Skip to main content

Sananche Badalate Swarup-सणांचे बदलते स्वरूप (लेख)

 


रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : ३६४
विषय क्रमांक : ४
विषय : सणांचे बदलते स्वरूप (लेख)
शब्दांकन: योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम, मुंबई

पूर्वपार चालत आलेल्या सणांनी भारतीय समाजाला संजीवनी देण्याचे काम केले आहे हे निर्विवाद सत्य आहे. या सणांमुळे मानवी समाजात जी आपुलकी निर्माण झाली त्यातूनच माणसांचे एकमेकांमध्ये जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते सबंध निर्माण झाले हे सुद्धा खरे आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे छोटे मोठे सण येतात आणि ते भारतीय लोक मस्तपणे साजरेही करतात. याचाच अर्थ असा होतो की सण म्हणजे फक्त धार्मिक विधी नाहीत, तर समाजाला एकत्र आणणारा, माणसांना आपल्या संस्कृतींशी जुळवून ठेवणारा महत्वाचा सेतू आहे.  या पारंपारिक सणामागे अध्यात्मिक विचार तर असतोच, तसाच सामाजिक संदेश सुद्धा  असतो. त्यात एखादी मानवी भावनासुद्धा दडलेली असते ती बऱ्याचवेळा मनोरंजनातून व्यक्तसुद्धा होत असते. म्हणूनच सण आपल्या परंपरेचे जिवंत रूप आहे. आज भारतात ज्या प्रकारे सण साजरे होत आहे, त्यामुळे आपल्याला सणांच्या स्वरुपात काही बदल जाणवत आहे.  पण हा बदल सकारात्मक म्हणजे प्रगतीचा आहे का की नकारात्मक मार्गाने गेल्यामुळे अध:पतनाचा आहे, हे मात्र पाहावं लागेल.

हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत दर महिन्यात कोणत्या ना कोणत्या रुपात सण साजरे केले जातात. चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा महाराष्ट्रात गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वास्तविक सण म्हणून साजरा न करता हिंदू प्रथेनुसार नवीनवर्षाचा शुभारंभ म्हणून साजरा केला जातो. या महिन्याच्या शुक्ल पक्षात नवव्या दिवशी प्रभू रामचंद्राचा जन्म दिवस रामनवमी म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यात प्रभू रामाने केलेल्या त्यागाचे महत्व सांगितले जाते. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करून हनुमाना सारखे बलदंड होऊन गावाचे रक्षण करणे कसे जरुरीचे आहे असे सांगितले जाते.

जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट सावित्रीचा सण साजरा केला जातो. हा सण सावित्रीच्या कथेवर आधारित आहे. इथे ही कथा खरी आहे की खोटी असा विचार न करता या कथेत शास्त्रोक्त सत्य काय आहे हे पाहिजे जात होते. या कथेत सत्यवान वडाच्या झाडाखाली आपले अचेतन शरीर ठेवतो मग सावित्री यमाला प्रसन्न करून सत्यावानाचे प्राण परत घेवून येते. याचा अर्थ असाही काढला जाऊ शकतो की सत्यवानाला प्राणवायू कमी पडत होता आणि तो अशा वडाच्या झाडा खाली होता त्या झाडाची प्राणवायू उत्सर्जनाची क्षमता इतर झाडांच्या तुलनेत खूप जास्त असते. त्यामुळे सत्यवान बेशुद्ध अवस्थेतून परत शुद्धीत आला. याचाच अर्थ असा की या वॄक्षाची माती आणि त्यायोगे जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते, म्हणून हे झाड कधीच तोडू नये यासाठी हा सण साजरा केला जातो.

बहुतेक भारतीय सण हे हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यापासून सुरु होतात. श्रावण महिन्यात नागपंचमी हा पहिला सण येतो. त्यानंतर नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्मोत्सव (दहीहंडी) सारखे सण येतात. याच महिन्यात मंगळागौरीची पूजा सुद्धा होते. या मंगळागौरीच्या पूजेत मुली बायका रात्रभर जागून पारंपारिक पद्धतीने गाणी म्हणत विविध खेळ खेळत असे. भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव, आश्विन महिन्यात येणारी नवरात्र, दसरा आणि आश्विन व कार्तिक महिन्यात येणारी दिवाळी असे मोठे सण साजरे होतात. मार्गशीष ते फाल्गुन महिन्यात छोटे सण साजरे होतात पण माघ महिन्यात महाशिवरात्री आणि फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणारी होळी पौर्णिमा हे मोठे सण साजरे होतात. या सर्व सणात मनोरंजनाचा व करमणुकीचा भाग जरी असला तरी वैचारिक आणि बौद्धिक घटकांचे पोषण करीत नवीन पिढ्या उत्तम पद्धतीने घडवण्याचे काम होत होते.

हे पारंपारिक पद्धतीने साजरे होणारे सण म्हणजे जीवनातील खरी मेजवानी असायची. घरातील प्रत्येक सदस्य, शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईक, एकंदर आजूबाजूचा सर्व समाज एकत्र येत होते आणि सण साजरे करीत होते. त्यात दिवाळीमधल्या प्रकाशाचा आणि सद्भभावनेचा सुगंध असायचा, गणेशोत्सव या सणात भक्तीच्या मार्गे एकता आणि समाजकारणाचा संदेश होता तर नवरात्रात नवचैतन्याचा उत्साह असायचा. मकरसंक्रांतीमधील गोडवा मानवी नाते घट्ट करीत असे. होळीचा रंग काही वेगळाच असायचा. या दिवशी जुने मतभेद किंवा वैर विसरून सर्वजण परत एकदा एकत्र येत असत. हा सर्व प्रकारामुळे मानवी जीवन सुंदर बनत होते.

पण काळानुसार मानवी समाज बदलला. जीवनशैली वेगळी झाली. जीवनातील अग्रक्रम बदलले. त्याचप्रमाणे सणांचे स्वरूपही बदलले. त्यात काही सकारात्मक बदल आले तर पुष्कळ प्रमाणात नकारात्मक बदल आले. आज बहुतेक लोकांसाठी हे सण म्हणजे सुट्टी, खरेदी आणि सोशल मिडीयामध्ये पोस्ट टाकणे एवढ्यासाठीच मर्यादित राहिले आहेत. प्रत्येक सणांचे व्यापारीकरण झाले आहे. प्रत्येक दुकानातील जाहिरात पाहून असे वाटते की आपण म्हणजे मानवी समाज हे सण साजरे करीत नसून बाजारपेठ आपल्याकडून हे सण साजरे करून घेत आहे. त्यामुळे सणांची सामुहिक भावना संपली असून माणसाच्या वैयक्तिक सामर्थ्यांचे प्रदर्शन वाढलेले दिसत आहे. म्हणजे हे सर्व सण स्टेटस सिम्बॉलझाल्यासारखे वाटू लागले आहेत. महागडे कपडे घेणे, मोठे कार्यक्रम करणे, वगैरे हेच सर्व सणांचे आकर्षण बनले आहे. या सगळ्यांच्या गदारोळात मानवी संवेदना, साधेपणा आणि एकत्रित आनंद हरवताना दिसतो.

वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून घरी नेतात आणि दुसऱ्या दिवशी त्या फांद्या कचऱ्यात फेकून देतात त्यामुळे त्या झाडाची अवस्था काय होत असेल याबद्दल न बोलणे बरे. त्याचप्रमाणे गोकुळाष्टमीचा अनोखा भाग असलेल्या दहीहंडीच्या सणाची. असं बघायला गेले तर दहीहंडी हा लहान मुलांचा खेळ आहे, पण आज हा सण तरुण मुले मोठ्याप्रमाणात साजरा करताना दिसतात. या सणामध्ये आता राजकीय पक्ष पण उतरले आहेत. या खेळात मोठी बक्षीसे दिली जात आहेत. त्यामुळे जीवघेणी स्पर्धा वाढली. बक्षिसांच्या हव्यासापायी गोविंदाचे अनेक थर वाढू लागले. दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा खाली पडतात,जखमी होतात. यात काही अपंग होतात किंवा मृत्यू पावतात. आज या सणाने एक भयानक रूप धारण केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला मोठा  आणि रोमांचक सण आहे. सुरुवातीला घराघरात साजरा करत असलेल्या सणाला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक रूप दिले. यामागे त्यांचा हेतू ब्रिटीश सत्तेपासून भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सर्व समाजाला एकत्र करणे हा होता. पण आज जागोजागी फक्त मोठ्या मूर्ती, रोषणाई, डीजेच्या तालावर मोठ्या आवाजात गाणी लावणे म्हणजेच सण साजरे करणे असा समज निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव सणाचा सुरवातीचा विचार विसरला गेला. पूर्वी होणारी व्याख्याने, प्रबोधन सारख्या गोष्टी जवळ जवळ बंद होऊन फक्त सजावटीवरच खर्च जास्त होत आहे. हीच गत सार्वजनिक नवरात्रोत्सव सणाची आहे. दिवसभर मोठ्या आवाजात गाणी, डीजे, दांडियाचा रात्रभर चाललेला खेळ म्हणजेच हा नवरात्रीचा सण अशी समजूत झाली आहे.    

दिवाळी आणि होळी असे दोन मोठे सण सुद्धा एका विचित्र समजुतीमध्ये अडकले गेले आहेत. दिवाळी या सणाच्या दिवशी प्रत्येकजण घरोघरी लावलेल्या दिव्यांमुळे मनाला आनंद मिळतो. त्याचप्रमाणे सर्व मित्रपरिवार. नातेवाईक एकत्र येऊन दिवाळीचा फराळाचा म्हणजे चकली, शेव, बेसन किंवा रव्याचे लाडू, चिवडा, करंजी, चिरोटे यांचा आस्वाद घेत असत. त्याचप्रमाणे झेंडूच्या फुलाचे तोरण, थोड्या प्रमाणात केलेली फटाक्यांची आतषबाजी, दाराबाहेर काढलेल्या रांगोळ्या आनंदात भर घालीत असत. आजच्या जीवनशैलीत सर्वजण एकत्र येण्यापेक्षा मिळालेल्या सुट्टीत पर्यटनस्थळी जाणे पसंत करतात. दिवाळीच्या शुभेच्छा सोशल मिडीयावर दिल्या जातात. दिवाळीला बनत असलेले पदार्थ आता बारा महिने उपलब्ध झाल्याने दिवाळीसाठी म्हणून मानले जात नाही. मातीच्या दिव्यापेक्षा मेणाचे दिवे अधिक लावलेले दिसतात. दिवाळी हा मोठा सण असल्यामुळे भारतात त्याची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे फटाक्यांची जुगलबंदी ठेवून ध्वनी प्रदूषण आणि हवा दुषित करून श्वसनाच्या रोगांना आमंत्रण आपणच देत आहोत.  

दिवाळी प्रमाणे होळीचा सण मोठा आहे. या दिवशी सार्वजण मतभेद विसरून एकत्र येतात आणि आपल्या दुर्गुणांसह होळी साजरी होत असे. शहरातील किंवा गावातील लावलेली जिवंत झाडे तोडून त्यांच्या फांद्या होळीत टाकून त्याला अग्नी देणे म्हणजे आपण पर्यावरणाची वाट लावतो आहे ही भावना मनात येत नाही. दुसऱ्या दिवशी रंग लावण्याचा प्रकार इतका खराब झाला आहे की रंगात मिसळेले केमिकल शरीराला इजा करीत आहे.

हे सारे पहिले की जाणवते सणांचे स्वरूप बदलत चालले आहे. आता ते झगमगीत तर झाले आहेच पण जास्तीतजास्त व्यावसाहिक होत चालले आहे. त्यातला पारंपारिक पणा कमी होत चालला आहे. पूर्वी प्रत्येक सणांमध्ये एक सामाजिक संदेश होता, आध्यात्मिक विचार होता. त्यात माणसामाणसांमधील नाते घट्ट करण्याची ताकद होती. हे सण कधीही दुसऱ्या धर्माच्या सणांचा द्वेष करायला शिकवत नसत. आता या सणांचा वापर द्वेष करण्यासाठी सुद्धा होत आहे. पूर्वी सण साजरे करताना एक प्रकारची सामुहिक भावना असायची ती आता जवळजवळ संपली असून आता फक्त वैयक्तिक भावना जपली जात आहे. प्रत्येक सणांना स्टेटस सिम्बॉलबनवलं जात आहे. आज सणांची परिभाषा सोशल मिडिया ठरवत आहे. या सगळ्या गदारोळात मानवी संवेदना, साधेपणा आणि एकत्रित राहण्याचा आनद आपण हरवून बसत आहोत. त्यामुळे हा बदल अध:पतनाचा वाटू लागला आहे.

यात काही सकारात्मक बदलसुद्धा आहेत पण ते फार थोड्या प्रमाणात आहे. शिक्षणामुळे लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढल्यामुळे पूर्वीच्या काही परंपरा बंद झाल्या आहे. नागपंचमीच्या दिवशी टोपलीत नाग घेऊन येणे याला कायद्याने बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे मातीच्या मूर्तीचा वापर, आवाज विरहित फटाके, कृत्रिम रंगाऐवजी नैसर्गिक रंगाने होळी खेळणे, झाडे लावून सण साजरे करणे आणि सामुहिक पद्धतीने पर्यावरणाची काळजी घेणे या नव्या कल्पनाने जागरुकता निर्माण करून सणांचा आनंद वाढविला आहे.

सणांचे बदलते स्वरूप हा एक महत्वाचा विषय आहे. काही बदल हे समाजासाठी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर आहे तर काही नकारात्मक जे बदल आहे त्यावर उपाय शोधून ते थांबविले पाहिजे. यासाठीच सणांचे मूळ उद्दिष्ट तशीच ठेवून तो आनंदाने साजरा करता आला पाहिजे. कारण आपल्या सणांमध्ये समता आणि बंधुता ही महत्वाची मुल्ये जीवनमुल्ये दडलेली आहेत. ती आपण शोधली तर आपल्याला जरूर मिळेल. आज सर्व सण केवळ करमणुकीचे साधन म्हणून पाहिले तर त्या सणांमध्ये चंगळवाद आणि प्रदूषण वाढले जाईल. त्यासाठी सामाजिक जाणीव म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. मोठ्या आवाजातील गाणी, मोठ्या प्रमाणात केलेली दिव्यांची रोषणाई, मोठे मंडप, मोठ्या प्रमाणावर लावलेले फटाके यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी सण साजरे करताना घेतली पाहिजे.

सणांचे बदलते स्वरूप हा केवळ सामाजिक बदलाचा विषय नसून; जीवनदृष्टीचा आरसा आहे. त्यामुळे प्रत्येक सण विवेकाने, संवेदनांनी आणि जबाबदारीने साजरे केले पाहिजे. आजच्या चंगळवादाच्या गोंगाटात सणांचे पावित्र जपले पाहिजे. जर सणाची व्याख्या करायची असेल तर एवढेच म्हणावे लागेल की खरा सण तोच आहे तो माणसातला माणूसपण जपतो, सर्व समाजाला एकत्र आणतो आणि पृथ्वीला प्रदूषणापासून जपतो.

याचाच अर्थ असा की पुढे बदलत्या काळातही सण साजरे करताना परंपरेचा प्रकाश कधीही मंदावणार नाही आणि तो आपल्या संस्कृतीच्या आकाशात कायम तेजाने झळकत राहील याची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे.  


धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...