विषय: पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : BOMBAY PLACE-NAMES AND STREET-NAMES
लेखक : सॅम्युअल टी शेपार्ड
प्रकाशक: थॉमस प्रेस इंडिया लिमिटेड, नवी दिल्ली
पाने: १६७
किमत: रुपये ४९९
शब्दांकन : योगेश गोगवेकर
मला जर कुणी विचारलं की भारतातील तुझी आवडती ठिकाणे कोणती तर माझे उत्तर असेल मुबंई आणि गोवा. त्यात मुंबई फारच प्रिय. मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी. या शहराच्या रस्तावर फिरत खेळत मोठा झालो. त्यामुळे या शहराचा इतिहास काय आहे, या शहराच्या रस्त्याला कशी नावे दिली गेली याचे मला नेहमीच कुतूहल असायचे. जेव्हा मी मुंबईत फिरू लागलो तेव्हा मला अनेक रस्त्यांची नावे कशी आली याचे कोडे उलगडत नव्हते. गिरगांव, भुलेश्वर, चर्नी रोड, क्रॉफर्ड मार्केट, पायधुनी, वगैरे नावे कशी दिली गेली त्यामागे काही कारणे आहेत का? असे प्रश्न मला नेहमीच पडत असे. त्याबद्दल मी अनेक लोकांकडे याबद्दल चौकशी केली तरीपण मला व्यवस्थित उत्तरे मिळत नव्हती. तेव्हा मी ठरवले की मुंबईचा इतिहास वाचायचा आणि त्यातील उत्तरे शोधायची. सुरुवातीला काही मराठी पुस्तके मिळवली पण त्यात हवी तशी माहिती मिळत नव्हती. त्यासाठी इंग्रजी पुस्तकांकडे वळावे लागले आणि मग मुबंई शहराच्या बद्दलचा बराच खजिना हाती लागला. त्यात अनेक पुस्तके होती पण मुंबई शहराच्या रस्त्यांना, मग ते रस्ते मोठे असो किंवा लहान, त्यांना नावे कशी पडली या नावाचे एक इंग्रजी पुस्तक हाती पडले. त्या पुस्तकाचे नाव आहे "Bombay Place-Names And Streets-Names, An Excursion into the by-ways of the history of Bombay City आणि या पुस्तकाचे लेखक आहेत सॅम्युअल टी शेपार्ड हे ब्रिटिश गृहस्थ. ह्या पुस्तकाची नवीन प्रत मागील आठवड्यात मला मिळाली आणि मला झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.
सॅम्युअल टी शेपार्ड यांनी हे पुस्तक लिहिले 1917 साली. म्हणजे शंभर वर्षांपूर्वी. तेव्हा ते टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाचे संपादक होते. त्यांना मुंबई शहराबद्दल प्रचंड ओढ आणि आस्था होती. त्यांनी मुंबईच्या इतिहासाबद्दल बरीच माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांना बरीच भ्रमंती करावी लागली आणि मिळालेली माहिती या पुस्तकात समाविष्ट केली. या पुस्तकाला लेखकाने एक उप शीर्षक दिले आहे. त्यासाठी त्यांनी इंग्रजी शब्द वापरला आहे Excursion. त्याचा मराठीत अर्थ आहे छोटी सहल किंवा फेरफटका. हे पुस्तक फक्त नावांचा शोध नसून मुंबईच्या परिसरातील विविध रस्त्यांना त्याकाळी जी नावे होती त्यांचा आधार घेऊन ती नावे का व कशी देण्यात आली ह्याचा एक सुंदर इतिहास आहे. हे पुस्तक ज्या वेळेस लिहिले तेव्हा मुंबई शहरात खूप बदल होत होते. मुंबईच्या उत्तर भागात म्हणजे दादर, माटुंगा, माहीम, शीव खूप विकास झाला होता तर पश्चिमेकडील भागात चौपाटी आणि बॅकबे बनत होते. ब्रिटिशांना मुंबई मिळाली ती इ. स.१६६१साली (११/०५/१६६१). तेव्हा मुंबई हे सात बेटांचे शहर होते. या शहराच्या सर्व बाजूने पाणी आणि दलदल होती. ब्रिटिशांनी ही बेटे एकमेकांना जोडली व पायाभूत सुविधांचे बांधकाम करून त्यांनी मुख्य संस्था उभारल्या आणि अठराव्या शतकाच्या अखेरीस मुंबई हे शहर बनवले. ह्या शहराचा खरा विकास झाला तो एकोणिसाव्या शतकाच्या मध्यभागी. पण खऱ्या विकासाला सुरुवात झाली ती १८८८ साली स्थापन झालेल्या मुंबई म्युनिसिपल कोर्पोरेशनमुळे.
या पुस्तकामध्ये दिलेल्या माहितीनुसार असा निष्कर्ष निघतो की एकोणिसाव्या शतकाच्या उत्तर्धापर्यंत मुंबईच्या रस्त्यांना नावे नव्हती. जी काही नावे होती ती देवदेवतांवर आधारित होती. उदा. प्रभादेवी, मुंबादेवी, काळबादे
१९१७ साली जेव्हा हे पुस्तक लिहिले गेले तेव्हा मुंबईमध्ये आजच्या सारखीच वरळी होती. तसेच वाळकेश्वर, दादर, शीव, नळ बाजार, फोर्ट वगैरे सुद्धा भाग होते. प्रचंड मेहनत घेऊन लेखकाने माहितीचे भरपूर धागे गोळा केले आणि मनोरंजक पद्धतीने ह्या पुस्तकात मांडले. त्यासाठी आपण काही उदाहरणे पाहू. पाहिले उदाहरण म्हणजे अब्दुल रेहमान स्ट्रीट ह्या रस्त्याचे. हा रस्ता क्रॉफर्ड मार्केटच्या पलीकडील रस्ता. ह्याला अब्दुल रेहमान हे नाव कसे पडले याचे सुरेख विश्लेषण या पुस्तकात केले आहे. सुरुवातीला हे अब्दुल रेहमान कोण असा प्रश्न त्यांना पडला आणि तो त्यांनी अनेकजणांना विचारला. काही लोकांनी त्यांना सांगितले की येथे अब्दुल रेहमान नावाचा एक घोड्यांचा व्यापारी होता त्यावरून हे नाव या रस्त्याला पडले. पण शेपार्ड यांवर विश्वास ठेवू इच्छित नव्हते. त्यावेळी विख्यात विद्वान असलेले आर. पी. कारकारिया यांनी शेपार्डना सांगितले की कल्याण येथील डोंगरावर अब्दुल रेहमान नावाच्या पिराची कबर आहे आणि त्याचे भक्त इथे राहतात म्हणून त्या रस्त्याला अब्दुल रेहमान स्ट्रीट असे नाव दिले गेल्याचे सांगितले. शेपार्डने यावरही विश्वास ठेवला नाही आणि या नावाचे खरे कारण शोधून काढले. हा अब्दुल रेहमान होता महाराष्ट्रातील कोकण भागातला म्हणजे कोकणी मुसलमान. इ. स. १७६५ च्या सुमारास या भागातील मोठया जमिनीचा तो मालक होता म्हणून या भागाला अब्दुल रेहमान स्ट्रीट असे म्हणत असत. पुढे ही जमीन जमशेद जीजीभाय यांनी घेतली तरी जुने नाव अजूनही प्रचिलीत आहे.
तसेच चर्नी रोड या रस्त्याचे. इ. स.१८२२ ते १८३८ मध्ये मुंबईचा फोर्ट भाग हा अतिशय गजबजलेला परिसर होता. व्ही टी रेल्वे स्थानका समोर एक कॅम्प नावाचे मैदान होते. तिथे अनेकजन आपली गुरेढोरे चरण्यासाठी घेऊन येत असत. त्यावर १९३८ साली ब्रिटिश सरकारने ते मैदान वापरण्यावर कर लावला. पण या गुरांचे मालक गरीब असल्यामुळे तो कर देऊ शकत नव्हते. तेव्हा जमशेद जीजीभाय यांनी स्वतःच्या खिशातून वीस हजार रुपये खर्च करून ठाकूरद्वार येथील गवताळ जमीन विकत घेतली आणि ती गुरांना चरण्यासाठी उपलब्ध केली. तेव्हापासून या भागास चर्नी रोड हे नाव पडले असे या पुस्तकात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे तिसरे उदाहरण आहे ते बाबुलनाथ रोडचे. हा रस्ता बांधला P W D या संस्थेने. इ. स १९०१ मध्ये त्यांनी हा बांधलेला रस्ता मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात दिला. मलबार टेकडीच्या जवळ असलेल्या रस्त्याला बाबुलनाथ रोड हे नाव कसे दिले गेले ह्याचे सुंदर विवेचन या पुस्तकात दिले आहे. ह्या पुस्तकात लेखकाने अनेक संदर्भ लक्षात घेऊन सांगितले आहे की हे नाव बाबूल ह्या शिवाच्या मंदिरावरून पडले हे खरे पण या मंदिराचे नाव बाबूलनाथ ठेवले कारण बाबूल हिरजी नाथ हा सोमवंशी क्षत्रिय शिवाचा अभिषेक करण्यासाठी लागणारा खर्च आपल्या स्वतःच्या खिशातून देत असे. अशी अनेक उदाहरणे या पुस्तकात आहे. त्यामुळे विषय खूप मनोरंजक होतो.
रस्त्यांच्या नावाच्या इतिहासाशिवाय हे पुस्तक आपल्याला त्याकाळातील मुंबईत राहत असलेला समुदाय, परिसर, मुंबईतील वनस्पती, ब्रिटिश कार्यकर्ते, मुंबईतील प्रसिद्ध व्यक्ती व व्यापारी आणि त्यांची मालमत्ता यांची सुद्धा माहिती देते. त्यामुळे पुस्तक वाचण्याचा खूप आनंद मिळतो. मुंबईच्या रस्त्यांना दिल्या गेलेल्या नावांचे परीक्षण करून शेपार्डने जो इतिहास सांगितला आहे तो अनेक संदर्भ देऊन सांगितला आहे. त्या संदर्भाचा उल्लेख प्रत्येक नावाबरोबर दिला आहे. या पुस्तकाची मूळ प्रत आज मिळत नसली तरी २०१७ साली या पुस्तकाची नवीन प्रत काढण्यात आली. हे पुस्तक १९१७ साली लिहिले असल्यामुळे या पुस्तकात बरीच रस्त्यांची जुनी नावे आहेत. त्यातील बरीच नावे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बदलण्यात आली. त्यांची बदलेली नावे या पुस्तकाच्या शेवटी देण्यात आली आहे. ती देताना त्या रस्ताचे जुने नाव आणि त्यापुढे बदलेले नाव दिले आहे.
हे पुस्तक थॉमस प्रेस इंडिया लिमिटेड, नवी दिल्ली येथून प्रकाशित झाले असून त्याची किंमत रुपये ४९९/- आहे. हे पुस्तक १६७ पानी असून नीटपणे वाचण्यासाठी सात दिवसाचा कालावधी लागतो. हे पुस्तक मुबंईच्या माहितीसाठी फारच उपयोगी आहे. ज्या मुंबई शहरात आपण राहतो त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी पडेल आणि पुढे येणाऱ्या नवीन पिढीलाही मुंबईचा इतिहास माहित होण्यास मदत होईल.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment