शिक्षणक्षेत्रात माणसाने इतकी आघाडी घेतली असतानाही नीतिमूल्यांची सतत घसरण होत आहे; माणसातील राक्षसी वृत्ती वाढत चालली आहे.यावर मात कशी करावी? (वैचारिक लेख)
शुभंकरोति साहित्य परिवार
सप्ताह क्र.: १९५ | विषय क्र.: ४विषय :शिक्षणक्षेत्रात माणसाने इतकी आघाडी घेतली असतानाही नीतिमूल्यांची सतत घसरण होत आहे; माणसातील
राक्षसी वृत्ती वाढत चालली आहे.यावर मात कशी करावी? (वैचारिक लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर
परीक्षक : मा. प्रा. सुमतीताई पवार
शिक्षण हे कोणत्याही मानवी समाजाच्या यशाचे आणि विकासाचे मूलभूत अधिष्ठान आहे. समाजाच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि नैतिक प्रगतीसाठी सुदृढ शिक्षणव्यवस्था आवश्यक आहे, याबाबत कोणाचे दुमत नाही. तसेच कोणत्याही समाजाचा शैक्षणिक दृष्टीकोन न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित असायला हवा. म्हणूनच कोणत्याही देशाच्या शासनाने अशी शिक्षणव्यवस्था उभारली पाहिजे, जी समाजातील सर्व घटकांना, त्यांची सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी काहीही असो, समान संधी देणारी असेल.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय शिक्षणधोरण आखताना सामाजिक समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचारसरणी यांना केंद्रस्थानी ठेवले. कोणतेही शिक्षण विशिष्ट धर्म, श्रद्धा किंवा अंधपरंपरांच्या प्रभावापासून मुक्त असले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. अशा शिक्षणातून विविध समुदायांमध्ये एकता आणि सौहार्द निर्माण होईल, असा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी वैज्ञानिक शिक्षणावर भर देत, समाजात टीकात्मक विचारकौशल्ये आणि चौकशीची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे, हे अधोरेखित केले. वैज्ञानिक दृष्ट्या साक्षर समाजच नावोपक्रम, संशोधन आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतो, असा नेहरूंचा विश्वास होता. त्यातून देश उभारणीसाठी उच्च शिक्षण संस्थेची पायाभरणी झाली.
या शिक्षणधोरणामुळे भारतीय समाजाने लक्षणीय प्रगती केली आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, ऑनलाइन अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण यांमुळे ज्ञानसंपादन अधिक सुलभ झाले आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे, कौशल्याधारित शिक्षणाला चालना मिळाली आहे आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी तरुण पिढी सज्ज होत आहे. तथापि, या सर्व प्रगतीच्या पार्श्वभूमीवर समाजात वाढत चाललेली हिंसा, असहिष्णुता, भ्रष्टाचार, लैंगिक अत्याचार, अमानुषता आणि आत्मकेंद्रित वृत्ती पाहिली की काही अस्वस्थ करणारे प्रश्न उभे राहतात. इतके शिक्षण असूनही माणूस अधिक निर्दयी का होत चालला आहे? शिक्षणाच्या प्रगतीबरोबर नीतिमूल्यांची सतत घसरण का होत आहे? हा विरोधाभास नाही काय?
हा विरोधाभास अधिकच अस्वस्थ करणारा आहे, कारण शिक्षणाचा मूलभूत उद्देश माणसाला सुसंस्कृत, विवेकी आणि जबाबदार नागरिक घडवणे हा आहे. जर शिक्षण असूनही माणूस अधिक क्रूर, असहिष्णु आणि आत्मकेंद्रित होत असेल, तर त्या शिक्षणपद्धतीचा पुनर्विचार करणे अपरिहार्य ठरते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आजचे शिक्षण मोठ्या प्रमाणावर उपजीविकाकेंद्रित झालेले दिसते. चांगली नोकरी, अधिक पगार, सामाजिक प्रतिष्ठा आणि यश यांनाच आपण शिक्षणाचे अंतिम ध्येय मानू लागलो आहोत. काय शिकायचे आणि किती शिकायचे, यावर भर असतो; पण कसे जगायचे, हा प्रश्न मागे पडतो.
नीतिमूल्ये, सामाजिक भान, सहअस्तित्व, करुणा आणि सत्यनिष्ठा यांसारख्या संकल्पना अभ्यासक्रमात असल्या, तरी त्या अनेकदा पाठांतरा पुरत्या मर्यादित राहतात. मूल्यशिक्षण हे गुणांच्या चौकटीत मोजता येत नाही, हे आपण विसरतो आहोत. परिणामी, शिक्षण आणि जीवन यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना यश मिळवण्याचे मार्ग शिकवले जातात; मात्र अपयश स्वीकारण्याची मानसिकता विकसित केली जात नाही. स्पर्धा जिंकण्याची वृत्ती वाढते, पण सहकार्याची भावना कमी होते. बुद्धिमत्ता वाढते; पण भावनिक परिपक्वता मागे पडते. विवेकापेक्षा चलाखपणाला अधिक महत्त्व दिले जाते, आणि हाच प्रवास माणसातील राक्षसी वृत्तीला खतपाणी घालतो.
या संदर्भात माध्यमे आणि सामाजिक माध्यमांची भूमिकाही दुर्लक्षित करता येणार नाही. तात्काळ प्रतिक्रिया, सतत मतप्रदर्शन आणि आक्रमक आत्मप्रचार यांमुळे संवेदनशीलतेचा ऱ्हास होत आहे. शिक्षणाने विचारशील नागरिक घडवायचे असताना, आपण प्रतिक्रिया देणारे उपभोक्ते निर्माण करत आहोत. सत्यापेक्षा प्रभावाला आणि संवादापेक्षा घोषणाबाजीला अधिक महत्त्व दिले जाऊ लागले आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकन तत्त्वज्ञ ऍलन ब्लूम यांचे The Closing of the American Mind: How Higher Education Has Failed Democracy and Impoverished the Souls of Today’s Students हे पुस्तक विशेष महत्त्वाचे ठरते. या पुस्तकात ब्लूम असा युक्तिवाद करतात की अमेरिकेतील विद्यापीठांनी टीकात्मक विचारसरणी आणि नैतिक स्पष्टता जोपासण्याचे आपले ध्येय गमावले आहे. परिणामी, बौद्धिक आणि सांस्कृतिक ऱ्हास मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. सापेक्षतावादाच्या अतिरेकामुळे चांगले आणि वाईट यातील फरक ओळखण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये कमी होत असल्याचे ते दाखवून देतात. त्यामुळे मानवी जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत नाही. १९८७ मध्ये लिहिलेले हे पुस्तक आजच्या जागतिक परिस्थितीस भारतासह लागू पडते, असे वाटते.
याच संदर्भात डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांचे उद्गार अर्थपूर्ण ठरतात. ते म्हणतात, “नैतिकतेशिवायचे शिक्षण म्हणजे होकायंत्राशिवायचे जहाज.” आजच्या तरुणांमध्ये नैतिक मूल्यांचा ऱ्हास हे समाजासमोरील गंभीर आव्हान बनले आहे.
मग या परिस्थितीत मार्ग कोणता? सर्वप्रथम शिक्षणाच्या उद्देशाकडे नव्याने पाहणे गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडवणे, हा विचार धोरणात्मक पातळीवर स्वीकारला गेला पाहिजे. अभ्यासक्रमात नीतिमूल्ये स्वतंत्र प्रकरण म्हणून न मांडता, सर्व विषयांमधून मानवी प्रश्नांची चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. इतिहास सत्तेचा विवेक शिकवू शकतो, विज्ञान जबाबदारीचे भान देऊ शकते, तर साहित्य मानवी संवेदना जागवू शकते.
ऍलन ब्लूम यांचे मत आहे की या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यांना ग्रंथवाचनाकडे परतले पाहिजे. अवांतर वाचनातूनच बौद्धिक पात्रता आणि नैतिक विचारशक्ती विकसित होते. ग्रंथ न्याय, प्रेम आणि सत्य यांसारख्या सार्वत्रिक प्रश्नांशी सामना करण्याची क्षमता देतात आणि आत्मपरीक्षणातून टीकात्मक विचार घडवतात.
या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका निर्णायक ठरते. शिक्षक हे केवळ अभ्यासक्रम पोहोचवणारे नसून, मूल्यांचे सजीव उदाहरण असतात. त्यांचे वर्तन, न्याय्यपणा आणि संवादशैली विद्यार्थ्यांवर खोल परिणाम करतात. प्रश्न विचारण्याची मुभा, मतभेदांना स्थान आणि संवादाची संस्कृती शिक्षण संस्थांमध्ये रुजली, तर शिक्षण खऱ्या अर्थाने फलदायी ठरेल. सुप्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ एरिक फ्रॉम शिक्षणाला मानवी क्षमता विस्तारण्याचे साधन मानतात. त्यांच्या मते शिक्षणातून प्रेम, आदर आणि स्वायत्तता जोपासली जाते, आणि हे केवळ संवेदनशील, मुरलेला शिक्षकच देऊ शकतो.
हे सर्व उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेत शक्य होते. अशा व्यवस्थेत विविध विचारधारांना वाव असतो आणि कला, साहित्य, तत्त्वज्ञान यांच्या माध्यमातून सत्याचा शोध घेणे सुलभ होते. मात्र या मोकळेपणाचा वापर जर ध्रुवीकरणासाठी केला गेला, तर त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात.
आजचा काळ आधुनिक शिक्षणाच्या आत्मपरीक्षणाचा आहे. प्रगतीच्या झगमगाटात आपण थांबून विचार केला पाहिजे, आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण घडवत आहोत? केवळ कुशल आणि स्पर्धक माणसे, की संवेदनशील, विवेकी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले नागरिक?
नीतिमूल्यांची घसरण ही केवळ शिक्षणव्यवस्थेची अपयशकथा नाही; ती समाजासाठी वाजणारी इशाराघंटा आहे. शिक्षण हेच असे प्रभावी साधन आहे, जे माणसातील राक्षसी वृत्तीवर विवेक, करुणा आणि मानवतेच्या बळावर मात करू शकते. मात्र त्यासाठी शिक्षणाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलावी लागेल. अन्यथा प्रगतीच्या झगमगाटात माणूसच हरवून जाईल आणि तोच आपल्या शिक्षणाचा सर्वात मोठा पराभव ठरेल.
योगेश गोगवेकर, माहीम, मुंबई
Comments
Post a Comment