शब्दांकन: योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
पत्ता : माहीम, मुंबई
आज सर्व समाजाचे एवढे ध्रुवीकरण झाले आहे की माणसा माणसांमध्ये वैमनस्य वाढताना दिसत आहे. त्यामुळे माणसांमधील माणुसकी संपत आहे का ? असे सतत वाटत आहे. हे किती काळ चालू राहील याचा अंदाज येत नसल्यामुळे मन खूप अस्वस्थ होत आहे. अशा वेळेस दोनच गोष्टी माणसाच्या मनाला या अस्वस्थेमधून बाहेर काढू शकतात असे मला वाटते. त्या दोन गोष्टी म्हणजे माणसाने निर्माण केलेला त्याचा बगीचा आणि स्वतःच्या मेहनतीने उभे केलेले स्वतःचे वाचनालय. या दोनच गोष्टी माणसाला त्याची माणुसकी जिवंत ठेवण्यास मदत करीत राहतात आणि त्यात पुस्तकाचा उपयोग जास्त होतो. कारण या अविवेकी वातावरणात पुस्तकेच माणसाचा हरवलेला विवेक त्याला परत देवू शकतात आणि त्याला वैचारिक दृष्ट्या सक्षम बनवत असतात, त्याला जगण्यासाठी आधार देतात आणि माणसाचे आयुष्य समृद्ध करतात.
पुस्तकामधून माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचायला मिळते. त्यात कादंबऱ्या, कथा, ललित, नाटकं, वैचारिक, भाषांतरीत व रुपांतरीत असे अनेक प्रकारचे साहित्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असते. भौतिकदृष्ट्या ते शब्दांमध्ये लिहिलेले असले तरी, हे शब्द मानवी मनाच्या कल्पनेतच जिवंत होत असतात. या शब्दातून निर्माण झालेल्या मजकुराचा जटीलपणा किंवा साधेपणा समजून घेण्याची क्षमता मानवी समाजाला इतर मानवी समाजांचा दृष्टीकोन समजून घेण्यास मदत करत असते. माणसाचा हा प्रवास पुस्तकांच्या पानांमध्ये कोरलेला असतो त्यामुळे जीवनातील अनेक अनुभवाबद्दल ही पाने बोलत असतात आणि जीवनाशी निगडीत असलेली नवीन तत्वे मांडीत असतात.
लहानपणापासून अनेक माणसांना पुस्तकरुपी लिहिलेल्या साहित्याचा परिचय होत असतो. हे साहित्य खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी त्यात विज्ञान कथा असतात तर कधी गूढ कथांचा संग्रह असतो. कादंबरी किंवा नाटकेसुद्धा साहित्य जत्रेतील महत्वाच्या गोष्टी आहेत. माणसाच्या लहानपणापासून सुरु झालेला पुस्तक वाचनाचा हा प्रवास मोठेपणी स्वतःच्या आवडीच्या विषयांचा शोध घेत साहित्याचे खरे महत्व समजून घेण्यास मदत करीत असतो. याचाच अर्थ असा की माणसांचे गुंतागुंतीचे जग मनापासून समजून घेण्यासाठी मानवाला पुस्तकच मदत करू शकते. लिहिलेल्या पुस्तकांमध्ये नैतिक शिक्षणाचे हेतू असतात. त्यात मानवी स्वभावाचे चांगले किंवा वाईट प्रतिबिंब पडलेले असते. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी नक्कीच होऊ शकतो. मात्र याचा अर्थ असा नव्हे की पुस्तके माणसाला केवळ मानवी जीवनाचे प्रतिबिंबच दाखवते, तर वाचकाला चांगला निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक सुद्धा ठरू शकते.
आजच्या इतके गोंधळलेले व आव्हानात्मक आणि सतत बदलणारे जग कधीच नव्हते. त्यामुळे आज पूर्वी इतके माणसाच्या व्यवहारी जीवनाचे अंदाज बांधणे सोपे नाही. म्हणूनच आज साहित्याला फार मोठे महत्व आहे कारण मानवी मन आणि त्याच्या सभोवतालच्या जगाच्या आकलनाचे अंदाज ग्रंथरुपात विस्तारलेले असतात. काय योग्य आणि काय अयोग्य या गोष्टीं पुस्तकी रुपात परिभाषित केली जाते. याचाच अर्थ पुस्तके माणसाला प्रेरक सामग्री देवून वाचकांना प्रोत्साहन तर देत असतातच पण वाचकाला आत्म-चिंतन करून इतरांना समजून घेण्यासाठी खूप मदत करून मानवी नातेसंबंध जोडण्याची क्षमता निर्माण करीत असतात.
इतिहास, विज्ञान, संगीत, खेळ, मनोरंजन, तत्वज्ञान, वगैरे अनेक विषयांची माहिती माणसाला पुस्तक स्वरूपात मिळत असतात. त्यामुळे माणूस नवी कल्पना आणि विचार प्रक्रीयेंशी परिचित होत जातो. सतत वाचनामुळे माणसाला माहिती तर मिळतेच पण त्या माहितीची आकलन करण्याच्या क्षमतेत वाढ होण्यास मदत होते. त्याशिवाय संवाद कौशल्य आणि शब्द भांडार वाढविण्यास मदत होते. त्यातून चांगले लेखन होण्यास मदत होत असते. पुस्तकांच्या सहवासात राहिल्यामुळे मेंदूला चालना मिळून संज्ञात्मक कार्य सुधारते आणि दैनंदिन जीवनाच्या ताणतणावांपासून मुक्त होण्यासाठी मदत होते. त्याप्रमाणे पुस्तक वाचन दीर्घकाळ केल्यामुळे लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत वाढ होत जाते.
पुस्तके तुम्हाला एकाच ठिकाणी बसवून वेगवेगळ्या प्रदेशात फिरवून आणतात आणि वास्तविकता पर्यंत पोहोचवतात. वाचन हा सतत शिकण्याचा आणि आत्मशोधाचा न थांबणारा प्रवास आहे. माणसाच्या वयाशी त्याचा काहीही संबंध नसतो. त्यात नेहमीच काहीतरी नवीन असते. म्हणून पुस्तक वाचन हे मानवी जीवनाचे महत्वाचे अंग आहे कारण पुस्तक अनेक विषयांचा खजिना देतात आणि इतरांशी चर्चा करण्यासाठी माणसाला समृद्ध करीत असतात. यासाठी पुस्तके वाचलीच पाहिजे. इथे मला सुप्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार Daniel J Boorstin यांचे एक वाक्य आठवते. ते म्हणतात,”A person who does not read is only half-alive. And if the members of a society stop reading?, Then you have a half-alive society.”
यासाठीच पुस्तके माणसाच्या जीवनातला महत्वाचा भाग असायला पाहिजे.
यासाठीच पुस्तके माणसाच्या जीवनातला महत्वाचा भाग असायला पाहिजे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment