शुभंकरोति साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक : २०४
विषय क्र. : ३
विषय : गांधी विचार म्हणजे नेमकं काय? (दीर्घ
लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई
परीक्षक : मा. माधुरीताई वानखडे
हिंगणघाट
आजच्या काळात जागतिकीकरण, उदारीकरण
आणि खाजगीकरण या प्रक्रियांमुळे जगभरातील अनेक राष्ट्रांमध्ये आर्थिक स्पर्धेचे
वातावरण निर्माण झाले आहे. विकसित राष्ट्रासोबत अविकसित देशसुद्धा या स्पर्धेत
उतरले आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्न अधिक
तीव्र स्वरूपात समोर येताना दिसतात. अनेक देशांमध्ये राजकीय व सामाजिक ध्रुवीकरण
वाढत आहे, आर्थिक असुरक्षिततेची भावना बळावत आहे, पर्यावरणीय
असंतुलन गंभीर होत आहे. दहशतवाद, भ्रष्टाचार, बेरोजगारी
यांसारख्या समस्या समाजाला वेढून राहिल्या आहेत. स्त्रिया आणि मुलांचे जीवनही अनेक
ठिकाणी असुरक्षित झाले आहे.
आज अनेक देशांमध्ये शासन व्यवस्था
लोकशाही असली तरी व्यवहारात एकाधिकारशाही प्रवृत्ती वाढताना दिसते. त्यामुळे
शासनप्रक्रियेत सामान्य लोकांचा सहभाग कमी होत आहे. धार्मिक आणि जातीय तणाव, आरोग्याच्या
समस्या, नैतिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, तरुण
पिढीची व्यसनाधीनतेकडे झुकणारी प्रवृत्ती आणि या सर्वांबाबत शासनाचे दिसणारे
उदासीन धोरण या सर्व गोष्टी समाजाला अधिक आक्रमक,
हिंसक आणि असहिष्णू बनवत आहेत. या
परिस्थितीपासून भारत देश पूर्णपणे अलिप्त नाही.
अशा वेळी मानवजातीला अशा विचारांची
आवश्यकता भासते जी संपूर्ण मानवी समूहाला एकत्र आणू शकतील आणि मानवतेचा व्यापक
दृष्टिकोन निर्माण करू शकतील. प्रेम,
सत्य,
अहिंसा,
सत्याग्रह आणि सर्वधर्मसमभाव ही मूल्ये
या संदर्भात अत्यंत महत्त्वाची ठरतात. आपण जर बारकाईने पाहिले, तर
लक्षात येते की ही मूल्ये महात्मा गांधींच्या विचारसरणीतून व्यापक स्वरूपात समोर
आली.
महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याच्या
काळात या मूल्यांचा केवळ प्रचार केला नाही,
तर त्यांचा प्रत्यक्ष आचरणातून उपयोग
करून दाखवला. त्यामुळे हे विचार एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिले नाहीत; ते
एक व्यापक विचारप्रवाह बनून संपूर्ण जगात पसरले. या विचारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते
केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. जातीयवाद,
धार्मिक तणाव, शैक्षणिक
प्रश्न, महिला सबलीकरण,
सामाजिक आणि ग्रामविकास अशा अनेक
क्षेत्रांना त्यांनी नव्या विचारांची दिशा दिली.
गांधींचे विचार हे त्यांच्या कृतीतून
घडलेले होते. तेच त्यांच्या तत्त्वज्ञानाचे मूळ होते. आपल्या विचारांमध्ये बदल
झाला तरी त्याचे खोटे समर्थन उभे करण्याची गरज त्यांनी कधीच भासू दिली नाही. कारण
त्यांच्या जीवनाचा पाया त्यांच्या विचारांपेक्षाही अधिक प्रामाणिक आणि मजबूत होता.
अहिंसा, सत्य, सत्याग्रह आणि स्वावलंबन हे त्यांच्या विचारांचे प्रमुख
आधारस्तंभ होते.
अहिंसेचे तत्वज्ञान
गांधीजींच्या अहिंसेबद्दल बोलताना एक
महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यांची अहिंसा ही भीरूपणाची किंवा
दुर्बलतेची संकल्पना नव्हती. उलट ती माणुसकीचा विचार करणारी, लोकशाही
मार्गाने संवाद साधून प्रश्न सोडविण्याची ताकद देणारी आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष
करण्याची प्रेरणा देणारी होती.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास
पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते, जर भारताने हिंसेच्या मार्गाने
स्वातंत्र्य मिळवीले असते, तर स्वतंत्र भारतातही प्रश्न सोडविण्यासाठी हिंसेचा मार्ग
मानला गेला असता. अशा परिस्थितीत लोकशाही संस्था निर्माण होण्याची शक्यता अत्यंत
कमी राहिली असती.
स्वातंत्र्यानंतर भारताने संसदीय
लोकशाहीचा मार्ग स्वीकारला. त्यात गांधीजींच्या अहिंसेच्या विचारांचा मोठा प्रभाव
होता. गांधीजींची अहिंसा केवळ शांततावादी नव्हती;
ती अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची नैतिक
शक्ती होती. ती मानवाला निर्भय बनवते आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची
प्रेरणा देते.
भारतीय स्वातंत्र्यलढा सुरू
करण्यापूर्वी गांधीजींनी संपूर्ण देशभर प्रवास करून लोकांचे जीवन जवळून पाहिले.
त्यांना हे स्पष्टपणे जाणवले की काही ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारून भारताला
स्वातंत्र्य मिळणार नाही. त्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारणे आवश्यक होते. भारतीय
जनता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे सशस्त्र संघर्ष करणे शक्य नव्हते. त्यामुळे
गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला आणि स्वातंत्र्यलढा सर्वसामान्य जनतेच्या
सहभागाने उभा राहिला.
सत्याची संकल्पना
अहिंसेप्रमाणेच गांधीजींनी सत्याची
संकल्पना अत्यंत प्रभावीपणे मांडली. त्यांच्या मते सत्याचा शोध घेणे हा मानवी स्वभावाचा
अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्याचा
प्रयत्न करत असत.
सुरुवातीला त्यांनी “ईश्वर
सत्य आहे” असे प्रतिपादन केले;
परंतु पुढे त्यांनी “सत्य
हेच ईश्वर आहे” अशी अधिक व्यापक मांडणी केली. या प्रक्रियेत त्यांनी स्वतःला देवत्व
देण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. त्यांच्या आयुष्यात झालेल्या चुका त्यांनी
प्रामाणिकपणे मान्य केल्या आणि शक्य तिथे त्या दुरुस्त केल्या. म्हणूनच गांधीजी
परिवर्तनशील आणि आत्मपरीक्षण करणारे महामानव ठरतात.
सत्याग्रहाची संकल्पना
गांधीजींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून
संघर्षाचे एक वेगळे तत्त्वज्ञान निर्माण केले. त्यांच्या मते कोणताही संघर्ष
अपरिहार्य असला तरी प्रतिस्पर्ध्याला शत्रू मानून त्याला नष्ट करणे योग्य नाही.
प्रत्येक व्यक्ती मानवी समाजाचा भाग आहे आणि त्याच्याशी संवाद साधून मतभेद कमी
करणे शक्य आहे.
मानवाने स्वतःच्या आणि आपल्या
संस्कृतीच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण वाढते आणि
व्यापक मानवतावादी दृष्टिकोन विकसित होतो.
समाजाला एखादी गोष्ट मान्य नसल्यास
हिंसेचा मार्ग स्वीकारण्याऐवजी असहकार,
बहिष्कार आणि सविनय कायदेभंग यांसारख्या
अहिंसक पद्धतीचा अवलंब करावा, असे गांधीजी सांगतात. कारण हिंसेतून
द्वेष निर्माण होतो आणि त्यातून शाश्वत असे काहीही निर्माण होत नाही.
धर्म आणि सार्वजनिक जीवन
गांधीजी सार्वजनिक जीवनात धर्माच्या
नैतिक मूल्यांना महत्त्व देतात; परंतु शासन आणि धर्म यांचा परस्पर संबंध
असू नये, अशी त्यांची ठाम भूमिका होती. कोणत्याही सरकारने धार्मिक
संस्थांना किंवा धार्मिक शाळांना आर्थिक मदत देऊ नये, असे
ते सांगत असत.
त्यांच्या मते कोणताही धर्म पूर्णतः
परिपूर्ण नसतो. त्यामुळे धर्मासाठी लागणारा निधी धार्मिक लोकांनी स्वतः उभारला
पाहिजे, म्हणजे त्याचा योग्य आणि जबाबदारीने उपयोग होईल.
स्वावलंबनाचा विचार
गांधीजींच्या विचारांमध्ये स्वावलंबनाला
अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचा स्वावलंबनाचा विचार स्वदेशी आणि
ग्रामस्वराज्य या संकल्पनांवर आधारित होता. स्थानिक संसाधनांचा वापर करून लोकांनी
आपली कामे स्वतः करावीत, असा त्यांचा आग्रह होता.
अन्न आणि वस्त्रनिर्मितीत स्वयंपूर्णता, चरख्याद्वारे
खादी उत्पादन आणि गावे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे, या
गोष्टींवर त्यांनी भर दिला. हा केवळ आर्थिक कार्यक्रम नव्हता; तो
आत्मसन्मान, नैतिक विकास आणि परकीय अवलंबित्व नाकारण्याचा तो मार्ग होता.
गांधींच्या विचारांचा जागतिक प्रभाव
महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव
भारतापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने जगभरातील
अनेक नेत्यांना प्रेरणा दिली. नेल्सन मंडेला,
मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर आणि बराक
ओबामा यांसारख्या नेत्यांनी त्यांच्या विचारां मधून प्रेरणा घेतली.
अनेक पाश्चात्त्य अभ्यासकांनी
गांधींच्या विचारांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते गांधीजींनी प्रत्यक्ष
कृतीतून दाखवलेले मार्ग आजही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.
२१व्या शतकातील गांधी विचार
आज अनेकांना प्रश्न पडतो की एकविसाव्या
शतकात गांधींच्या विचारांना काही महत्त्व उरले आहे का? प्रत्यक्षात
या प्रश्नाचे उत्तर सकारात्मकच आहे. आधुनिक समाजातील अनेक समस्या म्हणजे हिंसा, असहिष्णुता, पर्यावरणीय
संकट, सामाजिक विषमता यांच्या पार्श्वभूमीवर गांधींचे विचार अधिकच
महत्त्वाचे ठरतात.
यशवंत सुमंत यांनी “महात्मा
गांधींची विचारसृष्टी : काही अलक्षित पैलू”
या पुस्तकात गांधींच्या विचारांची
वैशिष्ट्ये स्पष्ट करताना सांगितले आहे की गांधी धर्माच्या भाषेत धर्मनिरपेक्षता
शिकवतात, कर्तव्याच्या भाषेत हक्कांची जाणीव करून देतात आणि कायद्याचे
पालन सांगताना आवश्यक तेथे कायदेभंग करण्याचा मार्ग दाखवतात. अशा प्रकारे ते
पारंपरिक संकल्पनांचा वापर करून अत्यंत क्रांतिकारक संदेश सामान्य लोकांपर्यंत
पोहोचवतात.
गांधीजी स्वतः म्हणत असत, “मी
एक माणूस असल्याने माझे परम सत्याचे आकलन परिपूर्ण नाही. जीवन म्हणजे आपल्या
मर्यादांमधून वर उठत ‘सत्याकडून सत्याकडे’
प्रवास करणे.”
या विचारांतून त्यांनी संपूर्ण
मानवजातीला निर्भयतेचा संदेश दिला. आजच्या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जगात
मानवतेचा मार्ग शोधायचा असेल, तर गांधी विचारांकडे पुन्हा नव्याने
पाहण्याची गरज आहे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment