विषय : पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव : द ब्रदर्स कारमाझोव्ह (The Brothers Karamazov)
लेखक : फ्योदोर दोस्तॉयवस्की (Fyodor Dostoevsky)
इंग्रजी भाषांतर : कॉन्स्टन्स गार्नेट (Constance Garnett)
प्रकाशक : OM Book International
पृष्ठे : ८८०
शब्दांकन : योगेश गोगवेकर
संकेतस्थळ :
आजचे युग डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. या युगातील अनेक तरुणांना लघुलेख आणि संक्षिप्त मजकूर वाचण्याची सवय आहे; प्रदीर्घ लेखनासाठी वेळ किंवा संयम कमी पडतो. अशा वेळी फ्योदोर दोस्तॉयवस्की यांची सुमारे ९०० पानांची ‘द ब्रदर्स कारमाझोव्ह’ ही कादंबरी वाचावी, असे सांगणे काहीसे कठीण वाटते. तरीही मला ठामपणे वाटते की वयाची एकवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही माणसाने ही कादंबरी कोणतीही पूर्वअट न ठेवता वाचली पाहिजे. कारण ही केवळ कथा नसून देव, स्वातंत्र्याची इच्छा, नैतिकता आणि मानवी जबाबदारी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर गंभीर चिंतन करणारे तात्त्विक महाकाव्य आहे.
स्वतःचे वेगळेपण जपायचे असेल, विचारांची स्वतंत्र दिशा घडवायची असेल, तर उत्तम आणि प्रदीर्घ साहित्य वाचणे आवश्यक असते. त्या दृष्टीने ‘द ब्रदर्स कारमाझोव्ह’ आपल्याला वास्तवाचा अर्थ लावण्याची बौद्धिक ताकद देते. आपल्याला अपेक्षित असलेली परिस्थिती आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये दरी असते; पण आपण जर त्या दरीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तर व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेली कोणतीही राजकीय-सामाजिक व्यवस्था कोसळण्याची शक्यता निर्माण होते, हा सूक्ष्म इशारा ही कादंबरी देते.
१८८० साली रशियन भाषेत प्रकाशित झालेली ही दोस्तॉयवस्की यांची अखेरची आणि सर्वाधिक परिपक्व कलाकृती मानली जाते. कारमाझोव्ह कुटुंबाच्या कथानकाभोवती विणलेली ही कादंबरी मानवी अंतःकरणातील श्रद्धा-अश्रद्धा, अपराधभावना, न्याय-अन्याय आणि मोक्ष-भ्रंश यांच्या सीमारेषांचा शोध घेते. ती केवळ कुटुंबकथा नसून मानवी आत्म्याच्या संघर्षाचा विस्तीर्ण पट उलगडते.
कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेले कारमाझोव्ह कुटुंब हे समाजाचे रूपक आहे. वडील फ्योदोर पावलोविच कारमाझोव्ह हे स्वार्थ, विकृती आणि नैतिक अधःपतनाचे प्रतीक आहेत. दोन विवाह केलेले, दोन्ही पत्नी दिवंगत; आणि जीवनाकडे बेफिकीर, स्वैर दृष्टीने पाहणारा हा मनुष्य आजच्या सार्वजनिक जीवनातील अनेक व्यक्तींशी साधर्म्य दाखवतो की जे सत्ता, पैसा आणि अहंकाराच्या जोरावर नैतिकतेला तिलांजली देतात. राज्यघटना वा मूल्ये यांच्याकडे ते आदराने नव्हे, तर स्वतःच्या सोयीने पाहतात.
फ्योदोर पावलोविच कारमाझोव्ह याला तीन पुत्र आहेत. ही तीन मुले म्हणजे समाजातील तीन प्रवृत्ती असल्याचे दाखविले आहेत. दिमित्री हा सर्वात मोठा पण फ्योदोर पावलोविचला पहिल्या बायको पासून झालेला मुलगा २८ वर्षाचा असून भावनांच्या भरात पेटणारा, संतापाने निर्णय घेणारा नागरिक आहे. दुसरा मुलगा इव्हान २४ वर्षाचा तर तिसरा मुलगा अल्योशा २१ वर्षाचा आहे. ही दोन्ही मुले फ्योदोर पावलोविचला दुसऱ्या बायकोपासून झालेली मुले आहेत. इव्हान हा तर्कशुद्ध पण निराश, प्रश्न विचारणारा पण कृती न करणारा मध्यमवर्गीय मनुष्य आहे आणि अल्योशा हा मूल्य, करुणा आणि संविधानिक नैतिकतेवर विश्वास ठेवणारा दुर्मिळ नागरिक आहे.
फ्योदोर पावलोविच कारमाझोव्ह याच्या तीनही मुलांमध्ये संपत्ती, प्रेम आणि मत्सर यामुळे संघर्ष होत असतो आणि शेवटी वडिलांचा खून होऊन कुटुंबात मोठा गोंधळ निर्माण होतो. खुनाचा आरोप दिमित्री पावलोविच वर आलेला असतो. तो खरा निर्दोष असतो आणि जगाला सांगत असतो की त्याचा वडिलांवर राग जरूर असतो पण त्याने हा खून केलेला नाही. हे त्याच्या दोन्ही भावांना सुद्धा माहिती असते. पण तेथील समाज त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. इथे लेखक अपराधाला केवळ गुन्हेगारी कृती पुरते मर्यादित ठेवत नाही. लेखकाच्या म्हणण्यानुसार “खून कोणी केला?” हे महत्वाचे नसून, माणूस चुकीच्या मार्गाने का जाऊ लागतो? हे समजून घेणे जरुरीचे आहे. त्यासाठी लेखक म्हणतो की अपराध हा मौनातूनही जन्मतो आणि द्वेष, दुर्लक्ष, असंवेदनशीलता हे या अपराधाचे स्वरूप आहे.
श्रद्धा आणि संशय यातील संघर्ष ही कादंबरीची मध्यवर्ती रेषा आहे. अल्योशा देव आणि माणुसकीवर विश्वास ठेवतो; तर इव्हान देवाच्या न्यायावर प्रश्न उपस्थित करतो. इव्हानचे प्रसिद्ध वाक्य आहे, “जर देव नसेल, तर सर्व काही परवान्याचे आहे.” हे वाक्य पुस्तक वाचून संपवल्यानंतर सुद्धा विसरू शकत नाही. कारण हा प्रश्न फक्त देवाचा नसून, तर नैतिकतेचा आहे. जर नियम नसतील, मूल्ये नसतील, अंतःकरण जागे नसेल, तर माणूस कुठे जाईल? आजच्या जगात जेव्हा पैसा, सत्ता, प्रसिद्धी हेच अंतिम सत्य बनते, तेव्हा हे वाक्य अधिक भयानक वाटते.
या पुस्तकातील “द ग्रँड इन्क्विझिटर” हा भाग जागतिक साहित्याच्या इतिहासात फार महत्वाचा मानला जातो. येथे प्रश्न विचारला गेला आहे की माणसाला खरेच स्वातंत्र्य हवे असते का, की सुरक्षित गुलामगिरी? हा विचार धार्मिक चौकटीपलीकडे जाऊन सामाजिक आणि राजकीय संदर्भातही अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अनेकदा स्वातंत्र्याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा सोयीचे बंधन माणूस गुलामगिरी पसंत करतो आणि ही जाणीव अस्वस्थ करणारी आहे.
लेखक फ्योदोर दोस्तॉयवस्की प्रत्येक पात्राची मानसशास्त्रीय गुंतागुंत समर्थपणे उलगडतात. येथे कोणी पूर्णतः चांगले किंवा पूर्णतः वाईट नाही. स्मेर्द्याकोव्ह, झोसिमा, ग्रुशेंका यांसारखी पात्रेही मानवी मनाच्या विविध छटा समोर आणतात. त्यामुळे ही कादंबरी कथा न राहता आत्मपरीक्षणाचा जिवंत दस्तऐवज बनते.
द ब्रदर्स कारमाझोव्ह ही कादंबरी केवळ रशियन समाजाचे चित्र नसून, ते कोणत्याही लोकशाही समाजासाठी एक महत्वाचा आरसा आहे. सामाजिक विषमता, जातीय व धार्मिक ध्रुवीकरण, राजकीय प्रचाराचे आक्रमण, सत्याचे विस्थापन, मूल्यांची माघार या पार्श्वभूमीवर ही कादंबरी आपल्याला अधिकच महत्वाची वाटते कारण ती सांगते की समाजाचा खरा प्रश्न सत्ता नाही; समाजाचा खरा प्रश्न नैतिकता आहे. म्हणून ही कादंबरी विचारते, “आपण कोण आहोत?” दिमित्रीचे आवेग? इव्हानचा संशय? की अल्योशाची करुणा?, ही कादंबरी पुढे म्हणते की समाजाचा खून केवळ माणसाचा नसतो. तो मूल्यांचा असतो. तो आत्म्याचा असतो. म्हणूनच द ब्रदर्स कारमाझोव्ह ही कादंबरी आजच्या काळात केवळ साहित्यिक महानता नाही, तर नैतिक आणि सामाजिक आत्मपरीक्षणाची गरज बनते.
कादंबरीतील एक महत्त्वपूर्ण संदेश विशेष उल्लेखनीय आहे: “स्वतःशी खोटे बोलू नका.” जो मनुष्य स्वतःशीच असत्य वागतो, त्याला शेवटी सत्य ओळखण्याची क्षमता गमवावी लागते. आदर नष्ट झाला की प्रेमही नष्ट होते; आणि प्रेम नसताना माणूस विकारांकडे झुकतो. म्हणून स्वतःचे आत्मपरीक्षण करत राहणे, खोटेपणापासून दूर राहणे आणि भीतीवर मात करणे, हा या कादंबरीचा जीवन दृष्टिकोन आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की ‘द ब्रदर्स कारमाझोव्ह’ ही कादंबरी केवळ साहित्यिक महानता नाही, तर मानवी आत्म्याचे तात्त्विक महाकाव्य आहे. स्वतःसाठी वेळ काढा आणि ही कादंबरी अवश्य वाचा; कारण ती आजच्या काळात आपल्याला जग समजण्यापूर्वी स्वतःला समजून घेण्याची शिकवण देते.
धन्यवाद,
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment