रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २३७
विषय क्रमांक: ४
विषय : मी माणूस शोधतोय
शब्दांकन: योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
मी माणूस शोधतोय म्हणजे नक्की काय शोधणार आहे हा विचार माझ्या मनात येत असतानाच मला लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे या आत्मचारित्रातील त्यांनी लिहिलेला एक प्रसंग आठवला. त्या एक सामाजिक कादंबरी लिहित होत्या. लिहित असताना त्या एका गोष्टीकडे येऊन थांबल्या. काही केल्या त्यांना पुढे जाता येईना. कारण त्यावेळी त्या शोध घेत होत्या माणसाचा. पण माणसाचा शोध घेणे म्हणजे नक्की काय आहे, हे त्यांना सुचत नव्हते. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके उलटी पालथी केली. तरी त्यांना माणसाचा शोध लागत नव्हता. इथेच त्यांना साहित्याचा खरा धर्म जाणवला तो म्हणजे माणूस शोधण्याचा. मग प्रश्न पडतो की माणूस शोधणे म्हणजे नक्की काय ? याचे उत्तर सांगताना त्या म्हणतात माणसाचा शोध म्हणजे माणसातल्या माणूसपणाचा शोध घेणे असा आहे. याचाच अर्थ त्याच्यातील अंत:प्रवृत्तींना भिडून त्याच्यातले सत्त्व शोधणे आणि हे सत्व म्हणजे माणसातील माणूसपण. तसे बघायला गेले तर माणूस हा प्राणीसृष्टीचा एक भाग आहे. पुढे त्याने प्राणीसृष्टीचा त्याग करून स्वतःची मानव सृष्टी निर्माण केली. या मानव सृष्टीत त्याने स्वतःच्या शक्तीने अनेक नैसर्गिक अडचणीवर मात तर केलीच पण स्वतःची बुद्धी विकसित करून तो आपले आयुष्य विवेकाने जगू लागला. या विवेकाच्या आधारे त्याने अनेक हत्यारे बनविली आणि स्वबळावर प्रगत विज्ञानाची व सभ्य संस्कृतीची निर्मिती केली. त्याचप्रमाणे संवाद साधण्यासाठी भाषा आणि उपासमार टाळण्यासाठी शेतीचीसुद्धा निर्मिती केली. त्यामुळे सांस्कृतिक मुल्ये आणि सहजीवन निर्माण होऊन सभ्यतेचे संकेत तयार झाले आणि माणूसपणाचा व्यापक दृष्टीकोन तयार केला. म्हणूनच सर्व भाषेतील साहित्य माणसातील माणूसपणाचा शोध घेत आहे. हा शोध कधी कथा कादंबरीतून दिसतो, तर कधी नाटकातून किंवा कवितातून दिसत असतो. तसेच विज्ञान किंवा तत्वज्ञान सुद्धा मानवाचा व्यापक दृष्टीकोनातून शोध घेताना दिसत आहे.
आजच्या काळात माणसांची मुल्ये बाजारातल्या घाऊक भावाने ठरविल्या जात आहे. जेव्हा माणूस बाजारात उभा राहतो तेव्हा तो तिथे माणूस म्हणून उभा नसून एक ग्राहक म्हणून उभा राहिलेला दिसतो. मग त्यात विद्यार्थी असो किंवा शेतकरी, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे असोत किंवा छोटे मोठे काम करणारे कामगार असोत. या प्रत्येकाला आपण पैसे कमाविणारे मशीन म्हणूनच बघत असतो. या अवास्तव अपेक्षेमुळे माणसाचा शोध घेणे म्हणजे कशाचा शोध घेणे असे वाटू लागते. कारण इथे माणसाचे माणूसपण हरवलेले दिसत असल्याचे जाणवते. कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence) आणि अनुवांशिक अभियांत्रिकी (Genetic Engineering) मानवाला त्यानेच निर्माण केलेली सांस्कृतिक मुल्ये नष्ट करून माणसाला निरुपयोगी बनवत असल्याचे दिसत आहे. तसे बघायला गेलं तर विज्ञानाचा मुख्य उद्देश मानवी जीवनाचे भवितव्य चांगले करण्यासाठी असायला हवे. भूतकाळातील आपल्या पूर्वजांच्या कृतीचा अभ्यास करून जे काही चांगले आहे ते घेवून आणि त्यांच्या झालेल्या चुका वर्तमानात किंवा भविष्यात टाळता आल्या पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. त्यासाठी इतिहासाचा अभ्यास आणि त्याचे आकलन होणे जरुरीचे आहे. गेली अनेक वर्षे जगावर मानवतावादाचा प्रभाव असला तरीसुद्धा तंत्रज्ञानाचा प्रभाव मानवजातीला तिच्या मर्यादाच्या पलीकडे नेणारा आहे. हे तंत्रज्ञान माणसाचे रुपांतर परमेश्वरात करून माणसाला निरर्थक बनवत असल्याचे दिसत आहे. हे तंत्रज्ञ इतके शक्तिशाली बनतील की मानवाला त्याच्या कुठल्याही कामातून बाजूला करू शकतात. तंत्रज्ञानाचा असा विकास मानवजात नष्ट करीत आहे का असा प्रश्न हल्ली माणसाचा शोध घेताना पडत असतो. म्हणून इथे सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सिग्मंड फ्राईड याने निर्माण केलेल्या सिद्धांताची आठवण येते. सिग्मंड फ्राईड मानवी मनाचा ठाव घेताना त्याची मनाची विलक्षण गुंतागुंत तपासतो. मग त्यातून निष्कर्ष काढताना त्याने मानवाच्या बेसावध मनाचा सिद्धांत मांडला. त्यात तो मानवाच्या जीवनात नकळत उभ्या राहिलेल्या त्याच्या आठवणी, विचार आणि आग्रह यांचा प्रभाव माणसाच्या अहंकारावर कसा परिणाम करतो याचे विश्लेषण करीत जातो. त्याचप्रमाणे पुढे अनेक सुप्रसिद्ध मनोवैज्ञानिकांनी माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे पण तो शोध माणूस नावाचे कोडे उलगडून दाखविण्यात यशस्वी झाला आहे असे म्हणता येणार नाही.
डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत सांगतो की मानव वानरापासून उत्क्रांत होत माणूस झाला. म्हणून त्याच्यात काही प्रमाणात प्राण्याच्या प्रवृत्ती आहेत. त्याला लाभलेल्या बुद्धिच्या जीवावर त्याने अनेक शोध लावले आणि स्वतःचे जीवन सुखमय व शांत पद्धतीने जगण्यास सुरुवात केली. परंतु लोभ, पैसा आणि वर्चस्व या गुणांनी माणसाला इतर प्राण्यांपेक्षा अधिक क्रूर आणि निर्दयी बनविले आहे. सिरियातील युद्ध, अफगाण युद्ध, भारत-पाकिस्तान संघर्ष, जागतिक दहशतवाद, महिला आणि बालकांच्या तस्करी, दंगल वगैरे गोष्टी पाहिल्या की असे वाटू लागते की खरोखरच माणूस तंत्रज्ञानासाठी स्वतःचे माणूसपण घालवून बसत आहे का? आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात इतके मग्न झालो आहोत की आपण माणूस म्हणून जन्माला येण्याचे खरे कारण आणि हेतू विसरून चाललो आहोत असे वाटू लागते आहे. नवीन निर्माण झालेल्या तंत्रज्ञानामुळे किंवा स्मार्ट फोनमुळे माणूस आपली माणुसकी विसरून जात असल्याचे दिसून येत आहे. महात्मा गांधी नेहमी म्हणत असत की, “माणसाने मानवतेवरील विश्वास गमावता कामा नये.मानवता एक महासागर आहे.समुद्राचे काही थेंब घाण झाले तर महासागर घाण होत नाही. मानवतेची व्याख्या मानव असण्याची गुणवत्ता म्हणून केली जाऊ शकते. म्हणून माणूस त्याच्या विलक्षण स्वभावामुळे तो इतर प्राण्यांपासून वेगळा आहे आणि त्याच्यात माणुसकीचे गुण जरूर असू शकतात. त्यामुळेच या नश्वर जगात अजूनही माणुसकी हरवलेली नाही असे काही लोकांमुळे आजमावणे शक्य होत असते.” त्यासाठी चांगला माणूस सर्व समाजापासून दुर्मिळ होता कामा नये. सहानुभूती, दयाळूपणा, सभ्यता, औदार्य, विचारशीलता, आत्मचिंतन, नैतिकता, आशा, आदर, क्षमा, प्रामाणिकपणा, सचोटी या सर्व गोष्टी मानवाचे जीवन सुखी आणि आनंदी होण्यासाठी खूपच जरुरीचे आहे, हे माणसाचा शोध घेताना सारखे जाणवत असते. म्हणून नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती ही मानवाला फायदेशीर ठरली पाहिजे. तिच्या निर्मितीमुळे प्रत्येक माणसाला स्वतःचा उत्कर्ष साधता आला पाहिजे. आजच्या जगात स्मार्ट फोनची गरज आवश्यक आहे. लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि लोकांना त्वरित मदत पोहोचविण्यासाठी स्मार्ट फोन गरजेचे आहे हे कोणीही नाकारत नाही. पण रात्रंदिवस स्मार्टफोनला चिकटून राहणे ही काही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे आजूबाजूला काहीतरी चुकते आहे हे समजत नाही. म्हणूनच कोणत्याही तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करावा हे सर्व माणसाला ठरवायचे आहे. तेव्हा तो त्याचे माणूसपण जपू शकेल.
तंत्रज्ञान सर्वांसाठी सारखेच असते. जर एखाद्या माणसाला त्याचे काम जगाला दाखवून द्यायचे असेल तर तो स्पर्धात्मक होता कामा नये. जर एखादा मनुष्य स्पर्धात्मक झाला तर तो शांतपूर्ण जीवनाची व्याख्या हरवून बसतो. आज माणसाचा शोध घेताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे लोकांना यश फक्त पैशाशी निगडीत असल्याचे वाटते. त्यासाठी इतरांची पर्वा न करता तो स्वतःची वाटचाल कशी करता येईल याची चिंता करीत राहतो. त्यामुळे अनेकांचा असा समज आहे की या जगात चांगले हृदय असणे म्हणजे कमजोरपणाचे लक्षण आहे. म्हणून मला इथे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची आठवण येते. त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा शोध घेताना आपल्याला समजून येते की सचिन तेंडुलकर नावाची एक चांगली व्यक्ती या जगात आपल्याला कायम दिसत असते. सचिनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या समोर अनेक खेळाडू स्पर्धा करायला तयार होते. स्वतःच्या मेहनतीने आणि क्रिकेटच्या प्रेमामुळे तो लवकरच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. तरीसुद्धा त्याला अहंकाराची बाधा झाली नाही किंवा त्याने कुठेही अपशब्द वापरून कोणाचा अपमान केला नाही. पंचावर तर त्याने कधीच आगपाखड केली नाही. हे त्याला कशामुळे शक्य झाले असे कोडे मला नेहमीच पडत असे. जेव्हा त्याचे आत्मचरित्र माझ्या वाचनात आले तेव्हा या गोष्टीचा उलगडा होत गेला. आपल्या आत्मचरित्रात त्याने एक नोंद केली आहे ती म्हणजे त्याच्या वडिलांनी म्हणजे रमेश तेंडुलकरांनी त्याला दिलेल्या मोलाच्या सल्ल्याची. तो सल्ला होता चांगला माणूस होण्याचा आणि सचिनने तो कायमचा त्याच्या मनावर कोरून ठेवला. सल्ला देताना रमेश तेंडुलकर आपल्या मुलाला म्हणतात, ‘‘क्रिकेट खेळून तू यश मिळवतो आहेस, यात आनंदच आहे. पण विचार कर, किती वर्ष क्रिकेट खेळशील? १५ वर्ष... जास्तीत जास्त २० वर्षे. आणि ‘माणूस' म्हणून जगशील अंदाजे ७० वर्ष. याचा अर्थ क्रिकेट खेळणे हा जीवनातील एक छोटा काळ आहे. तेव्हा यशाने माजू नकोस आणि अपयशाने खचू नकोस. माणूस म्हणून चांगला वाग. स्वभाव चांगला ठेव. अखेर लोकांनी तुला चांगल्या स्वभावाचा माणूस म्हणून लक्षात ठेवलं तर ते जास्त मोलाचं आहे.'' सचिनने हा सल्ला त्याच्या आयुष्यात खरोखरच पाळलेला दिसत आहे कारण सर्व प्रसंगात त्याचा संयम ढळलेला कधी दिसला नाही.म्हणून अशा व्यक्तिमत्वाचा माणूस म्हणून शोध घेताना एक गोष्ट जाणविते ती म्हणजे त्याच्या वागण्यात असलेला सभ्यपणा आणि सुसंस्कृतपण आणि त्याहीपेक्षा दिसतो तो त्याचा माणूस म्हणून असलेला त्याचा मोठेपणा.
काही माणसे अशी असतात की त्यांच्यात भरपूर चांगले गुण असतात. पण ते चांगले गुण या व्यस्त जगात आपल्याला त्या माणसांचा शोध घेतल्या शिवाय दिसत नाही. कारण माणसांचे माणूसपण त्यांच्या विचार प्रक्रियेत असते. तसे पहिले तर माणूस दरदिवशी हजारदा विचार करीत असतो. तेव्हा त्याच्या विचारांकडे विवेकबुद्धीने, चांगल्या वाईट नजरेने बघितले जाते. त्यातील काही विचार चांगले असतात आणि मानवी जीवन समृद्ध करणारे असतात किंवा एकदम उलटे म्हणजे नैराश्य निर्माण करणारे असतात. या गोष्टी आपल्याला माणसाचा शोध घेईपर्यंत समजत नाही. अशा दोन राजकीय व्यक्तिमत्वे मला दिसली की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेतल्यावर त्यांच्याबद्दल कुतुहल निर्माण झाले. जरी त्या व्यक्तींचे राजकीय विचार वेगळे असले तरी त्यांच्या माणूसपणाने माझ्या मनाचा ठाव नकळत घेतला गेला. ती दोन राजकीय व्यक्तिमत्वे म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो (Justin Trudeau) आणि दुसरे नेते आहेत भारतीय कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी. ऍडम स्कॉटी नावाच्या एका छायाचित्रकाराने २०१५ साली कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो (Justin Trudeau) यांचे एक माणूसपण दाखविणारे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. त्या छायाचित्रात काही शाळकरी मुले कॅनडाचे संसद पाहण्यासाठी आली होती . त्यातील एक लहान मुलगा थकून पायऱ्यांवर बसला होता. त्या मुलाला पाहून पंतप्रधान टुडो यांचे मन द्रवले आणि त्यांच्यातील शिक्षक जागा झाला. त्या मुलाची विचारपूस करण्यासाठी ते त्या मुलाच्या शेजारी पायऱ्यांवर बसले. हा सुंदर क्षण ऍडम स्कॉटी यांनी इतक्या छानपणे टिपला की त्यातून त्यांच्याकडे असलेल्या माणूसपणाची एक वेगळी ओळख दिसू लागली. तो पर्यंत त्यांनी केलेल्या माणूसपणाच्या बातम्याच अधूनमधून येत होत्या. या छायाचित्रावरून तर ते चांगले माणूस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या प्रकरणाची मला ‘मी माणूस शोधतोय’ हा लेख लिहिताना आठवण झाली.
असाच प्रकार मला जाणवला तो राहुल गांधी यांच्या बाबतीत. हल्ली राहुल गांधी यांची सोशल मिडीयावर किंवा दूरदर्शनाच्या माध्यमातून हवी तशी खिल्ली उडविली जात आहे. पण हा गृहस्थ एक अप्रतिम माणूस आहे असे कुठेही दाखविले किंवा सांगितले जात नाही. त्यांच्या बद्दल इतक्या विसंगती दाखवून त्यांचे व्यक्तिमत्व खूपच खुजे असल्याचे दाखवले जाते. तरीसुद्धा राहुल गांधी आपले काम चोखपणे करीत असतात. त्यांच्यातला माणूस शोधताना मला त्यांनी केलेल्या एका कामाचा उल्लेख करावा लागेल. ती गोष्ट दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाची. या घटनेमुळे निर्भया म्हणजे ज्योती सिंग यांच्या कुटुंबातील सर्वजण उध्वस्त झाले होते. त्यावेळी ज्योती सिंगचा भाऊ बारावीत शिकत होता आणि त्याला वैमानिक बनायचे होते. या घटनेनंतर त्याला मोठा धक्का बसला होता. अशावेळी तिच्या भावाला आणि तिच्या कुटुंबियांना मदत केली ती राहुल गांधीने. तिच्या भावाला इंदिरा गांधी उडान अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि ज्योती सिंगच्या भावाचे स्वप्न पुरे केले. राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्वाची ही हळवी बाजू ज्योती सिंगच्या आईने जगासमोर आणली आणि त्यांच्यातील माणूसपणाची ओळख करून दिली. आजही राहुल गांधी असे अनेक सामाजिक कार्यक्रम राबवीत असतात पण या गोष्टीची प्रसिद्धी ते करताना दिसत नाही. जेव्हा आपण त्यांच्यातील माणूस शोधायचा प्रयत्न करतो, तेव्हाच त्यांच्यातील वेगळे माणूसपण आपल्या नजरेत भरत असते. इथे मला कवी कुसुमाग्रजांची ‘मी” नावाची एक कविता आठवते. त्या कवितेच्या ओळी खालील प्रमाणे आहेत.
सृष्टीतील सृजन शक्तीचा
मी आहे एक,
खास उन्मेष
जो पूर्वी कधी घडला नव्हता
सृष्टीच्या प्रारंभापर्यंत
आणि पुन्हा कधीही घडणार नाही
सृष्टीच्या अंतापर्यंत
असा एक खास मी !
माझ एक खाजगी आकाश असतं, माताजी,
ज्यात उगवतात चंद्र,सूर्य,तारे
तेही-माझेच खाजगी, माताजी,
माझी एक खाजगी पृथ्वी असते
जिच्यावर वावरत असतं
माझं अस्तित्व
एकटं माताजी, अगदी एकटं;
तुम्हा लोकांना मी दिसतो ना माताजी
तो मी नसतोच –
आणि तसाही नसतोच,माताजी,
तुम्हाला दिसतात त्या फक्त असतात
माझ्या रूपाच्या अनुवाद करणाऱ्या
रंगीत चिंध्यांच्या बाहुल्या,
ज्या बनवलेल्या असतात तुम्हीच,माताजी,
स्वतःच्या समजुतीनं
आणि स्वतःच्या सोयीसाठी.
तात्पर्य माताजी,
माणूस आपल्यापर्यंत पोचतो
तो एका संबंधामधून,
पण त्या संबंधाच्या तुकड्याहून
तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो.
खिडकीच्या काचेतून
उन्हाचा कवडसा आपल्या खोलीत पडतो, माताजी,
पण कवडसाच, माताजी,
सूर्य नव्हे.
हजारो कवडसे पडले तरी
आकाशातील ती ज्वलंत घटना
अनोळखी राहते
आपल्या जाणीवांना!
आज माणसाचा शोध घेताना एक गोष्ट नक्कीच जाणवते की माणूस आपली वाटचाल आपल्या प्रगतीपटावर करीत आहे. पण ती करताना तो संवेदना हरवून बसल्यासारखे दिसत आहे. सर्वांपासून तो दूर होताना दिसत आहे. पैशासाठी जगायचे हाच त्याचा उद्देश बनला आहे. त्यासाठी त्याला कोणाच्या सहवासाची गरज नको आहे. त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होत आहे. याची सुद्धा त्याला जाणीव होत नाही आहे. त्यासाठीच एकमेकांना समजून घेणे फार जरुरीचे असते. त्यासाठी संवाद हवा असतो. त्यातून सुखदुःखाची देवाणघेवाण होऊ शकेल. नाहीतर माणूस गर्दीमध्ये सुद्धा एकटाच राहील. जर माणसे एकत्र आली तर विचारांची देवाण-घेवाण होईल, त्यातून संवाद होईल आणि माणूस घडत जाईल. त्यातून दुसऱ्या बद्दल वाटणारा द्वेष, तिरस्कार, मत्सर , हेवा निघून जाऊन माणसाला प्रेमाचे महत्व कळू लागेल. माणसांची ही ओळख आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज , महर्षी शिंदे, डॉ. बाबा आमटे वगैरे महापुरुषांनी करून दिली आहे. कारण त्यांनीच माणसातील माणूसपण शोधले होते आणि त्यांच्यातील संवेदनशीलता ओळखून माणसाला जबाबदार बनविले. म्हणून माणसाचा शोध घेणे हि प्रक्रिया चालूच राहिली पाहिजे तरच माणूस आपल्याला समजून येईल. या लेखाच्या शेवटी श्री उमेश हिरालाल बोरकर यांच्या मी माणूस शोधतोय या कवितेतील शेवटच्या ओळी देऊन हा लेख संपवत आहे.
लोक काय म्हणतील म्हणून
रूढी परंपरा पाळतात सारेच
या दंभीकतेवर प्रहार करणारा
एक परिवर्तनवादी शोधतो आहे
चांगले असो वा वाईट
टीका करतात सारेच
टिकांमुळे विचलित न होणारा
एक सन्मार्गी शोधतो आहे
पोट प्रपंच करतात सारेच
स्वत:साठी जगतात सारेच
दुसर्यांसाठी जगणारा
दिन-दुबळ्यांना, दुःखीना तारणारा
या स्वार्थाच्या दुनियेत
मी माणूस शोधतो आहे
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment