Skip to main content

Vachan Sanskrutiche Mahatva-वाचन संस्कृतीचे महत्व

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : २६०
विषय क्रमांक : ४
विषय:  वाचन संस्कृतीचे महत्व
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम , मुंबई
संकेतस्थळ:

हल्ली एक गोष्ट सातत्याने बोलली जाते ती म्हणजे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. असे विधान करणारे नेहमी याचे खापर तरुण पिढीवर टाकून मोकळे होतात पण ते स्वतः किती वाचन करतात याचा तपशील मात्र देत नाही. हे खरे आहे की आजच्या तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली तर वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि त्याचा फायदा सर्व पिढीतील लोकांना खासकरून भावी पिढीला जास्त होऊन ती पिढी सक्षम आणि सुजाण होण्यास मदत होईल. वाचन संस्कृतीमध्ये केंद्रस्थानी पुस्तक वाचणे असल्यामुळे तिथे असे एक वेगळे वातावरण तयार होते की त्याचा उपयोग माणसाच्या वैयक्तिक, सामाजिक आणि शैक्षणिक यशासाठी होत जातो. कारण पुस्तक वाचणे ही बौद्धिक आणि सांस्कृतिक क्रिया असून ती मेंदूला निरोगी करून जिवंत ठेवते. त्यासाठी वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे. मग प्रश्न पडतो की वाचन संस्कृती म्हणजे काय ? वाचन संस्कृती म्हणजे ज्ञान, अनुभव, श्रद्धा, मुल्ये, वृत्ती, अर्थ, विश्वाच्या संकल्पना आणि लोकांच्या समूहाने मिळालेल्या भौतिक वस्तू आणि संपत्ती यांचा एकत्रित केलेला संच होय. वाचन संस्कृतीची सुंदर व्याख्या करताना प्राध्यापक आणि समीक्षक राजेश्वर शिंदे म्हणतात,” सुसंस्कृत, सुशिक्षित समाजात साहित्य, संगीत , ललितकला आणि वैचारिक व वैज्ञानिक शास्त्र यांविषयी विचार करून, इतरांना विचार करायला लावणारी संस्कृती म्हणजे वाचन संस्कृती होय.” त्यांच्या म्हणण्यानुसार मग ते केलेले वाचन व्यक्तिगत पातळीवरून गट पातळीवर, गट पातळीवरून समाज पातळीवर, समाज पातळीवरून सांस्कृतिक परंपरेत सामील होत असेल तर त्याला वाचन संस्कृती म्हणता येईल.   

मग इथे असा प्रश्न पडतो की वाचन संस्कृतीला आपण नेहमी वाचक समाजाशी जोडत आहोत का? हा प्रश्न पडण्याचे प्रमुख कारण असे आहे की समाजात केवळ वाचणारे आणि त्यावर बोलणारे लोक भरपूर आहेत. ते वाचन संस्कृतीच्या कक्षेत येत नाही असे नाही, ते जरूर त्या कक्षेत येतात, पण तो जास्त करून वाचक समाज असतो ज्याला इंग्रजीत Reading Class म्हणतो. असा समाज वाचन संस्कृती शिवाय असू शकतो. यावर अक्षरनामा या डिजिटल डेली फीचर्स पोर्टलचे संपादक राम जगताप म्हणतात,” जो समाज सांस्कृतिक सक्षमता, विविध विषयांवरील वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान मिळविण्यासाठी, समाजातील अनेक प्रश्नांचे आकलन करण्यासाठी, इतिहासाचे योग्य आकलन करून त्याची व्यवस्थितपणे मांडणी करण्यासाठी आणि आर्थिक यशासाठी पुस्तक वाचन करीत असेल तर तो समाज वाचन संस्कृतीत असलेला समाज म्हणून ओळखला जातो”. हे पूर्णपणे खरे आहे कारण वाचन संस्कृतीमध्ये काही लोक ज्या पुस्तकांचा खप खूप जास्त आहे किंवा जी पुस्तके जास्त प्रमाणात प्रकाशित केली जातात यांचा समावेश करतात. तसे करणे म्हणजे वाचन संस्कृतीला संकुचित वृत्तीमध्ये बांधण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे समाजात माणसे कोणत्या प्रकारची पुस्तके वाचतात, त्यांच्या वैयक्तिक संग्रहात कोणत्या प्रकारची पुस्तके आहेत यावरून त्या व्यक्तीचा दर्जा ठरवला जाऊ शकत नाही. हे खरे आहे की वाचन संस्कृतीमध्ये असलेल्या समाजात वैयक्तिक ग्रंथ संग्रहांना मानाचे स्थान जरूर आहे पण वाचकाने कोणती पुस्तके वाचली आहेत आणि त्याबद्दल त्याचे काय आकलन झाले आहे हे फार महत्वाचे असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की वाचकाने किती वाचले आहे त्यापेक्षा काय वाचले आहे हे वाचन संस्कृतीमध्ये फार महत्वाचे आहे. याचाच अर्थ एका विशिष्ट हेतूने केलेले सखोल वाचन हे वाचन संस्कृती मध्ये येते तर फावल्या वेळेत केलेले वाचन हे वाचक समाजामध्ये समाविष्ट होते.

पुस्तके वाचणे ही जागतिक स्तरावर ओळखली जाणारी बौद्धिक आणि सांस्कृतिक क्रिया आहे, जी मेंदूला निरोगी आणि जिवंत तर ठेवतेच पण वाचन संस्कृती जोपासायला मदत सुद्धा करते. परंतु दुर्देवाने आपल्या समाजात पुस्तके वाचण्याची सांस्कृतिक चळवळ जवळजवळ अस्तित्वातच असल्याचे दिसत नाही. यासाठी अनेक कारणे आहेत. त्यातील दोन प्रमुख कारणे आहेत ती म्हणजे आपल्या समाजातील गरिबी आणि दुसरी आहे आपली शिक्षण पद्धती. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये विध्यार्थी असे समजतात की चांगले मार्क मिळविण्यासाठी फक्त क्रमिक पुस्तकांचा अभ्यास मनापासून केला पाहिजे. इथे विद्यार्थी असेही सांगतात की जर क्रमिक पुस्तकांमध्ये लिहिले गेलेल्या गोष्टींपेक्षा जर वेगळे काही लिहिले तर त्यांना मार्क तर दिले जात नाही आणि कोणतेही शिक्षक त्या विद्यार्थ्यांचे कौतुकही करीत नाही. तेव्हा मात्र शिक्षकांचे मर्यादित असलेले ज्ञान जाणवत असते. अशा वेळेस विद्यार्थी अवांतर वाचन करून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करणार नाही. या गोष्टींमुळे वाचन संस्कृती आपल्या समाजात हवी तशी रुजू शकत नाही. या दयनीय अवस्थेला नुसते शिक्षकच जबाबदार नसून मुलांचे पालक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. ते आपल्या मुलांना पाठ्यपुस्तकांशिवाय इतर पुस्तके वाचण्यासाठी कोणतेही प्रोत्साहन देत नाही. अभ्यासक्रमाशिवाय इतर पुस्तके वाचणे हे मुलांच्या पालकांना वेळ फुकट घालण्यासारखे आहे असे वाटते.  कारण त्यांना फक्त त्यांच्या मुलांना व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेले उच्च गुण मिळवून देण्यात धन्यता वाटत असते. चार दशकापूर्वी म्हणजे सत्तर ऐंशीच्या दशकात पुस्तक वाचन हे मुलभूत गरजांपैकी एक असे मानले जात असे. ज्यांना पुस्तके विकत घेण्यासाठी परवडत नसायचे, त्यांना ती पुस्तके जवळ असलेल्या ग्रंथालयात मिळत असे. त्यावेळी मुलांना पुस्तकांची आवड निर्माण होण्यासाठी त्यांचे पालक त्यांना कथांची पुस्तके, साप्ताहिक, मासिके वाजविच्या दारात विकत घेऊन आणून देत असत. मला आठवते मला क्रिकेट आणि सिनेमा बद्दलची इंग्रजी मासिके वाचायला मिळत असत. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होऊन त्याचा उपयोग कला, साहित्य, इतिहास, राजकारण, तत्वज्ञान, धर्म, खेळ यांच्याकडे चिकित्सक दृष्टीने बघण्यात झाला. त्या काळात लोकांना त्यांच्याकडे असलेल्या पुस्तक संग्रहाचा अभिमान वाटत होता. आज मात्र हे सर्व बदलेले वाटते. पुस्तक संग्रही असणे म्हणजे फालतू गोष्ट आहे असे सांगणारे अनेक उच्चशिक्षित आपल्याला दिसतात. अशा लोकांचे वाचन फक्त वृत्तपत्रातील मुख्य मजकूर वाचण्या पुरता मर्यादित झालेला दिसतो. तेव्हा मात्र प्रश्न पडतो की वाचन संस्कृती आपल्याकडे टिकू शकेल का ?

वाचन संस्कृती कमी होण्याचे अजून एक कारण म्हणजे इंटरनेटचा अविष्कार. आज बरीच पुस्तके आणि मासिके इंटरनेटवर सहजपणे उपलब्ध आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारचे हानिकारक साहित्य सुद्धा उपलब्ध असू शकते. त्यामुळे तरुण पिढीला त्यातील सत्यता पूर्णपणे आकलन होणार नाही. आमच्या मित्रपरिवारातील एकाने मला एका महापुरुषाबद्दल चुकीची माहिती दिली. जेव्हा मी त्यांस सांगितले की ही माहिती चुकीची आहे तेव्हा इंटरनेट मधील एक लिंक पाठवून त्याला माहित झालेली माहिती कशी बरोबर आहे हे त्याने सांगितले. त्यासाठी हवी असलेली माहिती मिळविणे किंवा मी कोणत्या आधारावर हे सांगतो आहे याचे विश्लेषण न करता इंटरनेटवर असलेली माहिती किंवा व्हिडियो पूर्णपणे बरोबर आहे अशी त्यांची समजूत झालेली असते. त्यावेळी प्रश्न पडतो की लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती टिकवायची कशी? साधारणपणे वीस वर्षापूर्वी लोक पुस्तकांना ज्ञान देण्याचे साधन म्हणत असत. पुस्तकांमुळे शब्द्संग्रहाचा विस्तार होतो आणि एकाग्रता वाढविण्यास मदत होते त्यामुळे मानसिक उत्तेजना वाढून उत्तम लेखन होऊ शकते असे मानले जात होते. म्हणून पुस्तकांना नेहमी मित्र म्हटले जात होते. इथे सुप्रसिद्ध लेखक Richard Steel यांच्या एका वाक्याची आठवण येत आहे. ते म्हणत असत की,” Reading is to the mind what exercise to the body’. त्यावेळी वाचन प्रक्रिया ही माणसांसाठी एक आकर्षक जीवनशैली होती. आज जरी इंटरनेटसारख्या माध्यमांवर अनेक युवा वर्गांचा वावर होत असला तरी त्यातील सर्वजण त्यांनी केलेल्या वाचानांवर चिंतन मनन करत असतील असे मात्र नाही. त्यातील कितीजणांची वैचारिक प्रगती होते हा संशोधनाचा विषय आहे. सोशल मिडीयावर येणारे मजकूर त्यातील कोणतीही सत्यता न तपासता ते पुढे ढकलून मोकळे होण्यास काय मजा वाटते हे मला अजूनही समजत नाही. तरीसुद्धा इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की आजची काही तरुण मंडळी इंटरनेटवर संचार करीत महत्वाची पुस्तके शोधून काढतात आणि मग त्या पुस्तकांचा आधार घेत त्यावर प्रबंध लिहित असतात. त्यांचे बरेच लेख त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून उपलब्ध सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे या तरुण लोकांनी काही दुर्मिळ ग्रंथ सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे मला असे वाटते की अशा तरुणांचा उपयोग करून इंटरनेटच्या माध्यमातून का होईना वाचन संस्कृती जोपासली जाऊ शकते, कारण इंटरनेटचे माध्यम आता कायमस्वरूपी राहणार असून त्यात नवीन नवीन तंत्रज्ञान येत राहणार आहे. मग याचा उपयोग करून वाचन संस्कृती कशी जोपासली जाऊ शकेल याचा विचार केला पाहिजे.

वाचनातील विविधता किंवा वैविध्य हा वाचन संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. काळानुसार व वयानुसार वैचारिक वाचन वाढणे हे वाचन संस्कृतीसाठी फार जरुरीचे आहे. जर एखादी व्यक्ती बऱ्याच वेळेस एका प्रकारचे वाचन करीत असेल तर त्याचे वाचन मर्यादित स्वरूपाचे होते. त्यामुळे वाचन संस्कृतीची वाढ होऊ शकणार नाही. जेव्हा आपण वाचन संस्कृती वाढली पाहिजे म्हणतो तेव्हा आपण जे काही वाचले आहे त्यावर स्वतःचा एक दृष्टीकोन तयार झाला पाहिजे आणि त्यात नाविन्यपूर्ण विचार व्यक्त तयार होऊन चांगले साहित्य तयार झाले पाहिजे. अशा वैचारिक वाचनामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःचा वैयक्तिक विकास तर करू शकेलच; पण  एखादी गोष्ट भिन्न दृष्टीकोनातून समजून सुद्धा घेऊ शकेल आणि स्वतःची क्षितिजे विस्तृत करू शकेल. कारण वाचण्याची क्षमता ही माहितीवरील प्रक्रिया, विश्लेषण आणि आकलन क्षमतेशी जोडली गेली आहे. यालाच अमेरिकन विद्यापीठाचे प्राध्यापक Donald M Stewart विचार करण्याची प्रक्रिया म्हणतात. हे सर्व वाचन संस्कृतीमुळे शक्य होऊ शकते. याबाबतीत सुप्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार Daniel J Boorstin यांचे एक वाक्य आठवते. ते म्हणतात,”A person who does not read is only half-alive. And if the members of a society stop reading?, Then you have a half-alive society.” इथे बोर्स्टिन यांना असे म्हणायचे आहे की पुस्तके न वाचणारा माणूस हा स्व-अपंग असतो म्हणजे तो अर्धा जिवंत असतो. त्याचप्रमाणे जर समाजसुद्धा पुस्तके वाचत नसेल तर तो अर्धा जिवंत समाज आहे असे समजायला पाहिजे. आपल्याला चांगला, सुशिक्षित आणि सक्षम समाज निर्माण करायचा असेल तर वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे आणि त्यासाठी योग्य ते उपाय केले पाहिजे.

वाचन संस्कृती फार महत्वाची आहे. वाचन ही प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वोत्तम गुंतवणूक आहे तसेच प्रेरणादायी सुद्धा आहे. वाचन संस्कृती सर्जनशील आणि बुद्धिवान लोक निर्माण होण्यास मदत करते. त्यासाठी वाचन प्रक्रिया नष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न केले पाहिजे कारण देवाने आपल्याला वाचन करण्याची मोठी शक्ती दिली आहे आणि त्याचा वापर नीटपणे आपण केला पाहिजे. जेव्हा माणूस वाचनाला सुरुवात करतो आणि ते पूर्ण करतो तेव्हा त्याचे वाचन पूर्ण झाले असे म्हणतो. मग आपण जे वाचले आहे त्याचे चिंतन, मनन व आचरण करतो तेव्हा ते वाचन एका संस्कृती मध्ये जाऊन बसते. संस्कृतीला तिची स्वतःची काही मुल्ये असतात, विचारधारा असते आणि तत्व असतात. म्हणून वाचनाची जेव्हा संस्कृती होते तेव्हा तिची व्यापकता वाढते आणि बदलत्या परिस्थितीनुसार तिला काही मर्यादाही येतात. म्हणून वाचन  संस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करणे जरुरीचे आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी ग्रंथालये निर्माण होणे जरुरीचे आहे. वाचनाशी संबधित प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक किंवा खाजगी कार्यालयातील लोकांनी देणगी देऊन वाचनालये उभारण्यासाठी मदत केली पाहिजे. विद्यार्थी आणि शिक्षकांना वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अभ्यास मंडळे तयार करणे, वाचनासाठी जागा तयार करणे, पुस्तक-परीक्षण लिहिणे, नाटकाचे वाचन करणे आणि पुस्तकांचे चिकित्सक पद्धतीने विचार करून त्याचे विश्लेषण मांडणे यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे. जेव्हा आपण बसमधून किंवा ट्रेन मधून प्रवास करतो तेव्हा त्या वेळेचा उपयोग वाचन करण्यासाठी केला पाहिजे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी नवीन आलेल्या तसेच जुन्या साहित्याची पुस्तके शाळा किंवा महाविद्यालयांच्या  वाचनालयात उपलब्ध होतील अशी काळजी तेथील शिक्षकांनी घेतली पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की वाचन संस्कृती निर्माण होण्यासाठी काही पूरक घडामोडी समाजात सतत घडाव्या लागतात. त्यातील काही या संस्थात्मक पातळीवरच्या असतात. वाचन संस्कृती फुलण्यासाठी साहित्यसंमेलने, पुस्तक प्रदर्शन, लेखक वाचक मेळावे ,ग्रंथालये,अभिवाचनाचे कार्यक्रम, वाचन मंडळे, वगैरे निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाचक आणि पुस्तकांमध्ये एक अदृश्य अनुबंध तयार होईल आणि अनेक पातळ्यांवर संवाद होऊ लागेल आणि वाचन संस्कृती वाढू लागेल. इथे एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते की वाचन संस्कृतीचे भवितव्य हे समाजाच्या धारणेवर अवलंबून आहे. जेवढा समाज ज्ञानाचा मार्ग अनुसरतो, त्यासाठी प्रत्येक गोष्ट चिकित्सक पध्दतीने विश्लेषण करून एक नवीन दृष्टीकोन तयार करतो, त्या समाजात वाचन संस्कृती वाढविण्यास मदत होते.

म्हणून पुस्तक वाचन करिताना त्यामधील समृद्ध विचारांचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतच राहणार आणि त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कायमचा बदलून जाणार. याला कारण म्हणजे पुस्तक हे अनुभवांसह सकारात्मक विचार करायला लावणारे एक मोठे साधन आहे. म्हणूनच वाचन संस्कृतीचे महत्व तरुण पिढीला सांगून तिचे जतन करण्याचा प्रयत्न करूया. हा लेख लिहित असताना मला सरदार हाश्मी यांच्या कवितेतील काही ओळी आठवत होत्या. त्या थोडक्यात माझा हा लांबलेला लेख संपवत आहे. सरदार हाश्मी लिहितात,

“किताबे करती है बाते, बीते जमाने की,
दुनिया की, इन्सानों की, आज की, कल की.....,
क्या तुम नही सुनोगे, इन किताबो की बाते?
किताबें कुछ कहना चाहती है |
तुम्हारे साथ रहना चाहती है ||

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...