Skip to main content

Ahinsa aani Mahatma Gandhi




विषय : अहिंसा आणि महात्मा गांधी
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम,मुंबई

आजचा भारतीय समाज एका विचित्र संक्रमणातून जात आहे. सोशल मिडीयाचा व्यवस्थित वापर करून भारतीय समाजाचे सर्व क्षेत्रात ध्रुवीकरण होत असल्याचे दिसत आहे. चुकीच्या पोस्ट सोशल मिडीयावर दररोज येत असतात आणि त्यातील सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न कुणीही करताना दिसत नाही. सत्य न समजल्यामुळे आजच्या भारतीय समाजाची हालत महाभारतातील अश्वथामा सारखी झालेली दिसत आहे. महाभारतात अश्वथामा हा गरीब ब्राह्मण दांपत्यांचा म्हणजे आचार्य द्रोण आणि कृपी यांचा पुत्र. लहान असताना अश्वथाम्याला दुध हवे होते पण घरातल्या गरिबीमुळे त्याला दुध मिळत नव्हते. एकदा त्याने दुधाचा हट्ट धरला तेव्हा त्याला त्याच्या आईने पिठाचे दुध करून पाजले. तेव्हापासून त्याला तेच खरे दुध वाटू लागले. जेव्हा दुर्योधनाने त्याला खरे दुध दिले तेव्हा त्याला खऱ्या दुधाची चव न आवडल्यामुळे त्याने ते दुध थुकून टाकले. हीच गत आजच्या भारतीय समाजाची झाली आहे. धृविकरणाच्या विळख्यात तो पूर्णपणे अडकला गेला आहे. त्यातून बाहेर काढण्याचे सामर्थ आजतरी कोणत्याही नेतृत्वात दिसत नाही. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे सोशल मिडीयावर महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंवर चुकीची माहिती सातत्याने येत आहे आणि दोघांना या देशाचे शत्रू म्हणून उभे केले जात आहे. या दोघांवर आलेल्या चुकीच्या पोस्टचे कोणत्याही व्यक्तीने खंडन केलेले दिसत नाही. जर कुणी तसा प्रयत्न केला तर व्यवस्थितपणे ट्रोल करून त्या व्यक्तीला समाज माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सत्य समजून घेण्याचे प्रयत्न कुणीही करण्याचा प्रयत्न दिसत नाही.      

महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सोशल मीडियातून येत असतात, तेव्हा एक गोष्ट जाणवते ती म्हणजे  या विषयी कोणताही अभ्यास नसलेल्या व्यक्ती अशा पोस्ट टाकतात. ही माणसे केवळ ऐकलेल्या गोष्टींवरून त्यांनी तशी पोस्ट  लिहिलेली असते. जेव्हा अशा प्रकारची पोस्ट  वाचक वाचतो तेव्हा सुद्धा एक गोष्ट जाणवते की वाचकाचासुद्धा कोणताही अभ्यास नसतो आणि तो या पोस्टमध्ये आलेली चुकीची माहिती त्याला सत्य वाटू लागते. या गोष्टींचे समर्थन जेव्हा शिक्षित (यात उच्चशिक्षण घेतलेलेसुद्धा येतात) करतात तेव्हा वाईट वाटल्या शिवाय राहत नाही. कारण त्यांचा अभ्यास हा त्यांनी स्वीकारलेल्या व्यवसाया पुरताच मर्यादित असतो. अशा लोकांचे अवांतर वाचन बहुधा नसते. त्यामुळे ते अचूक विश्लेषण करू शकत नाहीत. अशीच एक पोस्ट मी महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानावर वाचली होती. ज्याने ती पोस्ट लिहिली होती त्या व्यक्तीची मला कीव आली. जेव्हा त्या व्यक्तीला मी विचारले की ही पोस्ट लिहिताना तू काही वाचन केले असेल किंवा काही संदर्भ मिळविले असेल तर ते संदर्भ मला दे. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली की ही पोस्ट त्याने लिहिली नसून त्याला ती सोशल मीडियावर म्हणजे WhatsApp वर आली होती. ती त्याला आवडली म्हणून सर्वाना पाठवून दिली. त्यामागे त्याने कुठलेही संशोधन केलेले नव्हते किंवा कोणतेही पुस्तक वाचले नव्हते. जेव्हा मी त्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला सांगितले की या सर्व गोष्टी डाव्या लोकांनी लिहिल्या आहेत आणि त्या चुकीच्या आहेत पण आज सत्य बाहेर येत आहे. अशा वेळेस हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे. तेव्हा जाणवते की आपल्या समाजाची गत अश्वथाम्याला मिळालेल्या दुधासारखी झाली आहे.

जेव्हा आपण गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गांधीजींचे अहिंसेचे तत्वज्ञान हे केवळ डरपोक माणसाचे तत्वज्ञान नव्हते. त्यामागे एक विचार नक्कीच होता, एक वेगळी प्रेरणा होती, माणुसकीचा विचार होता आणि लोकशाही मार्गाने चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे सामर्थ होते. म्हणून स्वातंत्र्याच्या लढ्याचे विश्लेषण करताना एक गोष्ट जाणविते ती म्हणजे जर भारतीय समाजाने हिंसेचा वापर करून देश स्वतंत्र केला असता तर स्वतंत्र भारतात सुद्धा कोणत्याही प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी हिंसेचाच वापर केला गेला असता. त्यासाठी कोणतीही संस्था उभारली गेली नसती. नुसती चर्चा काय पण अहिंसक मार्गाने कोणतीही आंदोलने सुद्धा झाली नसती. स्वतंत्र भारताने लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचा विचार केला तेव्हा भारताने महात्मा गांधींचा अहिंसेचा मार्ग स्वीकारून संसदीय लोकशाहीची स्थापना केली. याला कारण म्हणजे गांधीजींची अहिंसा नुसत्या शांततावादाची जपमाळ ओढत नाही. अन्यायाच्या विरोधात ती संघर्ष करते आणि स्वतः सक्रीय बनून सर्व मानव जातीला निर्भय बनविते. ही अहिंसा सामाजिक आणि राजकीय संस्था उभारून मानव जातीचे शोषण थांबविण्याचे प्रयत्न करते. म्हणून तिचे नाते गौतम बुद्धाने सांगितलेल्या अहिंसेशी आहे. भारतीय स्वातंत्र्याचा लढा चालू करण्या अगोदर गांधी पूर्ण देशभर फिरले आणि त्यांनी सर्व भारतीयांची परिस्थिती समजून घेतली. मगच स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले. एकेक ब्रिटीश माणसाला मारून काही भारतीय स्वातंत्र्य येणार नव्हते त्यासाठी व्यापक लढा उभारणे गरजेचे होते. अशा वेळेस हिंसक मार्गाचा उपयोग नव्हता कारण भारतीय जनता एवढी गरीब होती की त्यांना शस्त्रे उचलणे कठीण होते. म्हणून गांधीनी त्यांना निर्भय बनो हा अहिंसक मंत्र दिला आणि स्वातंत्र्य भारताचा लढा चार भिंतीतून काढून सर्वसामान्य जनतेपर्यंत नेला.

पुढे स्वतंत्र भारताने गेली सत्तर वर्षे अहिंसक मार्गाने म्हणजे गांधीजीने दाखवलेल्या मार्गाचा अवलंबन करून राज्य कारभार केला. पुढील वर्षी म्हणजे ३१ जानेवारी २०२५ रोजी गांधीजींची हत्या होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील तरीपण महात्मा गांधींचे विचार आणि तत्वज्ञान पुसले जात नाही. नुसते भारतातच नव्हे, परदेशातही गांधींच्या विचारांना महत्व मिळत आहे. याची सुरुवात विसाव्या शतकातच सुरु झाली होती. त्यांच्या अहिंसेचे तत्वज्ञान समजून घेऊन किंवा आत्मसात करून अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी आपले लढे उभारले. त्यात नेल्सन मंडेला, जु. मार्टिन ल्युथर किंग, बरेक ओबामा सारखे नेते आहेत. मेन विश्वविद्यालाचे प्रोफेसर डग्लस एलन यांचे तर असे म्हणणे आहे की महात्मा गांधीनेच अंमलात आणलेले मार्ग आपल्याला प्रतीस्पर्धकाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी आणि शासनाला अन्यायापासून रोखण्यासाठी सहजपणे वापरू शकतो. अशी अनेक उदाहरणे देता येतात. नजीकच्या काळात अनेक अरब लोकांचे म्हणणे असे आहे की इस्रायल विरुद्ध हिंसक लढा न देता अहिंसक लढा दिला तर तो जास्त उठावदार होईल. या अहिंसक मार्गाने जाऊन सविनय कायदेभंग किंवा असहकार चळवळ चालवून इस्रायल लोकांना सांगितले की आम्ही तुम्हाला कोणतीही इजा पोचवणार नाही. तुम्हीसुद्धा आम्हांवर अन्याय आणि जुलूम करण्याचे बंद करा. जर अहिंसक मार्गाने केलेल्या लढ्यावर इस्रायल शासनाने हिंसक कृती केली तर जगाला त्याची नोंद घ्यावीच लागेल. इथे काही लोक हे मान्य न करता स्टॅलिन आणि हिटलरची उदाहरणे देवून अहिंसक मार्ग योग्य नसल्याचे सांगितले जाते.. त्यांचे म्हणणे काही पूर्णपणे बरोबर नाही. असे म्हणताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे स्टॅलिनच्या किंवा हिटलरच्या विरोधात अहिंसक मार्गाने लढा उभारू शकत नव्हता कारण तेथे काय घडते आहे हे जगाला सांगायला कोणीही साक्षीदार नव्हता. आज तशी परिस्थिती नाही. इंटरनेटचे जाळे सर्व जगभर पसरले आहे. कोणीही, केव्हाही आणि कधीही एकमेकांशी संपर्क साधू शकतो. तेव्हा कोणताही लढा महात्मा गांधीनी सांगितलेल्या अहिंसक मार्गाने उभारला जाऊ शकतो.

तरीसुद्धा अनेकांना बऱ्याचदा एक प्रश्न पडतो ते म्हणजे २१व्या शतकात महात्मा गांधींच्या विचारांना किंवा तत्त्वांना महत्व आहे का? याचे उत्तर होय असेच आहे. कारण आजसुद्धा या महात्माचे विचार आपल्याला समजून घ्यावेच लागतात. ‘महात्मा गांधींची विचारसृष्टी काही अलक्षित पैलू ‘ या पुस्तकात यशवंत सुमंत यांनी महात्मा गांधींच्या विचारांवर खूप छानपणे भाष्य केले आहे. ते म्हणतात, ”देव-धर्मादिकांची परिभाषा वापरून ते धर्मनिरपेक्षता शिकवतात. कर्तव्याची भाषा वापरत हक्काची जाणीव निर्माण करतात. ब्रह्मचर्याची भाषा वापरत ते निकोप स्त्री-पुरुष संबंध कसे निर्माण होतील याची चर्चा करतात. कायदा पालनाचे महत्व सांगत ते कायदेभंगाचा संघर्ष उभा करतात. वर्ण-जातीची परिभाषा वापरत जातीव्यवस्था आणि जातीभेद निर्मूलनाचा संदेश देतात. अराज्यवादाची भाषा करत तिसऱ्या जगातील समाजवास्तवात राज्यसंस्था आधुनिकीकरणाची संक्रमणकालीन संस्था कशी असू शकते हे सांगतात. याचाच अर्थ आपल्या विचारांची मांडणी करताना अशी परिभाषा वापरून त्याच्या रुढ अर्थापेक्षा अत्यंत क्रांतिकारक संदेश सामान्य लोकापर्यंत पोचवतात आणि अपेक्षित परिणाम साधतात”. हे सर्व वाचत असताना महात्मा गांधीजींचे शब्द आठवतात. गांधी सांगतात, “मी एक माणूस असल्याने माझे ‘परम सत्याचे’ किंवा कोणत्याही गोष्टींचे आकलन परिपूर्ण नाही; जीवन म्हणजे आपल्या मर्यादा, आपले पूर्वग्रह यांच्यातून सतत वर उठायचं; नेहमी इतरांच्या संपर्कात राहायचं आणि या वाटचालीत ‘सत्याकडून सत्याकडे’ मोठ होत जायचं”. असे सांगून ते सर्व मानव जातीला भयमुक्त करण्यासाठी निर्भय बनो हा संदेश देतात्त.

गांधीजी कुठलाही संघर्ष अपरिहार्य मानत नाही आणि कोणताही संघर्ष अटल आहे म्हणून प्रतीस्पर्धाकाला असुर बनविणे त्यांना मान्य नाही. कुणालाही मानवी समाजातून हद्दपार करणे ही अतिशय अमानवी कृती आहे असे त्यांना वाटते. ती सुद्धा माणसे आहेत आणि त्यांच्या सोबत संवाद साधून संघर्ष कमी करायचा असतो किंवा त्यांना संपवून टाकायचे नसते असे त्यांचे मत होते. म्हणून ते प्रत्येक मानवाला स्वतःची आणि स्वतःच्या संस्कृतीच्या मर्यादा ओळखायला सांगतात. तसे केल्यामुळे माणसाची दृष्टी व्यापक होते आणि सर्व मानव जातीचा एकमेकांशी  संवाद होऊन त्याचे रुपांतर फार मोठ्या विचार प्रक्रियेत होण्यास मदत होईल असे ते समजतात. जर मानव जातीला एखादी गोष्ट मान्य नसेल तर त्यासाठी कोठेही हिंसा करण्यापेक्षा असहकार, बहिष्कार, सविनय कायदेभंग सारखे अहिंसक मार्ग ते स्वीकारावयास सांगतात. जिथे अन्याय होत असेल तिथे माणसाने जरूर गेले पाहिजे पण त्यांचे प्रश्न हिंसेने सोडवू नये. कारण हिंसेमध्ये द्वेष असतो आणि त्यातून शाश्वत असे काही निर्माण होत नाही. फक्त असूया व आकसच मागे राहतो. म्हणून महात्मा गांधी मानवाला विवेकपूर्ण विचारविनिमय करण्यास सांगतात. यासाठीच ते सार्वजनिक व्यवहारात धर्माची भूमिका मान्य करतात पण त्यात त्यांना शासनाचा हस्तक्षेप पूर्णपणे नको होता. ते नेहमी म्हणत असत की सार्वजनिक जीवनामध्ये धर्माचे स्थान जर रास्त असले तरी शासकीय संस्थांचा धर्माशी काहीही संबंध असता कामा नये. कोणत्याही सरकारांनी धार्मिक संस्थांना किंवा धार्मिक शाळांना अनुदान देऊ नये. याचे कारण सांगताना गांधीजी म्हणतात, ” कोणताही धर्म हा परिपूर्ण असूच शकत नाही. त्यामुळे कोणत्याही धार्मिक कार्याला सरकारने दिलेला पैसा गैर मार्गासाठी वापरला जाऊ शकतो. धर्मासाठी लागणारा निधी धार्मिक लोकांनी स्वकष्टाने जमवावा म्हणजे तो योग्य पद्धतीने वापरला जाईल”.

गांधीजींचे जीवन नेहमी विकसित होणारे जीवन होते. ते काळाप्रमाणे विकसित होत असत. त्यांना आलेल्या अनुभवावरून त्यांनी आपली मूल्ये बनविली जी नेहमी मानवजातीला नेहमी उपयोगी पडतील. म्हणून महात्मा गांधी समजून घेण्यासाठी त्यांच्या मूल्यांचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. स्वतः महात्मा गांधी आपल्या मूल्यांकडे वेगळाच दृष्टीकोन घेऊन बघत होते. त्यांच्या मते माणूस कसा आहे हे त्याने आयुष्यात जपलेल्या मूल्यां वरून समजते. ते नेहमी म्हणत की त्यांच्या जीवनाचे सत्य म्हणजे ज्या मूल्यांवर ते जगतात, त्या मूल्यांकडे ते सत्य म्हणून पाहत. ते म्हणतात की जे सत्य त्यांना दिसत, त्याच सत्याकडून सत्याकडेच प्रगती करणे हीच त्यांची मूल्ये आहेत. कारण आज जे सत्य आहे ते उद्यासुद्धा असणार आहे असे ते मानत होते. जी मूल्ये त्यांनी आयुष्यभर जपली त्या मूल्यांच्या आधारे त्यांनी आपले आयुष्य उभे केले आणि जगातील सर्व मानव जातीला निर्भय बनवून अहिंसेचा नवीन मंत्र दिला जो आजही उपयोगी आहे. कारण त्यांची मूल्ये मानव जातीशी निगडित होती. त्यांनी सुद्धा मानवजातीसाठी  स्वतःच्या महात्मा होईपर्यंतच्या प्रवासात अनेकदा भूमिका बदलेल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास १९०७ च्या झुलू युद्धात त्यांनी जखमी झालेल्या सैनिकांची केलेली सेवा आणि दुसरे उदाहरण म्हणजे पहिल्या महायुद्धात त्यांनी भारतीय तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी उत्तेजन दिले होते. पुढे २० ऑक्टोबर १९४७ रोजी निर्माण झालेल्या काश्मीर प्रश्नासाठी भारतीय सैन्य काश्मीरमध्ये पाठविणे कसे गरजेचे आहे हे समजून सांगितले. याचाच अर्थ त्यांनी घेतलेल्या भूमिका या त्यावेळेच्या काळाशी सुसंगत होत्या असे म्हणावे लागेल पण तसे म्हणताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे त्यांच्या कोणत्याही भूमिका अहिंसेच्या तत्वाशी फारकत घेताना दिसत नाही. त्यांनी अहिंसेचे तत्वज्ञान सांगताना मानवाचा आत्मरक्षणाचा नैसर्गिक हक्क मान्य केला आहे. आज समाज माध्यमावर त्यांचे अहिंसेचे तत्वज्ञान सांगताना एका गालावर मार खाल्यावर दुसरा गाल पुढे करायचा असा चुकीचा समज भारतीय लोकांच्या मनावर नोंदवला जात आहे. यातून सर्व भारतीय जनतेने स्वतःला लांब ठेवले पाहिजे.

वर म्हटल्या प्रमाणे गांधीने नेहमी सत्य जाणून घेण्यासाठी सत्याचा पाठलाग केला. त्यासाठी ते प्रत्येक कामाची सत्यता पडताळून पाहत असत. सत्याचा शोध घेणे हा मानवी स्वभाव आहे असे ते मानत असत. त्यासाठी त्यांनी सत्य ही संकल्पना धर्म आणि ईश्वरी संकल्पनेपासून दूर केली होती. सुरुवातीला त्यांनी ईश्वर सत्य आहे असे सांगितले. पुढे कालांतराने सत्य हेच ईश्वर असल्याची मांडणी केली. असे करताना स्वतःचे विवेचन स्पष्टपणे मांडताना स्वतःला देवत्वाकडे नेण्याचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला. भूतकाळात काम करतांना ज्या चुका त्यांच्या हातून झाल्या त्या त्यांनी नंतरच्या काळात दुरुस्त केल्या. ज्या त्यांना दुरुस्त करता आल्या नाहीत त्या त्यांनी आपल्या जीवनचरित्रात मान्य केल्या आहेत. म्हणूनच महात्मा गांधी हे परिवर्तनशील महामानव होते. ते एक पारंपारिक राजकीय रसायन होते. समाजमनाचा पोत जाणून आवश्यक बदल ते घडवून आणू शकत होते. म्हणून महात्मा गांधी या महामानवाला समजून घेणे फार कठीण होऊन जाते. मध्यंतरी अण्णा हजारे मध्ये अनेकांनी गांधी शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तत्वांशी कालसंगत तडजोड आणि आवश्यकता असेल तेथे लवचिक राजकीय भूमिका यांची सांगड त्यांच्या आंदोलनात नव्हती आणि पुढे असेही लक्षात आले एका राजकीय पक्षाच्या प्रेरणेने ते आंदोलन अण्णा हजारेनी केले होते. याचाच अर्थ असा की गांधीजींचे जीवन अध्यात्मातून परम मोक्षाच्या अपेक्षांनी भरलेले होते. ते नेहमी म्हणत असत अशी कोणतीतरी शक्ती आहे जी माझ्या कडून सर्व कार्य करून घेत असते आणि त्या शक्तीच्या प्रेरणे मुळेच जगात अनेक महत्वाच्या गोष्टी घडत असतात. म्हणून महात्मा गांधी समजून घेणे सोपे नसते. रेमो रेलो यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रा मधून सर्व जगाला गांधी माहित झाले. नंतर अनेकांनी त्यांच्यावर संशोधन केले, त्यांच्या विचारांना वाहून घेतले अशा लोकांनासुद्धा गांधीना एका विचारांमध्ये बांधता आलेले नाही. हल्ली भारतामध्ये गांधी म्हणजे एक महाभयंकर मानव होता असा प्रचार होताना दिसत आहे. जे कोणी प्रज्ञावंत हुकुमशाह आहेत त्यांना गांधी फक्त राजकीय फायदा मिळविण्यासाठी हवा असतो. पण गांधी हुकुमशहाना रुचत तर नाहीच पण पचत सुद्धा नाही. सर्व जगासमोर गांधींचे गुण गायचे आणि भारतात त्यांच्या विचारांवर परत परत हमले करायचे हेच ते करीत असतात. हे करण्यामागे एकच कारण आहे आणि ते त्यांच्यावर हमले करणाऱ्यांना चांगले माहित आहे ते म्हणजे आज गांधींचे विचार भारतीय राजकारणात, समाजकारणात आणि लोकशाहीत इतके रुजले आहेत की आजच्या कठीण परिस्थितीतसुद्धा ते कळत नकळत परत चमकत आपल्याला निर्भय बनोचा संदेश देत असतात. त्यामुळे गांधी नावाचा brand राजकीय आणि सामाजिक गरज म्हणून सतत आपल्या बरोबर राहणार आहे आणि तो अजरामर सुद्धा असणार आहे.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

संदर्भ
१.     अवतरणार्थ –लेखक राहुल गडपाले
२.     महात्मा गांधींची विचारसृष्टी- लेखक यशवंत सुमंत
३.     लाटा लहरी-विनोद शिरसाठ
४.     Talking Politics –Bhikhu Parekh
५.     नास्तिकासोबत गांधी –लेखक गोपराजू रामचंद्र राव
६.     महात्म्याची अखेर –जगन फडणीस
७.     पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा –रावसाहेब कसबे
८.     त्याने गांधीला का मारले –अशोक कुमार पांडेय
९.     महात्मा गांधी –विचार विमर्श
१०.गांधी का मरत नाही? -चंद्रकांत वानखेडे
११.मजबुती का नाम महात्मा गांधी –चंद्रकांत झटाले

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...