रंग लेखणीचे परिवार
आठवडा
क्रमांक : ३५५
विषय
क्रमांक : ४
विषय
: एकदा जरूर वाचावे असे पुस्तक
शब्दांकन
: योगेश गोगवेकर
पत्ता
: माहीम, मुंबई
एकदा जरुर वाचावे असे पुस्तक हा विषय प्रत्येक व्यक्तीचा आवडी निवडीशी जोडला जाऊ शकतो कारण मला जे पुस्तक महत्वाचे वाटले ते इतर कुणाला महत्वाचे वाटेलच असे नाही. मी जी काही पुस्तके वाचली आहेत त्यातील एखादे पुस्तक एकदा तरी वाचण्यासाठी मी दुसऱ्या व्यक्तींना वाचण्यासाठी फक्त विनंती करू शकतो पण त्याने ते वाचावे म्हणून मला आग्रह धरता येणार नाही. अशी अनेक पुस्तके वेगवेगळ्या विषयांवर आहेत जी एकदा तरी वाचली गेली पाहिजेत असे मला वाटते. कारण पुस्तक हे साधन आहे, साध्य नव्हे, ती वाचल्याने मानवी मनाचा विकास होण्यास वाव मिळतो. त्यामुळे मनन, चिंतन, विश्लेषण आणि अनुसरण करण्याची सवय लागते आणि आपल्या समाजात भोवताली घडत असलेल्या परिस्थितीचा अचूक अंदाज घेता येतो. पण इथे मला फक्त एकच पुस्तक निवडायचे आहे. म्हणून मी १९४८ रोजी जॉर्ज ऑरवेल यांनी लिहिलेली १९८४ ही कादंबरी निवडली आहे. ही एकदा तरी आयुष्यात वाचली गेली पाहिजे कारण ही कादंबरी लोकशाही राज्यातच अचानक निर्माण होणाऱ्या अनियंत्रित राजकीय शक्तींच्या, फॅसिझम आणि हुकुमशाही राजवटींच्या धोक्याविरूद्ध अचूक इशारा देते.
१९८४
ही कादंबरी अशा एका डिस्टोपियन (Dystopian)
समाजाचे
चित्रण स्पष्ट करते जिथे एक राजकीय पक्ष आणि त्या पक्षातील प्रमुख नेता समाजातील
प्रत्येक मानवी पैलूंवर लक्ष केंद्रित करतो. समाजातील सर्व घटकांवर नियंत्रण
ठेवण्यासाठी असत्य गोष्टी सत्य म्हणून आचारणात आणण्यासाठी
उपलब्ध असलेल्या माध्यमांचा कसा उपयोग केला जातो याचे सुंदर वर्णन या कादंबरीत
येते. त्याप्रमाणे स्वायतत्ता,
मुक्त
विचार आणि अधिकारावर असलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारणे यावर नकळत कसे निर्बंध
आणले जातात याचा उल्लेखसुद्धा ही कादंबरी करते. न्युजपिक सारख्या संस्था उभ्या
करून विचारणा मर्यादित करण्यासाठी भाषा डिझाईन करणे आणि मानव जातीला अपारंपारिक
गोष्टींपासून दूर करण्यासाठी कशा योजना आखल्या जातात याचे प्रतिबिंब या कादंबरीत
पुष्कळवेळा पडताना दिसते. वास्तविक ही कादंबरी मानवी जीवनाच्या गरजा आणि या
गरजांवर दडपशाही व्यवस्थेने केलेल्या अत्याचाऱ्यामुळे झालेला समाजाचा विनाश याची
शोकांतिका शोधत राहते. म्हणून ही कादंबरी इतर कादंबरी सारखी नसून ती वाचताना मानवी
दृष्टीकोन घेऊन वाचली तर ती आपल्याला जरूर आवडेल.
विस्टन
स्मिथ हा कादंबरीचा नायक आहे. तो ओशनिया सारख्या निरकुंश राज्यात राहत असतो जेथे
इंग्सोक नावाचा पक्ष सत्ताधारी असून त्या पक्षाचा नेता सर्वश्रेष्ठ म्हणवत
हुकुमशाही पद्धतीने राज्य करीत असतो. या पक्षाच्या नेत्याला बिग ब्रदर म्हटले
जाते. तो सत्तेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करीत असल्यामुळे त्याची नजर सर्वत्र
असते. म्हणून या पुस्तकात, ”Big Brother is watching you” हे
घोषवाक्य सतत येवून आपल्याला आठवण करून देते की पक्षाच्या कोणत्याही सदस्यांना
गोपनीयतेचा अधिकार नाही आणि या सदस्यांची वैचारिक शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी
त्यावर सतत देखरेखीची आवश्यकता आहे. म्हणजे त्या पार्टीमध्ये अभिव्यक्ती
स्वातंत्र्य अकल्पनीय आहे. युद्ध म्हणजे शांतता,
स्वातंत्र्य
म्हणजे गुलामगिरी आणि अज्ञान हेच आपले सामर्थ्य’
अशी
ब्रीदवाक्य आहेत. सत्य गोष्टी नाकारून पूर्णपणे काल्पनिक इतिहास स्थापन करणे हे
पक्षाचे महत्वाचे काम आहे. हे केल्यामुळे त्या पक्षाला सत्ता कायमची मिळेल असे
त्या पक्षाच्या प्रमुखाला म्हणजे बिग ब्रदरला वाटत असते. हे प्रामुख्याने
सर्वव्यापी टेलिस्क्रीनद्वारे होते जे द्वि-मार्गी व्हिडिओ संप्रेषण प्रदान करतात
आणि सतत जोरदार प्रचार करतात. हा पक्ष तेथील नागरिकांचा तिरस्कार करतो आणि त्यांचा
भयंकर पद्धतीने छळ करतो. बिग ब्रदर म्हणून ज्या व्यक्तीला इथे संबोधले आहे ती
व्यक्ती अशी आहे की तिला कोणी पाहिले नाही आणि ती व्यक्ती कधीही मरणार नाही. ती
व्यक्ती फक्त जगासमोर स्वतःच्या नावाने पक्षाचा कार्यक्रम ठरवते. त्यामुळे
पक्षाच्या विचारांचा प्रचार सर्व समाजात करणे सोपे होऊन जाते.
अशा
पक्षात विस्टन स्मिथ हा सदस्य असून तो पक्षाच्या आदेशानुसार इतिहासाचे पुनर्लेखन
करीत असतो. ते करताना विस्टन स्मिथला जाणवते की या पक्षाचे काम करणाऱ्या व्यक्तीला
पक्षाच्या विचारांचा सर्वत्र प्रचार केला पाहिजे नाहीतर त्याला देशद्रोही ठरवून
समाज जीवनातून हद्दपार केले जाईल. या पक्षाच्या सर्वोच्य नेत्याने ‘बिग ब्रदर’
म्हणून
स्वतःचा एक पंथ (Cult) तयार केला
आहे. आपली त्याच्यावर खूप भक्ती आहे हे सतत पक्षाच्या सदस्यांना कृती करून दाखवत
राहवं लागते. म्हणून हा पक्ष वेगळी माहिती देणारी पुस्तके जाळून टाकतो आणि जर कोणी
ती पुस्तके परत लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला पूर्णपणे संपवून टाकतो.
प्रत्येक जुने रेकॉर्ड नष्ट करणे आणि ठेवले तर ते कसे खोटे आहे हे सर्व समाजाला
सांगून त्यावर त्यांना विश्वास ठेवायला सांगणे हे या पक्षाचे काम महत्वाचे असते.
जर का हे करण्यास दिरंगाई केली किंवा तसे करण्यास नकार दिला तर ते पक्ष विरोधी
कारवाई ठरवून देशद्रोहाची कलमे शिक्षा करताना लावली जाण्याची शक्यता अधिक असते.
विस्टन
स्मिथ अशा पक्षात काम करतो जिथे बिग ब्रदरने ठरवलेल्या आणि सतत बदलत्या आवृत्तीशी
जुळण्यासाठी इतिहासाच्या नोंदी बदलतो,
सुधारतो, त्यांचे पुनर्लेखन करतो आणि जुन्या नोंदी जाळून टाकतो.
पण हे करताना तो मनातून खूप अस्वस्थ होत जातो आणि अखेरीस तो या क्रूर नेतृत्वाचा
तिरस्कार करतो आणि बिग ब्रदरच्या पराभवाची इच्छा व्यक्त करत जातो.
अशी
इच्छा मनात धरण्यानेसुद्धा तो गुन्हेगार ठरू शकतो,
हे
विस्टनला पूर्णपणे माहित असते. तरीसुद्धा तो या राजवटीला विरोध करतो आणि बंडखोर
होण्याची स्वप्ने पाहतो. एके दिवशी तो प्राचीन वस्तू विकणाऱ्या मिस्टर
चारिंग्टनकडून एक डायरी विकत घेतो आणि त्या डायरीत तो पक्ष आणि बिग ब्रदरवर टीका
करू लागतो. यात त्याला साथ मिळते ज्युलिया नावाच्या एका तरुणीची जी त्या पक्षात
कादंबरी लिहिण्याची जबाबदारी सांभाळत असते. एके दिवशी ज्युलिया विस्टनला प्रेमपत्र
लिहिते आणि त्या दोघांमध्ये एक गुप्त प्रेमसंबंध सुरु होतो. ज्युलियासुद्धा या
राजकीय पक्षाचा विरोध करते पण लवकरच विस्टनला कळते की ती राजकीय दृष्ट्या उदासीन
असून ही राजवट उलटून टाकण्यात तिला रस नाही. ती जरी बंडखोर असली तरी पक्षाने बंदी
केलेल्या व्यभिचार आणि सुखवादी भोगांमध्ये गुंतली आहे. तिला सामाजिक अन्याय आणि
वास्तविकतेची जाणीव असल्या सारखी वाटत नाही.
ज्या
क्षणी तिला चांगले वाटेल अशा गोष्टींची ती आस धरते आणि ती मिळविण्यासाठी ती बंडखोर
होते. तिच्या तुलनेत विस्टन एक बौद्धिक बंडखोर आहे. तो नेहमी सत्य, स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्कांवर विचार करतो.
नंतर त्याला ज्युलिया बद्दल संशय येवू लागतो. त्याला ती त्याचा वरिष्ठ ओ’ब्राऊनची सहकारी असल्याचे वाटू लागते . मग
त्यांचे संबंध बिघडतात आणि ते वेगळे होतात.
ओ’ ब्रायन हा पोलीस असून ब्रदरहुडचा सदस्य आहे. तो
विस्टनला सांगतो की प्रत्यक्षात बिग ब्रदर अस्तित्वात आहे की नाही हे विस्टनला
कधीच कळणार नाही. तो विस्टनला त्याने आणि त्याच्या सहकाऱ्याने लिहिलेले इमॅन्युएल
गोल्डस्टाईन यांचे 'द थिअरी
अँड प्रॅक्टिस ऑफ ऑलिगार्किकल कलेक्टिव्हिझम'
या
काल्पनिक पुस्तकाची प्रत देतो की ज्यात बिग ब्रदरला अचूक आणि सर्वशक्तिमान म्हणून
संबोधले आहे. नंतर रेकॉर्डमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विस्टन आणि ज्युलियाला
पक्षाच्या कार्यालयात बोलावून त्यांना गोल्डस्टाईनच्या पुस्तकातील काही उतारे
वाचावयास सांगितले जाते. हे उतारे पक्ष सत्ता कशी राखतो, त्यांच्या घोषणांचे खरे अर्थ काय आणि शाश्वत
युद्धाची संकल्पना स्पष्ट करतात. त्यात असा युक्तिवाद केला जातो की पक्षाचे लोक
बंड करून उठले तर त्या पक्षाची सत्ता उलथून टाकता येते, पण विस्टनला पक्षाने सत्ता का घेतली आणि ती
कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवण्याचे कारण बिलकुल समजत नाही.
पुढे
विस्टन आणि ज्युलीयाला अटक होते तेव्हा त्यांना कळते की मिस्टर चारिंग्टन आणि ओ’ब्रायन हे पोलिस कार्यालयातून आलेले गुप्तहेर
असून पक्षांच्या विरोधात असलेल्यांना पकडणाऱ्या मोहिमेचे सदस्य आहेत. पोलिस कोठडीत
विस्टनचे हाल केले जातात. त्याला बरेच महिने जेवायला पण देत नाही. ओ’ब्राय त्याला सांगतो की बिग ब्रदर खरोखरचा माणूस
आहे की नाही हे त्याला कधीच कळणार नाही. तो त्याला पुढे सांगतो की पक्षाचे ध्येय
फक्त सत्ता मिळविणेच आहे. मग विस्टनला एका घाणेरड्या खोलीत नेऊन ठेवण्यात येते.
तिथे त्याला उंदारांशी सामना करावा लागतो. शेवटी त्याचा ब्रेनवाश होऊन तो
ज्युलियाचा विचार न करता तिचा निषेध करतो आणि बिग ब्रदरची माफी मागतो. त्याच्यावर
प्रेम करू लागतो आणि हुकुमशाहीची दडपशाही मान्य करतो. त्यानंतर विस्टन आणि
ज्युलिया दोघानाही सोडण्यात येते. ते परत एकदा भेटतात आणि एकमेकांचा विश्वासघात
केल्याचे मान्य करतात पण एकमेकांपासून कायमचे दूर होतात.
दुसऱ्या
महायुद्धानंतर लिहिलेली ही कादंबरी हिटलर आणि स्टालिन या दोघांना नजरेसमोर लिहून
ठेवली असली तरी त्यात एकाधिकारशाहीच्या उदयाबद्दल जॉर्ज ऑरवेलच्या चिंतेचे
प्रतिबिंब त्यात पडलेले दिसत आहे. बिग ब्रदर हा स्टालिन आणि हिटलरचे प्रतिनिधित्व
करीत असतो. तसेच ही कादंबरी लिहिताना जॉर्ज ऑरवेलने राजकारण आणि मानसशास्त्र यांचा
खोलवर विचार केल्याचे दिसून येते. ही कादंबरी १९४८ मध्ये लिहिली आहे आणि या पुस्तकात
लिहिलेल्या घटना कदाचित ३६ वर्षानंतर घडू शकतील असे त्याला वाटत असणार म्हणून
लेखकाने या पुस्तकाला १९८४ हे नाव दिले आहे. त्यामध्ये त्याने १९८४ सालातील
कोणतीही तारीख दिली नाही किंवा कुठला महिनाही सांगितला नाही, पण आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात या
कादंबरीत लिहिलेल्या घटना खऱ्या होताना दिसत आहे.
हे
पुस्तक वाचताना एक गोष्ट सतत जाणवते ती म्हणजे या पुस्तकात सेन्सॉरशिप आणि
ब्रेनवॉशिंगबद्दल वारंवार येणारा एक धोकादायक संदेश. सेन्सॉरशिपमुळे वाचन आणि
लिखाणाला मर्यादित स्वरूप येते तर ब्रेनवॉशिंगमुळे चुकीचे विचार नागरिकांना सत्य
म्हणून स्विकारावे लागतात. याचा अर्थ असा होतो की सत्ता टिकविण्यासाठी सत्य नाकारत
इतिहास पूर्णपणे बदलून तो काल्पनिक पद्धतीने स्थापित केला जाऊ शकतो. दडपशाही, पाळत ठेवून गोपनीयतेचे नुकसान करणे, सत्य आणि इतिहासाची फेरफार करणे, प्रचार आणि भाषेला नियंत्रण करणे, वगैरे गोष्टी करून सरकार फॅसिझमच्या विळख्याखाली
सर्व नागरिकांच्या प्रत्येक पैलूवर कसे नियंत्रण ठेवू इच्छिते याचे सुंदर विश्लेषण
या पुस्तकात आढळते.
थोडक्यात
१९४८ साली लिहिलेल्या १९८४ हे पुस्तक प्रत्येकाने कधीतरी वाचले पाहिजे कारण हे
पुस्तक राजकीय अतिरेकीपणाचे धोके, मग
ते फॅसिस्ट असोत, कम्युनिस्ट
असोत किंवा इतर कोणी असोत, जगातील
सर्व नागरिकांना सांगितले आहेत. ते कोणत्याही काळात उपयोगी पडणारे आहेत.
त्याचप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला जटिल सामाजिक समस्या,
प्रश्न
विचारायचा अधिकार आणि स्वातंत्र्याची मुल्ये याबद्दल एक चांगला दृष्टीकोन प्रदान
करते. इथे एक मात्र खरे आहे की हे पुस्तक वाचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. वाचायला
जरी कठीण असले तरी त्यात आनंद घेऊन १९८४ हे पुस्तक एकदा तरी वाचले पाहिजे.
धन्यवाद
योगेश
गोगवेकर

Comments
Post a Comment