विषय: वाचन वेड
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम , मुंबई
माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे वेड असू शकते. वाचन वेड हे सुद्धा एक प्रकारचे व्यसन किंवा वेडच आहे. जर का हे वेड माणसाला एकदा लागले की ते कधीच सुटत नाही. आजच्या धावपळीच्या काळातसुद्धा माणूस हे वेड जपण्यासाठी तारेवरची कसरत करायला तयार होतो. अशी वाचन वेडी माणसे जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी विविध प्रकारची पुस्तके विकत घेऊन आपला वेळ वाचनात घालावीत असतात. ही माणसे दर महिन्याला सात ते आठ पुस्तके सहजपणे वाचून काढतात. अशा माणसांसाठी वाचन म्हणजे श्वास होऊ लागतो. वाचनाशिवाय त्यांना जगणे अशक्य होऊ लागते. मग अशी वाचन वेडी माणसे स्वतःच्या घरात असलेला एखाद्या कौंटुंबिक कार्यक्रमला किंवा मित्रांबरोबर बाहेर कुठेही न जाता घरात बसून नुसते पुस्तक वाचण्यात धन्यता मानतात. बऱ्याच वेळेस अशी माणसे पुस्तके विकत घेऊनच वाचत असतात. जर एखाद्या जवळच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी विचारले की ते तुमचे एखादे पुस्तक वाचायला घेऊ शकतात का? तेव्हा ते पुस्तक देताना वाचन वेड्या माणसांच्य मनात, काही अपवाद सोडून, अस्वस्थता निर्माण होत असते. याला एक कारण पण तसेच असते. ते कारण म्हणजे वाचनाची सवय लागण्यापूर्वी माणूस अंधारात असतो. वाचनामुळे त्याचा अंधार दूर होतो. प्रकाशाची अनेक दारे खुली होऊन ज्ञानाची बंधने मुक्त होत जातात. अनेक वर्षे दडून राहिलेली अनेक रहस्ये किंवा गुपिते माणसाला ज्ञात होत जातात. त्यामुळे पुस्तकाचे जग त्याच्यासाठी फार महत्वाचे होत जाते. वाचन हे त्याच्यासाठी ज्ञान देणाऱ्या गुहेची सर्वात मोठी गुरुकिल्ली असते. त्यामुळे माणसाला वाटत राहते की जर या जगात सन्मानाने जगायचे असेल तर वाचन केल्याशिवाय कुठलाही तरणोपाय नाही. म्हणून मला इथे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जॉन हर्षल यांच्या लेखातील एक परिच्छेद आठवतो. त्यात ते लिहितात, “ गजबजलेल्या संभ्रमित जीवनात तुमचा एकमेव विसावा कोण असे जर का तुम्ही मला विचारले , तर मी सांगेन, वाचन हाच माझा विरंगुळा असेल. माणसाला हाच एक विरंगुळा द्या, त्याला वाचायची सवय लावा, त्यामुळे माणसाला आयुष्यात सुख म्हणजे काय याची जाणीव होईल.” याचा अर्थ असा होतो की माणसाला वाचनाचे वेड एकदा लागले की त्याच्या मनावरचा ताण कमी होऊन तो पुस्तकांच्या सहवासात सहजपणे गुंगून जातो. पुस्तकांमुळे त्याच्या कमकुवत मनाला धीर मिळतो. निराशेच्या गत्रेत अडकलेल्या माणसाला त्याचे वाचन वेडच बाहेर काढू शकते.
माणसाला घडविण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याला लाभलेली उत्कृष्ट माणसे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाला असलेले वाचन वेड. म्हणून पुस्तकांना विशाल काळाच्या भव्य सागरातून तारुन नेणारे जहाज असे म्हटले आहे. माणसाच्या या वाचन वेडामुळेच त्याच्या विचारांची समृद्धी होऊन नवनवीन विचारांची निर्मिती होत जाते. म्हणूनच त्याच्या सृजनशक्तीला वाव मिळतो, त्याची प्रतिभाशक्ती जागृत होते आणि दुसऱ्यांचे सुख-दु:ख जाणणारे संवेदनशील मन तयार होते. या गोष्टीचा परिणाम माणसावर होऊन तो स्वतःला समर्थपणे व्यक्त करण्यास समर्थ होतो. कारण वाचनाने माणसाचे मनोरंजन होते, त्याला नवीन ज्ञान मिळते, जगाकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन त्याला मिळतो. वाचन माणसाला बहुश्रुत बनवते आणि चिंतन करण्याची क्षमता वाढविते. त्यामुळे माणसामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन तयार होण्यास मदत होते. त्यातून त्याची शोध घेण्याची प्रवृत्ती तयार होत जाते. म्हणूनच ग्रंथ वाचन हे ज्ञान मिळविण्याचे एक साधन असल्यामुळे त्याचा उपयोग माणूस त्याच्या बुद्धीच्या जीवावर योग्य पद्धतीने ग्रंथाचे चिंतन, मनन करून स्वतःच्या बुद्धीनुसार त्याचे आकलन स्वतंत्रपणे करत जातो. माणसाला निसर्गत: जी बुद्धी प्राप्त झालेली असते ती त्याच्या जीवनाची सर्वोच्य शिखरे गाठण्यासाठी पुरेशी नसते. त्याला प्रतिभाशाली बनण्यासाठी स्वतःच्या बुद्धीला अनेक अंगाने फुलविता आले पाहिजे आणि हे केवळ पुस्तक किंवा ग्रंथ वाचनामुळे होऊ शकते कारण पुस्तक किंवा ग्रंथ वाचन माणसाच्या विचारांच्या कक्षा विस्तारण्यात मदत करीत असतात. त्यामुळे ज्ञानाचा साठा वाढत जातो. मग त्या विस्कळीत साठ्याची मांडणी सुव्यवस्थित करण्यासाठी लेखन करावे लागते आणि विद्वानांच्या सहवासात राहावे लागते. तेव्हा कुठे आपल्या चिंतनाचा आशय काय आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहे याची जाणीव होऊन माणूस स्वतःची प्रतिभा मोठी करू शकतो. त्यामुळे ग्रंथाचे वाचन वेड हे फार महत्वाचे आहे. नाना प्रकारची माहिती आपल्याला ग्रंथातून मिळत असते. इथे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे सर्वच ग्रंथाचे लेखक ज्ञानी, विवेकी किंवा सत्याचा शोध घेऊन लिहिणारे असतील असे नाही. तेव्हा असे लिखाण सत्याच्या आधारे तपासून पाहिले पाहिजे. त्यासाठी चांगले निवडून स्वीकारावे लागते आणि आंधळेपणाने कोणतीही गोष्ट न स्वीकारण्याची सवय ठेवावी लागते. तरच हे वाचन वेड आपल्याला उपयोगी पडू शकेल. म्हणून माणसाने नुसते शैक्षणिक पदवीधारक होऊन चालणार नाही तर वाचन करून आपल्या प्रतिभेचे कमळ फुलविले पाहिजे. त्यासाठी त्याला वाचन वेड जोपासावे लागेल.
जेव्हा वाचन वेड एका नव्याने वाचन करणाऱ्या माणसाला लागते तेव्हा त्याला प्रश्न पडतो की काय वाचावे आणि कसे वाचावे? याला कारण जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. एका व्यक्तीला एखादे पुस्तक आवडेल तेच पुस्तक दुसऱ्या व्यक्तीला आवडेल असे नाही. तरीसुद्धा काही पुस्तके अशी असतात जी बहुसंख्य वाचकांच्या पसंतीला येतात. पण अशी पुस्तके केवळ करमणूक म्हणून उपयोगी पडतात. त्यात फक्त मनोरंजनच असते. या पुस्तकांचे वाचक ही पुस्तके कधी मन लावून किंवा बारकाईने वाचत नाही. तत्वज्ञान असलेली, वैचारिक व ऐतिहासिक संदर्भ असलेली गंभीर पुस्तके बारकाईने वाचावी लागतात तरच त्या पुस्तकातील आशय वाचकाला नीटपणे समजून घेता येईल. त्यासाठी वाचन चोखंदळपणे आणि सखोल करावे लागेल. अशी पुस्तके माणसाचे मन खेचून घेतात आणि ती पूर्ण वाचून झाल्याशिवाय वाचकांचे मन इतर कशातही गुंतून राहत नाही. सुप्रसिद्ध तत्वज्ञ फ्रान्सिस बेकन (Francis Bacon) एकदा म्हणाला होता की, “माणूस काय खातो यावर माणसाचे सामर्थ्य मुळीच अवलंबून नाही. माणूस काय पचवतो यावर त्याचे सामर्थ्य अवलंबून असते.” तसेच वाचनाचे आहे. तुम्ही काय वाचले आणि किती वाचले हे महत्वाचे नसून तुम्ही जे काही वाचले आहेत ते किती आत्मसात केले आहे हे फार महत्वाचे आहे. त्यासाठी वाचन कसे करावे हे फार महत्वाचे आहे. अमेरिकन लेखक हेनरिक व्हॅनडाईकने वाचकांचे तीन प्रकार सांगितले आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे साधासुधा वाचक, दुसरा चतुर वाचक आणि तिसरा असामान्य वाचक. साध्यासुध्या वाचकांबद्दल व्याख्या करताना व्हॅनडाईक म्हणतो की हा वाचक मिळेल ती पुस्तके वाचतो. त्याला पुस्तकांचा साहित्यिक दर्जा माहित नसतो. पण आपल्याला काय आवडते हे त्याला माहित असते . त्यामुळे समोर येईल ते पुस्तक तो कुठलीही तक्रार न करता वाचत असतो. चतुर वाचकांबद्दल सांगताना व्हॅनडाईक म्हणतो की हे वाचक ज्ञान प्राप्तीसाठी वाचत असतात. पुस्तकात काय माहिती आहे याचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. वाचन हे फार उपयोगी आहे अशी त्यांची धारणा असते. त्याचा जास्त वेळ पुस्तकांच्या दुनियेत जातो. एखादे पुस्तक वाचून झाल्यावर ते त्यापेक्षा अधिक चांगले पुस्तक कोणते आहे याचा शोध घेऊन ते पुस्तक मिळवितात आणि वाचत जातात. असामान्य वाचकांच्या बद्दल सांगताना व्हॅनडाईक म्हणतो की असा वाचक हा ज्ञानप्राप्तीसाठी, माहितीसाठी किंवा मनोरंजनासाठी वाचत नाही. या वाचकाला आपले मन व्यापक आणि विशाल करायचे असते. त्याला स्वतःचा विकास करायचा असतो आणि स्वतःच्या आनंदाला वेगळा अर्थ लावायचा असतो. म्हणूनच असे म्हटले जाते की उत्तम वाचक आपले मन सदैव जागरूक ठेवतो आणि लेखकाचा मथितार्थ योग्य रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. हे सर्व वाचन वेड असल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही.
वाचन वेड माणसाला लागण्याचे अजून एक कारण म्हणजे पुस्तकांची साथ माणसाला नेहमीच मिळत असते. माणूस प्रवासात असला किंवा आपल्या कामा निमित्ताने बाहेर गावी गेला तेव्हा पुस्तकेसुद्धा त्याच्या बरोबर प्रवास करीत असतात. त्यामुळे पुस्तके माणसांचे मित्र बनतात. जसजसा काळ पुढे जातो तसतसे आपले जवळचे जुने मित्र अधिकच जवळ तरी येतात किंवा काही कामानिमित्ताने दूर निघून जातात. पण ग्रंथ आयुष्यभर जवळच राहत असतात. ग्रंथ कितीशी जुने झाले तरी आपले मित्रच बनत असतात. यासाठीच लोकमान्य टिळक म्हणतात, “मी नरकातसुद्धा उत्तम पुस्तकांचे स्वागत करीन कारण मी पुस्तकांच्या साहाय्याने स्वर्ग निर्माण करू शकतो. पुस्तकांचे सामर्थ मी जाणतोच. जर माणसाला त्याचे व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर त्याला वाचन करावे लागेल”. असे सांगून ते पुढे म्हणतात, “जेव्हा माणूस आपली पदवी परीक्षा पास झाल्यावर ज्ञानव्यासंग सोडून देतात ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. खरे म्हणजे पदवी घेतल्यानंतर माणसांचा ज्ञानव्यासंग खऱ्या अर्थाने चालू होतो.” म्हणून ग्रंथ कधीच जुनापुराणा होत नाही आणि त्यांना वर्तमानपत्रासारखे रद्दीत टाकता येत नाही. उलटे ग्रंथ जुने झाल्यामुळे त्यांची किंमत वाढली जाते. त्यासाठी माणसाला वाचन वेड असणे जरुरीचे आहे. कारण वाचन वेडच मानवाच्या मनाची मशागत करून त्याला धारदार बनवत असतात. याबाबतीत सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलीन यांची एक गोष्ट सांगावीशी वाटते. हा माणूस निर्धनावस्थेत फिलाडेल्फियाच्या रस्त्यावरून भटकत होता. तो धड कॉलेजमध्ये सुद्धा गेला नाही. पण त्याने अनेक ग्रंथाची पारायणे केली. त्यासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण वाचनात घालवला आणि आपले मन संपन्न केले. याचे वर्णन करताना तो लिहितो, “रात्री वाचायला वाचनालयातून आणलेले पुस्तक सकाळी परत करायचे म्हणून मी सारी रात्र वाचीत बसे”. इतिहासाच्याच वाचनामुळे त्याला साम्राज्यांची भेदक पाश्वर्भूमी माहित झाली आणि आंतरराष्ट्रीय घटनांचे त्याला परिपूर्ण ज्ञान झाले. या ग्रंथ वाचनामुळेच त्याने एक चतुरस्त्र हजरजबाबी आणि संभाषणचतुर व्यक्ती म्हणून त्याने लौकिक मिळवला. म्हणून तो अखेर पर्यंत म्हणत असे ,” No man can be truly educated, successful in life unless he is a reader of books”. याचा अर्थ ग्रंथ हेच आपले खरे गुरु असतात. कारण एखादा ग्रंथ रस्तावर जॉन मॅसफिल्ड नावाचा हमाल वाचनामुळे इंग्लिश भाषेतील मोठा कवी बनू lशकतो तर सुताराचा मुलगा म्हणजे अब्राहीम लिंकन ग्रंथ वाचनाने अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो. याचाच अर्थ ग्रंथ आपल्याला त्याची उपयुक्तता जाणून देण्यासाठी त्यातील तात्विक विचार कलात्मक पद्धतीने माणसांपर्यंत पोचवत असतो. त्यासाठी प्रत्येकाला वाचनाचे वेड असावे लागेल.
वाचन वेड जोपासल्यामुळे माणूस नुसता सुसंकृत होत नसतो तर त्याच्यातील गुप्त ईर्षा जागृत होते. काहीतरी करून दाखविण्यासाठी त्याची धडपड सुरु होते. त्याचे व्यक्तिमत्व बंडखोर होत जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे धर्मानंद कोसंबी. आधुनिक भारतात त्यांनी बौद्ध धर्माचा पाया कसा घातला याचे वर्णन त्यांनी निवेदन नावाच्या आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. कोसंबी हे मूळचे गोव्याचे. त्यांना मराठी शिवाय कोणतीही भाषा येत नव्हती. बुद्धाच्या शोधासाठी त्यांनी घर सोडले आणि जगभर प्रवास केला. पुढे त्यांनी इंग्रजी, रशियन, संस्कृत आणि पाली भाष्यांचा अभ्यास करून प्रभुत्व मिळविले. हे सर्व त्यांनी केवळ वाचनामुळे साध्य केले. ते लिहितात त्यांच्या या वाचन प्रवासात त्यांना तुकारामाची गाथा मिळाली. त्यांनी ती वाचून काढली आणि तुकाराम महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला. त्यांचे अनेक अभंग वाचून पाठ केले. यावर लिहिताना ते म्हणतात की मी हे सर्व वाचनाच्या जीवावर केले, म्हणून ग्रंथांचे हे ऋण कधीही न फिटणारे आहे. म्हणून सुप्रसिद्ध तत्वज्ञ फ्रान्सिस बेकन म्हणतो, “ मी माणसांपेक्षा ग्रंथाचा अधिक अभ्यास करतो. कारण ग्रंथ हेच माणसांचे खरे मित्र आहेत. माणसांशी ते नेहमी प्रामाणिक राहतात आणि त्यांची सोबत अखंड असते. म्हणून सर्व थोर माणसांच्या जीवनात ग्रंथांनी फार मोठे उपकार केले आहेत. मग ते महात्मा गांधी असोत किंवा जवाहरलाल नेहरू, महादेव गोविंद रानडे असोत अथवा डॉ बाबासाहेब आंबेडकर असोत. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी वाचना विषयी सांगताना म्हटले आहे की त्यांना थोरोचा थिअरी ऑफ डिसओबिडीयन्स नावाचा ग्रंथ मिळाला आणि त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले तर महात्मा गांधीनी कबुल केले आहे की रस्किनच्या ‘अन टू दी लास्ट’ या पुस्तकाचा त्यांच्या जीवनावर फार मोठा परिणाम झाला. याचाच अर्थ असा होतो की ग्रंथात लेखकाचे उत्कृष्ट अनुभव व विचार असतात. त्यांची पुस्तके वाचून त्यांचे विचार जाणून घेऊ शकतो आणि आपल्या बुद्धीला चांगले खाद्य देऊन मनाची चांगली मशागत करू शकतो. शेक्सपियर, टॉलस्टॉय, डिकन्स, डोस्टोव्हस्की, हेमिंग्वे, रसेल , विल दुरांत, हार्डी , चेकॉव्ह, ह्युगो, शॉ, इस्बेन , ज्ञानेश्वर , एकनाथ , तुकाराम, हरी नारायण आपटे, शरदबाबू, प्रेमचंद, टागोर , केशवसुत, गडकरी , खाडिलकर, अत्रे, शिरवाडकर, कुरुंदकर यांच्या सारखे अनेक लेखक व कवी त्यांच्या लिखाणातून आमच्या पर्यत पोहचू शकतात. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत असत की वाचाल तर वाचाल. पण त्यासाठी माणसाला वाचन वेड जपावे लागेल.
वाचनाचा छंद असलेली माणसे इतरांना त्रासदायक न होता मार्गदर्शक ठरतात. कित्येक चरित्र ग्रंथ अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतात तर ऐतिहासिक ग्रंथ भूतकाळात शिरून आपल्याला भौगोलिक विश्वाची माहिती करून देतात. त्याचप्रमाणे चांगले काव्य आणि सुंदर ललित लेख आपली रसिकता जिवंत ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच असे म्हणतात की ग्रंथ वाचनामुळे माणसे घडली जातात, संस्कृतीची जडणघडण होते आणि जीवनामध्ये नवीन दृष्टीकोन निर्माण होऊन राष्ट्र उभारणीस मदत होते. यासाठी वाचनाची सवय विकसित करावी लागेल. आपण जेवढे वाचन करू तेवढा आपल्या ज्ञानात भर पडेल आणि भाषेचे सौंदर्य व शब्द कौशल्ये समजून घेण्यास मदत होईल. त्यासाठी वाचन वेड जरुरीचे आहे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment