पुस्तक परिचय : The Foresighted Ambedkar: Ideas That Shaped Indian Constitutional लेखक : Anurag Bhaskar
पुस्तक परिचय : The Foresighted Ambedkar: Ideas That Shaped Indian Constitutional
लेखक : Anurag Bhaskar
प्रकाशक : Penguin Viking
पृष्ठे : ४००
शब्दांकन : योगेश गोगवेकर
संकेतस्थळ :
आज भारतीय समाजाचे बऱ्याच अंशी राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरण झाल्याचे दिसून येते. अशा वेळी भारतीय संविधानात सांगितलेली चार तत्त्वे म्हणजे न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व पूर्णपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे वाटू लागले आहे. कारण ही तत्त्वे स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सुधारण्याच्या प्रक्रियेला प्रगतिशील दिशा देतात. म्हणूनच ही तत्त्वे समजून घेण्यासाठी The Foresighted Ambedkar: Ideas That Shaped Indian Constitutional हे अनुराग भास्कर यांनी इंग्रजीत लिहिलेले पुस्तक जरूर वाचले पाहिजे.
हे पुस्तक अंतर्दृष्टीपूर्ण आणि ज्ञानवर्धक असून ते डॉ. आंबेडकरांना दूरदर्शी नेते म्हणून अधोरेखित करते आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीत त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सखोल अभ्यास मांडते. भारतीय राज्यघटनेचा विचार करताना आपण घटनासभा, मसुदा समिती आणि २६ जानेवारी १९५० या ऐतिहासिक क्षणाकडे संविधानाचे अंतिम स्वरूप म्हणून पाहतो. परंतु राज्यघटना ही एका दिवसात किंवा एका सभागृहात जन्मलेली कल्पना नाही; ती संघर्ष, अनुभव, विचार आणि सामाजिक असमानतेविरुद्धच्या लढ्यांतून घडलेली ऐतिहासिक प्रक्रिया आहे. याच प्रक्रियेचा मागोवा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनात्मक दूरदृष्टीचा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.
पुस्तकाची सुरुवात आंबेडकरांच्या बालपणापासून आणि शिक्षणापासून होते; परंतु हे वर्णन केवळ माहितीपर राहत नाही. लेखक दाखवतो की जातीय भेदभावाचा अनुभव, कोलंबिया व लंडनमधील शिक्षण, आणि अर्थशास्त्र-राजकारणातील अभ्यास यांमुळे आंबेडकरांच्या मनात राज्यरचना, प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय या प्रश्नांबद्दल गंभीर विचार रुजला. लेखक नमूद करतो की १९१९ पासूनच्या वसाहती घटनासुधारणांच्या चर्चेत आंबेडकर सहभागी झाले होते. त्यामुळे राज्यघटनेचे तत्त्वज्ञान त्यांच्या मनात खूप आधीपासून विकसित होत होते. हा दृष्टिकोन पुस्तकाचा बौद्धिक वैशिष्ट्य ठरतो. डॉ. आंबेडकरांना केवळ मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नव्हे, तर भारतीय घटनाविचाराच्या दीर्घ प्रवाहातील सातत्यपूर्ण हस्तक्षेपक म्हणून पाहण्याची दृष्टी लेखक देतो.
लोकशाहीविषयी आंबेडकरांची व्यापक संकल्पना कशी होती हा महत्त्वाचा मुद्दा लेखकाने स्पष्टपणे मांडला आहे. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा प्रारंभ असला तरी तिचा आत्मा सामाजिक समतेत आहे, असे आंबेडकरांचे मत होते. जर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये सामाजिक व्यवहारात उतरली नाहीत, तर राजकीय लोकशाही टिकणार नाही, हा त्यांचा इशारा आजही तितकाच अर्थपूर्ण वाटतो, असे हे पुस्तक सांगते. लेखक या विचाराला राज्यघटनेतील मूलभूत हक्क, सामाजिक न्यायाच्या तरतुदी आणि आरक्षण धोरणाशी जोडून स्पष्ट करतात.
या पुस्तकात आंबेडकरांचा अजून एक महत्त्वाचा इशारा नमूद केला आहे. बहुसंख्याकांच्या संख्याबळावर चालणाऱ्या लोकशाहीतील संभाव्य धोका म्हणून त्यांनी न्यायालयीन पुनरावलोकन, संघराज्य रचना, मूलभूत हक्क आणि वंचितांसाठी प्रतिनिधित्व या घटकांना घटनात्मक संरक्षण देण्याचा आग्रह धरला होता. गोलमेज परिषदांपासून घटना सभेतील चर्चांपर्यंत त्यांच्या भूमिकेत दिसणारे सातत्य दाखविताना लेखकाने हे स्पष्ट केले आहे की आंबेडकरांचे विचार केवळ प्रतिक्रियात्मक नव्हते, तर ते एक सुसंगत घटनात्मक तत्त्वज्ञान होते.
हे पुस्तक अनेक उल्लेखनीय पैलूंवर नवा प्रकाश टाकते आणि काही प्रचलित गैरसमजांवर ठोस टीका करते. उदाहरणार्थ, आंबेडकरांनी संविधान जाळण्याची भाषा का वापरली, आरक्षणाचा कालावधी कसा समजायचा, किंवा त्यांनी काही मुद्द्यांवर केलेले तडजोडीचे निर्णय कोणत्या राजकीय संदर्भात होते, या सर्व प्रश्नांवर लेखक ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे पुरावे देत गैरसमजांचे खंडन करतो. यामुळे आंबेडकरांचे विचार घोषणांमध्ये किंवा प्रतीकांमध्ये अडकून न राहता त्यांच्या मूळ तात्त्विक आणि राजकीय संदर्भात समजण्यास मदत होते. वैचारिक वाचकांसाठी हा भाग विशेष उपयुक्त ठरतो.
भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीविषयी सार्वजनिक चर्चेत काही गैरसमज आजही दिसतात. त्यापैकी एक म्हणजे B. N. Rau यांनी संविधान लिहिले अशी समजूत सोशल माध्यमांतून पसरताना दिसते. प्रत्यक्षात राऊ हे मसुदा समितीचे घटना सल्लागार होते. ते संविधान सभेचे सदस्य नसल्याने त्यांनी सभेतील चर्चांमध्ये भाग घेतला नव्हता; परिणाम “कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली डिबेट्स”च्या १२ खंडांत त्यांचे एकही भाषण आढळत नाही. त्यांनी विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून प्राथमिक टिपणे, तुलनात्मक संदर्भ आणि सैद्धांतिक आराखडा तयार केला.
परंतु त्या आराखड्याला भारतीय सामाजिक-राजकीय वास्तवाशी सुसंगत घटनात्मक रूप देण्याचे कार्य मसुदा समितीने, विशेषतः अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनासभेतील चर्चांमधून पूर्ण केले. हा फरक लक्षात घेतल्यास ही राज्यघटना बनविताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वाचे योगदान समजून येते. हे वाचताना लेखक अनुराग भास्कर यांच्या पुस्तकाचा एक अप्रत्यक्ष परिणाम असा जाणवतो की ते राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करते.
आंबेडकरांनी मांडलेली “संविधानिक नैतिकता” ही संकल्पना पुस्तकात प्रभावीपणे उलगडते. राज्यघटनेचा आत्मा केवळ कलमांमध्ये नसतो; तो नागरिकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या वर्तनात असतो, हे आंबेडकरांचे मत लेखक उदाहरणांसह मांडतो. त्याचप्रमाणे संविधान कितीही प्रगत असले तरी ते चालवणारा समाज जर असमानतेला मान्यता देत असेल, तर लोकशाही दुर्बल होते, हा आंबेडकरांचा संदेश भाषणे आणि ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे प्रभावीपणे मांडला आहे. आजच्या काळातील संस्थांवरील प्रश्न, सार्वजनिक चर्चेतील ध्रुवीकरण आणि सामाजिक विषमता पाहता हा विचार अधिकच समकालीन वाटतो.
आज भारतात राज्यघटना, नागरिकत्व, सामाजिक न्याय, संघराज्य आणि लोकशाहीच्या स्वरूपावर नव्याने चर्चा सुरू आहे. अशा वेळी आंबेडकरांच्या मूळ घटनात्मक चिंतनाचा मागोवा घेणारे हे पुस्तक विशेष अर्थपूर्ण ठरते. हे पुस्तक वाचताना जाणवते की आंबेडकरांसाठी राज्यघटना ही केवळ कायदेशीर चौकट नव्हती; ती सामाजिक परिवर्तनाची राजकीय रूपरेषा होती. लोकशाही टिकवण्यासाठी संस्थात्मक रचना पुरेशी नसून सामाजिक समता, नैतिक जबाबदारी आणि विवेकशील नागरिकत्व आवश्यक आहे. हा त्यांचा संदेश आजही तेवढाच महत्वाचा आहे.
‘The Foresighted Ambedkar हे पुस्तक डॉ. आंबेडकर अभ्यासातील महत्त्वाची भर आहे. ते त्यांना एका ऐतिहासिक क्षणापुरते मर्यादित न ठेवता भारतीय घटना विचारांच्या दीर्घ प्रक्रियेतील केंद्रस्थानी ठेवते. वैचारिक दृष्टीकोनातून पाहिले तर हे पुस्तक आणि त्यावरील हे परीक्षण एका मूलभूत जाणिवेकडे नेते. भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून सामाजिक न्यायाच्या स्वप्नाची राजकीय रचना आहे; आणि त्या स्वप्नाला आकार देणाऱ्या आंबेडकरांची दूरदृष्टी समजून घेणे म्हणजे भारतीय लोकशाहीच्या आत्म्याला समजून घेणे होय.
पुस्तकाची भाषा शैक्षणिक असूनही प्रवाही आहे. इतिहास, कायदा आणि राजकीय सिद्धांत यांचा संगम असलेले हे लेखन अभ्यासकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ ठरते, तसेच सामान्य वैचारिक वाचकालाही समजण्यास सोपे आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व भारतीयांनी वाचावे असे वाटते.
हे पुस्तक मराठीतही उपलब्ध असून त्याचा मराठी अनुवाद सविता दामले यांनी उत्तमरीत्या केला आहे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment