विषय
: पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव : The Trial
लेखक : Franz Kafka
प्रकाशक : Penguin Classics
पृष्ठे : २०८
शीर्षक : गुन्हा न कळताही शिक्षा
उपशीर्षक : Franz Kafka यांच्या The
Trial मधील
अस्तित्ववादी संघर्षाची कहाणी
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेतस्थळ :
एखाद्या व्यक्तीवर आरोप काय आहे हेच माहित
नसताना त्याला शिक्षा होऊ शकते का? हा
अस्वस्थ करणारा प्रश्न The
Trial ही कादंबरी
वाचताना सतत मनात घोळत राहतो.
ही कादंबरी Franz Kafka यांनी १९१४ साली लिहिलेली असून, त्यांच्या
मृत्यूनंतर १९२५ मध्ये प्रकाशित झाली. जोसेफ के. या बँक कर्मचाऱ्याच्या आयुष्यात
घडणाऱ्या विचित्र आणि भयावह घटनांभोवती ही कथा फिरते. येथे कोणताही ठोस खलनायक
नसून, संपूर्ण राज्यव्यवस्थाच एका खलनायकाच्या रुपात
अदृश्य शक्ती म्हणून उभी राहते.
जोसेफ के. हा प्राग शहरात राहणारा एक यशस्वी
बँक कर्मचारी. एके दिवशी पहाटे अचानक दोन अधिकारी त्याच्या खोलीत येऊन त्याला अटक
करतात. मात्र त्याच्यावर कोणता आरोप आहे, हे
कोणीच सांगत नाही. तरीही त्याच्याकडून स्वतःचा बचाव अपेक्षित असतो. हीच या कथेची
सर्वात मोठी विसंगती आहे.
यानंतर तो एका गूढ, गुंतागुंतीच्या आणि अमानवी न्यायप्रणालीत
अडकतो. येथे “निर्दोष सिद्ध होईपर्यंत दोषी” अशीच कार्यपद्धती दिसून येते. न्यायालयीन
प्रक्रिया अस्पष्ट, विलंबित आणि अपमानकारक आहे. सुनावण्या जीर्ण
इमारतीत, अस्वच्छ आणि गुदमरवणाऱ्या वातावरणात होतात, जिथे मानवी प्रतिष्ठेला कोणतीही किंमत नसते.
न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात तो विविध लोकांना
भेटतो. तो अधिकारी, वकील, धर्मगुरू
या सर्वाना भेटतो. परंतु प्रत्येक ठिकाणी त्याला निराशाच मिळते. त्याच्यावरचा आरोप
अखेरपर्यंत गूढच राहतो. या प्रक्रियेत राज्याच्या नोकरशाहीची दडपशाही आणि अमानवी
स्वरूप ठळकपणे समोर येते. शेवटी त्याला दोषी ठरवले जाते.
ही कादंबरी केवळ एका व्यक्तीची कथा नाही; ती व्यक्तीस्वातंत्र्य आणि सत्ताकेंद्र
यांच्यातील संघर्षाचे प्रभावी चित्रण आहे. ती अस्तित्ववादी कथेसारखी, बोधकथेसारखी किंवा आधुनिक नोकरशाहीच्या
अतिरेकाची चेतावणी म्हणून वाचता येते.
आजच्या काळात या कादंबरीचे महत्त्व अधिक
प्रकर्षाने जाणवते. लोकशाहीचे आवरण राखून सत्तेचे केंद्रीकरण वाढत आहे. प्रशासन, न्यायव्यवस्था आणि माध्यमांवरील नियंत्रणामुळे
व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात येत आहे. अशा वेळी The Trial आपल्याला सावध करते—अपारदर्शक
सत्ता हळूहळू हुकूमशाहीकडे झुकते.
जोसेफ के. ची लढाई ही न्यायासाठी नसून, स्वतःच्या अस्तित्वाच्या मान्यतेसाठी आहे.
त्याचा पराभव हा एका व्यक्तीचा नसून, संपूर्ण
व्यवस्थेच्या अमानवीपणाचा परिणाम आहे.
आजच्या डिजिटल युगात, जिथे देखरेख, डेटा आणि अल्गोरिदमिक नियंत्रण वाढत आहे, तिथे या कादंबरीची भीती अधिक वास्तव वाटते.
काफ्काने शंभर वर्षांपूर्वीच या अदृश्य नियंत्रणाची जाणीव करून दिली आहे.
शेवटी, The Trial ही केवळ साहित्यकृती नसून एक प्रभावी सामाजिक-राजकीय भाष्य आहे. ती
आपल्याला प्रश्न विचारते की आपण खरोखर स्वतंत्र आहोत का?
ही कादंबरी अस्वस्थ करते; पण हीच अस्वस्थता आपल्याला अधिक सजग आणि सुजाण
नागरिक बनवते.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment