विषय : पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : 84, Charing Cross Road
लेखिका : हेलन हँफ्फ
प्रकाशक : Penguin Random House LLC
पाने : ११२
किंमत: रुपये ९५८/-
शब्दांकन : योगेश गोगवेकर
लेखिका : हेलन हँफ्फ
प्रकाशक : Penguin Random House LLC
पाने : ११२
किंमत: रुपये ९५८/-
शब्दांकन : योगेश गोगवेकर
फोर्ट, मुंबई येथील स्ट्रॅण्ड बुक स्टॉल हे माझे पुस्तके विकत घेण्याचे आवडते ठिकाण. साधारणता पाच वर्षापूर्वी (दुकान बंद होण्यापूर्वी) मी दुकानात गेलो असता मला एक इंग्रजी पुस्तक हाती लागले. ते पुस्तक काही कादंबरी किंवा प्रेम कथा किंवा प्रणयरम्य पुस्तक नव्हते तर ते पुस्तक होते दोन व्यक्तीने पुस्तकासाठी पत्राद्वारे केलेला संवाद. हा पत्रव्यवहार होता एका पुस्तक प्रेमी वाचकाचा आणि पुस्तकाच्या दुकानात काम करण्याऱ्या दुसऱ्या पुस्तकप्रेमी कर्मचाऱ्याचा. मी जेव्हा पुस्तक चाळू लागलो तेव्हा मला पहिलेच पत्र आवडले. म्हणून मी पुढची दोन पत्रे सुद्धा वाचली आणि मी आश्चर्यचकित झालो. लगेच पुस्तक विकत घेऊन माझ्या पुस्तकांच्या संग्रहात जमा केले. या पुस्तकातील लिखाण जरी कलात्मक नसले तरी मनोरंजक आहे. मी घरी येऊन हे पुस्तक वाचू लागलो तेव्हा मी त्या पुस्तकातील संवाद वाचून खूपच भारावून गेलो. त्या पुस्तकाचे नाव आहे 84, Charing Cross Road आणि हा संवाद आहे दोन व्यक्ती मधला त्यांची नावे आहेत हेलन हँफ्फ ( Helen Hanff ) व फ्रॅंक डॉयल (Frank Doel). शंभर पानी असलेले हे पुस्तक 1970 साली प्रकाशित झाले होते. ह्या आठवड्यात हे पुस्तक परत वाचून काढले.
आजच्या संगणकाच्या दुनियेत पत्रव्यवहार फार दुर्मिळ झाला आहे, नव्हे जवळ जवळ नाहीसा झाला आहे. हवी असलेली पुस्तके पुस्तकप्रेमी संगणकाच्या माध्यमातून किंवा व्हाट्सअप सारख्या सोशल माध्यमातून मागवू शकतात, नाहीतर आपल्या टॅबवर वेब ब्राउझरवर वाचू शकतात. त्यामुळे पत्राद्वारे लेखी संवाद आता इतिहास बनला आहे आणि पत्रव्यवहारामुळे होणारा संवादाचा साठा नाहीसा झाला आहे. सुमारे 70 वर्षा पूर्वी असा संवाद करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पत्र लिहिणे हाच होता. जेव्हा हे पुस्तक वाचू लागलो तेव्हा मला ह्या संपलेल्या पत्रसंवादचे महत्व समजले आणि ह्या पुस्तकाची मजा घेत वाचू लागलो.
हेलन हँफ्फ ह्या एक न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या जबरदस्त वाचक आणि लेखिका होत्या. न्यूयॉर्कमध्ये त्यांना इंग्रजी साहित्याच्या चांगल्या आवृत्या सापडत नव्हत्या. त्यासाठी त्यांना न्यूयॉर्क सिटी पब्लिक लायब्ररीवर अवलंबून राहावे लागत असे. पण ही जागा त्यांच्या राहत्या घरापासून दूर तर होतीच आणि त्यांना फक्त वाचनालयात बसूनच पुस्तक वाचावे लागत असे. दुसरे असे की ती पुस्तके योग्यप्रकारे छापलेलीसुद्धा नव्हती. सुदैवाने त्यांचे शेजारी ब्रिटिश होते आणि त्यांनी हेलन हँफ्फ यांना एका लंडनच्या कंपनीचा पत्ता दिला आणि तो पत्ता होता, "मार्क्स अँड कंपनी, 84, चेअरिंग क्रॉस रोड, लंडन". तेव्हा हेलन हँफ्फ यांनी त्यांना पत्र लिहून जुनी आणि दुर्मिळ झालेल्या पुस्तकांची यादी दिली व त्यासाठी लागणारी पूर्ण किंमत त्यांनी भरली. अशाप्रकारे दोन पुस्तकप्रेमी माणसांचा पत्रव्यवहार सुरु झाला आणि तो वीस वर्षे चालू राहिला.
फ्रॅंक डॉयल हे मार्क्स अँड कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी असले तरी ते एक जबरदस्त वाचक आणि पुस्तकप्रेमी होते. त्यांनी हेलन हँफ्फ या लेखिकेच्या पत्राला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला औपचारिक पद्धतीने सर किंवा मॅडम असा उल्लेख करीत असत. पुढे पुस्तकांच्या आवडीमुळे त्यांच्यात मैत्री वाढू लागली आणि त्यांच्यात एक माणुसकीचे नाते निर्माण झाले. मग लेखिका हेलन हँफ्फची फ्रॅंक डॉयल यांच्या पत्नीशी सुद्धा खूप चांगली मैत्री झाली आणि पुस्तकाबरोबर काही खाद्यपदार्थाची सुद्धा देवाणघेवाण लंडन ते न्यूयॉर्क मध्ये होऊ लागली. या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे फ्रॅंक डॉयल यांनी हेलन हँफ्फ यांना लंडनला येऊन त्यांच्या कुटुंबासमवेत राहण्याची विनंती केली होती पण लेखिकेला प्रवास खर्च परवडत नसल्याने त्या लंडनला जाऊ शकत नव्हत्या. पुढे त्या कधी लंडनला गेल्या की नाही याचा तपशील उपलब्ध नाही आहे कारण 1960 दशकाच्या शेवटी फ्रॅंक डॉयल यांचे निधन झाले आणि ही बातमी लेखिकेला मार्क्स अँड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली तेव्हा लेखिकेला जबरदस्त धक्का बसला व तिच्या आयुष्यातील एक पुस्तकप्रेमी मित्र कायमचा निघून गेला.
हे ११२ पानी असलेले एक सुंदर पुस्तक आहे. पुढे या पुस्तकावर आधारित चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका सुद्धा आल्या. चित्रपटात Anne Bancroft यांनी हेलन हँफ्फची भूमिका साकारली असून फ्रॅंक डॉयलची भूमिका Anthony Hopkins यांनी केली आहे.
या पुस्तकाने मला एक वेगळाच आनंद दिला. समविचारांची आणि पुस्तकप्रेमी असलेली दोन माणसे जी वेगळ्या प्रदेशात राहतात आणि एकमेकांना न भेटता केवळ पत्राद्वारे त्यांच्यात मैत्री होऊ शकते असा नवीन संदेश ह्या पुस्तकामार्फत मिळाला. तेव्हा पुस्तकप्रेमिनो हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा आणि तुमच्या संग्रही सुद्धा असू द्या कारण हे पुस्तक वाचणे म्हणजे नवीन मित्र कसे मिळवणे हाच संदेश आहे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment