रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २१७
विषय कार्मांक : ४
विषय : न्यू इयरचे रेझोल्युशन्स
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
न्यू इयरचे रेझोल्युशन्स ही पश्चिमात्य जगातील परंपरा आहे. मागील काही दशकांपासून ती पूर्वेकडील देशातसुद्धा आढळत आहे. भारत देशसुद्धा त्याला अपवाद नाही आहे. त्यात प्रत्येक मानवी व्यक्ती आपले मागील वर्षाचे अवगुण सोडून नवीन वर्षी चांगले वर्तन करण्याचा संकल्प करते. सुरुवातीला लोक धार्मिक पद्धतीने अशा प्रकारचे संकल्प करीत असे. इथे लोक वर्षाच्या सुरुवातीला आपल्या देवतांना असे वचन देत असत की त्यांनी उधार घेतलेल्या वस्तू परत देतील किंवा एखादे कर्ज घेतले असेल तर ते व्याजासकट परत करू. ही परंपरा बहुतेक रोमन लोकांनी चालू केली असावी असे काही पुरावे इतिहासात आढळतात. दरवर्षी हे लोक जानुस (ज्यावरून जानेवारी हे नाव पडले) या देवाला नवीन वर्षी चांगल्या गोष्टी करू असे वचन देऊन नवीन वर्षाची सुरुवात करीत असत. पुढे मध्ययुगामध्ये अनेक शूर योद्धे आपली शूरता दाखविण्याचे वचन देवतेला देत असत. त्यासाठी अनेक ख्रिस्ती बांधव वॉचनाईट सेवांमध्ये जाऊन तसा संकल्प करीत असत. प्रत्येक नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हे ख्रिस्ती बांधव एकत्र येऊन नवीन नागरिक सेवा देण्यासाठी सुद्धा एक करार करतात. अशी प्रथा प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने असल्याचे आढळून येते. मागील वर्षी केलेल्या अपराधांची प्रत्यक्षपणे कबुली देणे आणि क्षमा मागणे हेच उद्दिष्ट यामागे असते. म्हणून येथे जबाबदारीपेक्षा त्यागाची भावना अधिक असते.
काही लोकांच्या मते या संकल्पाची सुरुवात चार हजार वर्षापूर्वी प्राचीन बॅबिलोनी लोकांनी केली अशी आहे. त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात जानेवारीत नसून मार्चमध्ये होती कारण मेसोपोटेमियामध्ये जीवन शेतीभोवती फिरत होते. जेव्हा पिके वाढू लागली तेव्हा कॅलेंडरची सुरुवात मार्च/एप्रिल या महिन्याच्या कालावधीत सुरू झाली. असे हे नवीन संकल्प सुरुवातीचे प्रतीक बनले आणि बॅबिलोनियन अकिटू फेस्टिव्हलसह जोडले गेले. नवीन वर्षासाठी नागरिक देवतांना वचने देतात आणि उधार घेतलेली साधने, पुरवठा आणि उपकरणे परत करण्याचे वचन देऊन ती उपकरणे काही क्षण वापरतात. मग ही माणसे अधिक व्यापार करून आपली अर्थव्यवस्था चांगली करतात. त्यामुळे असे संकल्प करणे ही एक चांगली गोष्ट असून या संकल्पाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठीच अस्तित्वात आणला गेला आहे. त्यात असेही म्हटले गेले की जर तुम्ही देवतांना दिलेले वचन (नवीन वर्षाचा संकल्प) पाळले, तर तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल. याचाच अर्थ असा आहे की न्यू इयरचे रेझोल्युशन्स हे एक प्रकारचे वचन आहे जे वर्षाच्या सुरुवातीला दिले जाते. त्यात पुढील वर्षी चांगले जीवन जगण्यासाठी दिलेले आश्वासन असते. म्हणून नवीन वर्ष अनेकांना सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी चांगला काळ आहे असे मानले जाते.
मग प्रश्न पडतो की मार्च \एप्रिल मध्ये साजरा होणारा नवीन वर्षाचा दिवस १ जानेवारीपासून कधी झाला आणि तो कोणी केला ? यामागे कारण कोणते होते ? याचा इतिहास नीटपणे पहिला तर आपल्याला कळेल की इसवी सनपूर्व ४७ मध्ये ज्युलियस सीझरने १ जानेवारी हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून स्थापित केला. त्याकाळी संप्रेषण तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे नवीन वर्षाचा कोणता दिवस आहे हे कळत नसे. त्यामुळे लोकांना कोणताही सांस्कृतिक किंवा इतर कार्यक्रम ठरविणे कठीण जात होते. शहराच्या मध्यभागातून जितके पुढे जाऊ तितके लोकांना तो दिवस कोणता आहे हे समजण्यास फार कठीण जात होते. म्हणून ज्युलियस सीझरने या समस्येचे निराकरण करण्यासाठी वर्षाची सुरुवात १ जानेवारीची स्थापना केली. या कॅलेंडरला ज्युलियन कॅलेंडर असे म्हटले जाई. वर म्हटल्याप्रमाणे जानेवारी हे नाव जानस या देवापासून आले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या या देवाला दोन चेहऱ्यांनी चित्रित केले जाते. एक चेहरा भविष्याकडे पाहणारा असून दुसरा चेहरा भूतकाळाकडे पाहणारा आहे. त्यासाठी ज्युलियस सीझरने अशी व्यवस्था केली की १ जानेवारीच्या दिवशी सरकारी अधिकारी त्यांच्या सम्राटाला किंवा देवाला निष्ठा दाखविण्यासाठी वचने देतील आणि त्यादिवशी सर्व न्यायालये अर्धा दिवस बंद राहतील आणि नवीन वर्षाचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जाईल. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे १ जानेवारी हा सार्वत्रिकरीत्या वर्षारंभाचा पहिला दिवस असला तरी, जगांतील विविध देश व धर्म यांच्या हिशोबाने ३६५ दिवसांत प्रत्यक्षात ८० वर्षारंभ दिवस साजरे करतात. यांपैकी कित्येक तारखा समान असल्या तरी १२ महिन्यांत ५८ दिवस असे आहेत की त्या दिवशी कुठला ना कुठला वर्षारंभ दिवस ठरलेला असतो. तरीसुद्धा सर्व जग १ जानेवारीला वर्षाचा प्रारंभ मानीत आहे. त्याला कारण आज आपण १५८२ रोजी तयार केलेले ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतो. हे कॅलेंडर ख्रिश्चन धर्मगुरू आठवा पोप ग्रेगरी याने बनविले आहे, जे ज्युलियन कॅलेंडर मध्ये सुधारणा करून बनविले आहे.
वर आपण म्हटल्याप्रमाणे प्राचीन रोममध्ये लोक देवतांना नवीन वर्षात चांगले काम करण्याचे वचन देत असत. त्यामुळे प्राचीन रोमपासून नवीन वर्षाचे संकल्प लोकप्रिय झाले असे मानण्यात येते. इ.स.१६७१ मध्ये अॅन हॅल्केट या स्कॉटिश लेखिकेने लिहिलेल्या आपल्या दैनंदिनमध्ये न्यू इयरचे रेझोल्युशन्सची नोंद आढळते. ’मी आणखी कुणाला नाराज करणार नाही’ किंवा ’मी कोणाचा अपमान करणार नाही‘ अशा प्रकारचे शीर्षक तिने आपल्या न्यू इयरच्या रेझोल्युशन्सला दिले होते. त्या दैनंदिनीमध्ये फक्त अशा प्रतिज्ञा आढळतात की ज्या लेखिकेने बायबलच्या वचनातून घेतलेल्या आहेत. यावरून असे दिसते की त्यावेळी अशीच प्रथा असली पाहिजे आणि लोक त्यांस न्यू इयरचे रेझोल्युशन्स समजत असावे. तेव्हा लोक १९व्या शतकापर्यंत असेच संकल्प करीत असले पाहिजेत. पण पुढे जाऊन त्यात दिलेली वचने कुणी पाळीत नसावीत. याला कारण म्हणजे १८१३ च्या जानेवारी महिन्यात बोस्टन वृत्तपत्राच्या अंकातील एका अज्ञात व्यक्तीने लिहिलेला लेख म्हणतो की न्यू इयरचे रेझोल्युशन्सचे आदेश प्राप्त करण्याची सवय असलेली लोक संपूर्ण डिसेंबर महिन्यात पाप करतील आणि नवीन संकल्प ठरवून नवीन वर्षाची सुरुवात करतील. त्यातील कोणतेही वचन गंभीरपणे न घेता परत एकदा पाप करतील आणि वर्षाच्या शेवटी पापमुक्त होतील. हा लेख काही म्हणो पण एक गोष्ट नक्कीच होती ती म्हणजे न्यू इयरचे रेझोल्युशन्स हे १९व्या शतकापर्यंत नक्कीच होते आणि त्यांची उद्दिष्टये चांगले मानवी जीवन जगण्यासाठीच होते. संकल्प करणे हे केव्हाही चांगले असते कारण ते मानव जातीसाठी निष्क्रिय नसून सक्रिय असलेल्या आशावादाने नवीन वर्षाची वाट पाहण्याचा एक मार्ग आहे.
आत्तापर्यंत लिहिलेल्या गोष्टीवरून असे दिसून येते की नवीन वर्षाच्या संकल्पनेला कोणतेही ऐतिहासिक मूळ नसले तरी त्यास सांस्कृतिक परंपरेसाठी काही निश्चित अशी वळणे जरूर आहेत. त्यासाठी आपण १९०७ पासून नवीन वर्षाच्या उत्सवाचा प्रमुख भाग झालेल्या न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये वन टाइम्स स्क्वेअरच्या छतावर एक टाइम बॉल आहे आणि दरवर्षी १९०७ पासून ते आतापर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत लाखो लोक बॉल ड्रॉप बघायला येतात आणि त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पाची सुरूवात म्हणून या क्षणाचा उपयोग करतात. ३१ डिसेंबर १९०७ रोजी न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राचे मालक ऍडॉल्फ ओच्स यांनी हा कार्यक्रम प्रथम आयोजित केला होता. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फटाक्यांच्या प्रदर्शनाच्या मालिकेचा उत्तराधिकारी म्हणून त्यांनी टाइम्सचे नवीन मुख्यालय म्हणून त्याच्या दर्जाचा प्रचार करण्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी टाइम्सच्या इमारतीमध्ये आयोजित केला होता. हा बॉल आर्टक्राफ्ट स्ट्रॉसने
डिझाइन केला होता. १९०८ चे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर १९०७ रोजी प्रथम आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम १९४२आणि १९४३ ही दोन वर्षे वगळता (कारण युद्धकाळातील ब्लॅकआउट पाळत असल्यामुळे) दरवर्षी आयोजित केला जातो. ही गोष्ट जाहीर करताना न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने जाहीर केले की नवीन वर्षाच्या आगमनाचा अचूक क्षण टॉवरच्या वरून विद्युत प्रकाशमय बॉल खाली पाडण्याद्वारे सूचित केले जाईल. हा चेंडू पाच फूट व्यासाचा असेल आणि त्यासाठी २१६ विद्युत दिव्यांनी प्रकाश दिला जाईल. पुढे हा प्रकार वार्षिक परंपरेचा भाग बनला गेला. नवीन वर्षाची संध्याकाळ साजरी करणारे लोक आजही बॉल ड्रॉप पाहण्यासाठी न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर गर्दी करीत असतात. पण हा प्रकार कुठून आला हे काही समकालीन लोकांना माहीत असण्याची शक्यता नसते. त्यात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. काही लोक बॉल का आणि त्यामागचा अर्थ काय? असे सांगताना काहीजण म्हणतात की ही परंपरा प्रत्यक्षात प्राचीन नौकानयनातून आली आहे. खलाशांना वेळ काय आहे हे माहित असणे आवश्यक होते. परंतु जहाजांवर त्यांच्या वेळेचे पालन करण्याच्या पद्धती फार जुन्या होत्या. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, बंदरावर एक महाकाय चेंडू असेल जो समुद्रातून दिसू शकेल. हा बॉल दररोज एकाच वेळी (सामान्यत: दुपारी 1 वाजता ) खाली पडेल जेणेकरुन खलाशांना त्यांची वेळ बरोबर समजण्यास मदत होईल. तर काही लोक सांगतात की या भागात लोकांच्या सुराक्षतेसाठी फटक्यांना बंदी घालण्यात आली होती म्हणून न्यूयॉर्क टाइम्सने या उत्सवाची सुरुवात टॉवरच्या वरून विद्युत प्रकाशमय बॉल खाली पडण्याद्वारे केली.
न्यू इयरचे रेझोल्युशन्स ही एक चांगली संकल्पना असली तरी ती योग्य रीतीने हाताळणे जरुरीचे आहे. त्यासाठी नवीन संकल्पना शोधणेसुद्धा गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या कारकिर्दीकडे लक्ष देवून काही उद्दिष्टे पक्की केली पाहिजेत. काम करणाऱ्यांनी निरोगी आणि सक्रीय राहणे , नवीन कौशल्य शिकणे, तंत्रज्ञानावर खास करून सोशल मिडियावर मर्यादा घालणे, संस्कृतीमधील गुंतवणूक वाढविणे, वगैरे संकल्प आपण नेहमीच करत असतो. पण अशा संकल्पासाठी नवीन वर्षाची गरज आहे असे वाटत नाही. तरीसुद्धा आपण तसे करण्याचे संकल्प नवीन वर्षाच्या आगमना अगोदर ठरवत असतो. त्यामुळे आपले लक्ष एखाद्या गोष्टी पुरतीच मर्यादित राहते. वरून छोटी वाटत असलेली गोष्ट सोपी असेल पण त्यामध्ये मोठा अर्थ दडला असेल तर त्याचा शोध आपण नवीन वर्षात घेतला पाहिजे. आज जगामध्ये संवाद संस्कृतीची प्रचंड वेगाने हानी होताना दिसत आहे आणि विवेकाची भूमिका जवळजवळ संपत असल्याची जाणीव होत आहे. टोकाचा विरोध जगातील सर्व समाजाला सोसावा लागत आहे. त्यामुळे मानवी समाजाने विसाव्या शतकात पाहिलेली भव्य स्वप्नांची जागा एकविसाव्या शतकात फुटकळ आणि प्रतिक्रियावादी विचार घेत असल्यासारखी जाणीव होत आहे. त्यामुळे चांगल्या आणि सुंसंस्कृत समाजापासून सुशिक्षित व सुबुद्ध समाज दूर होताना दिसत आहे. अशा सुशिक्षित व सुबुद्ध समाजाला श्रमजीवी किंवा हातावर पोट असणाऱ्या वर्गाचा संघर्ष दिसत नाही आहे. आज धर्माच्या नावाखाली चाललेला अधिकाधिक कडवट अविष्कार माणसाचा वैज्ञानिक दृष्टीकोन दूर करण्यास मदत करीत आहे. त्यामुळे मानवी समाजाला आपल्या समाजातील परंपरागत मतांपेक्षा वेगळे मत मांडणे खूप कठीण होत आहे. त्यात आलेल्या नवीन समाज माध्यमांनी साऱ्या जगातील सर्व प्रकारचे चर्चा-संवाद व नात्यांची वीण पूर्णपणे बदलून टाकली आहे. जर एखाद्या व्यक्तीने समाज माध्यमावर प्रचीलीत गोष्टीवर स्वतः अभ्यास करून वेगळे मत मांडले तर त्या व्यक्तीवर समाज माध्यमात आक्रमक लिखाण करून त्यास पूर्णपणे नामोहरम केले जाते. त्यात्तून एक संदेश दिला जात आहे की जे काही आम्ही सांगतो आहे तेच सत्य आहे. ते मान्य करा. त्यासाठी कुठल्याही आधाराची गरज नाही. जर हे तुम्हाला मान्य नसेल तर तुम्हाला जगण्याचा काहीही अधिकार नाही आहे; तरीसुद्धा आम्ही उदार मानाने तुमचे शरीर संपवून टाकत नाही. यातच तुमचे भले आहे, असे समजा. अशा वातावरणात कोणतीही वैचारिक चर्चा होणे शक्यच नाही. त्यामुळे वातावरण खूपच विषारी बनत चालले आहे आणि सर्वत्र द्वेष पसरताना दिसत आहे. त्यामुळे संवेदनांचे आणि आकलनाचे बौद्धिक निष्कर्ष पूर्णपणे गळून पडल्याचे दिसत आहे. ही गोष्ट सर्व समाजासाठी फार हानिकारक आहे. त्यातून माणसांची बेफाम झुंड तयार होऊन मानवी समाजाला एकत्र राहणे कठीण होऊन जाईल. म्हणूनच येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपण एक न्यू इयरचे रेझोल्युशन्स मांडूया. ते म्हणजे समाजातील सर्व वर्गाच्या, जातींच्या , धर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन मानवी समाजाला सुखी करू. त्यासाठी द्वेषाचे किंवा विषारी वातावरण समाजात पसरू न देता प्रेमाचा संदेश सर्व मानव जातीतील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करूया. जे बुद्धाला जमले, गांधीना जमले, त्यातून प्रेरणा घेऊन अवघा मानव समाज द्वेषाच्या आणि विषारी वातावरणातून मुक्त करूया. हाच खरा येत्या नवीन वर्षाचा संकल्प असायला हवा आहे.
या लेखाच्या शेवटी नवीन वर्षात द्वेष मुक्त मानवी समाज असा संकल्प मांडताना सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक आणि तत्वेत्ता Voltaire यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सिद्धांत मांडताना त्यांचे म्हणणे लक्षात ठेवूया. ते म्हणतात, "I may not agree with what you have to say, but I will defend to death your right to say it”. याचे मराठीत अनुवाद करायचे झाल्यास म्हणता येईल की, "तुझे मत मला बिलकुल मान्य नाही. मात्र , ते मांडण्याचा तुझा अधिकार शाबूत राहील, यासाठी मी प्राणपणाने लढेन”. या वाक्याच्या गाभ्यातच उदारमतवादी लोकशाहीची तत्वे लपलेली आहेत, याची जाणीव करून घ्या. त्यासाठी नवीन वर्षात कोणताही विचार स्वीकारताना स्वतः त्याचा अभ्यास करा. त्यासाठी वाचा, शोध घ्या व लिहा आणि सर्व मानव जातीचे कल्याण करा.
धन्यवाद
Comments
Post a Comment