Skip to main content

Garrudzep -गरुडझेप



रंग लेखणीचे परिवार
आठवढा क्रमांक : २७२
विषय क्रमांक : ४
विषय: गरुडझेप
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम, मुंबई

गरुडझेप हा शब्द आपण अनेक ठिकाणी बऱ्याच वेळेला ऐकत असतो. एखाद्याने असामान्य कर्तुत्व केले तर आपण म्हणत असतो त्या व्यक्तीने गरुडझेप घेतली आहे. मग प्रश्न पडतो की एखाद्या माणसाच्या सक्षम कामाची तुलना गरुड या पक्षाबरोबर का केली जाते ? याला कारण माणसाला आपले आयुष्य हे पायाने ठेचले जाणाऱ्या गोम, गांडूळ किंवा श्वानाप्रमाणे नको असते. त्याला नेहमी आपले आयुष्य उंच झेप घेणाऱ्या गरुडासारखे असावे असेच वाटत असते. त्यामुळे इथे एक गोष्ट सतत जाणवते की माणूस कोणत्याही धर्म संस्कृती मध्ये मोठा झाला, तरी गरुड या पक्षाला प्रत्येक मानवीजातीच्या हृदयात महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक संस्कृती मध्ये या पक्षाची प्रशंसा केली जाते. याचे कारण गरुडाची शक्ती आणि सामर्थ, धैर्य व अभिमान आणि आकाशात ढगापुडे झेप घेण्याची त्याची क्षमता त्याला वर्चस्वाचे प्रतिक बनविते. म्हणून प्रत्येक धर्म संस्कृतीमध्ये गरुडाला त्याच्या भव्य स्वरूपासाठी आदर व्यक्त केला आहे. यासाठीच त्याला पक्षांचा राजा म्हटले जाते. धारदार चोच, त्याची तीक्ष्ण नजर, दुरून सुद्धा सहजपणे आपले सावज हेरण्याची क्षमता, त्याच्या पंखातील बळ आणि पायांच्या नखातली ताकद  या गोष्टी प्रत्येक माणसाच्या चेतना आणि अध्यात्मिक क्षमता जागृत करीत असते. म्हणून काही प्रांतात गरुड पाहणे हे अध्यात्मिक दृष्टीने चांगले समजतात. त्यांच्या मते गरुड पाहणे म्हणजे पुनर्जन्म, जीर्णोद्वार आणि नुतनीकरणाचे प्रतिक असू शकते. याचाच अर्थ गरुडाला सामर्थ, अभिमान आणि लवचिकतेचे प्रतिक मानले जाते.

अशा गरुडझेप घेणाऱ्यांच्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो किंवा वाचत असतो. त्यापैकी अनेक आपण शालेय इतिहासाच्या पुस्तकातून वाचलेल्यासुद्धा आहे. तरीसुद्धा अशी काही व्यक्तिमत्वे आहेत ज्यांनी आपल्या कर्तुत्वाने यशस्वी गरुडझेप घेतल्या आहेत. म्हणून त्यांचा इतिहास कितीही माहिती असला तरी आजही वाचताना तो प्रेरणादायक होत असतो. असे व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच्या इतिहासाचा शोध घेतला तर एक गोष्ट नक्कीच जाणवते ती म्हणजे त्याकाळी महाराष्ट्रातील अनेक सरदार मोगलशाहीत, आदिलशाहीत, कुतुबशाहीत किंवा निझामशाहीत चाकरी करण्यात आनंद मानत होते. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी साहस, रणकौशल्य, समाजाच्या भल्यासाठी केलेले राजकारण या गुणांच्या बळावर स्वतःचे राज्य उभे केले. १६७४ च्या जुन महिन्यात त्यांनी राज्याभिषेक करून सर्व भारतीय समाजाला गुलामगिरीतून मुक्त केले आणि आजपासून आम्ही तुमचे रक्षणकर्ते व नेते आहोत असे आश्वासन सुद्धा दिले. ज्या दिवशी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला, त्या दिवशी खऱ्या अर्थाने घटनात्मक दृष्ट्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य निर्माण होऊन त्याची घटना तयार झाली. इथे स्वतः महाराजांनी इतर कोणतेही बिरूद न घेता छत्रपती ही पदवी घेतली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श लोकनेता होते असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्यांना सर्व जाती जमातीचा नेता समजतो. त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यासाठी लढण्याची जिद्द असते. त्यासाठी ते स्वकीयांना तयार करून लढण्यासाठी पोलादी ताकद निर्माण करतात. त्यांचे नेतृत्व स्त्रियांचा व समाजातील सर्व जमातीचा आदर करायला शिकवितात. ते सर्व धर्मियांना समान स्वातंत्र्य देतात. म्हणून त्यांचे नेतृत्व लोककल्याणकारी बनते. शिवाजी राजे एक कुशल प्रशासक सुद्धा होते. त्यांनी सरंजामशाही नष्ट केली आणि वतनदारांच्या जुलमातून जनतेला सोडविले. गुणवत्तेप्रमाणे राज्यकारभारात जागा निर्माण केली. लष्करी सामर्थ तयार केले आणि प्रशासनालासुद्धा महत्व दिले. भारतीय नौदलाची स्थापना करण्याचा पहिला मान त्यांनाच दिला जातो. त्यांच्या प्रशासनाचे एकच ध्येय होते ते म्हणजे लोककल्याण राज्य. हे सर्व निर्माण करताना त्यांना अनेक प्रकारच्या संकटाना तोंड द्यावे लागले. तरी ते डगमगले नाहीत आणि गरुडपक्ष्याप्रमाणे उंच झेप घेत एक आदर्श राज्य निर्माण केले की त्यांच्या मृत्युनंतरसुद्धा सत्तावीस वर्षाच्या प्राण घेऊ प्रदीर्घ झुंजीतून शिल्लक राहिले. शिवाजी महाराजांनी पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापती नसताना प्रचंड फौजांच्या विरुद्ध सत्तावीस वर्षे अखंड झगड्याला पुरु शकली यातच त्यांच्या नेतृत्वाचे खरे यश आहे. म्हणून इथे म्हणावसे वाटते की स्वतःचे राज्य शुन्यातून निर्माण करण्यासाठी महाराजांनी घेतलेली गरुडझेप खरोखरच लक्षणीय तर आहेच पण प्रेरणादायी सुद्धा आहे.

गरुडझेप घेतलेली अशी अनेक व्यक्तिमत्व भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील इतिहासात तर जरूर आहेत, पण समकालीन भारतीय इतिहास (भारतीय स्वातंत्र्य नंतरचा) वाचताना सुद्धा अशी व्यक्तिमत्वे सुद्धा आपल्याला आढळत असतात. त्यापैकी एक  व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाणांचे आहे. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी देवराष्ट्र जिल्हा सांगली येथे सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. ते लहान असताना त्यांचे पितृछत्र हरवले. त्यांचा सांभाळ त्यांच्या आईने आणि काकांनी केला. त्यांच्या आईने त्यांना आत्मनिर्भरता आणि देशभक्ती शिकवली. त्यामुळे ते भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे आकर्षित झाले आणि १९३० सालच्या असहकार चळवळीत भाग घेऊन तुरुंगात गेले. तुरुंगात त्यांची भेट अनेक राजकीय आणि साक्षर व्यक्तींशी झाली. पुढे तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. त्यांनी १९४६ रोजी मुंबई राज्याच्या विधानसभेसाठी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ते निवडून पण आले. इथेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली असे मानले जाते. सुरुवातीला त्यांची नियुक्ती मुंबई राज्याचे गृहमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली. पुढे त्यांचे काम पाहून  त्यांना नागरी पुरवठा, समाज कल्याण आणि वन खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. या खात्यात त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री नेमण्यात आले आणि पुढे ते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री असताना त्यांनी कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून महाराष्ट्राचा विकास घडवून आणला. त्याचप्रमाणे त्यांनी सहकार चळवळ उभारून महाराष्ट्राला देशाच्या विकासात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविले म्हणून त्यांना नव महाराष्ट्राचे शिल्पकार म्हटले जाते. १९६२ ला चीन विरुद्ध लढाईत भारताचा दारूण पराभव झाल्यावर यशवंतरावांनी देशाची संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारली आणि त्या मंत्रालयात अनेक आधुनिक सुधारणा केल्या. त्यांनी सैन्याला आधुनिक उपकरणे दिली, सैनिकांना आधुनिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. चीनशी बोलून शत्रुत्व संपवण्यासाठी बोलणी केली. त्यामुळे १९६५ मध्ये पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात भारत विजयी ठरू शकला. १९६६ मध्ये गृहमंत्रालय हाती घेऊन त्यांनी पश्चिम बंगालमधील नक्सलबारी समस्या, उत्तर भारतातील विद्यार्थ्यांचे हिंस्त्र आंदोलन आणि शंकराचार्यांनी सुरू केलेल्या बीफ बंदीच्या समस्या व्यवस्थित आणि यशस्वीपणे हाताळल्या. पुढे अर्थमंत्री किंवा देशाचे उपपंतप्रधान म्हणून त्यांची कारकिर्दी वाखाण्याजोगी आहे. राजकारणा व्यतिरिक्त त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि साहित्यात अधिक रस होता. ते अनेक पुस्तके खरेदी करून वाचत आणि त्या पुस्तकांच्या लेखकांशी त्यावर चर्चा करीत असत. असे हे व्यक्तिमत्व एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्मले पण आपल्या कर्तुत्वाने त्यांनी अशी काही गरुडझेप घेऊन स्वतंत्र भारताला सशक्त आणि आधुनिक बनविण्यासाठी त्यांचे कार्य आणि उल्लेखनीय योगदान कोणत्याही भारतीय माणसाला  विसरता येणार नाही.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे समकालीन भारतात अनेक स्त्रियांनीसुद्धा गरुडझेप घेत आपले कार्य केले आहे. त्यांची कामे पाहिली की थक्क व्हायला होते. असेच एक स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय. त्यांची ओळख फक्त भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक धडाडीच्या कार्यकर्त्या एवढीच नसून त्या समाजसुधारक, परिपूर्ण राजकीय विचारवंत, महिला चळवळीतील स्वातंत्रवादी स्त्री, नाटक व साहित्याच्या समर्थक आणि हस्तकलाप्रांतातील नवीन निर्मितीसाठी तळमळीने काम करणाऱ्या जबरदस्त कलाकार पण होत्या. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वामुळे त्या प्रेरित झाल्या आणि त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून गेली. भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा पुरुषांपुराता मर्यादित न ठेवता स्त्रीवर्गास ही वाव द्यावा यासाठी महात्मा गांधीस राजी करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर विविध क्षेत्रात काम करून भारतास आधुनिक बनविण्यास त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९०३ रोजी गौडसारस्वतब्राह्मण कुटुंबात मंगळूर येथे झाला. त्यांचे बालपण कधीच सुखाचे नव्हते. त्या सात वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबियाला आर्थिक पेचप्रसंगांचा  सामना करावा लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब त्यांच्या मामाकडे राहू लागले. तिथे त्यांना वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांचा कल सामाजिक विकास कामाकडे होण्यास मदत झाली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचे पहिले लग्न झाले पण एका वर्षात त्यांच्या यजमानांचे निधन झाले. याही परिस्थितीत त्यांनी मंगळूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्या पुढील शिक्षणासाठी चेन्नईत गेल्या. तेथे शिकत असताना त्यांची ओळख हरींद्रनाथ चट्टोपाध्यायाशी झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न केले. पण लंडनमध्ये समाजशास्त्राची पदवी घेत असताना काही गोष्टींशी सामंजस्य न झाल्यामुळे हरींद्रनाथ आणि कमलादेवी यांनी मैत्रीपूर्वक वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी १९३० चा मिठाचा सत्याग्रह आणि १९४२ सालचे चाले जाव या आंदोलनात भाग घेतला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर कमलादेवीने औपचारिक राजकारणात प्रवेश करण्यास नकार दिला. स्वतःला मानवतेच्या सेवेमध्ये झोकून दिले. भारताच्या विभाजनानंतर अनेक निर्वासितांना पुनर्वसन करण्यासाठी अनेक योजना तयार केल्या. त्यांनी सहकार तत्वावर घरे बांधण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी भारतीय सहकारी संघ स्थापन केले. त्याप्रमाणे भारतीय सहकारी संघटनेने दिल्लीच्या हद्दीत औद्योगिक वसाहत तयार केली, तेथे कार्यशाळा व कारखाने उभारले. आज ते शहर फरीदाबाद ह्या नावाने ओळखले जाते. त्यांनी भारतातील सुंदर, श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण हस्तकला परिपूर्ण करण्यासाठी श्रम घेतले. त्यात त्यांनी शिल्पकला, विणकाम, कुंभारकाम व खेळणी बनविण्याची कला समजून घेतली. ह्या कलेला वाव मिळण्यासाठी किंवा त्यांच्या विक्रीला चांगले भाव मिळण्यासाठी त्यांनी Central Cottage Industries Emporium and Crafts Council of India ची स्थापना केली. त्याच प्रमाणे त्यांनी कला, संगीत, नृत्य, नाटक आणि कठपुतळी ह्यांच्या विकासासाठी अनेक संस्था उभारून फार महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत नाटक अकादमी, अखिल भारतीय हस्तशिल्प मंडळ अशा अनेक संघटना उभारल्या. त्याशिवाय त्यांनी कुशल कलाकारांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांची सुद्धा स्थापना केली. त्यांना 1955 साली पद्मभूषण आणि 1987 साली पद्मविभुषण देऊन गौरवण्यात आले. 1966 रोजी त्यांना सामुदायिक नेतृत्वासाठी Ramon Magsya पुरस्कार देण्यात आला तर हस्तकला विकसित केलेल्या योगदानाबद्दल युनेस्कोने त्यांना  युनिमा (Union International De La Marionette) असा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे चरित्र वाचताना त्यांनी घेतलेली गरुडझेप फार प्रेरणादायी वाटत राहते.


कमलादेवी चट्टोपाध्याय प्रमाणे गरुडझेप घेतलेली अजून एक स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे  गोदावरी शामराव परुळेकर. १४ ऑगस्ट १९०८ रोजी जन्मलेल्या गोदावरी गोखले या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक होत्या. पुढे त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या झाल्या. त्या उत्तम लेखिका पण होत्या. त्यांनी स्वतःच्या लेखनाचा वापर कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केला. बी.ए. एलएल.बी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी आपल्या मुलीला वैचारिक स्वातंत्र्य देऊन ते पूर्ण करण्यासाठी पाठबळही पुरवले. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या कामगार चळवळीकडे वळल्या. इथेच त्यांची ओळख शामराव परुळेकर यांच्याशी झाली आणि पुढे त्या दोघांनी लग्न केले. शामराव परुळेकरां कडून त्यांना कामगारांच्या विविध प्रश्नांची माहिती झाली. कामगार लढ्यासाठी सुद्धा ब्रिटिश सरकारने त्यांना तुरुंगात पाठविले. पुढे त्या वारली शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी जोडल्या गेल्या. या वारली शेतकऱ्यांची कोणीही दखल घेत नव्हते. त्यामुळे त्यांना या शेतकऱ्यांसाठी संघर्षाचा लढा उभारावा लागला. हा लढा उभारताना त्यांना वारली समाजातील स्त्रियांवर होणारे अत्याचार दिसले. या समाजातील स्त्रियांवर तेथील जमीनदार बलात्कार करीत असत. पितृसत्ताक दबावामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धांचा पगडा एवढा जबरदस्त होता की त्यात त्या स्त्रिया भरडल्या जात होत्या. त्यामुळे एका निष्पाप स्त्रीला भूतबाधा झाल्याचे सांगून त्यांना मारहाण करण्यात येत असे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला तेव्हा त्यांना जाणवले की आदिवासी महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार केल्याशिवाय हे काम सोपे नाही. त्यासाठी त्यांना सामाजिक आणि आर्थिक गोष्टी समजावून देवून समजा विरुद्ध लढण्याचे बळ दिले. यासाठी त्यांना खूप त्रास कसा सहन करावा लागला याचे विश्लेषण त्यांनी जेव्हा माणूस जागा होतोया आत्मचारित्रात केला आहे. हे पुस्तक फार प्रेरणायी आहे कारण ते वाचून झाल्यावर अनेक कार्यकर्ते गोदावरी ताईना मिळाले असे सांगितले जाते. कामगार असो, शेतकरी असो किंवा आदिवासी या सर्वांसाठी काम करीत असताना त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरु केली. लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांचे विचार सुधारण्यास मदत होईल म्हणून त्यांनी दहा मोफत वाचनालये सुरु केली. त्यासाठी घेतलेले परिश्रम आणि आलेल्या अडचणीला तोंड देत आपले कार्य चालू ठेवले. त्यांचे प्रयत्न कोठेही वाया गेले नाही. आज वारली समाजांच्या नावावरील सामाजिक शुद्रत्वाचा शिक्का पुसला गेला आहे. महिलांना हक्क आणि सामाजिक समानता देण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला तर ही गरुडझेप खूपच मोठी वाटते.

अशी अनेक उदाहरणे आपण गरुडझेप घेतलेल्यांची देऊ शकतो. त्यात महात्मा फुले, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राममनोहर लोहिया, ताराबाई शिंदे, हमीद दलवाई वगैरे अनेक उदाहरणे आहेत. त्यातील फक्त चार व्यक्तींचा (दोन पुरुष आणि दोन महिला) उल्लेख केला आहे. याचा अर्थ असा नाही की इतरांचे कर्तुत्व यांच्या पुढे सुमार होते. उलट त्यांनी केलेल्या कार्यांचा उल्लेख वेळोवेळी होत असतो. म्हणून शिवाजी महाराज सोडून इतर तीन व्यक्तींचा उल्लेख सहसा कुठे आढळत नाही म्हणून केला आहे. माणसांच्या उत्कृष्ट कामगिरीला नेहमी गरुडझेप म्हणतात याचे कारण गरुड हा असा पक्षी आहे की तो स्वतःची शिकार स्वतः करतो, आयते मिळालेले अन्न तो कधीच ग्रहण करीत नाही त्याचप्रमाणे अशी कर्तृत्वान माणसे स्वतःच आपले कार्य ठरवून गरुडाप्रमाणे मोठी झेप घेत असतात.  

धन्यवाद 

✍🏻 योगेश गोगवेकर


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...