Skip to main content

Adhunik Bharat आधुनिक भारत

 

रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक:२५७

विषय क्रमांक:४

विषय:आधुनिक भारत (लेख)

शब्दांकन:योगेश गोगवेकर

पत्ता :माहीम,मुंबई

 १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारतीय उपखंडाचा एक राष्ट्र म्हणून उदय झाला. मग प्रश्न पडतो की या राष्ट्राची ओळख आधुनिक भारत म्हणून केव्हापासून झाली. सुप्रसिद्ध गांधीवादी नेते आणि लेखक शंकर दत्तात्रय जावडेकर आपल्या आधुनिक भारत या ग्रंथात लिहितात,” इ. स. १८१८ मध्ये पेशवाईचा अंत होऊन ब्रिटीश सत्ता भारतात सार्वभौम बनली. त्याच सुमारास बंगालमध्ये आधुनिक भारताचा जन्म झाला”. असे सांगून ते पुढे लिहितात, ”राजा राममोहन रॉय  हे पहिले आधुनिक भारतीय होय.वास्तविक आधुनिक युगाची सुरुवात युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात झाली असे म्हटले जाते. हा काळ बहुधा इ.स. १३ वे शतक ते इ.स. १६ वे शतकामधील काळ असावा. कारण या काळात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्मसुधारणेची चळवळ या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणून या काळाला प्रबोधन युग असेही म्हटले जाते. या प्रबोधनात प्राचीन परंपरा नव्याने मांडून सर्वांगीण प्रगतीला चालना कशी मिळेल हे पहिले गेले. असे म्हणतात की मध्ययुगीन काळात युरोपियन देशात धर्माचा पगडा जबरदस्त होता. पण तेराव्या शतकापासून तिथे प्रबोधनाची चळवळ सुरु होऊन अनेक बदल होऊ लागले. याची सुरुवात जरी इटली या देशामधून झाली असली तरी ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांनी स्वतःची जी सर्वांगीण सुधारणा व प्रगती केली, त्यामुळे अठराव्या शतकाच्या प्रारंभी ही दोन्ही राष्ट्रे युरोप खंडामध्ये आघाडीवर जाऊन पोहचली. याकाळात कला, खेळ, स्थापत्य, संगीत, विज्ञान आणि तत्वज्ञान नवी निर्मिती होऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्यापाऱ्याची निर्मिती होण्यास मदत झाली. त्यामुळे युरोपमधील अनेक शहरे विकसित होत गेली.

धर्माच्या पगड्यातून युरोपियन राष्ट्रे आधुनिकतेकडे जाण्यास दोन महत्वाच्या घटना कारणीभूत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्या दोन महत्वाच्या घटना आहेत ब्रिटनमध्ये झालेली औद्योगिक क्रांती आणि फ्रान्समधील राज्यक्रांती. या दोन घटनेमुळे जुने जग ढवळून निघाले आणि युरोपचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून गेला. त्यामुळे जमीनदारी, सरंजामशाही आणि हुकुमशाही नष्ट होऊन लोकशाहीची निर्मिती झाली. त्यातूनच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे एक युग अस्तित्वात आले. याचाच अर्थ असा आहे की आधुनिकता नेहमी आपल्याला मानवतावादाकडे घेऊन जात असते. आधुनिक जगामध्ये जेव्हा प्रबोधन घडत गेले तेव्हा माणसांचा माणसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आणि माणसाला बरे-वाईट, योग्य-अयोग्य याची जाणीव होऊ लागली. त्याला स्वतःकडे विवेकबुद्धी असल्याची जाणीव झाली आणि स्वतःकडे असलेल्या भावनांच्या आणि इच्छाशक्तिच्या जीवावर तो सर्व विचारांचा केंद्रबिंदू सुद्धा बनला. त्यामुळे तत्वज्ञान , साहित्य, स्थापत्य , संगीत, चित्रकला, शिल्प, वगैरे अशा कलाकृती निर्माण होऊ लागल्या. त्यात सामान्य माणसांना त्यांच्या भावनांचा आणि सुखदुःखाच्या गोष्टी व्यवस्थितपणे मांडता येऊ लागल्या. या नवीन विचारांमुळे किंवा ज्ञानामुळे परंपरेने चालून आलेले ज्ञान,अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा यांना आव्हान दिले जाऊ लागले आणि ज्ञानाच्या निर्मितीसाठी माणूस स्वतःच्या बुद्धीचा जाणीवपूर्वक उपयोग करू लागला. निरीक्षणशक्ती आणि प्रयोगाच्या आधारे अनेक वैज्ञानिक निसर्गातील अनेक गूढ गोष्टींचे उकल करू लागले. पदार्थ विज्ञान ,रसायनशास्त्र, जीवशास्त्र व खगोलशास्त्र यामुळे अनेक ज्ञानाच्या शाखा विकसित झाल्या आणि धर्मशास्त्राला आव्हान मिळून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय ती स्वीकारायची नाही असा सिद्धांत नव्याने मांडण्यात आला.

या आधुनिकतेमुळे युरोपियन लोकांचा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका खंडाशी व्यापार सुरु झाला आणि त्यात त्यांची भरभराट होऊ लागली. इंग्लंड, स्पेन, फ्रेंच, पोर्तुगाल, हॉलंड सारखी राष्ट्रे यात आघाडीवर होती आणि आर्थिक धोरणाला ते व्यापारवाद म्हणू लागले. यात इंग्लंड हे राष्ट्र अग्रसेर होते. ते व्यापारातून मिळालेला नफा दुसऱ्या उद्योगात घालून व्यापारासाठी भांडवल उभारू लागले. त्यातूनच व्यापारी कंपनीची निर्मिती होऊ लागली. १८ व्या शतकाच्या मध्यकाळात हे इंग्रज व्यापारी भारतात आले आणि १७५७ मध्ये झालेल्या प्लासीच्या लढाईत विजय मिळवून त्यांनी आपले पाय भारताच्या बंगाल प्रांतात ठेवले आणि भारतासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. त्यामुळे हे अठरावे शतक भारताच्या दृष्टीने फार महत्वाचे ठरले. कारण इथूनच पुढे भारतीयांची आपापसातील लढाई संपून भारतीय उपखंडाची एक राष्ट्र म्हणून निर्मिती झाली आणि भारताच्या इतिहासाला एक नवीन वळण मिळाले. जरी अनेक इतिहासकारांमध्ये इतिहासाबद्दल मतभेद असले तरी त्या सर्वांचे आधुनिक भारताच्या कालखंडाच्या उदयाबद्दल एकच मत आहे ते म्हणजे १८ व्या शतकात इ.स.१७५७  सुमारास स्थापन झालेली ब्रिटीश सत्ता. त्यामुळे आधुनिक भारताचा कालखंड नेहमी चार भागात करावा लागतो कारण याच कालखंडात भारतात प्रबोधन, धार्मिक सुधारणा, भौगोलिक शोध आणि विज्ञानाची ओळख याची पार्श्वभूमी तयार होत एका नव्या क्रांतीची पावले उमटू लागली. त्यामुळे आधुनिक भारताचा विचार करण्यासाठी आपल्याला आधुनिक भारताची विभागणी खाली दिलेल्या चार भागात म्हणजे चार कालखंडात करावी लागेल. पहिला कालखंड हा ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा कालखंड म्हणजे १७५७ ते १८५८. १८५८ ते १८८५ हा दुसरा कालखंड ज्यात भारतीय राष्ट्रवादाचा उदय झाला. तिसरा कालखंड हा १८८५ पासून ते १९४७ पर्यंतचा आहे की ज्यात भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि शेवटचा कालखंड म्हणजे १९४७ ते १९६४ पर्यंतचा ज्यात नेहरू युगाचा काळ येईल.   

पहिल्या कालखंडात म्हणजे १७५७ ते १८५७ पर्यंतच्या काळापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचा  भारतातील प्रवासाचा होतो. त्यात त्यांनी व्यापार करण्यासाठी अस्थिर राजकीय व्यवस्था कामाची नव्हती म्हणून त्यांनी आपला कारभार करण्यासाठी लष्करी सामर्थ्याचा उपयोग केला. प्लासीच्या लढाईत ब्रिटीश सत्तेला बंगाल मध्ये स्थान मिळाले तर बक्सारच्या लढाईत विजय मिळाल्यामुळे त्यांना उत्तर प्रदेश सारख्या सुपीक प्रदेशावर सत्ता प्रस्थापित करता आली. यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आणि पुढे १८१८ मध्ये पेशवाईचा पराभव करून महाराष्ट्र आणि १८४७ रोजी राजा रणजित सिंगचा पराभव करून पंजाब ही दोन राज्ये ब्रिटिश राज्यात सामील झाली. मग संपूर्ण भारतावर ब्रिटिशांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले. या दरम्यान अनेक प्रकारच्या सुधारणा ब्रिटीश सत्तेने करायला सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने चांगले प्रशासन, न्यायव्यवस्थेमध्ये केलेली सुधारणा, महसूल प्रशासनातील कायमधारा पद्धत आणि त्याचे आधुनिकीकरण, रेल्वे, टेलिग्राफ, रस्ते, कालवे, बंदरे अशा पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी शिक्षणामध्ये सुद्धा सुधारणा करून भारतीयांना नवीन वैज्ञानिक दृष्टी दिली. जरी हे आधुनिकीकरण वसाहतवादाने प्रेरित असले तरी त्याचा फायदा सर्व भारतीयांना मिळत होता. याच कालखंडात राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांच्या सारखे सुधारक निर्माण झाले. राजाराममोहन रॉय यांनी सतीसारखी अमानुष भारतीय पद्धत बंद करण्यास पुढाकार घेतला तर महात्मा फुले यांनी सर्व जातींना आणि स्त्रियांना शिक्षण देण्याचे प्रयत्न केले. दुसरा कालखंड हा १८५७ ते १८८५ पर्यंतचा आहे. त्यात १८५७ चा उठाव प्रामुख्याने येतो. या उठावाला काही लोकांनी भारतीय शिपायांचे बंड म्हटले तर काही लोकांनी पहिले स्वातंत्र्याचे युद्ध असे म्हटले आहे. हे होण्याची मुख्य कारणे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी स्वरुपाची आहेत. या उठावामुळे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि सत्ता ब्रिटीश संसदेच्या हाती गेली. याच काळात इंग्रजी शिक्षण मिळाल्यामुळे अनेक भारतातील राष्ट्रीय नेत्यांना पश्चिमेचा इतिहास, तिकडचे प्रशासन, विज्ञान या  सारख्या गोष्टी समजू लागल्या. त्यात १८८५ रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेमुळे सर्व भारतीयांना आपली विवंचना मांडण्यासाठी एक चांगले माध्यम उपलब्ध झाले.

आधुनिक भारताचा तिसरा कालखंड फार महत्वाचा आहे. हा कालखंड २८ डिसेंबर १८८५ पासून सुरु होतो आणि १५ ऑगस्ट १९४७ ला संपतो. या काळात भारताला मध्य युगामधून आधुनिकतेकडे नेणारी प्रबोधनाची व्यापक चळवळ उभी राहिली. ही चळवळ प्रत्येक क्षेत्रात म्हणजे सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक अशा महत्वाच्या क्षेत्रात सुरु झाली. देशाची प्रगती साधण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनीष्ट प्रवृत्ती कशा दूर करता येतील याचा विचार प्रामुख्याने करण्यात आला. भारतीय समाजातील कर्मकांडे, रुढीप्रीयता, अंधश्रद्धा, जातीभेद, उच्चनीचता दूर करण्याचे प्रयत्न सुरु झाले. चौकस व चिकित्सक पद्धतीने विचार करण्याची पद्धत सुरु झाली. त्यामुळे भारतीय समाज पूर्णपणे आधुनिक कसा बनेल यासाठी प्रबोधन होऊ लागले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वेलोकहितवादी गोपाल हरी देशमुख, वीरेशलिंगम पंतलु, स्वामी विवेकानंद, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, महादेव गोविंद रानडे, शाहू महाराज, गोपाल गणेश आगरकर , विठ्ठल रामजी शिंदे, कमला देवी चट्टोपाध्याय यांनी सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान देऊन भारताला रुढीपरंपरेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. राजकीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या रूपाने स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, खुदीराम बोस सारखी व्यक्तिमत्वे निर्माण झाली. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक, गोपाल कृष्ण गोखले, लाला लजपत राय, बकिंचंद्र पाल, नेताजी सुभाष चंद्र बोस, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, राजगोपालाचारी, मौलाना आझाद  सारख्यांनी भारतात नवीन राजकीय क्रांतीचा पाया रचला. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता सारख्यांनी भारतीय आर्थिक व्यवस्थेचा पुरस्कार केला. यामध्ये अशा दोन व्यक्ती आहेत की ज्यांनी भारताला एकत्र तर आणलेच पण प्रत्येक क्षेत्रात नवीन चैतन्य निर्माण केले आणि विचारांचा वारसा तयार केला. या दोन्ही व्यक्तींनी संसदीय लोकशाहीची गरज ओळखून भारताला निर्भय तर बनवलेच पण एका वेगळ्या पद्धतीने आधुनिकतेकडे घेऊन गेले. या दोघांनी जातीभेद नष्ट करणाचे काम तर केलेच पण आर्थिक दृष्टया दलित वर्ग सुधारेल याकडे सुद्धा लक्ष दिले. यांनी भारतीय स्वातंत्र्याचा लढा चालू असतानाच अनेक संस्था ज्या लोकशाहीसाठी गरजेच्या आहेत त्याकडे लक्ष दिले आणि त्या उभारल्या सुद्धा. या दोन व्यक्ती आहेत महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे भारतात राष्ट्रीय एकतेचे बीजारोपण झाले. भारताला मध्यवर्ती बँकेची हवी असलेले गरज ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी RBI ( Reserve Bank of India ) ची स्थापना करण्यासाठी जोरदार प्रयत्न १९३५ साली केली. याच काळात शिक्षण आणि वृत्तपत्रे वाढू लागली. त्यामुळे ऐक्याची भावना, देशप्रेम, सांस्कृतिक परंपरेचा अभिमान वाढत जाऊन राष्ट्रवादाची जाणीव वाढू लागली. हा राष्ट्रवाद केवळ राजकीय तत्वज्ञानाशी जोडला नव्हता तर त्याने आर्थिक शोषणाविरुद्ध सुद्धा जागृतीचा अविष्कार होता. या सर्वाचांचा परिणाम होऊन अखेर आधुनिक भारत स्वतंत्र झाला. 

आधुनिक भारताचा चौथा कालखंड म्हणजे नेहरू युगाचा कालखंड. हा कालावधी १५ ऑगस्ट १९४७ पासून सुरु होतो आणि संपतो नेहरूंच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजे २७ मे १९६४ रोजी. भारत स्वतंत्र झाला खरा पण भारत एक संघ न राहता भारत आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. १५ ऑगस्ट १९४७ ला भारतासमोर अनेक आव्हाने उभी होती. त्यामध्ये संविधानाची निर्मिती, संस्थानांचे विलीनीकरण, निर्वासितांचे प्रश्न इत्यादी एक आव्हान म्हणून उभे होते. पंडित जवाहरलाल नेहरूं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे प्रश्न इतके छानपणे हाताळले आणि भारताला आधुनिकतेकडे घेऊन गेले. संस्थानांचे विलीनीकरण भारतीय संघात सामील करून सरदार वल्लभभाई पटेलांनी महत्वाचे कार्य पार पाडले. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी भारतीय संविधानाची निर्मिती करून भारत एक आधुनिक राष्ट्र आहे यावर शिक्का मारला. निर्वासितांचा प्रश्न सोडविताना पंडित नेहरूंनी वेगवेगळ्या घटक राज्यांची मदत घेऊन हा प्रश्न कायमचा निकालात लावला. संविधानाच्या मार्फत स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांचा वापर करून सर्व क्षेत्रात एकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. स्वतंत्र न्यायपालिका, एकेरी नागरीकत्व, संघात्मक राज्यव्यवस्था, प्रौढ मताधिकार, धर्मनिरपेक्षता, संसदीय लोकशाही, मुलभूत अधिकार, मागास जातीला संरक्षण निर्माण करून भारताला आधुनिकतेकडे जाण्यास मदत केली. याच दरम्यान भारताने गोवा, दिव, दमण सारखी राज्ये भारतीय संघ राज्यात सामील करून घेतली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी महत्वाचे निर्णय घेऊन त्यांनी मोठमोठे उद्योगधंदे उभारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व लोकांना समजून सांगितले. त्यासाठी त्यांनी IIM,  IIT, Scientific research center , ISRO सारख्या संस्थांची निर्मिती केली. इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे यंत्र वाढविणारा दृष्टीकोन नव्हे. वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भाव तपासणे असा होतो. याचाच अर्थ असा होतो की माणसांच्या गरजा सुसंगत कसे करता येईल याचा विचार करणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन. भारतात विज्ञानाची निर्मिती होण्यासाठी त्यांनी विक्रम साराभाई, स्वामिनाथन , प्रशांत महाबोलोनीस, डॉ. होमी भाभा , डॉ. सतीश धवन सारख्या वैज्ञानिकांना जवळ केले. तसेच नेहरूनी अंतर्गत आणि परराष्ट्र धोरण व्यवस्थितपणे राबविले. पंचवार्षिक योजना राबवून त्यांनी सामाजिक,आर्थिक औद्योगिक क्षेत्रात मोठी प्रगती गाठली. अशा अनेक गोष्टींमुळे भारत या कालखंडात एक आधुनिक राष्ट्र म्हणून उभे राहिले.

अनियंत्रित परकीय राजसत्तेतून स्वकीय लोकसत्तेत आधुनिक भारताचा प्रवेश झालेला आहे असे आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर यांनी आपल्या आधुनिक भारत या ग्रंथात म्हटले आहे. ते पुढे लिहितात की आधुनिक जगातील इतर राष्ट्रांच्या वर्तमान काळातील इतिहासापासून आपल्या कार्याला स्फूर्ती घेणारे आधुनिक भारताचे समाजवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महत्वाचे नेते महात्मा गांधी यांनी एक नवीन मानवतावादी दृष्टीकोन देवून भारताला  आधुनिक राष्ट्र बनविले. याचीच प्रेरणा घेवून हमीद दलवाई सारखा क्रांतिकारक व  समाज सुधारक मुस्लिम समाजात निर्माण झाला, हीच भारत आधुनिकतेकडे गेल्याची महत्वाची पावती आहे. म्हणून वर म्हटल्या प्रमाणे आधुनिकता नेहमी मानवतावादाकडे झुकत असते. त्यासाठी मानवाची प्रगती नेहमी आधुनिकतेमुळे होते. जुन्या संकुचित विचारांना तिलांजली देवून भारत परत एकदा नव्याने आधुनिक बनवूया .

 धन्यवाद

 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...