शुभंकरोति साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक : २०७
विषय क्र. : ४
विषय : अंधश्रद्धेच्या विळख्यात महिला (वैचारिक लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई
परीक्षक : मा. ऋचाताई पारेख मुंबई
आज आपण अशा युगात राहतो आहोत, ज्यात विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. नवीन-नवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे. आज विज्ञानाने चंद्र, मंगळ गाठले; कृत्रिम बुद्धिमत्तेपासून अवकाश संशोधनापर्यंत मानवाने अभूतपूर्व प्रगती साधली आहे. तरी एक प्रश्न अस्वस्थ करतो तो म्हणजे विज्ञानाच्या प्रकाशात जग झगमगत असताना स्त्री अजूनही जादूटोणा, नजर, तंत्र-मंत्र यांच्या अंधारात का अडकलेली आहे?
अलीकडील काही घटनांनी हा प्रश्न अधिक तीव्र केला आहे. महाराष्ट्रातील सिन्नर तालुक्यात एका भोंदू व्यक्तीने ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यातच एका संविधानिक पदावरील महिलेने त्या आरोपीचे पाय धुतल्याचे छायाचित्र समोर आले. अशा घटना पाहिल्यावर प्रश्न निर्माण होतो की ज्या व्यवस्था महिलांच्या संरक्षणासाठी आहेत, त्यांच्याच कृतींमुळे जर अंधश्रद्धेला बळ मिळत असेल, तर पीडित महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा?
या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले की, अंधश्रद्धा केवळ एक ‘विश्वास’ नसून ती मानवी जीवनावर थेट परिणाम करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. अशा घटना ग्रामीण भागापुरत्याच मर्यादित नाहीत; त्या शिक्षण आणि आधुनिकतेचा दावा करणाऱ्या समाजातही घडत आहेत. म्हणून अंधश्रद्धा ही केवळ व्यक्तीची समस्या नसून ती एक मानसिक गुलामगिरी आहे. महिलांना यातून मुक्त करणे म्हणजे कुटुंब आणि समाज सशक्त करणे होय. स्त्रीने स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवून अंधश्रद्धेच्या अंधारातून विज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करणे, ही काळाची गरज आहे.
घराच्या चार भिंतींमध्ये, परंपरेच्या आणि श्रद्धेच्या नावाखाली स्त्रीला जखडून ठेवणाऱ्या समजुती तिच्या अस्तित्वालाच आव्हान देतात. नजर लागली, तंत्र-मंत्राचा प्रभाव अशा कारणांनी तिच्या आयुष्याला दोष दिला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या घरात मूल वारंवार आजारी पडले, तर डॉक्टरांकडे नेण्याऐवजी प्रथम “नजर काढणाऱ्या” व्यक्तीकडे नेले जाते. काही ठिकाणी नवजात बाळाच्या कपाळावर काळा ठिपका लावला नाही म्हणून आईलाच दोष दिला जातो. अशा छोट्या वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू मोठ्या अंधश्रद्धांमध्ये रूपांतरित होतात.
ग्रामीण भागात तर जादूटोण्याच्या संशयावरून महिलांना गावाबाहेर काढणे, त्यांच्यावर अत्याचार करणे किंवा सामाजिक बहिष्कार टाकणे, अशा घटना घडतात. इतकेच नव्हे, तर तंत्र-मंत्राच्या नावाखाली लैंगिक शोषणाच्या घटनाही समोर येतात. या सर्व उदाहरणांतून स्पष्ट होते की अंधश्रद्धा ही केवळ समजूत नसून सामाजिक अन्यायाचे साधन बनते
महिलांमध्ये अंधश्रद्धा टिकून राहण्यामागे बालपणापासून रुजवलेली भीती, परंपरेचे आंधळे पालन, सामाजिक दबाव आणि असुरक्षितता ही कारणे आहेत. ‘असं केलं तर अपशकुन होईल’ अशा शिकवणींमुळे त्यांच्या मनात भीतीची बीजे पेरली जातात. त्यामुळे अंधश्रद्धा ही केवळ श्रद्धा न राहता मानसिक आधार बनते. म्हणून या विषयाकडे टीकेपेक्षा संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या कार्यातून वारंवार अधोरेखित केले होते की अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानातून निर्माण होत नाही, तर ती भीती, असुरक्षितता, पितृसत्ताक सामाजिक रचना, सांस्कृतिक व पौराणिक परंपरा आणि आंधळ्या पालनातूनही वाढते. महिलांच्या बाबतीत हे विशेषतः खरे ठरते. घरात एखादी अडचण आली, एखादा आजार बळावला किंवा आर्थिक संकट निर्माण झाले की त्यामागे ‘काहीतरी अनिष्ट शक्ती’ कारणीभूत असावी, असा समज केला जातो. अशा वेळी महिलांनाच दोष दिला जातो किंवा त्यांनाच ‘उपचार’ करण्यासाठी भोंदू लोकांकडे नेले जाते.
श्याम मानव यांनी अंधश्रद्धेविरोधातील आपल्या चळवळीतून दाखवून दिले की समाजातील अनेक अंधश्रद्धा या अज्ञान आणि गैरसमजुतींच्या पायावर उभ्या आहेत. नजर लागणे किंवा जादूटोणा यांसारख्या संकल्पनांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले. तरीही या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या कमी होत नाही, याचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव आणि परंपरेचे आंधळे अनुकरण आहे. त्याचा परिणाम म्हणून मोठं झाल्यावर त्या या अंधश्रद्धांना प्रश्न न विचारता स्वीकारतात. यामध्ये त्यांच्या स्वतंत्र विचारक्षमतेवर मर्यादा येतात.
मुस्लिम सत्यसमाज सुधारक हमीद दलवाई यांनी समाजसुधारणेच्या दृष्टीने महिलांच्या सशक्तीकरणावर विशेष भर दिला होता. त्यांच्या मते, महिलांना शिक्षण, स्वातंत्र्य आणि विचार करण्याची मोकळीक मिळाली, तर त्या अंधश्रद्धेच्या विळख्यातून सहज बाहेर पडू शकतात. पण जेव्हा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते आणि त्यांच्या मतांना कमी लेखले जाते, तेव्हा त्या अशा गोष्टींना बळी पडण्याची शक्यता अधिक वाढते.
अंधश्रद्धेच्या विळख्यात महिला अडकण्याचे अजून एक कारण म्हणजे पुराणातील कथा आहे. भारतीय समाजाच्या मानसिकतेवर अशा पुराणकथांचा खास करून रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा मोठा प्रभाव आहे. या ग्रंथांतील स्त्रीपात्रे केवळ आदर्श किंवा प्रतीक म्हणून नव्हे, तर समाजाच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब म्हणून पाहिली जातात. उदाहरणार्थ, सीता ही पतिव्रतेचे प्रतीक मानली जाते. पण तिच्या आयुष्यातील अग्निपरीक्षा हा प्रसंग स्त्रीच्या शुद्धतेवर शंका घेणाऱ्या मानसिकतेचे द्योतक आहे. समाजाच्या संशयामुळे तिला स्वतःला निर्दोष सिद्ध करावे लागले. हीच मानसिकता आजही महिलांना ‘नजर लागली’, ‘अपशकुन झाला’ अशा आरोपांना सामोरे जाण्यास भाग पाडते.
तसेच महाभारतातील द्रौपदी हिच्या वस्त्रहरणाचा प्रसंग स्त्रीच्या सन्मानाची होणारी पायमल्ली दाखवतो. तिच्यावर झालेला अन्याय हा केवळ व्यक्तिगत नव्हता, तर संपूर्ण समाजाच्या मौनाची साक्ष देणारा होता. आजही अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर होणारे अत्याचार पाहिले, तर द्रौपदीची वेदना पुन्हा जिवंत होते.
द्रौपदी प्रमाणे अंबा आणि माधवी यांसारख्या स्त्रियांच्या कथा अधिक जटिल वास्तव मांडतात. अंबेला तिच्या इच्छेविरुद्ध आयुष्य जगावे लागले, आणि तिच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी तिला अनेक जन्म घ्यावे लागले, अशी कथा सांगितली जाते. माधवीला तिच्या वडिलांच्या निर्णयामुळे वेगवेगळ्या पुरुषांना ‘दान’ केले गेले जाते, हे स्त्रीला वस्तूसारखे वागवण्याचे उदाहरण आहे. या कथा आपल्याला सांगतात की, स्त्रीच्या आयुष्यावर तिचा स्वतःचा अधिकार किती कमी होता.
या पुराणकथांचा परिणाम असा झाला की स्त्रीने सहन करणे, प्रश्न न विचारणे आणि परिस्थितीला शरण जाणे हेच तिचे कर्तव्य मानले गेले. याच मानसिकतेतून अंधश्रद्धा अधिक बळकट झाली आणि महिलांनी स्वतःच्या समस्या ‘दैवी शक्तीं’शी जोडून पाहायला सुरुवात केली.
म्हणूनच येथे महात्मा फुले यांची आठवण येते. त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार करताना स्पष्ट केले की अज्ञान हे सर्व प्रकारच्या अन्यायाचे मूळ आहे. महिलांना शिक्षणापासून दूर ठेवणे म्हणजे त्यांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ढकलणे होय. त्यांच्या स्त्रीशिक्षणाच्या विचारांमुळे स्त्रीला विचार करण्याची दिशा मिळाली.
आज आधुनिक साहित्यिकांमध्ये दक्षिणेकडील अनेक लेखिकेने आपल्या लेखनातून स्त्रीच्या अंतर्मनातील संघर्ष आणि समाजाच्या अपेक्षांमधील ताण उलगडून दाखवला आहे. शशी देशपांडे यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या कथांमध्ये स्त्री ही केवळ सहन करणारी नसून प्रश्न विचारणारी आणि स्वतःचा मार्ग शोधणारी आहे असे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे तामिळ लेखिका मंगई अरासू आणि वासंती यांनी स्त्रीच्या सामाजिक बंधनांवर आणि परंपरांच्या प्रभावावर भाष्य केले आहे. त्यांच्या मते, परंपरा आणि अंधश्रद्धा यांचा वापर अनेकदा स्त्रीला नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
तसेच सुप्रसिद्ध तेलगु लेखिका पोपूरी ललिता कुमारी (वोल्गा) यांनी आपल्या लेखनातून रामायण मधील सीता हिच्या व्यक्तिरेखेचे नव्याने पुनर्मूल्यांकन केले आहे. त्यांच्या कथांमध्ये सीता ही केवळ आज्ञाधारक पत्नी नसून स्वतःचा आवाज शोधणारी स्त्री आहे. या पुनर्वाचनामुळे स्त्रीच्या भूमिकेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. रितू मेनन यांनी स्त्रीवादी विचारसरणीतून समाजातील लिंगभेद आणि अंधश्रद्धा यांचे नाते स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, अंधश्रद्धा ही अनेकदा स्त्रीला दुय्यम ठेवण्यासाठी वापरली जाते, आणि त्यामुळे तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतात.
याच मानसिकतेचे प्रतिबिंब मराठी साहित्यातही दिसते. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ब्राह्मणकन्या या कादंबरीत परंपरा, जात, आणि स्त्रीजीवन यातील गुंतागुंत प्रभावीपणे मांडली आहे. या कादंबरीतील नायिका समाजाच्या कठोर नियमांमध्ये अडकलेली आहे, जिथे तिच्या भावनांना आणि इच्छांना स्थान नाही. परंपरेच्या नावाखाली तिच्यावर लादलेले नियम आणि बंधने तिला स्वतःपासून दूर नेतात. हीच परिस्थिती अनेक महिलांची वास्तवातही आहे, जिथे त्या स्वतःच्या विचारांऐवजी समाजाच्या ठरावीक चौकटीत जगतात, आणि त्या चौकटीत अंधश्रद्धा सहज रुजत जाते. जरी ही कादंबरी १९३० रोजी लिहिलेली असली तरी त्यातील विचार आजही लागू होतात.
या समस्येवर उपाय शोधताना सर्वप्रथम शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. गुलामांना गुलामीची आठवण करून द्या, म्हणजे तो बंद करून उठेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते. तीच गोष्ट अंधश्रद्धेतून स्त्रियांना बाहेर काढताना म्हणावे लागेल. त्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, माध्यमांची जबाबदारी आणि विवेकवादी चळवळीचे बळकटीकरण गरजेचे आहे. केतकरांची ब्राह्मणकन्या ही कादंबरी आणि वर नमूद केलेल्या लेखिकांच्या साहित्याचे पुनर्वाचन करून त्यातील स्त्रीच्या वेदना आणि संघर्ष समजून घेवून महिलांना समजावून सांगणे गरजेचे आहे.
शेवटी, अंधश्रद्धा ही परंपरेचा भाग म्हणून स्वीकारण्याऐवजी तिचा विवेकाने विचार करणे आवश्यक आहे. महिलांना या विळख्यातून मुक्त करायचे असेल, तर त्यांना शिक्षण, स्वातंत्र्य आणि प्रश्न विचारण्याची ताकद देणे अपरिहार्य आहे. परंपरा आणि विवेक यांची योग्य सांगड घातली, तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगत आणि न्याय्य होऊ शकतो.
म्हणून लेखाच्या शेवटी महाराष्ट्राच्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याकडे अद्भुत प्रतिभा, मर्मभेदी दृष्टी आणि विलक्षण समाजभान होतं. म्हणून त्यांनी आपल्या कवितेमधून ठणकावून सांगताना म्हटले आहे ,
नको नको रे ज्योतिषा। माझ्या दारी नको येऊ।
माझे दैव मला कळे।माझा हात नको पाहू॥१
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह।तळहाताच्या रेघोट्या।
बापा नको मारू थापा।अशा उगा खऱ्या खोट्या॥२
म्हणून नरेंद्र दाभोळकर, श्याम मानव आणि हमीद दलवाई यांनी दाखवलेला मार्ग हा विवेकाचा मार्ग आहे.
हा विवेकाचा मार्ग स्वीकारून स्त्रीने स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवला, तरच अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल शक्य आहे. म्हणून आजपासून आपण अंधश्रद्धेला नाही म्हणूया आणि विवेकाला होकार देऊया.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment