Skip to main content

इथे पुस्तके राहतात !


रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : ३०९
विषय क्रमांक : ४
विषय : इथे पुस्तके राहतात !
शब्दांकन: योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम, मुंबई
संकेतस्थळ :

सॅम्युअल जॉन्सन सारखा विचारवंत एकदा म्हणाला होता की अविरत वाचन म्हणजे ज्ञानाचा पाया!  हे विचार फार महत्वाचे वाटतात कारण आपण जेव्हा शाळेत किंवा महाविद्यालयात शिकत असतो तेव्हा आपल्याला एक संकुचितरीत्या आखून दिलेला अभ्यासक्रम असतो आणि आपण त्या अभ्याक्रमाची, खास करून महाविद्यालयात, मर्यादा न ओलांडता त्याच वर्तुळात अभ्यास करीत राहिलो तर आपण पदवीधर जरूर होऊ पण आधुनिक विद्वतेचे पाईक होणे आपल्याला शक्य होणार नाही. हे खरे आहे की शाळेतील किंवा महाविद्यालयातील शिक्षकामुळे आपल्या ज्ञानात भर पडत जाते. पण खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पाया हा ग्रंथच आहे. ग्रंथाशिवाय आपला व्यासंग वाढणार नाही. त्यामुळे आपण प्रबुद्ध आणि सुजाण नागरिक बनू शकणार नाही. जर माणसाला स्वतःचा व्यासंग वाढवून आधुनिक विद्वान व्हायचे असेल तर त्याच्या शिक्षणाचा पाया ग्रंथच असायला हवा. यासाठीच वाचनालयाचे महत्व असायला पाहिजे कारण पुस्तके तिथे राहत असतात.

एखादे पुस्तक किंवा पुस्तकातील एखादे प्रकरण आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकेल एवढी ताकद पुस्तकात असते. मराठी साहित्यात अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्या लेखकांनी अवांतर वाचन करून स्वतःचा व्यासंग तर वाढवलाच पण स्वतःला मिळालेले ज्ञान त्यांनी सर्व मराठी समाजापुढे ठेवले. त्यात आचार्य जावडेकर, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर, नरहर कुरुंदकर, मे.पु.रेगे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गोविंद तळवलकर, ना.सी.फडके, वि.स.खांडेकर, वगैरे लेखकांची नवे सांगता येतील. असे म्हणतात की अरब भाषेतील सुरस आणि चमत्कारी गोष्टी वाचल्यामुळे वि.स. खांडेकरांना शालेय विद्यार्थी जीवनापासून साहित्याची आवड निर्माण झाली. तसेच जॉन म्यासफील्ड हा ब्रिटनचा थोर कवी न्यूयॉर्कमध्ये हमालाचे काम करीत असताना त्याच्या हातात चॉसरचे, ’पार्लमेंट ऑफ दी फाऊल्स’ हे पुस्तक पडले आणि त्याचे आयुष्य बदलून गेले. या पुस्तकाच्या वाचनाने तो हमालाचा थोर कवी झाला. म्हणून पुस्तकाचे महत्व फार मोठे आहे. यासाठीच  पुस्तके स्वतःच्या राहत्या घरी राहण्यासाठी यायलाच पाहिजे.  

ग्रंथ म्हणजे आत्म्याचे गवाक्ष आणि ग्रंथविना घर म्हणजे गवाक्ष नसलेले घर असे सुप्रसिद्ध मराठी लेखक बाळ सामंत म्हणाले होते. यात किती सत्यता आहे हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. शाळेत असताना काही सुरस कथा वाचताना नकळत मराठी भाषेतील ऐतिहासिक पुस्तके वाचायची आवड लागली. मग महाविद्यालयात गेल्यावर इतिहासाबरोबर कादंबरी, ललीत लेख, वैचारिक साहित्य वाचायला आवडू लागले. मराठी बरोबर इंग्रजी पुस्तकेसुद्धा वाचायची हौस वाढू लागली. त्यासाठी मराठी पुस्तके वाचण्यासाठी मराठी मुंबई ग्रंथ संग्रालयाचा सभासद झालो. इंग्रजी पुस्तकासाठी ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी सुरु केली. त्यामुळे मला हव्या असलेल्या विषयांची पुस्तके वाचायला मिळू लागली. पुढे कमवता झाल्यावर हवी असलेली पुस्तके खरेदी करू लागलो आणि आज माझे स्वतःचे खाजगी ग्रंथालय तयार झाले. त्यात इतिहास, वैचारिक, तत्वज्ञान , क्रिकेट, भारतीय संगीत, राजकारण, समाजकारण, समकालीन भारतीय इतिहास, वगैरे  अशी अनेक पुस्तके आहेत. त्यामुळे मला बौद्धिक उत्तेजन तर मिळत गेले पण शोध घेण्याची भावना सुद्धा वाढीस लागली. आज मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की माझ्या घरात पुस्तकेसुद्धा राहतात.

माणसाला पुस्तके तीन कारणांसाठी जरूर वाचली पाहिजे. त्यातील पहिले कारण आहे त्या पुस्तकाची उपयुक्तत्ता, दुसरे कारण आहे त्यातील तात्विकता आणि तिसरे कारण आहे त्या पुस्तकातील कलात्मकता. याचाच अर्थ असा की विविध पुस्तकांचा संग्रह निर्माण झाल्यामुळे आपल्याला विविध जगाची, तंत्रज्ञानाची, विज्ञानाची ओळख होत जाते आणि आपल्या विचारांत आणि दृष्टिकोनात बदल घडत जातो. म्हणजे पुस्तके आपले भौतिक वातावरण सुंदर आणि आरामदायक तर बनवतात पण ज्ञान आणि संस्कृतीशी माणसाचे नातेसुद्धा घट्ट करतात. यासाठी पुस्तके नियमितपणे संकलित करणे जरुरीचे आहे. जर माणसाने स्वतःचा वैयक्तिक पुस्तकांचा संग्रह केला तर ती गोष्ट अभिमानाची होऊ शकते. शेवटी, पुस्तकांची उपस्थिती मानवी सर्जनशीलता आणि चौकशीच्या फळांसह शिकण्याची, शोधण्याची आणि स्वत: च्या सभोवतालची आवड दर्शवते. त्या वातावरणात तल्लीन होण्याचे आवाहन अनेकांसाठी वैयक्तिक आणि समृद्ध करणारे आहे. म्हणून प्रत्येक माणसाच्या घरात पुस्तके असायलाच हवी.

पुस्तके वाचत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे प्रत्येक पुस्तके ही एकचित्त होऊन वाचण्याची गरज नसते. काही पुस्तके वाचताना शांत वातावरण असण्याची गरज असते. पण अशी काही पुस्तके असतात जी केव्हाही उघडावी आणि वाचावीत, प्रत्येक वेळी वाचताना या पुस्तकांचा वेगवेगळा अनुभव येत जातो. असेच एक पुस्तक म्हणजे सी.एल.आर.जेम्स यांचे बियाँड अ बाउंड्री. हे पुस्तक आपल्याला क्रिकेट या खेळाची कलात्मक किनार सांगत वेस्ट इंडीज सारख्या देशात या खेळाचा सामाजिक परिणाम नमूद करते. त्याप्रमाणे विल डुरांट यांची Pleasures of Philosophy, Story of Civilization आणि Meaning of Life, त्याचप्रमाणे नरहर कुरुंदकरांचे जागर आणि शिवरात्र, आचार्य जावडेकरांचे आधुनिक भारत सारखी पुस्तके आपल्याला ज्ञान मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतात. सार्त्रचे Being and Nothingness  हे एक तात्विक कलाकृती असलेले पुस्तक आहे ज्यात अस्तित्व, चेतना आणि स्वातंत्र्याचे स्वरूप या प्रश्नांचा अभ्यास करते. हे स्वत: च्या आणि वास्तविकतेच्या पारंपारिक कल्पनांना आव्हान देते, शेवटी वैयक्तिक जबाबदारी आणि सत्यतेचे महत्त्व सांगते. म्हणून अशाप्रकारची पुस्तके तुमच्या संग्रही असायलाच हवी कारण अशी पुस्तके तुम्हाला जीवनाचा न उलगलेला अर्थ समजावून सांगतात. त्यांच्या तेजस्वी प्रतिभेमुळे तुमच्या समोर विश्वरूप दर्शन घडते. तेव्हा अशा पुस्तकांचा संग्रह करून त्याचे वैयक्तिक पद्धतीने वाचनालय बनवावे. तरच सर्व समाज म्हणू लागेल इथे पुस्तकेच राहतात.

जॉन हर्शल नावचा एक खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने लिहिले आहे की या गजबजलेल्या संभ्रमित जीवनात तुमचा एकमेव विसावा कोणता असेल तर वाचन हाच असेल. तो पुढे म्हणतो की पुस्तक वाचनाच्या अगोदर तुम्ही अंधारात असतात. पण वाचनाने प्रकाशाची दारे खुली होतात. ज्ञानाची बंधने खुली होतात. माणसाने जे काही मिळविले, काही आत्मसात केले ते सर्व पुस्तक रूपे नोंदले गेले आहेत. त्यामुळे पुस्तकाचे वाचन हे ज्ञान देणाऱ्या अलिबाबाची गुहा आहे. जर तुम्हाला मोठे व्हायचे असेल, तर वाचन केल्याशिवाय पर्याय नाही. कारण मानवी जीवनाचे तात्पर्य पुस्तकामध्येच आलेले आहे.  म्हणून जॉन मिल्टन सारखा इंग्लिश कवी सांगतो की ग्रंथाना मृत समजू नका. कारण पुस्तकात ईश्वराने निर्माण केलेल्या माणसांच्या हृदयाच्या कथा असतात. जेव्हा तुम्ही ग्रंथ नष्ट करतात तेव्हा तुम्ही ईश्वराने निर्माण केलेली प्रतिभा नष्ट करतात. म्हणून चार्लस किंग्जले सारखा विख्यात कादंबरीकार म्हणतो, “ जिवंत माणूस सोडल्यास या भूतलावर पुस्तकासारखी अन्य विलक्षण गोष्ट नाही. पुस्तकाचा लेखक मृत किंवा जिवंत असेल तरीसुद्धा त्यांनी लिहिलेल्या अक्षरामुळे प्रत्येक माणूस त्याला हवी असलेली गोष्ट शोधून काढू शकतो. त्यामुळे त्याची स्मृती जागृत होते. म्हणून प्रत्येक माणसाकडे पुस्तके ठेवण्यासाठी घराचा एक कोपरा तरी असायला हवा.

आजच्या  धावपळीच्या काळात तुमची बौद्धिक उंची गाठण्यासाठी वाचन हे फारच गरजेचे आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही अवांतर वाचन केले पाहिजे. कारण विचारांना शाश्वत स्वरुपात आकार देण्याचे काम पुस्तके करीत असतात. म्हणून असे म्हणतात की पुस्तके म्हणजे नुसत्या ज्ञान देणाऱ्या खिडक्या नसून संपूर्ण विश्वाकडे बघण्याचा दरवाजा सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही हा दरवाजा उघडता तेव्हा तुम्ही कधीही, कुठेही जगाच्या संपर्कात येऊन अनेक मानवाशी संवाद करू शकतात. तिथे तुम्हाला तुमच्या विचारांशी जवळीक असलेली माणसे भेटू शकतात. म्हणून पुस्तके ही चैनीची वस्तू नसून गरजेची गोष्ट आहे जी तुम्हाला हवे असलेले ज्ञान देवू शकते. यासाठीच मी पुस्तके विकत घेऊन माझे संग्रालय बनविले आहे. त्यात अनेक प्रकारची पुस्तके आहेत. मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी काढून ती वाचत जातो, त्यात मांडलेले विचारांचे आकलन करून स्वतःचे विचार मांडीत जातो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व पुस्तकांची काळजी घेत असतो कारण मला माहित आहे की पुस्तकांमध्ये लिहिलेल्या शब्दात माणसांचे विचार बदलण्याची ताकद आहे. माझ्याकडे असलेल्या पुस्तकांच्या संग्रहावरून मी असेच म्हणीन येथे पुस्तके राहतात!

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...