठी होतात. लहान भाऊ पोलीस अधिकारी होतो आणि मोठा विजय वाम मार्गी जाऊन स्मगलर होतो. मग दोन भाऊ वेगळे होतात आणि त्यांची आई लहान भावाबरोबर राहायला जाते. चित्रपटाच्या शेवटी विजयला समजते त्याची आई आजारी असते. डॉक्टर उपचार करीत असतात पण औषधाला गुण येत नसतो. तो आपल्या आईला भेटायला जाऊ शकत नाही कारण पोलीस त्याच्या अटक करण्याच्या मार्गावर असतात. म्हणून विजय त्या शंकराच्या देवळात जाऊन आईला बरे वाटावे म्हणून देवाकडे मागणी करतो. मग कथानकात त्याची आई बरी झालेली दाखवली जाते.

सुरुवातीला देवळाच्या पायरीवर बसणारा विजय देवावर विश्वास ठेवत नाही, तर आईसोबत देवळात जाणारा रवी श्रद्धेने जोडलेला असतो. पण आयुष्याच्या कठीण टप्प्यावर, आईची तब्येत बिघडल्यावर, विजय देवळाच्या पायऱ्या चढतो, तेव्हा तो क्षण श्रद्धेचा आहे की असहाय्यतेचा? असा प्रश्न पडतो. दुसरीकडे रवी इस्पितळात आईची सेवा करतो, तेव्हा ती कृती म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि जबाबदारी यांची भागीदारी ठरते. येथे चित्रपट आपल्याला सांगतो की केवळ देवावर अवलंबून राहणे पुरेसे नाही; कृती आणि जबाबदारी हीच खरी श्रद्धा आहे.

माझ्या स्वतःच्या आयुष्यातही असा एक अनुभव आहे. लहानपणी मला सांगितले जायचे की काही विशिष्ट दिवशी केस कापले तर अपशकुन होतो. मीही ते अंधपणे पाळत होतो. पण एकदा अभ्यासाच्या दडपणात मी त्या दिवशीच केस कापले आणि काहीच वाईट घडले नाही. त्या क्षणी मला जाणवले की हे केवळ मनाचे बंधन होते. त्या दिवसापासून मी प्रत्येक गोष्टीकडे तर्काने पाहू लागलो. हा छोटा अनुभव मला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारा ठरला.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रमुख प्रणेते होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सूक्ष्म फरक स्पष्ट करून, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे त्यांच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांचे विचार प्रामुख्याने मानवी प्रतिष्ठा, विवेकवाद आणि समाज सुधारणेवर आधारित होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्पष्ट करताना ते म्हणत असत की आपली श्रद्धा कुणालाही शारीरिक, आर्थिक किंवा मानसिक यातना देणारी नसावी. तर्कशुद्ध श्रद्धा ही व्यक्तिगत असू शकते, परंतु जिथे तर्क नाही आणि केवळ अंधविश्वास आहे, तिथे अंधश्रद्धा येते. संविधानाला अभिप्रेत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून विवेकशील समाज निर्मिती करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यांचा लढा हा मानवी विवेकाला जागृत करण्याचा आणि शोषणापासून मुक्ती मिळवून देण्याचा होता.

महाराष्ट्रातील विचारवंत आणि लेखक नरहर कुरुंदकर यांनीही विचारस्वातंत्र्य आणि तर्कशुद्धतेवर भर दिला. ते म्हणत की समाजाची प्रगती ही प्रश्न विचारण्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर त्यांनी अत्यंत तर्कशुद्ध आणि मूलगामी भाष्य केले आहे. ते म्हणत की श्रद्धा आणि अंधश्रद्धा या कालसापेक्ष संकल्पना आहेत. एकाच्या दृष्टीने जी श्रद्धेची गोष्ट असते, ती दुसऱ्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. त्यामुळे समाजमन समजून घेताना त्यांनी विवेक आणि सलोखा यावर भर दिला. म्हणून त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धा आणि अनिष्ट परंपरांना विरोध केला. म्हणून ते म्हणतात की धर्माने माणसाला प्रगल्भ करावे, पण अनेकदा धार्मिक लोक तर्क सोडून बुद्धी मंद करून घेतात.

सुप्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ आर्थर शोपेनहॉवर हे आपल्या ग्रंथात 'द वर्ल्ड ॲज विल अँड रिप्रेझेंटेशन' श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर त्यांचे विचार अत्यंत परखड आणि तार्किक पद्धतीने मांडताना सांगितले की श्रद्धा म्हणजे सामान्य लोकांचे तत्त्वज्ञान आणि अंधश्रद्धा म्हणजे मानवी बुद्धीच्या अभावाचे लक्षण. असे सांगून ते म्हणतात की अंधश्रद्धा ही लहानपणी मेंदूत भिजवलेली भीती असते. एकदा मनावर ठसा उमटला की, एखादा माणूस स्वतःच्या अस्तित्वावर शंका घेईल, पण शिकवलेल्या धार्मिक सिद्धांतांवर शंका घेणार नाही. त्यांचे म्हणणे होते की, खऱ्या श्रद्धेला (तार्कीक विचाराला) पुरावे हवे असतात, परंतु अंधश्रद्धा 'प्रकाशनावर' (Revelation) विश्वास ठेवते, ज्याला तर्काचा आधार नसतो. म्हणून सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ Bertrand Russell एका ठिकाणी म्हणतात की Fear is the main source of superstition याचा अर्थ मराठीत करायचा म्हणजे भीती ही अंधश्रद्धेची मूळ कारणे आहेत.

यावरून स्पष्ट होते की श्रद्धा ही सकारात्मक, उन्नत करणारी शक्ती आहे, तर अंधश्रद्धा ही भीती, अज्ञान आणि अंधानुकरणातून जन्मलेली आहे. श्रद्धा आपल्याला जोडते, तर अंधश्रद्धा आपल्याला बांधून ठेवते.

आजच्या विज्ञानयुगात श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. देवावर विश्वास ठेवणे चुकीचे नाही, पण त्या विश्वासामुळे आपल्या कृतींवर परिणाम होऊ नये. संकटात देवाची आठवण ठेवावी, पण त्याचबरोबर स्वतःचे कर्तव्यही पार पाडावे, हेच खरे श्रद्धेचे लक्षण आहे, जे दीवार सिनेमात रवीच्या पात्रातून दिसते.

शेवटी, श्रद्धा ही डोळे उघडून ठेवणारी असावी, डोळे बंद करणारी नव्हे. विवेक, तर्क आणि अनुभव यांच्या आधारावरच खरी श्रद्धा निर्माण होते. अंधश्रद्धा आपल्याला भीतीत ठेवते, तर श्रद्धा आपल्याला धैर्य देते; अंधश्रद्धा आपल्याला बांधून ठेवते, तर श्रद्धा आपल्याला पुढे नेते.

श्रद्धा आपल्याला उभं करते, अंधश्रद्धा आपल्याला वाकवते. याची निवड मात्र प्रत्येकाने स्वतः करायची आहे.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...