Skip to main content

Badal-बदल

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक:२१८
विषय क्रमांक: ३
विषय: बदल
शब्दांकन: योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम,मुंबई
संकेतस्थळ :

बदल म्हणजे परिवर्तन आणि हे परिवर्तन माणसाच्या प्रत्येक गोष्टींशी निगडीत असते. म्हणून प्रत्येक मानवी जीवनात बदल नावाची गोष्ट आवश्यक आहे. माणसाच्या मनात बदल करण्याची इच्छा होत असेल तर ती चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे असे मानले जाते. बदल ही एक सुंदर प्रक्रिया आहे की ती माणूस संयमाने, विवेकाने आणि इतर माणसांच्या मदतीने घडवू शकतो. सुप्रसिद्ध भौतिकशात्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी एकदा म्हटले होते की,”The world as we have created it is a process of our thinking. It cannot be changed without changing our thinking’.  या वाक्याचे मराठीत भाषांतर करायचे झाले तर असे म्हणता येईल की हे जग म्हणजे आपल्या विचारांची प्रक्रिया आहे. जो पर्यंत आपली विचारसरणी आपण बदलत नाही तो पर्यंत आपल्याला हे जग बदलता येणार नाही. या वाक्यात कितीतरी सत्यता आहे कारण बदल मानवाला अधिक विकसित व्यक्ती बनण्यास प्रवृत्त करतो, नवीन परिस्थितीशी जुळवून घायला शिकवितो, वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावून मानवाची वैयक्तिक वाढ होण्यास मदत करतो. जरी माणसाला बदलाची संकल्पना अस्वस्थ करणारी असली तरी ती माणसाच्या वैयक्तिक प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. बदल माणसाच्या जीवनातील सर्व पैलूंना स्पर्श करतो आणि वैयक्तिक विकासाठी म्हणजे माणसाला सक्षम व्यक्ती बनण्यास मदत करतो. महात्मा गांधी बऱ्याच वेळा म्हणत असत,” Be the change that you should see in the world”. याचाच अर्थ असा आहे की जर आपण जगात बदल पाहू इच्छित असेल तर तो बदल आपणच ठरवलेला असला पाहिजे. म्हणूनच असे म्हटले जाते की विचारशील, वचनबद्ध नागरिकांचा एक छोटासा गट जग बदलू शकतो यात कुठलीही शंका नाही, कारण बदल म्हणजे नवे काही शिकण्याची किंवा नवीन गोष्टीचा शोध लावण्याची प्रक्रिया आहे.

शाळेत असताना आम्हाला कवी केशवसुतांची एक कविता होती. त्यातल्या काही ओळी आजही आठवतात. त्या ओळी अशा होत्या, ‘ ब्राह्मण नाही हिंदुही नाही, न मी एक पंथाचा | तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा || खादाड असे माझी भूक | चतकोराने मला न सुख , कूपातिल मी नच मंडूक || मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे | कोण मला वठणीवर आणू शकत ते मी पाहे ||”. कवी केशवसुतांच्या या ओळी आजच्या समाजाला तंतोतंत लागू पडत आहेत, कारण आजच्या मानवी समाजाने मानवाला फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी जखडून ठेवले आहे आणि त्याच्या अस्तित्वाचे प्रशिक्षण वर्षानुवर्षे सतत दिले जात आहे. त्यामुळे माणूस संकुचित झाला आहे. स्वतःच्या अस्तित्वाशिवाय जगण्यासाठी भरपूर काही आहे याचा विचार करताना माणूस दिसत नाही. म्हणून बहुतेक माणसे बदल नाकारत असतात. त्यामुळे या कवितेच्या ओळी वाचताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिमत्वाची वाढ करायची असेल किंवा स्वतःची प्रगती करायची असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची संकुचित वृत्ती सोडून दिली पाहिजे. सगळ्या प्रकारच्या मर्यादा सोडून द्यायला पाहिजे. आपल्या आवडत्या गोष्टीचा शोध घेऊन हवे ते बदल करावयास पाहिजे. तरच नवीन तंत्रज्ञान व उद्योगधंदे, नवीन साहित्य, नाट्य किंवा चित्रपट निर्मिती, नवीन संगीत यांची निर्मिती होत राहणार. त्यासाठीच  स्वतःच्या अस्तित्वातून मानवाने बाहेर आले पाहिजे आणि आपल्या मळ्यास घातलेले कुठल्याही प्रकारचे कुंपण तोडले गेले पाहिजे कारण जिथे कलेच्या ख-या उपासकाला आणि रसिकाला तर राष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं तिथे तो धार्मिक किंवा जातीचे कुंपणसुद्धा कधी स्वीकारणार नाही.

बदल हा जसा निसर्गाचा नियम आहे तसाच तो मानवी जीवनाचा आत्मा आहे. जर अपेक्षित असे बदल घडवून आणले नाही तर मानवी जीवन एकसुरी होईल किंवा कमकुवत होईल. कुठलाही बदल हवा असेल तर माणसाला नवीन संकल्पनांचा अभ्यास करून त्या संकल्पना आत्मसात कराव्या लागतील. त्यानंतर त्या संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी समाजातील माणसांशी संवाद साधावा लागेल, तेव्हाच जुन्या गोष्टी बदलून नवीन गोष्टींची निर्मिती होऊ शकेल. यात बदल दोन प्रकारचे म्हणजे अंतर्गत बदल आणि बाह्य बदल असे होऊ शकतात. अंतर्गत होणारे बदल हे फार महत्वाचे असतात. कारण त्यात प्रत्येक माणसाचा कृत्यामध्ये वैयक्तिक लाभ असतो. त्यामुळे मानवी समाज प्रगत होत जातो. बाह्य प्रकारचे बदल हे एखाद्या विशिष्ट मार्गाने केलेली कृती असते. ती जरी प्रभावित असली तरी ते बदल कुणाच्या धाकाने किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून झालेले असतात. त्यात वर्षानुवर्षाची परंपरा जपली जाण्याची शक्यता असते. म्हणून असे म्हणतात की अंतर्गत बदल माणसाची प्रगती निश्चित घडवून आणू शकते तर बाह्य बदलामध्ये माणसाची वैयक्तिक प्रगती हवी तशी होत नाही, उलट त्यामुळे माणूस कमकुवत होऊन परावलंबी होत जातो. पण कोणत्याही क्षेत्रात जर बदल घडवून आणावयाचा असेल तर माणसाला इतर माणसांशी संवाद साधला पाहिजे. मग असा बदल राजकीय क्षेत्रात असो, आर्थिक क्षेत्रात असो, शिक्षण क्षेत्रात असो, खेळात असो, पर्यावरणातील बदल असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो. या संवादामुळे माणसाला बदल का हवा आहे, त्याची ऐतिहासिक कारणे कोणती आहेत आणि त्याचा परिणाम त्याच्या भविष्यावर काय होणार आहे याची व्यवस्थित माहिती मिळून अशा बदलांना चालना मिळू शकेल. म्हणून मला नेहमी असे वाटते की सर्वात महत्वाचा बदल हा सामाजिक क्षेत्रातील बदल आहे आणि या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी मानवी संवाद खूपच जरुरीचा आहे.

सामाजिक बदलाच्या अनेक व्याख्या या जगात असू शकतात आणि त्या व्याख्या बऱ्याच गुंतागुंतीच्या आहेत. तरीही या जगात राहणारी बहुतेक माणसे सामजिक बदल करू इच्छितात. पण सामाजिक बदल घडवून आणताना माणसाला सर्व प्रथम कोणत्या प्रकारचा सामाजिक बदल करावयाचा आहे याची जाणीव असायला हवी आणि त्याप्रमाणे माणसाने काळजी घेतली पाहिजे. कारण असे बदल भविष्यात त्याच्या आयुष्यात परिणाम करू शकतात. हे बदल चांगले होतील की वाईट याचे विष्लेषण पुढे येणारा काळच ठरवू शकेल. त्यासाठी माणसाला आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी आणि सामाजिक संस्थेशी संवाद करणे फार जरुरीचे आहे. कारण असे सामाजिक बदल सांस्कृतिक आणि इतर सामाजिक संकल्पना यांचे नियम बदलून टाकतात. वरवर पाहता असे सामाजिक बदल चटकन आपल्या लक्षात येत नाही पण एक बदल घडवून आणताना अनेक वर्षे त्याची कृती करावी लागते. उत्तम उदाहरण म्हणजे महिलांच्या किंवा पिडीत समाजातील लोकांच्या शिक्षणाचे देता येईल. वर म्हटल्याप्रमाणे अशाप्रकारचे सामाजिक परिवर्तन करताना मानवी संवाद फार महत्वाचा आहे आणि तो करताना आपण इतरांशी कसा आणि केव्हा संवाद साधतो यावर अवलंबून असतो. सामान्यतः असे बदल वैचारिक , राजकीय आणि आर्थिक हालचालीद्वारे प्रेरित केले जाऊ शकतात. बऱ्याच वेळेस सामाजिक बदल हा सर्व प्रथम तळागाळातील समाजापासुन केला जातो. मग तो समाजातील वरच्या समाजापुढे जातो आणि शेवटी तो कायद्यात रूपांतर करण्यासाठी सत्ताधारी लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच सैद्धांतिकदृष्ट्या सामाजिक बदलाची प्रक्रिया समजून घेणे फार जरुरीचे असते कारण सामाजिक बदल ही सतत घडणारी प्रक्रिया असून त्याची रचना समाजात दीर्घ काळ टिकून राहणारी असते. सामाजिक बदल हा माणसांसाठी खूप वेगळा आहे. जिवशास्त्र्याच्या अभ्यासामुळे किंवा निसर्गातील बदल समजून घेण्याच्या क्षमतेमुळे मानव सामाजिक बदल घडवू शकले ही नक्कीच प्रेरणादायी गोष्ट आहे.

बऱ्याच वेळेस काही लोक प्रश्न विचारत असतात की सामाजिक बदल महत्वाचे आहेत का?  याचे उत्तर होय म्हणूनच येईल. सामाजिक बदल जेव्हा घडतात तेव्हा सामाजिक संस्था , संरचना आणि संस्कृतीमध्ये लक्षणीय बदल होत जातो. यांचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास १६व्या शतकातील युरोप मधील सुधारणा किंवा अमेरिकेत उभी राहिलेली नागरी चळवळ देता येईल. तसे पाहिले तर सामाजिक बदल फार हळू हळू होत असतात. तरीसुद्धा सामाजिक बदल गरजेचे आहेत. त्यासाठीस काही कारणे आहे. सगळ्यात महत्वाचे कारण आहे की सामाजिक बदल सर्व जगाला एकत्र आणतो आणि स्त्री-पुरुषांमध्ये समानता निर्माण करायला मदत करतो. त्याचप्रमाणे मागास वर्गीयांचे अधिकार जपण्यास मदत होते आणि वांशिक असमानता दूर करण्यास सोपे होते. सामाजिक बदल हा जसा व्यवसायासाठी चांगला असतो तसाच तो पर्यावरणातील समतोलपणा राखण्यास उपयुक्त ठरतो. कुठलाही सामाजिक बदल प्रत्येक मानवी समाजाला शिक्षण देत समाजात जागृती निर्माण करतो आणि कोणत्याही समस्येची चिकित्सा मुळापासून करण्यास शिकवितो. त्यामुळे मानवी समाज सुसंकृत होऊन कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सक्षम बनतो. जेव्हा कोणतेही सामाजिक बदल होतात त्यांचा फायदा भावी पिढ्यांसाठी चांगले जीवन घडविण्यासाठी होतो. म्हणून सामाजिक बदल अपरिहार्य आहे. जर तो झाला नाही तर कोणतीही प्रगती शक्य नाही. यातले सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे तंत्रज्ञानात होणारे महत्व पूर्ण बदल. हे बदल मानवी समाजावर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम करीत असते आणि माणसाला ते आत्मसात करणे जरुरीचे वाटत असते. कारण हे बदल माणसाला भूतकाळ मागे ठेवून पुढे जाण्यास मदत करते आणि माणसाला आपली गुणवत्ता सुधारून नवनिर्मिती करण्याची संधी देत असते.

बदल हा माणसाच्या वैयक्तिक विकासाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे कुठलाही बदल  मानावी समाजाच्या मदतीशिवाय करणे शक्य होणार नाही. याला कारण आहे वर्षानुवर्षे मानवी समाजाने जपलेल्या परंपरा एकदम बदलून टाकता येणार नाही. वर म्हटल्या प्रमाणे या पारंपारिक गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत. म्हणून कुठल्याही बदलाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने झाला पाहिजे. याचे सुंदर विश्लेषण करताना सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक अ.ह.साळुंके आपल्या परिवर्त्तन : शास्त्र , कलाही या पुस्तकात म्हणतात, “ परिवर्तनाची प्रक्रिया ही एक सुंदर तपश्चर्या आहे, असं मला वाटतं. आपण ही तपश्चर्या निष्ठेनं, विवेकानं, संयमानं, परस्पर विश्वासानं आणि परस्पर सहकार्यानं करूया. परिवर्तनवादी कार्यकर्ता होण्यासाठी व्यक्तीनं आधी चांगला माणूस कसं बनायचं ते शिकलं पाहिजे आणि तसं बनलंही पाहिजे, असं मी मानतो. जी माणसे हि प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्ते बनले आहेत, त्यांच्यापुढं मी नतमस्तक आहे”. असे सांगून ते पुढे म्हणतात,” "गणितशास्त्र, मानसशास्त्र इत्यादीसारखी कोणतीही ज्ञानशाखा घेतली, तरी तिचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं लागतं. नेमकं तेच परिवर्तन शास्त्राच्या बाबतीत आहे. एक शास्त्र म्हणून स्वतः शिकून घेतल्याशिवाय कोणीही यांपैकी काहीही दुसऱ्याला शिकवू शकणार नाही. त्याच पद्धतीने संस्कृती, नीती, इतिहास, धर्म, सण, उत्सव, देवता इत्यादींच्या बाबतीत गांभीर्यानं अध्ययन केल्याशिवाय कुणालाही त्या क्षेत्रांत निर्दोष परिवर्तन घडवता येणार नाही. परिवर्तनाला ज्ञानाच्या अंगानं शास्त्र म्हणून मानत असतानाच सौंदर्यानुभवाच्या अंगानं मी त्याला कलाही मानू इच्छितो. खरं तर, परिवर्तनाच्या प्रक्रियेत काम करणाऱ्यांच्या व्यक्तिमत्वात शास्त्र आणि कला यांचा एकात्म असा समन्वय व्हायला पाहिजे, त्यांची एक रेशम गुंफण व्हायला पाहिजे. आणि जसं शास्त्राचे शिक्षण घेतलं पाहिजे, तसेच कलेचे शिक्षण घेतलं पाहिजे - मग ते औपचारिक असो वा अनौपचारिक असो. निदान अंत:स्फूर्तीनं का असेना, जाणीवपूर्वक स्वतःची स्वतः काही तपश्चर्या तरी करायलाच हवी”. याचाच अर्थ असा की कोणताही बदल हा दुसऱ्याच्या अस्तित्वाशिवाय होऊच शकत नाही आणि तो करायचा असेल तर स्वतः पासून सुरु करून त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. मग ज्याला बदल नको आहे अशा माणसांना त्या बदलाचे महत्व समजून सांगितले पाहिजे. म्हणून बदलाचा मार्ग स्वीकारणे आणि ते स्वतःपासून सुरु करणे हे केव्हाही चांगले आहे. कारण कुठलाही बदल मानवी जीवन एक सुंदर कलाकृती बनवू शकेल आणि संपूर्ण समाजाची निर्मिती क्षमता फुलविण्यास मदत करेल.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...