Skip to main content

परंपरा जपताना काही अनिवार्य बदल स्विकार्य आहेत का?


शुभंकरोति साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक : २०५
विषय क्र. : ४
विषय : परंपरा जपताना काही अनिवार्य बदल स्विकार्य आहेत का? हे बदल नाही स्वीकारले तर, नवीन पिढीला आपल्या संस्कृतीपासून दूर नेत आहोत का?* (वैचारिक लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई
परीक्षक : मा. सौ. अनलाताई बापट, अहमदाबाद

परंपरा जपायची म्हणजे नेमकं काय जपायचं, रूढी की मूल्ये? हा प्रश्न आज प्रत्येक सजग मनाला अस्वस्थ करणारा आहे. कारण परंपरा जपण्याच्या नावाखाली आपण जे काही टिकवून ठेवतो, त्यामागील सार समजून घेतो का, की केवळ बाह्य स्वरूपाला चिकटून राहतो, हा विचार करणे अत्यंत आवश्यक ठरते.

परंपरा या शब्दाची व्याख्या करायची झाली तर आपल्याला स्थिर परंपरा आणि परिवर्तनीय परंपरा या दोन्हींचा विचार करावा लागतो. कारण परंपरेमध्ये सामाजिक रचना, श्रद्धा आणि सांस्कृतिक प्रतीके यांचा समावेश असतो. त्यामुळे एखादी गोष्ट पारंपरिक आहे की नाही, हे ठरवताना तिच्यामागील मूल्ये तपासणे अत्यंत गरजेचे ठरते. कारण इथे परंपरा म्हणजे मूल्यांनी समृद्ध झालेली कल्पना जी जुन्या पिढीने नव्या पिढीकडे सोपवलेला एक अमूल्य ठेवा आहे. या ठेव्यामध्ये धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक परंपरांचा समावेश होतो; त्यामुळे त्यात कोणतीही भर घालताना विवेकाची साथ असणे आवश्यक आहे.

याच संदर्भात आज एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, तो म्हणजे परंपरा जपताना काही अनिवार्य बदल स्वीकारणे आवश्यक आहे का? आणि जर हे बदल स्वीकारले नाहीत, तर आपण नवीन पिढीला आपल्या संस्कृतीपासून दूर नेत आहोत का?

आपली संस्कृती आणि परंपरा या समाजाची ओळख असतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रथा, रूढी आणि मूल्ये आपण जपत असतो आणि त्याचा अभिमानही बाळगतो. मात्र काळाच्या ओघात समाज, जीवनशैली आणि विचारसरणी बदलत असतात. त्यामुळे परंपरा जपताना आवश्यक ते बदल स्वीकारणे ही केवळ गरज नसून एक जबाबदारीही ठरते.

आज आपण पाहतो की सण साजरे करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी घरगुती वातावरणात साजरे होणारे सण आता अनेकदा केवळ औपचारिकता किंवा दिखाऊपणाकडे झुकताना दिसतात. काही ठिकाणी तर पारंपरिक अर्थ आणि भावनांपेक्षा सोशल मीडियावर पोस्टकरण्यावर अधिक भर दिला जातो. यामुळे सणांचा आत्मा हरवत जातो आणि नवीन पिढीला त्या परंपरांशी भावनिक नाते निर्माण होणे कठीण जाते.

तसेच भाषेच्या बाबतीतही हेच चित्र दिसते. घराघरांतून मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे आणि इंग्रजीचा प्रभाव वाढताना दिसतो. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृतीची वाहक असते. जर नवीन पिढीला आपल्या मातृभाषेत संवाद साधण्याची सवयच राहिली नाही, तर त्या भाषेशी निगडित परंपरा, साहित्य आणि विचारसरणीपासून ती हळूहळू दूर जाऊ शकते.

सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे, “जग हे आपल्या विचारांची निर्मिती आहे; आणि विचार बदलल्याशिवाय जग बदलत नाही.या विचारातून हे स्पष्ट होते की बदल हा विचारांपासून सुरू होतो. परंपरा जपताना जर आपण बदलाला पूर्णतः नाकारले, तर आपण स्वतःलाच एका चौकटीत बंदिस्त करून घेतो. बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी संयम, विवेक आणि संवाद यांच्या माध्यमातून अधिक योग्य रीतीने स्वीकारता येते.

माणसाला बदलाची संकल्पना कधी कधी अस्वस्थ करणारी वाटते; परंतु ती त्याच्या वैयक्तिक विकासाचा अविभाज्य भाग आहे. बदल माणसाला अधिक सक्षम बनवतो. महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे, “Be the change that you wish to see in the world.” म्हणजेच, आपण समाजात जे बदल पाहू इच्छितो, त्याची सुरुवात स्वतःपासून करणे आवश्यक आहे. परंपरा जपत असताना जर आपण विचारपूर्वक बदल स्वीकारले, तर त्या परंपरांना अधिक व्यापक आणि समकालीन स्वरूप प्राप्त होते.

आजच्या काळात परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष दिसून येतो. उदाहरणार्थ, काही देवळांमध्ये विशिष्ट पोशाखाचे नियम पाळले जातात. काहींना हे परंपरेचे जतन वाटते, तर काहींना ते बदलत्या काळाशी विसंगत वाटते. या दोन्ही बाजूंमध्ये काही अंशी सत्य आहे. परंपरेचा गाभा जपत, त्यात काळानुसार लवचिकता ठेवणे अधिक योग्य ठरते. कारण परंपरा ही स्थिर नसून प्रवाही असते. कोणत्याही नियमांचा अतिरेक टाळला नाही, तर परंपरेबद्दल चीड निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोशाखापेक्षा मनाची शुद्धता आणि शांततेचे पालन अधिक महत्त्वाचे आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे.

कवी केशवसुत यांच्या एका कवितेतील विचार इथे मार्गदर्शक ठरतात. ते म्हणतात, “ब्राह्मण नाही हिंदुही नाही, न मी एक पंथाचा | तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा || खादाड असे माझी भूक | चतकोराने मला न सुख , कूपातिल मी नच मंडूक || मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे | कोण मला वठणीवर आणू शकत ते मी पाहे ||”. या ओळी संकुचित विचारसरणी पासून दूर राहण्याचा संदेश देतात. जर आपण केवळ परंपरेच्या नावाखाली संकुचितता जपली, तर नवीन पिढीला त्या परंपरा जड आणि अप्रासंगिक वाटू लागतात. परिणामी, ती पिढी आपल्या संस्कृतीपासून दूर जाण्याची शक्यता वाढते.

यावरून असे दिसते की, माणसाने स्वतःच्या आवडीनिवडींचा शोध घेत नवनवीन बदल स्वीकारले पाहिजेत. त्यातूनच नवीन तंत्रज्ञान, उद्योग, साहित्य, नाट्य, चित्रपट आणि संगीत यांची निर्मिती घडते. खऱ्या अर्थाने सर्जनशीलतेसाठी माणसाने स्वतःभोवती घातलेली कुंपणे तोडणे आवश्यक असते. कलेच्या आणि विचारांच्या जगात संकुचिततेला स्थान नसते; त्यामुळे धर्म, जात किंवा राष्ट्रीयतेची चौकट ओलांडून व्यापक दृष्टी स्वीकारणे गरजेचे आहे.

म्हणूनच, परंपरा जपताना तिच्यामागील मूल्ये समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जी परंपरा मानवी सन्मान, समानता आणि प्रगती यांना पोषक आहे, ती जपलीच पाहिजे. परंतु जी प्रथा कालबाह्य ठरते किंवा समाजात भेदभाव निर्माण करते, त्यामध्ये बदल करणे अपरिहार्य ठरते.

नवीन पिढी ही तर्कशुद्ध आणि प्रश्न विचारणारी आहे. तिला ही परंपरा आहेएवढे सांगणे पुरेसे ठरत नाही. त्या परंपरेमागील कारणे, मूल्ये आणि तिचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे. यासाठी संवाद हा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरतो. संवादामुळे परंपरा आणि आधुनिकता यांच्यात समन्वय साधता येतो.

बदल हा निसर्गाचा नियम आहे, तसेच तो मानवी जीवनाचाही आत्मा आहे. अपेक्षित बदल न घडल्यास जीवन एकसुरी आणि कमकुवत होऊ शकते. कोणताही बदल स्वीकारण्यासाठी नवीन संकल्पनांचा अभ्यास आणि त्यांचे आचरण आवश्यक असते. तसेच, समाजाशी संवाद साधूनच जुने बदलून नवीन निर्माण करता येते.

जर बदल स्वीकारले नाहीत, तर परंपरा कालबाह्य होण्याचा धोका निर्माण होतो. अशा वेळी नवीन पिढी त्या परंपरांपासून दूर जाऊ शकते. परंतु विवेकपूर्ण बदल स्वीकारले, तर परंपरा अधिक समृद्ध आणि टिकाऊ बनतात. त्या नव्या पिढीला जवळच्या वाटतात आणि त्यांच्याशी नाते अधिक घट्ट होते.

मराठीतील विचारवंत आणि लेखक  अ. ह. साळुंखे यांनी परिवर्तनाबाबत अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोन मांडला आहे. त्यांच्या मते, परिवर्तन ही एक तपश्चर्या आहे, जी निष्ठा, विवेक, संयम आणि सहकार्य यांवर आधारित असते. कोणत्याही क्षेत्रात योग्य परिवर्तन घडवण्यासाठी सखोल अध्ययन आवश्यक असते. संस्कृती, धर्म, इतिहास आणि परंपरा यांचा अभ्यास केल्याशिवाय त्यामध्ये निर्दोष बदल घडवता येत नाहीत. परिवर्तन हे केवळ शास्त्र नाही, तर एक कला देखील आहे.

शेवटी असे म्हणता येईल की परंपरा आणि बदल हे एकमेकांचे विरोधक नसून पूरक आहेत. परंपरेचा आत्मा जपत, काळानुसार आवश्यक बदल स्वीकारले, तरच आपली संस्कृती जिवंत आणि गतिमान राहील. अन्यथा, बदल नाकारल्यास आपण नकळत नवीन पिढीला आपल्या परंपरेपासून दूर नेत आहोत, हे निश्चित.

धन्यवाद
योगेश गोगवेकर


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...