Skip to main content

Book Analysis :पुस्तकाचे नाव :The Crowd: A study of popular mind-Crowd Psychology by Charles-Marie Gustave Le Bon





 

विषय:पुस्तकाचे विश्लेषण
पुस्तकाचे नाव :The Crowd: A study of popular mind-Crowd Psychology
प्रकाशनाचे नाव : Adansonia Publishing
लेखक:Charles-Marie Gustave Le Bon
शब्दांकन:योगेश गोगवेकर                                  
पत्ता: माहीम,मुंबई

नववर्षाच्या सुरुवातीला माझ्या वैयक्तिक ग्रंथाच्या संग्रहात असलेले एक जुने पुस्तक मिळाले. पाच सहा वर्षापूर्वी हे पुस्तक वाचून झाले होते. पण परत एकदा वाचायचा मोह आजच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीमुळे आवरता आला नाही. या पुस्तकाचे नाव आहे ‘The Crowd : A Study Of Popular Mind-Crowd Psychology ‘ आणि ते लिहिले आहे फ्रेंच लेखक  Charles-Marie Gustave Le Bon.  हे पुस्तक १८९५ मध्ये लिहिले होते, पण जवळजवळ १२५ वर्षानंतर सुद्धा आजच्या परिस्थितीवरच लिहिले आहे असे वाटत राहते. या पुस्तकात झुंडशाहीवर भाष्य आहे. लोक झुंडशाहीच्या प्रभावाखाली कसे येतात आणि ही झुंडशाही लोकांना एका विशिष्ट मार्गाने वागण्यास कशी प्रवृत्त करते याचे वर्णन लेखकाने सुंदरपणे मांडले आहे. कुठलीही व्यक्ती जेव्हा झुंडीच्या आधिपत्याखाली येते तेव्हा ती झुंड त्या व्यक्तीच्या भावनांचे नेतृत्व करू लागते. जेव्हा एखादी व्यक्ती भारावून जाऊन आपली बुद्धी त्या झुंडीच्या प्रभावशाली प्रभावांच्या अधीन करून टाकते तेव्हा ती स्वतःची जबाबदारी कशी गमावून बसते याचे सुंदर विश्लेषण लेखक ले बॉ यांनी केले आहे.

लेखक ले बॉ यांनी हे विविध विषयांचे व्यासंगी विद्वान होते. त्यांनी आपले पदवी शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात प्राप्त केले असले  तरी त्यांनी मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र व भौतिकशास्त्र यांचा खोलात जाऊन अभ्यास केला होता. मानववंशशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियामध्ये भरपूर प्रवास करून मानवतेचा नवीन दृष्टिकोन तयार केला. असे करतांना त्यांनी गर्दी किंवा झुंडीचा नवीन मानसशास्त्रचा दृष्टिकोन विकसित केला. ते करताना त्यांनी गर्दी किंवा झुंड म्हणजे वैयक्तिक गोष्टींची बेरीज वजाबाकी नाही असे सुचवून त्याचे मानसिक अस्तित्व कसे तयार होत जाते आणि त्याची वैशिष्टये वांशिक पद्धतीद्वारे कशी निर्धारित केली जातात याचे विश्लेषण करून एक सुंदर तत्वज्ञान या पुस्तकाद्वारे मांडले आहे. या पुस्तकात ते म्हणतात की कुठलीही व्यक्ती कोणत्याही कारणाने गर्दीत किंवा झुंडीत सामील होत नसते तर ती भावनेने सामील होत असते. म्हणून गर्दीत किंवा झुंडीत सामील झालेली व्यक्ती नेहमी अबोध पातळीवर जीवन जगत असते. अशा व्यक्तीला स्वतःचे भान नसते आणि त्यांना स्वतःची जाणीव अगदी सुप्त रुपात जाणवत असते.

Crowd  
या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत करावयाचा झाला तर तो जमाव किंवा गर्दी, झुंड असा करता येईल. या पुस्तकाचा आशय नीटपणे समजून घ्यायचा असेल तर इथे झुंड हा शब्द वापरणे इष्ट होईल. कुठल्यातरी राजकीय किंवा धार्मिक कारणाने माणसे एकत्र जमा होऊ लागली की त्या जमावाला झुंड असे म्हटले जाते. पण लेखक इथे झुंड या शब्दाची व्याख्या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून करताना वेगळ्या प्रकारे करतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही माणसे जेव्हा एका विशिष्ट प्रसंगाने एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये नेहमीपेक्षा काही वेगळ्या गुणांचा संचार निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे त्यांच्यात मानसिक एकजूट तयार होऊन त्यांचे विचार आणि आचार एकाच विशिष्ट दिशेने जाण्यास तयार होतात. इथे वैयक्तिक विचारांना महत्व नसते. त्यामुळे जमावात सामील झालेल्या माणसांच्या मनाची स्थिती अबोध झालेली असते कारण अशा व्यक्तींची आकलन करण्याची सवय जमावामुळे लुप्त होत जाते. झुंडीत त्यांच्या विचारांचा पाडाव होऊन त्या एकलक्ष्यी बनतात किंवा एकाच गोष्टीवर त्यांचे लक्ष केंद्रित झालेले असते. झुंड तयार होत असताना एकाचवेळी एकाच ठिकाणी माणसे शरीराने एकत्रित झाली पाहिजे असे काही नसून वेगवेगळ्या ठिकाणी राहूनसुद्धा झुंडीत सामील होता येते पण त्यावेळी विशिष्ट तीव्र भावनांचा प्रभाव झुंडीमध्ये असावा लागतो. एक गोष्ट मात्र नक्की की कोणत्याही मानव समुदायाला झुंड म्हणता येणार नाही कारण झुंडीमध्ये सामुदायिक गटाची मानसिक स्थिती आणि तिची वैचारिक प्रतिक्रिया फार महत्वाची असते. म्हणून मानवी समुदायात किती माणसे आली यावर झुंडीचे मानसशास्त्र ठरत नसते.

वर म्हटल्याप्रमाणे जेव्हा माणसे एका लक्षासाठी एकत्र आली म्हणजे झुंड तयार होते. या झुंडीत कुणीही सामील होऊ शकतात. त्यासाठी माणूस शिक्षित असला पाहिजे असा काही नियम नसून अशिक्षित माणूससुद्धा त्यात सामील होऊ शकतो. झुंडीत सामील झालेला एखादा माणूस जरी बुद्धिवान किंवा विद्वान असला तरी त्याच्या बुद्धिचा परिणाम झुंडीवर बिलकुल होत नसतो. एखाद्या माणसाचा विशिष्ट विषयाचा अभ्यास जरी चांगला असला तरी झुंडीमध्ये तो माणूस सामान्य ठरत असतो. याला कारण म्हणजे सामान्य माणूस आणि बुद्धिवान माणूस या दोघांचे प्रतिसाद सारखेच असतात. एकटा असताना जो मनुष्य चिकित्सक बुद्धिने विश्लेषण करतो, त्याचा लवलेशही झुंडीमध्ये शिल्लक असत नाही. म्हणून लेखक ले बॉ सांगतात की झुंडीची बौद्धिक पातळी कधीही वरच्या दर्जाची नसते. ती नेहमी खालच्या दर्जाची असते. म्हणून असे म्हणतात की जरी झुंड कोणत्याही चांगल्या कामासाठी तयार झालेली असली तरी कोणत्याही शहाण्या माणसाने झुंडीच्या कार्यक्षेत्रात किंवा संघटन व्यवस्थेत पडू नये, नाहीतर त्या माणसांचे नुकसानच होण्याची शक्यता अधिकच असते. याचे कारण सांगताना लेखक लिहितात की मानवतेवर प्राण्यांच्या संघटन व्यवस्था जशा गुंतागुंतीच्या असतात तशाच गुंतागुंतीच्या मानवी संघटन व्यवस्था सुद्धा असतात. त्यामुळे त्या व्यवस्थांमध्ये कोणतेही बदल तडकाफडकी करणे कधीही चांगले नसते कारण असे बदल उपकारक न ठरता अपकारक ठरू शकतात आणि त्यांचे परिणाम फार काळ टिकून राहण्याची शक्यता असते. अशावेळेस घाईघाईने कोणतीही सुधारणा समाजावर लादण्याचे परिणाम त्या समाजासाठी घातक ठरू शकेल. म्हणून कोणत्याही बुद्धिवान किंवा विद्वान माणसाने कुठल्याही संप्रदायाला किंवा पंथाला स्वतःला जखडून ठेवणे म्हणजे त्या पंथाची किंवा संस्थेची गुलामी स्वीकारल्या सारखेच आहे. म्हणून ज्या व्यक्तींचा वैज्ञानिक दृष्टिकोनावर किंवा सत्य शोधण्यावर विश्वास आहे त्यांनी कुठल्याही झुंडीमध्ये सामील होऊ नये कारण कोणतीही झुंड सत्य स्विकारायला तयार असत नाही.

झुंड किंवा जमाव कुठलेही सत्य स्विकारायला कधीही तयार नसते. म्हणून कायदा आणि संस्थेचा प्रभाव झुंडीवर पडत नाही. याला कारण म्हणजे झुंडी स्वतःहून कधीही विचार करीत नाही. त्यांच्यावर लादलेल्या  मतांवर ते चिकटून बसतात. त्यामुळे समान पातळीवरून झुंडीशी संवाद होऊ शकत नाही. त्यांच्याशी अधिकारवाणीने बोलावे लागते. न्याय काय आहे किंवा अन्याय कसा होतो हे झुंडीला कळत नाही म्हणून झुंडीतील अनुयायी अन्याय सुद्धा सहन करत राहतात. म्हणून झुंडीचे मानसशास्त्र सांगताना लेखक ले बॉ झुंडीची काही साम्ये सांगतात. त्यातील पहिले साम्य आहे की झुंडी आपल्या अनुयायांना चळवळीचे तत्व सांगून आत्मबलिदान करायला प्रवृत्त करतात. दुसरे साम्य म्हणजे सर्व कृती झुंडीचे अनुयायी संघटीतपणे करतात. तिसरी गोष्ट म्हणजे झुंडी आपल्या अनुयायांना माथेफिरू बनवितात. महत्वाचे साम्य म्हणजे या झुंडी सामाजिक जीवनात उलथापालथ घडवू शकतात. त्यासाठी झुंडी आपल्या अनुयायांकडून आंधळ्या व अव्यभिचारी निष्ठेची अपेक्षा करतात. आज जरी आपण जगात कुठल्याही चळवळीकडे पहिले तर झुंडीची काही साम्ये सहजपणे लक्षात येतात ती म्हणजे झुंडीच्या चळवळी कुठल्यातरी पवित्र कार्याला वाहून घेत आहेत असे भासविले जाते. मग एकाच विचारप्रणालीवर विश्वास ठेवण्याची गरज अघोरीत केली जाते. यातून हुकूमशाहीचे विकृत आकर्षण निर्माण केले जाते. याचाच अर्थ जर कोणी वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती त्या झुंडीची शत्रू होते. त्यामुळे झुंडीमध्ये सामील झालेल्या व्यक्ती संमोहन निद्रेत अडकलेल्या व्यक्तीप्रमाणे झुंडीच्या पूर्णपणे अधीन होत जातात हेच निर्विवाद सत्य आहे. म्हणुनच एखादी गोष्ट झुंडीच्या अनुयायांच्या मनात बसायला वेळ लागतो त्यापेक्षा अधिक काळ त्या गोष्टींपासून अनुयायांना दूर करण्यास लागतो. असे लेखक झुंडीचे मानसशास्त्र सांगताना लिहितात.

झुंडीचे मानसशास्त्र सांगत लेखक शिक्षणाचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे असे सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार लोकशाहीमध्ये शिक्षणाला फार महत्व आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्व फार महत्वाचे असते. त्यासाठी नागरिक शिक्षित आणि विद्वान असायला पाहिजे असे लेखक आवर्जून सांगतात. तरच तो झुंडीचे तत्वज्ञान सहजपणे स्वीकारू शकणार नाही. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे. साक्षर झालेला माणूस पदवीधर तर होईल आणि पुढे जाऊन तो त्याच्या विषयात प्राविण्यसुद्धा मिळवेल. म्हणून तो पूर्णपणे शिक्षित झाला असे म्हणता येणार नाही. त्याने शिक्षणातील एक टप्पा पूर्ण केला असे म्हणता येईल. कारण पदवीधर किंवा एखाद्या विषयात प्राविण्य मिळविताना त्याने ठराविकच किंवा त्याला अभ्यासक्रमाला असलेलीच पुस्तके किंवा पत्रके वाचलेली असतात. अवांतर वाचन त्याने केलेले नसते त्यामुळे कुठल्याही प्रश्नांवर तात्पर्य कसे काढावे याचे ज्ञान त्याच्यापाशी नसते. त्यामुळे अशा व्यक्ती केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून आपले विचार तयार करीत जातात आणि नकळत झुंडीच्या चळवळीत सामील होतात. त्यातून त्याला जसे सत्य कळत नाही तसेच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तीन गोष्टींचे महत्व सुद्धा समजत नाही. समता ही फक्त संधीची समानता असू शकते असे तो समजतो. स्वातंत्र्य म्हणजे सर्व नागरिकांच्या हक्काबद्दल जागरूक राहणे असे न समजता तो स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल जागरूक राहणे समजतो. त्यामुळे अशा व्यक्ती झुंडीमध्ये सामील होऊन लोकशाहीपेक्षा हुकुमशाही बरी असे म्हणत राहतात.

झुंडीचे तत्वज्ञान मांडताना लेखक म्हणतात की झुंडीला रूढी आणि परंपरा फार प्रिय असतात. त्यासाठी रूढी आणि परंपरा यांची व्याख्या करताना लेखक सांगतात की रूढी परंपरा म्हणजे परंपरेने चालत आलेला भावनिक व अन्य प्रकारच्या समजुती, विश्वास आणि वैचारिक समज. राष्ट्राचा स्वभाव घडविण्यामध्ये रूढी परंपरेचा मोठा वाटा असतो. चांगल्या-वाईटाच्या, पाप-पुण्याच्या गोष्टी मनुष्य त्याच्या रूढी परंपरेपासून शिकत असतो. त्यामुळे समाजाला दिशा देण्याचे काम रूढी परंपरा करीत असतात. माणसाच्या मनावर रूढी परंपरेचा पगडा जबरदस्त असतो. म्हणून झुंडी नेहमी रूढी परंपरा पूजक असतात. कधी कधी आपल्याला जाणवते की झुंडी परंपरेच्या विरोधात उभ्या राहतात पण ते केवळ अल्प काळासाठी असते. ते एकमेकाविरुद्ध उभे राहणे फक्त तकलादू प्रकारचे असते. जर समाजात परंपरेचे मूळ बदलत गेले तर त्याचे परिणाम झुंडीला आवडणार नाही असे सांगून लेखक लिहितात की झुंडी कधीही क्रांतिकारक नसतात. परंपरेतील मुलभूत बदल त्यांना पसंद पडत नाही. जुने ते सोने या तत्वावर झुंडी विश्वास ठेवतात. जर परंपरा विकासाच्या मार्गात अडसर ठरत असतील तर त्या सोडून दिल्या पाहिजे हे तत्व झुंडी मान्य करीत नाही. जर विचारपूर्वक केला जाणारा बदल होऊ शकला नाही तर प्रगती होण्यास मदत होणार नाही हे झुंडीला समजत नाही. अशा रूढी परंपरांना कुणीही विरोध केला तर झुंडी अशा व्यक्तीला एक नंबरचा शत्रू मानतात. याला कारण म्हणजे प्रत्येक जाती जमातीतील माणसांवर रूढी परंपरेचा पगडा इतका बहुमोल असतो की जर या रूढी परंपरा काढून टाकल्या तर नागरिकांच्या कल्पना शक्तीला, विचारांना वळण देतील असे आदर्श उरणार नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्य आवडेल त्या मार्गाने जाऊ लागेल आणि समाजात अंदाधुंदी माजण्याची शक्यता असते. म्हणून लेखक म्हणतात की समाजामध्ये विचारपूर्वक केल्या गेलेल्या सुधारणा हा एकमेव खात्रीचा मार्ग समाज पुढे नेण्यासाठी आहे.  

लेखक ले बॉ यांनी लिहिलेले हे पुस्तक ११५ पानी असून ते चार भागात लिहिले आहे. हे सर्व लिहिताना लेखकाने झुंडीची मानसिकता, त्याची लक्षणे, त्यांचे मनोविकार व नैतीकतेचे वागणे, झुंडीची विचार शक्ती आणि धार्मिक बैठक, झुंडीची मते, श्रद्धा, भावना आणि धारणा, झुंडीच्या भ्रामक आणि फसव्या कल्पना, झुंडीचे नेते आणि त्यांची कार्यपद्धती असे सर्व प्रकार झुंडीचे विश्लेषण करताना घेतले आहे.  या पुस्तकाचा उपयोग  सिग्मंड फ्रॉइड सारख्या मानसशास्त्रज्ञाने सुद्धा स्वतःच्या तत्वज्ञानाचा सारांश मांडताना केला आहे. या पुस्तकाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना फ्रॉईड म्हणतो की गर्दीतील व्यक्तीची स्थिती "संमोहनात्मक" असते हे खरे आहे असे सांगून तो लिहितो,” the contagion and the higher suggestibility are different kinds of change of the individual in the mass”. हे पुस्तक खूपच वाचनीय आहे, कारण या पुस्तकात असे विश्लेषण आहे की ज्या गोष्टी व्हायला नको असतात त्या गोष्टींवर लोक कसे काय विश्वास ठेऊन आपला भविष्यकाळ संकटांच्या स्वाधीन करतात. म्हणून झुंडीच्या मानसंशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे छोटे पुस्तक प्रत्येकाने जरूर वाचावे असे मला वाटते.

धन्यवाद
योगेश गोगवेकर  

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...