विषय: पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव: हिरोज ऑफ हिस्टरी ( Heroes of History)
लेखक: Will Durant ( विल ड्युरंट )
प्रकाशक: Simon and Schuster (सायमन आणि शुस्टर)
पाने: ३३०
किमत: रुपये ६९९/-
शब्दांकन : योगेश गोगवेकर
विल ड्युरंट यांची लेखन शैली विद्वान माणसांपेक्षा सामान्य माणसासाठी अधिक जवळची असल्या कारणाने मला त्यांची पुस्तके नेहमीच वाचायला आवडतात. इतिहास आणि तत्त्वज्ञानातील घटना व कल्पना विल ड्युरंट यांनी इतक्या सोप्या आणि रोमांचक पद्धतीने मांडल्या आहेत म्हणून सामान्य माणसांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आशावादी होत जातो. त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत. त्यांचे अकरा खंडातील द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन हे पुस्तक सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकात उत्कृष्ट कृतींचा दस्तऐवज मानला जातो. या पुस्तकात प्राचीन काळापासून ते आधुनिक जगाच्या सुरुवातीपर्यंत मानवी जीवन आणि संस्कृतीचा इतिहास मांडताना त्यांनी सर्व बाजूने घडलेल्या घटनांचा विचार आत्मसात केल्याचे जाणवते.
विल
ड्युरंट यांचे ‘हिरोज ऑफ हिस्टरी’
(Heroes of History ) हे पुस्तक ‘स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन’ या अकरा खंडाच्या पुस्तकाचे
संक्षिप्त रूप आहे. या पुस्तकात विल ड्युरंट म्हणतात की भूतकाळ कधीही मरत नसतो तर
तो वर्तमानात गुंडाळला जातो. असे सांगून ते म्हणतात की प्रत्येक मानवी जीवन हे
भूतकाळ असते. त्यामुळे प्रत्येक माणसाचा चेहरा हे त्याचे आत्मचरित्र असते.
त्यांच्या मते वर्तमानातील प्रत्येक माणसांवर त्याच्या विस्मृतीत पसरलेल्या
पिढ्यान पिढ्याच्या आनुवंशिकतेचा, वातावरणाच्या
घटनांचा, त्याला
भेटलेल्या स्त्री-पुरुष सहवासाचा, त्याने
वाचलेल्या पुस्तकांचा आणि त्याला आलेल्या अनुभवांचा परिणाम होत असतो. म्हणून लेखक
म्हणतात की माणूस समजून घेण्यासाठी त्याचा भूतकाळ समजणे फार गरजेचे आहे.
हिरोज
ऑफ हिस्टरी या पुस्तकात विल ड्युरंट यांनी अशा काही
व्यक्तींवर लिहिले आहे की ज्यांचे आयुष्य राजकारण आणि तत्वज्ञानासाठी महत्वपूर्ण
होते. कारण इथे लेखक त्यांच्या नायकांद्वारे माणसांची कथा सांगताना युगानुयुगातील
अनेक गुंतागुंती असलेल्या गोष्टींचा वापर सुलभपणे करतात आणि पुरुष व्यक्तींच्या
कथा सांगताना मानवी आणि मानवेतर घटकांच्या परस्पर संवादावर लक्ष केंद्रित करतात.
त्यामुळे त्या घटकांची तरलता सुंदरपणे पकडली जाते. त्यात लेखक भूतकाळातील
वेगवेगळ्या अध्यायातून मानवी जीवनाचा शोध घेत आणि पूर्वीचे संदर्भ आठवून इतिहासाची
पुनरावृत्ती कशी होते हे सांगताना त्यांनी शोधलेल्या अध्यायांचा त्याच्या
संदर्भाशी तुलना खूप छानपणे केलेली आढळते. म्हणून असे म्हणावयाचे वाटते की इथे
लेखकाने केवळ वस्तुस्थितीच दाखविण्याचा प्रयत्न केला नाही तर ज्ञानसुद्धा देण्याचा
प्रयत्न केला आहे.
हिरोज
ऑफ हिस्टरी हे पुस्तक वाचताना एक गोष्ट नक्कीच जाणवते की विल ड्युरंट यांचे हिरो
परिपूर्ण नायक नाही आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्यांचे दोष त्यांच्या
सद्गुणांपेक्षा जास्त आहेत. पण त्यांचे सर्व नायक प्रभावशाली होते यात शंका नाही.
कोणत्यातरी कठीण परिस्थितीत कोणा एका माणसाचे नेतृत्व उभे राहते आणि मग ते नेतृत्व
इतिहासाचा प्रवाह एकदम बदलून टाकते. ज्या व्यक्तीकडे कल्पना, व्यक्तिमत्व आणि परीस्थितिचे संयोजन
करण्याची क्षमता असते, तीच
व्यक्ती बदलासाठी उत्प्रेरक बनू शकते. कधी कधी हे नेतृत्व चांगले असते तर कधी
त्यातून वाईट प्रकारचा हुकुमशाहसुद्धा तयार होतो कारण कुठलीही व्यक्ती चांगल्या
किंवा वाईट घटनांशी संबंधित असतात. या घटना व्यापक असतात तसेच मनोरंजक सुद्धा
असतात आणि त्यातूनच संपूर्ण मानव जातीच्या सभ्यतेमध्ये त्याची पुनरावृत्ती होताना दिसतात.
हिरोज
ऑफ हिस्टरी हे पुस्तक प्राचीन कालखंड, शास्त्रीय
कालखंड आणि युरोपियन कालखंड तीन भागांमध्ये विभागले गेले आहे. प्राचीन संस्कृतीचा
उल्लेख करताना त्यांनी चीन, भारत, मध्य पूर्व आणि इजिप्त या देशांच्या
संस्कृतीचा विचार पहिल्या अध्यायात केला आहे. तसे करताना लेखकाने या प्राचीन
संस्कृतीला आर्थिक परिस्थितीशीसुद्धा जोडले आहे. दुसऱ्या प्रकरणात लेखकाने
कन्फ्यूशियस म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुंग फू त्झेचे चरित्र स्पष्ट करून
लाओ-त्सेच्या शिकवणीचे देखील वर्णन केले. चिनी कवी ली पो यांच्या चरित्राचाही
त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे दुसरा अध्याय त्यांनी चीनला समर्पित केल्याचे
वाटते.
तिसऱ्या
अध्यायात लेखक सिंधू खोरे आणि वैदिक कालखंडाचा उल्लेख करून भारतीय संस्कृतीबद्दल
सांगतात. त्यात त्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिकवणीचाही उल्लेख केला. आधुनिक
भारतात त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या कविता, महात्मा
गांधींचे तत्त्वज्ञान आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील भारताचा उल्लेख केला
आहे. चौथा अध्याय लिहिताना त्यांनी इजिप्शियन सम्राट इख्नाटोन बद्दलची माहिती देऊन मेसोपोटेमिया आणि
इजिप्तच्या इतिहासाबद्दल सांगितले आहे. पुढच्या अध्यायात, त्यांनी इस्रायल-पॅलेस्टाईनच्या
इतिहासाबद्दल आणि बायबलच्या जुन्या करारातील उतारांबद्दलही सांगितले आहे.
प्राचीन
कालखंडा प्रमाणे लेखक शास्त्रीय कालखंडाबद्दल लिहिताना ग्रीस, रोमन, आणि
येशू ख्रिस्ताविषयी चर्चा करतात. हा कालखंड कथित करताना लेखकाने सोलोन, मॅरेथॉनची लढाई , अलेक्झांडरचा विजय, पेरिकलीन अथेन्समधील नाटके, तत्त्वज्ञान आणि जीवनशैली, रोमन प्रजासत्ताक आणि रोमन
साम्राज्य यांच्याबद्दल सांगितले आहे. या कालखंडाचा शेवट करताना लेखकाने येशू
ख्रिस्त आणि त्याची शिकवण याचा उल्लेख केला आले. याच कालखंडात विल ड्युरंट यांनी मध्ययुगामध्ये
चर्चची वाढ कशी झाली हे सुद्धा सविस्तरपणे सांगितले आहे.
युरोपियन
कालखंडाचे वर्णन लेखकाने सात भागात केले आहे. तसे करताना चौदाव्या, पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील
विद्येचे पुनर्जागरण झालेल्या युरोपचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्यांनी मेडिसी
आणि त्यांच्या समर्थकांबद्दल त्याचप्रमाणे रोम
आणि पोपबद्दल बोलताना त्यांनी व्हेनिस, मार्टिन
ल्यूथर, जर्मन
शेतकऱ्यांचे युद्ध आणि कम्युनिस्ट, कॅथलिक
धर्मातील सुधारणा आणि एलिझाबेथ 1, विल्यम
शेक्सपियर आणि सर फ्रान्सिस बेकन यांच्या नेतृत्वा बद्दलची चर्चा केली आहे.
हिरोज
ऑफ हिस्टरी हे पुस्तक इतिहासाबद्दल भरपूर ज्ञान देणारे पुस्तक आहे. विल ड्युरंटनी
स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून अतिशय सोप्या आणि रोमांचक शब्दात हे पुस्तक
परिपूर्ण केले आहे. पुढील पिढीच्या ज्ञानासाठी हे पुस्तक फार महत्वाचा वारसा ठरणार
आहे. कारण या पुस्तकात इतिहासाचे
नायक, त्यांची
ऐतिहासिक तथ्ये आणि घटना हे लेखकाने स्वतःच्या मतांवर आणि विचारसरणीवर प्रतिबिंबित
करून लिहिले आहे. जरी हे पुस्तक सर्व वाचकांसाठी परिचयात्मक पुस्तक असले तरी ते
वाचकांना तात्विक आणि विद्वतेच्या मार्गाने इतिहास समजून घेण्यास मदत करते. हे
पुस्तक कितीही विलक्षण असले तरीसुद्धा वाचताना एक खंत मनाला वाटून राहते ती म्हणजे
लेखकाने या पुस्तकात आफ्रिकन संस्कृती, इस्लामिक
जग, अमेरिका
आणि ऑस्ट्रेलियन लोकांबद्दल कसलाही उल्लेख केलेला नाही. कदाचित त्यासाठी त्यांना
वेळ मिळाला नसेल.
इथे
एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे लेखक या पुस्तकात ऐतिहासिक घटनांच्या
व्याख्यामध्ये स्वतःचे तत्वज्ञान ठेवताना कोणताही आडपडदा ठेवत नाही. हे सांगायचे
मुख्य कारण म्हणजे लेखकाने ख्रिश्चन
पद्धतीने घेतलेले शिक्षण, ख्रिस्ती
पुजारी बनण्याची त्यांची इच्छा मग त्यांच्या विचारात बदल होऊन तत्वज्ञान आणि
इतिहासाचा केलेला अभ्यास, या
अभ्यासांचा त्यांच्यावर परिणाम होऊन त्यांचे बदलत गेलेले पूर्वग्रह आणि बायबल वरचा
त्यांचा उडालेला विश्वास याचा प्रत्यय या पुस्तकातील युरोपियन कालखंड वाचताना
येतो. पुढे त्यांनी
कन्फ्यूशियसचा आदर्श स्वीकारताना माणसाने सर्वप्रथम स्वतःशी प्रामाणिक राहायला
पाहिजे आणि मग तो स्वतःच्या कुटुंबात आणि समाजात प्रामाणिक राहू शकतो हे
तत्वसुद्धा पुस्तक वाचताना जाणवते.
हिरोज
ऑफ हिस्ट्री हे पुस्तक खरोखरच विलक्षण पुस्तक असले तरीसुद्धा ते ऐतिहासिक दृष्ट्या
परिपूर्ण आहे असे वाटत नाही कारण इतिहासात वर्षानुवर्षे काय घडले याचा आढावा
घेताना अनेक घटनांचा उल्लेख आढळत नाही. तरीसुद्धा हे पुस्तक इतिहासाच्या
अभ्यासकाने जरूर वाचावे कारण लेखक इतिहासकार आणि तत्वज्ञसुद्धा असल्याने या
पुस्तकात आलेल्या ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण लेखकाने तत्त्वज्ञानाच्या
दृष्टीकोनातून केले आहे. त्यामुळे या पुस्तकातून भूतकाळात जे काही घडले त्याचा
विचार व्यापक दृष्टिकोनातून करून वाचक चांगला
भविष्यकाळ घडवू शकतो. त्यासाठीच हिरोज ऑफ हिस्ट्री हे
पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.
धन्यवाद
योगेश
गोगवेकर

Comments
Post a Comment