विषय : कृत्रिम बुद्धीमत्ता आणि साहित्यासामोरील आव्हाने
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम, मुंबई
संकेतस्थळ :
कृत्रिम बुद्धिमत्ता हे शब्द इंग्रजी भाषेमध्ये Artificial Intelligence म्हणून संबोधले जातात. या शब्दांची कुठेही व्यवस्थितपणे व्याख्या दिलेली आढळत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता हे संगणकाच्या विज्ञान शाखेने बनविलेले एक मानवी यंत्र आहे जे माणसांप्रमाणे तर्क करण्याची क्षमता ठेवते आणि एखाद्या गोष्टींचे विश्लेषण करून अर्थ शोधते. याचा अर्थ असा आहे की हे मानवी रोबोट असलेले मशीन आहे. हे मानवी रोबोट माणसांप्रमाणे शिकते, नियोजन करते आणि समस्या सोडविण्यासाठी माणसाला मदत पण करते. सोप्या भाषेत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक असे बुद्धिवान मशीन आहे जे मानवी भावना ओळखते आणि समजून घेते.
या कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द् तयार करण्याचे श्रेय ऍलन टुरिंग, मर्विन मिन्स्की, ऍलन नेवेल, हर्बर्ट ए सायमन आणि जॉन मॅकार्थी या संगणक शास्त्रज्ञांना जात असले तरी कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द पहिल्यांदा प्रचारात आणण्याचे काम जॉन मॅकार्थी यांनी केले आहे म्हणून त्यांना या शब्दाचे जनक मानले जाते. भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता आणण्याचे काम राजगोपाल रेड्डी यांनी केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्रातील महत्वाची निर्मिती असून या शाखेमध्ये मानवी मशीन तयार करताना मानवी बुद्धीशी ते कसे संपर्कात राहील हे पहिले जाते. कारण हे मानवी यंत्र एक स्वयंभू व्यक्ती असण्यासाठी किंवा कोणत्याही मानवी नियंत्रणाशिवाय स्वतंत्रपणे काम करण्यासाठी जे काही संगणकीय अल्गोरिदम वापरलं जात, त्यामुळे त्यात कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता तर निर्माण होतेच पण या यंत्राने अवखळपणा, खट्याळपणा सुद्धा करावा असेही अंतर्भूत केले जाते. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास गुगल सर्च किंवा Alexa ही नावे देता येईल.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अर्थशास्त्रातील आर्थिक नियोजन करणे. वैद्यकीय शास्त्रात अचूक निदान करण्यासाठी, अभियांत्रिक संरक्षणासाठी, गाडी चालवताना चालकाला दिशा दाखवण्यासाठी तसेच साहित्यिक लेखकांना लेख लिहिण्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी माणसाचा आभासी अवतारसुद्धा निर्माण केला जातो. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की एकदा का कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली गेली की त्या यंत्रमानवावर कोणत्याही निर्मात्याचे नियंत्रण असणार नाही. या बाबतीत मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आणि शास्त्रज्ञ बाळ फोंडके म्हणतात की प्रत्येक प्रसंगाच्या अनुभवावरून आपली वर्तणूक निर्धारित करणे हेच मुळी जर बुद्धिमत्तेचे व्यवच्छेदक लक्षण आहे तर ते नैसर्गिक पडते. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी डीपफेक तंत्रज्ञाचा वापर करून माणसाचा आभासी अवतार तयार करून संभाषण करण्यासाठी कसा वापर केला जातो हे सांगताना बाळ फोंडके भारतातील एका साहित्य मेळाव्याचे उदाहरण देतात.
या वर्षीच्या मौज या दिवाळी अंकात लिहिताना बाळ फोंडके या आभासी अवतारा बद्दल सांगतात की ‘मातृभूमी’ या पत्रिकेचे प्रकाशन करणाऱ्या संस्थेने एक साहित्य मेळावा साजरा केला होता. त्यात सुप्रसिद्ध लेखक आणि खासदार शशी थरूर यांना मुलाखत देण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांनी ते मान्य केले आणि वेळेवर कार्यक्रमाच्या जागी येऊन ते मुलाखतकाराची वाट पाहत राहिले. थोड्याच वेळात त्यांच्या सारखा दिसणारा माणूस तेथे पोहचला आणि थरूर यांच्या समोर बसला. सुरुवातीला शशी थरूर दचकले. नंतर त्यांनी मुलाखत द्यायला सुरुवात केली पण शेवटपर्यंत ते चकित झाल्यासारखे वाटत होते. कारण त्यांची मुलाखत घेणारे शशी थरूरच होते. हा नुसता आभासी अवतार नव्हता तर त्या अवताराला शशी थरूर यांचा बोलण्याचा ढंग, शब्द उच्चारण्याची शैली, भाषेवरील प्रभुत्व, त्यांचा व्यासंग हे सर्व माहित होते. म्हणून ते मानवी यंत्र शशी थरूर यांच्याशी अर्थ पूर्ण संवाद साधू शकत होते. हे सर्व पाहताना, ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होत होते कारण तीक्ष्ण बुद्धीमत्तेसाठी प्रसिद्ध असलेले शशी थरूर यांची जुगलबंदी आभासी असलेल्या यंत्र मानवाशी तोडीस तोड होती. असे सांगून लेखक म्हणतात की हा आभासी मानव व्यवस्थित गृहपाठ करून आला होता. त्याच्याकडे निरनिराळे प्रश्न तर होतेच पण थरुरानी दिलेल्या उत्तराला तो उपप्रश्न सुद्धा विचारीत होता.
हे सर्व वाचताना मन अस्वस्थ होत होते. कारण असे प्रकार कुठेही होऊ लागले तर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल आणि माणसाचे आयुष्य निरर्थक आणि गुंतागुंतीचे बनेल. इथे मला सुप्रसिद्ध लेखक आणि भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी दिलेल्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संभाव्य चेतावणीची आठवण येते. स्टीफन हॉकिंगच्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यांच्या मते विचार करणारी यंत्रे जेव्हा स्वतःच उत्तरे देवू लागतील तेव्हा ही यंत्रेच स्वतःमध्ये बदल करून स्वतंत्रपणे अधिक सक्षम प्रणाली निर्माण करून मानवाला सर्व घटकामधून बाहेर काढतील आणि मानवी जीवन खूप दुःखाच्या गर्तेत सापडेल. जर कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले यंत्र सक्षम झाले तर ते स्वतःच स्वयंशासित शस्त्रे बनवेल आणि त्याचा वापर अव्यवहारी पद्धतीने करून बऱ्याच चांगल्या गोष्टींचा नाश करेल. त्यामुळे अशी स्वयंशासित शस्त्रे बनविण्याची स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ती थांबवली पाहिजे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाच्या नोकऱ्या जाऊन नवीन सामाजिक प्रश्न उभा राहील. यात मानवाचा अंत सुद्धा होऊ शकतो. या सर्व गोष्टी नमूद करताना स्टीफन हॉकिंग म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आज जरी माणसांच्या चांगल्या कामासाठी झाला असला तरी उद्या माणसांची उद्दिष्टे त्याच्याशी जुळली नाही तर माणूस अडचणीत येईल. त्यासाठी वेळीच खबरदारी घेऊन या तंत्रज्ञानाचा व्यवस्थित उपयोग होईल हे बघितले पाहिजे.
आज या कृत्रिम बुद्धिमत्तेची घुसखोरी सर्व क्षेत्रात झाली आहे. ज्या काळात तंत्रज्ञानाचा विकास जेव्हा डोळ्यांना दिसू लागत होता, त्याच काळात कुठल्याही भाषेतील साहित्याचे जग तुलनेने स्थिर होते. आता एक मनोरंजक असा सहयोग मूळ धरत आहे. एके काळी विज्ञानाच्या क्षेत्रात उतरलेली कृत्रिम बुद्धिमत्ता आता साहित्याच्या क्षेत्रात सूक्ष्मपणे घुसखोरी करत आहे आणि आजच्या वाचन प्रक्रियेवर त्याचा प्रभावपण टाकत आहे. माणसाची कल्पकता आणि मानवी यंत्राची बुद्धिमत्ता यांच्यातील वाढती भागीदारी अन्वेषणाची मागणी करीत आहे. माणसांच्या सर्जनशीलतेचा आणि अभिव्यक्तीचा बालेकिल्ला मानलेल्या साहित्याच्या जगात नवीन परिवर्तन घडवून येत असल्याचे दिसत आहे. याचाच अर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता आता लेखकाच्या क्षेत्रात सावधपणे पाऊले टाकत आहे. चरित्रलेखन, कथा, संवाद , कादंबरी, नाटके आणि कविता लिहिण्यापर्यंत या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लेखक आणि वाचक दोघांवर होणाऱ्या प्रभावा विषयी कुतूहलजनक प्रश्न तयार झाले आहेत. म्हणून कृत्रिम बुद्धीमत्तेत असे काही अल्गोरिदम तयार केले आहे की ते मानवी लेखन शैलीचे अनुकरण करून सुसंगत आणि सर्जनशील सामुग्री तयार करीत आहे. या मानवी यंत्राने लिहिलेल्या कथा आणि लेखांच्या गुणांवर जरी वाद होत असला तरी ते लेखकांसाठी महत्वाचे साधन बनले गेले आहे. त्याचप्रमाणे हे मानवी यंत्र वाचकांनासुद्धा वरदान ठरत आहे, या मानवी यंत्राद्वारे वाचक साहित्याच्या क्षेत्रात खोलवर जाऊन ऐतिहासिक संदर्भ सहजपणे शोधू लागेल. त्यामुळे वाचकांचे आकलन वाढण्यास मदत होते.
कुठल्याही भाषेतील साहित्य हे व्यक्तीनिष्ठ किंवा मानवाच्या स्वभावाशी जुळलेले असते. प्रत्येक माणसाकडे कलात्मक आणि भावनिक गुणवत्ता असते. त्यामुळे माणसाला लेखन करताना भावनिक खोली आणि अद्वितीय दृष्टीकोन असतो. मग प्रश्न असा पडतो की कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केलेले कुठलेही साहित्य हे माणसांच्या भावनेंशी आणि विचारांशी मिळते जुळते आहे का? म्हणून संगणकीय शास्त्रज्ञांनी चॅट जीपीटी नावाचे अल्गोरिदम बनविले आहे. त्यामुळे साहित्यात नाविन्यपूर्ण आणि भावनिक शैली वापरून चांगले साहित्य निर्माण करण्याची शक्यता दिसते. तरीसुद्धा हे संगणक कलात्मक गुणवत्ता लक्षात न घेता काम करते म्हणून ते मौलिकतेचे आणि सर्जनशीलतेचे साहित्य निर्माण करू शकत नाही. सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक सलमान रश्दी यांच्या म्हणण्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे कल्पनाशक्ती आणि विनोदबुद्धीचा अभाव असल्याने ते अभिजात साहित्य निर्माण करू शकणार नाही कारण अभिजात साहित्यात नुसती लेखकांची मते येत नसून त्यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंब सुद्धा त्यात पडत असते. त्यामुळे हवी असलेली कल्पकता आणि स्वप्नरंजन कृत्रिम बुद्धीमत्ता करू शकेल असे सलमान रश्दी यांना वाटत नाही. सलमान रश्दींचे म्हणणे आज जरी खरे मानले तरी वर्तमानात कृत्रिम बुद्धिमत्तेची जलद उत्क्रांती पाहिल्यास भविष्यात त्याची गुणवत्ता सुधारून हवा असलेला कुठलाही कलात्मक दृष्टीकोन साहित्य क्षेत्रात येऊ शकेल. याला कारण म्हणजे चॅट जीपीटी सारखे किंवा व्हर्च्युअल असिस्टंट सारखे नवीन अल्गोरिदम विकसित केले जात आहे.
जसजसे कृत्रिम बुद्धीमत्तेसारखे तंत्रज्ञान विकसित होत आहे तसतसे साहित्यात त्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र हे लिखाण मानवी लेखनाला बदलून टाकू शकणार नाही, उलट ते माणसाला नवीन सर्जनशील मार्ग शोधण्यासाठी, विविध शैली विकसित करण्यासाठी आणि त्यांचे अभिजात साहित्य समर्थित साधनाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल. या तंत्रज्ञानाचा उपयोग दुसऱ्या भाषेतील साहित्य स्वतःच्या भाषेत भाषांतरीत करण्यासाठी जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे एक नवीन साहित्य जग तयार होऊन वाचक वर्गांचे आकलन सुधारण्यास मदत होईल आणि कथा कादंबरीमध्ये नाविन्यपूर्ण आयाम शोधता येईल. म्हणून साहित्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात लेखकांचे काम वाढवू शकेल आणि वाचनाचे अनुभव वैयक्तिकृत करणारे व परस्परसंवादी कथाकथनाची ओळख करून देणारे असेल. याचाच अर्थ असा आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे माणसांची मने मोकळी होतील आणि विचार करण्यासाठी जुन्या पद्धती जाऊन नव्या पद्धतीने विचार करण्याची पद्धत विकसित होईल.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment