विषय: पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव: डार्कनेस ॲट
नून
लेखक: आर्थर कोस्टलर
प्रकाशक: विन्तेग क्लासिक (Vintage Classic)
पाने: २११
किमत: रुपये ५६७/-
शब्दांकन : योगेश गोगवेकर
जेव्हा काही नागरिकांना हुकुमशाही चांगली वाटत असते, तेव्हा जगातील अशा नागरिकांनी त्यांच्या आयुष्यात चार पुस्तके वाचलीच पाहिजे असे मला वाटते. ती चार पुस्तके आहेत, The Trial written by Franz Kafka, 1984 by George Orwell, Animal Farm by George Orwell and Darkness at Noon by Arthur Koestler. याचे कारण म्हणजे ही पुस्तके हुकुमशाहीची पद्धत काय असते याचे थोडक्यात पण विस्तृतपणे वर्णन करून जगातील सर्व समाजाला जागृत करण्याचे काम करीत असतात. मी माझ्या अनेक समकालीन मित्रांना किंवा नातेवाईकांना या पुस्तकांबद्दल सांगतो, तेव्हा त्यांची एकच प्रतिक्रिया असते की होय मी ही पुस्तके फार पूर्वी वाचली आहेत, पण हल्ली परत वाचायला वेळ मिळत नाही. याचाच अर्थ असा होतो की त्यांनी ही पुस्तके कधीही वाचलेली नसतात किंवा वाचली असतील पण त्या पुस्तकांचे आकलन त्यांना नीटपणे जमलेले दिसत नाही. हे सर्व सांगायचे कारण हे की या वर्षाच्या सुरुवातीपासून मी यातील पहिली तीन पुस्तके परत एकदा वाचली and Darkness at Noon हे पुस्तक आत्ताच वाचून काढले. जेव्हा मी ही पुस्तके वाचीत होतो तेव्हा मन खूपच अस्वस्थ होत होते कारण उदारमतवादी लोकशाही बाजूला सारून जगातील बहुतेक समाजच थोड्याशा स्वार्थासाठी हुकुमशाहीला आमंत्रण देत असतो. आज जगामध्ये अशी काही उदाहरणे भरपूर बघायला मिळत आहे.
वर म्हटल्या प्रमाणे बहुतेक लोकांना असे
वाटते की लोकशाहीतल्या उदारमतवादापेक्षा हुकुमशाहीतील शिस्त चांगली असते. पण अशा
लोकांना हेच समजत नसते की लोकशाही पद्धतीच्या राजवटीमध्ये कितीही त्रुटी असल्या
तरी लोकशाही पद्धतीची राजवट मानवी जीवन समृद्ध बनविते आणि मानवता, बंधुत्व
यांचा आदर करते. याचे आकलन वरील चार पुस्तके वाचताना होत जाते. या चारही पुस्तकातून
सर्वाना एक संदेश मिळत जातो तो म्हणजे अंतिम सत्य हे उपांन्त नेहमी असत्य असते.
म्हणून ही पुस्तके म्हणजे केवळ राजकीय रणनीतीचा किंवा इतिहासातील घडलेल्या घटनांचा
अभ्यास नसून तो इतिहासात घडलेल्या घटनांच्या आधारे चांगले आणि वाईट समजून
घेण्यासाठी शक्तिशाली मांडलेल्या विचारांचा आहे. केवळ संकुचित स्वार्थासाठी माणूस
स्वतःचे स्वातंत्र्य बाजूला करून हुकुमशाहीचा स्वीकार करतो आणि मग नको असलेल्या
परिणामांचा जबरदस्तीने त्याला स्वीकार करत लोकशाहीकडे परतण्याचे सर्व मार्ग
पूर्णपणे बंद करतो.
डार्कनेस ॲट नून
ही कादंबरी जरी
रशियातील म्हणजे त्याकाळी
असलेल्या सोव्हिएत युनियनच्या
कम्युनिस्ट राजवटीवर खास
करून स्टॅलिनच्या राज्यकारभारावर
भाष्य करत असली तरी ती कादंबरी म्हणजे
ऐतिहासिक कल्पना आहे. त्यात कोणत्याही देशाचे,
कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा
व्यक्तीचे नाव दिलेले नाही. या कादंबरीचे मुख्य पात्र आहे निकोलस रुबाशोव्ह जो
बोल्शेविक मधील कम्युनिस्ट पक्षामधील सर्वात जेष्ठ सदस्यांपैकी एक असून त्याचे
पक्षामधील स्थान नंबर दोनचे म्हणजे स्टॅलिनच्या नंतरचे आहे. तरीपण पक्षामध्ये
वेगळे विचार मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे रुबाशोव्हला अटक केली जाते. त्याला अटक
करण्यासाठी तरुण आणि वृद्ध असे दोन अधिकारी येतात. वृद्ध अधिकारी हा विनम्र असतो
तर तरुण अधिकारी खूपच गर्विष्ठ असतो. सुरुवातीलाच हे पुस्तक दोन अधिकाऱ्यांमधील
विरोधाभास नमूद करते आणि नव्या पिढीची काळी बाजू सुबुद्ध जेष्ठ नागरिकांवर कसे
वर्चस्व गाजू पाहत आहे हे उघड करते.
डार्कनेस ॲट नून
हे पुस्तक तीन
भागामध्ये विभागलेले आहे.
पहिले दोन भाग हा रुबाशोव्हची सुनावणीबद्दल असून त्यातील
तिसरा भाग व्याकरणात्मक कथेचा आहे. जेव्हा रुबाशोव्हला अटक होते तेव्हा त्याच्या
मनातील भीती आणि चिंता संपते. त्याला समजून चुकते की त्याला मरेपर्यंत तुरुंगातील
एकांतवास सहन करावा लागणार आहे. त्यासाठी तो टॅप कोडचा वापर करून आपल्या शेजारच्या
सेल नंबर ४०२ मध्ये असणाऱ्या कैद्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. त्या चर्चेच्या
दरम्यान रुबाशोव्हला कळून चुकते की शेजारच्या सेल मध्ये बंदिस्त झालेला कैद्दी हा
एक लष्करी अधिकारी असून कोणत्याही कम्युनिस्ट पक्षाच्या सभासदाचा विरोधी असतो आणि
त्यांना अटक झाली की तो आनंदी होतो. तरीसुद्धा रुबाशोव्ह त्यांच्याशी संवाद चालू
ठेवतो कारण वर्तमानात घडत असलेल्या गोष्टी बद्दल दोघांचीही मते सारखीच असतात.
म्हणून रुबाशोव्हला वाटत राहते की समाजातील पुढील पिढ्यांना चांगले दिवस
देण्यासाठी आज होणारा त्रास सहन करावा लागेल.
जेलमध्ये एक आठवडा झाल्यानंतर
रुबाशोव्हला पाहिलांदा सुनावणीसाठी नेतात तेव्हा त्याची भेट त्याचा मित्र असलेला
इव्हानोव्हशी होते. इव्हानोव्ह याने झालेल्या गृहयुध्यात स्वतःचा पाय गमावलेला
असतो. त्यामुळे इव्हानोव्हच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतात पण रुबाशोव्हने
त्याला आत्महत्येपासून परावृत्त केलेले असते. म्हणून इव्हानोव्हच्या हृदयाच्या एका
कोपऱ्यात रुबाशोव्हबद्दल नेहमी प्रेम दिसून येते. म्हणून तो सांगतो की जर
रुबाशोव्हने आरोपांची कबुली दिली तर त्याची फाशीची शिक्षा रद्द होऊन त्याला शिक्षा
म्हणून फक्त पाच सहा वर्षाचा तुरुंगवास होईल. पण रुबाशोव्ह ही संधी नाकारतो कारण
तुरुंगातील पाच सहा वर्षाचा कंटाळवाणा प्रवास त्याला नकोसा झालेला असतो. त्यामुळे
नाईलाजाने इव्हानोव्हला ही केस त्याचे कनिष्ठ अधिकारी ग्लेटकिनकडे सुपूर्द करावी
लागते.
ग्लेटकिन हा एक कठोर अधिकारी असतो.
कैद्यांना शारीरिक इजा करीत आणि निराश करीत तो प्रत्येक कैद्यांकडून जबरदस्तीने
कबुलीजबाब लिहून घेत असतो. तरीसुद्धा इव्हानोव्ह त्याला असे प्रकार रुबाशोवहसाठी न
वापरण्याचे आव्हान करतो. तेव्हा ग्लेटकिन त्याला सांगतो की कैद्यांकडून कबूलीजबाब
घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे यातनाच आहे. एकदा असा कबुलीजबाब मिळाला की त्यांना
मारल्या शिवाय दुसरा पर्यायच राहत नाही,
असे ही सांगतो. ग्लेटकिन त्याला हवा
असलेला म्हणजे अर्धसत्य असलेला कबुलीजबाब रुबाशोव्हकडून लिहून घेतो आणि त्याच्या
भूतकाळात काही वाईट घटनांचा उल्लेख करून तो जिवंत राहणे कसे धोक्याचे आहे हे
सांगतो. कारण रुबशोव्हने भूतकाळात पक्षासाठी काम करीत असताना रिचर्ड, लोवे
आणि अर्लोवा सारख्या एजंटना मारले होते. ते मारणे विश्वासघाताने आणि निर्दयपणे
असल्याचे ठरवून ग्लेटकिनने रुबाशोव्हला अपराधी ठरविले होते आणि त्यासाठी त्याला
मृत्युदंडच द्यावा अशी शिफारीस केली होती. या शिफारशीच्या आधारे रुबाशोव्हला मारले
जाते आणि इथेच या कादंबरीची कथा संपते.
या कादंबरीची कथा हुकुमशाही राज्याचे
दूरवरचे परिणाम व्यवस्थितपणे रुबशोव्हच्या रूपाने सांगितले आहे. कुठलेही हुकूमशाही
सरकार माणसाच्या मनावर नियंत्रण करू इच्छिते. त्यामुळे जनतेला कोणतेही प्रश्न
सरकारला विचारायचे हक्क नसतात आणि जर का ते विचारले तर त्याची अवस्था या कथेतील
पात्राप्रमाणे म्हणजेच रुबाशोव्ह प्रमाणेच होईल असा संदेश या कथेत मिळत जातो.
हुकुमशाही पद्धतीच्या सरकारमध्ये एक महत्वाची गोष्ट जाणवते ती म्हणजे सत्य हे कधीच
वास्तवाकडे लक्ष न देता पक्षाचा नंबर एकचा नेता जे सांगेल तेच सत्य आहे असे समजून
सर्व जनतेने तेच मान्य करावे. कथेच्या शेवटी रुबाशोव्ह जे मान्य करतो त्यात
सत्याचा भाग किती आणि असत्याचा भाग किती असतो हे तो सांगू शकत नाही कारण शासन जे
सत्य सांगते तेच मान्य केले पाहिजे असा नंबर एकचा आदेश असतो.
आर्थर कोस्टलर यांनी ही कादंबरी प्रथम
१९४० मध्ये जर्मन भाषेत लिहिली होती. पुढे ही कादंबरी इंग्रजीत आणि इतर
भाषेतसुद्धा भाषांतरीत झाली. जरी ही उत्कृष्ट कादंबरी स्टॅलिनयुगातील
कम्युनिष्टविरोधी म्हणून लिहिली गेली असली तरी लोकशाही मार्गाने येणाऱ्या
हुकुमशाही पद्धतीचे अतरंग या कादंबरीत आढळते. या कादंबरीमुळे एक गोष्ट निश्चितपाने
मान्य होते की एखाद्या राष्ट्राला मिळालेले व्यक्तीस्वातंत्र्य कसे टिकून राहील हे
त्या राष्ट्राच्या राजकीय परीपक्वतेवर अवलंबून असते. इथे एका वृद्धक्रांतीकारकाला
म्हणजेच निकोलस रुबशोव्हला तुरुंगात डांबले जाते,
त्याचा छळ केला जातो. निरर्थक
गुन्ह्याची कबुली देण्यास भाग पाडले जाते. याचा अर्थ असा की निरंकुशतावाद किंवा
फॅसिझम मध्ये निरंकुश चळवळीला भयंकर मूर्त रूप दिले जाते.
म्हणून जगातील सर्व नागरिकांना सांगावेसे
वाटते की वरील नमूद केलेली चारही पुस्तके जरूर वाचावी. कारण ही पुस्तके आपल्याला
कम्युनिस्ट राज्यांच्यापलीकडे घेऊन जातात. हे सर्व काही एकाच व्यक्तीसाठी किंवा
एकाच पक्षासाठीच आहे असे सांगितले जाते तेव्हा त्यात किती सत्य आणि किती असत्य आहे
हे अज्ञात असते. डार्कनेस ॲट नून ही
कादंबरी जेव्हा रुबाशोव्हच्या
रूपाने मानसिक छळांशी
रूपरेषा मांडते तेव्हा
एकच प्रश्न मनात
येतो की उद्याच्या
सुंदर भविष्यासाठी आजचा
वर्तमान अन्यायकारक बनवायचा का?
त्यासाठीच मला वाटते की डार्कनेस ॲट
नून ही कादंबरी
वाचलीच गेली पाहिजे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment