Skip to main content

Jivlaga जिवलगा

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : २५४
विषय क्रमांक : ३
विषय : जिवलगा
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम , मुंबई

१९७१ साली ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या आनंद या चित्रपटात राजेश खन्ना संवाद म्हणत असताना एक वाक्य म्हणतो, “देखो बाबूमोशाय, हर एक बॉडी एक ट्रांसमीटर है और एक रिसीवर। बस उसकी बॉडी में से एक वायब्रेशन निकली और मैंने पकड़ ली, बस दोस्ती हो गई।“. या संवादाचा अर्थ असा आहे की एकत्रित आलेल्या व्यक्तींचे ऋणानुबंध जुळून येतात आणि काळाच्या ओघात ते जिवलग मित्र बनतात. मैत्री बाबतचा इतका सुंदर संवाद मला इतर कोणत्याही चित्रपटात ऐकायला मिळाला नाही. या संवादात कुठेही जिवलगा हा शब्द आला नसला तरी दोन माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांचे भावनिक संबंध मजबूत असतात. यामध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवतात किंवा एकमेकांवर विसंबून राहू शकतात अथवा अशा व्यक्ती एकमेकांशी स्वतःची रहस्येसुद्धा शेअर करतात. याचाच अर्थ असा आहे की दोन व्यक्तींमध्ये संयोगाने झालेली भेट पुढे एकामेकांचे स्वभाव, विचार आणि आवडींच्या समानतामुळे आपोआपच जिवलग मित्र होऊन जातात. म्हणून जिवलगा या शब्दाचा अर्थ समजून घेताना म्हणावे लागेल की जिवलगा म्हणजे जिव्हाळ्याची, आवडती किंवा प्रिय व्यक्ती जी जिवाभावाचा मित्र बनून माणसाच्या प्रत्येक सुख दु:खाच्या प्रसंगी समरस होऊन मदत करेल.

मग इथे एक प्रश्न पडतो की ज्या मित्राला आपण जिवलगा म्हणतो तो कशा अर्थाने चांगला किंवा खरोखरच जिव्हाळ्याचा आहे. त्यासाठी आपल्याला आपत्कालीन परिस्थितीचा विचार करावा लागेल. असा विचार करताना आपल्याला असे जाणवेल की जेव्हा माणसाला कुठल्यातरी अडचणीचा सामना करावा लागतो तेव्हा त्या माणसाचा जिवलगा त्याला सोप्या भाषेत उपाय सांगून अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करतो. जेव्हा एखादी चूक माणसाकडून घडते, तेव्हा त्याचा जिवलगा त्याची चूक समजून घेऊन त्या व्यक्तीस मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे माणूस त्याच्या आयुष्यात चांगले काम करून यशस्वी झाला की त्याचा जिवलगा त्याचे अभिनंदन तर करतोच पण त्यास एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी दरवेळेस प्रोत्साहनसुद्धा देत असतो. म्हणूनच जिवलग झालेली मैत्री प्रत्येक माणसाच्या जीवनात मोठी मदत करू शकते. हे खरे आहे की माणसे त्यांच्या आयुष्यात विविध लोकांशी संपर्कात येत असतात. त्यात समान दृष्टीकोन आणि अभिरुची असलेली माणसे एकत्र येऊन एकमेकांच्या सहवासात जास्त वेळ घालवू लागतात. हळूहळू, त्यांच्यात एक प्रकारचे बंधन उदयास येऊ लागते आणि मग त्यांची मैत्री आयुष्यभर टिकून राहते. मग ही जिवलग झालेली माणसे आपल्या कुटुंबाचा एक भाग बनतात.

देवाने या पृथ्वीवर सर्वात मौल्यवान गोष्ट निर्माण केली ती म्हणजे मैत्री. जर माणसाला त्याच्यावर विश्वास ठेवणारा , त्याला मदत करणारा मित्र सोबत म्हणून मिळाला तर त्यासारखे सुख दुसरे काहीच नाही. कारण मित्राच्या भक्ती आणि प्रामाणिकपणाशी इतर कुणीही जुळवू शकत नाही. मित्र हा माणसाच्या आयुष्यातील नुसती महत्वाची आणि जवळची व्यक्ती नसून त्याच्या सारखा दुसरा अमूल्य ठेवा माणसाच्या जीवनात दुसरा कुणीही नाही. म्हणून माणूस स्वतःच्या आयुष्यातील महत्वाचे पैलू आपल्या मित्राकडे नेहमी शेअर करीत असतो. असे म्हणतात की सर्वोत्कृष्ट मित्र एकमेकांचे आधार होतात आणि जिवलग होऊन जातात. जसजशी माणसे मोठी होत जातात तसतसे त्यांचे जिवलग अधिक जवळ येऊ लागतात कारण त्यांच्या गतआयुष्याच्या चांगल्या आठवणींशी ते बांधले गेलेले असतात. त्यासाठी एकत्र प्रवास करणे किंवा सहलीला जाणे अथवा जेवणासाठी एकत्र येणे फार महत्वाचे आहे. असे एकत्र येणे प्रत्येक माणसाला आपल्या जिवलग मित्राच्या जीवनाशी कसे जागरूक आहोत याची जाणीव करून देते. याचाच अर्थ असा आहे की आपण ज्याला जिवलगा म्हणतो ती अशी व्यक्ती असते जिच्यासोबत प्रत्येक माणूस बंध आणि परस्पर समाज सामायिक करत असतात. एखाद्या व्यक्तीला त्याच्या समाजातील प्रतिष्ठेमुळे अनेक मित्र मिळत असतील पण प्रत्येक माणूस त्याच्या समविचारी मतांबाबत असलेल्या लोकांच्या अधिक जवळ जातो. म्हणून अनेक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की लोक एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र राहतात. माणूस हा सामाजिक प्राणी असल्याने तो आपल्या जिवलगाच्या सहवासामुळे भरपूर प्रगती करू शकतो. याला कारण म्हणजे प्रत्येक माणसांचा आपल्या जिवलगावर असलेला विश्वास. म्हणून प्रत्येक मानवी जीवनात जिवलगाला फार महत्वाचे स्थान आहे.

हा लेख लिहित असताना एक गोष्ट सारखी जाणवत असते ती म्हणजे आज खरोखरच माणसे एकमेकांच्या जवळ आली आहेत का? त्यांच्या जवळ असलेल्या व्यक्तीला आपण जिवलगा हा शब्द वापरू शकू का? असे प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे आजच्या सारखा माणूस कधीही आत्मकेंद्रित झाला नव्हता. वर म्हटल्याप्रमाणे माणसाची जवळीक जाणून घेण्यासाठी माणसाला आपत्कालीन परिस्थितीचा विचार करणे जरुरीचे आहे. कारण माणूस जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याचा किंवा तिचा जिवलगा त्या माणसाला मदत करण्यासाठी एका हाकेवर धावत येतो. अशी परिस्थिती आज क्वचितच आपल्याला बघायला मिळते. वरती एका परिच्छेदात म्हटले होते की माणसाने एकदा तरी एकत्र येऊन सहलीला किंवा जेवायला भेटणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे अनेकदा माणसे एकत्र भेटतात पण त्याचा उपयोग माणसाचे दु:ख कमी करण्यासाठी किती होतो असा प्रश्न पडल्याशिवाय होत नाही. असे मांडण्याचे कारण असे की आज माणसाचे जिवलग मित्र किंवा नातेवाईक Get together जरूर करीत असतात परंतु त्यात आपलेपणापेक्षा दिखाऊपणा अधिक असतो. अशा कार्यक्रमात माणसे एकत्र येतात ती केवळ स्वतःच्या आर्थिक यशाचे प्रदर्शन करण्याच्या हेतूने पण त्यात कुणीही स्वतःचे दु: ख किंवा अपयश एकमेकांना सांगत नाही आणि ते कुणीही ऐकण्याच्या परिस्थितीत असत नाही. मग कार्यक्रम झाल्यानंतर ज्याने कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याची टिंगल टवाळी करणे हाच तिकडे आलेल्या मित्रांचा किंवा नातेवाईकांचा उद्योग असतो. तेव्हा अशा माणसांना जिवलगा तरी कसे म्हणावे हे समजत नाही. एकमेकांचे यश अपयश समजून घेऊन त्यांची मागून कुठलीही टिंगलटवाळी न करता त्या माणसाच्या यशासाठी त्यांचे कौतुक तर करावेच पण अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीमागे उभे राहून त्याला संकटातून मुक्त करण्यासाठी कमीपणा वाटू नये तरच आपण त्या व्यक्तीला एक चांगला जिवलगा म्हणू शकतो.  

खरा मित्र हा जिवलगा असतो तसाच तो मोठा खजिना असतो. माणसाला त्याच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक मित्र मैत्रिणी भेटतात. त्यातले काही मित्र मैत्रिणी हे बालपणापासून मिळालेले असतात. बालपणापासून मिळालेले मित्र मैत्रिणी यांना आपल्या मित्र मैत्रिणींचे स्वभाव, त्यांची आवड, अभिरुची वगैरे माहीत असतात म्हणून त्यांची मैत्री ही जिवाभावाची होऊन आयुष्याच्या अखेर पर्यंत टिकून राहते. त्यात मतभेद किंवा वादविवाद होत असतात पण दुरावा कधीच निर्माण होत नाही. ते एकमेकांना व्यवस्थितपणे ओळखत असतात. जरी त्यांच्यामध्ये बराच काळ फोनसुद्धा झाला नाही तरी त्यांना त्याबद्दल काहीही वाटत नाही. अशा मित्रांशी गप्पा मारताना कोणताही विषय चालू शकतो. त्यात त्यांना कसलाही फरक पडत नाही. ते सहसा भेटत नसतील तरी त्यांच्यात दुरावा निर्माण होत नाही. या मिळालेल्या मैत्रीच्या प्रेमामुळे माणूस एक सुखाचे जीवन सहजपणे जगू शकतो. मग अशावेळेस तिथे मैत्रीच्या भावनांची खरी खोली व्यक्त करायलासुद्धा शब्द कमी पडतात. म्हणूनच जिवलग मित्र मिळणे हे सुद्धा आयुष्यात फार महत्वाची गोष्ट आहे. फक्त व्यवहारी दृष्टीकोन ठेवून मैत्री करणारा माणूस कधीच जिवलगा होऊ शकत नाही. संयोगाने झालेली भेट , एकमेकांचे जुळलेले स्वभाव, विचार, आवड , अभिरुची दोन माणसांना एकत्र आणते आणि त्यांच्यात जिवलग मैत्री होऊन ते एकमेकांचे जिवलगा होऊन जातात.  

धन्यवाद 
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...