Skip to main content

Patra पत्र

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : २१२
विषय क्रमांक : ४
विषय : पत्र
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई

पत्र म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला एका माध्यमातून पाठवलेला लेखी संदेश आहे. जेव्हा आपण पत्रलेखन म्हणतो तेव्हा पत्र लिहिण्याचा एक प्रकार असतो. पत्र या शब्दाचे एक वैशिट्यपूर्ण स्वरूप आणि संकल्पना आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पत्र लिहिते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की ती व्यक्ती एका कागदावर आपल्या भावना किंवा विचार दुसऱ्या व्यक्तीसमोर व्यक्त करीत असते. इथे जी व्यक्ती पत्र घेत असलेली व्यक्ती ज्याने पत्र लिहिले आहेत त्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी परत पत्र लिहीत असते. त्यातून एकमेकांशी संवाद होत जातो. ज्या कागदावर पत्र लिहिले जाते, तो कागद टपाल खात्याच्या माध्यमातून (Postal System) ज्यांना जे पत्र लिहिले आहे त्यांना पोहोचवले जाते. हे लिहिलेले पत्र औपचारिक किंवा अनौपचारिक असू शकते. त्यामुळे पत्र हे जसे एकमेकांशी संवाद करण्यासाठी महत्वाचे साधन असले किंवा त्याद्वारे माहिती सुद्धा  मिळत असली तरी पत्र लिखाण एक महत्वाची कला म्हणून आपली भूमिका बजावत आहे असे इतिहासात नमूद केले आहे. याला कारण म्हणजे सुसंगता हा नेहमीच पत्रलेखनातला अतिशय मौल्यवान गुण आहे आणि त्यासाठी मुबलक असा शब्दसंग्रह असायला पाहिजे. म्हणून कुठलेही पत्र लिहिताना शब्दांचे महत्व फार मोठे आहे. पत्र लेखन हे एक प्रभावी माध्यम आहे की त्यातून आपण पूर्णपणे बदल घडवून आणू शकतो. त्यात स्वतःचे विचार पूर्णतः प्रतिबिंबित झाले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीस पत्र लिहीत असतो तेव्हा समोरची व्यक्ती कोण आहे यावर योग्य शब्दांचा वापर करणे जरुरीचे आहे. त्यासाठी वाक्यांची रचना फार मोठी न करता थोडक्यात करावी किंवा कोणतेही मोठे अलंकारिक शब्द न वापरता वाक्य रचना करावी. त्यामुळे समोरच्यावर आपल्या लिखाणाचा प्रभाव पडेल. त्यासाठी सतत लिहिण्याचा सराव असायला पाहिजे.

पत्र लेखानाचे दोन प्रकार आहेत. एक आहे औपचारिक पत्रे आणि दुसरा प्रकार म्हणजे अनौपचारिक पत्रे. जी पत्रे  शासकीय कार्यालयाला आपल्या दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी लिहितो त्या पत्रास औपचारिक पत्रे असे म्हणतो. त्यात खाजगी कंपनीच्या कार्यालयाला लिहिलेले पत्र सुद्धा येते. कारण खाजगी कंपनीमध्ये काम करीत असलेली व्यक्ती आपल्या कामानिमित्ताने त्रयस्थ व्यक्तीला पत्र लिहीत असते. अशी पत्रे कोणालाही त्रास न होता आणि विशिष्ट पद्धतीने लिहिली जातात. त्यात एक प्रकारचा औपचारिकपणा म्हणजे शिष्टाचार व उपचार असतात. इथे कोणत्याही प्रकारची सलगी व्यक्त न होता कामाचे स्वरूप थोडक्यात आणि नेमकेपणाने सांगितलेले असते. निमंत्रण किंवा आमंत्रण पत्र, अभिनंदन पत्र, चौकशी पत्र, तक्रार पत्र, मागणी पत्र ही काही औपचारिक पत्रे म्हणून ओळखली जातात. अनौपचारिक पत्र हे वैयक्तिक स्तरावर लिहिले जाते. जी पत्रे आपण आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रिणीं, वगैरे यांना उद्देशून लिहितो ती पत्रे अनौपचारिक पत्रे असतात. यात कोणताही विषय नसतो. इथे लिहिण्याची भाषा घरगुती बोली सारखी असते. पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीत आहे यावर पत्राचे लेखन होत असते. पत्रात योग्यरीतीने परिच्छेद पाडावे लागतात, त्याचप्रमाणे पत्राचा शेवट योग्य प्रकारे करणे जरुरीचे असते. अशा पत्रांची सुरुवात 'प्रिय' हा शब्द किंवा सं. न. वि. वि. हे शब्द वापरून केली जाते आणि समारोप  करताना आईवडिलांना किंवा घरात असलेल्या वयस्कर माणसांना नमस्कार आणि लहानांना आशीर्वाद असे शब्द लिहून करावा. त्यामुळे जवळीक होण्यास मदत होते. आजच्या युगात इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल फोन यांच्या वापरामुळे अनौपचारिक पत्र व्यवहार कमी झाला आहे किंवा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. पण औपचारिक पत्रव्यवहार ई-मेलद्वारे चालू आहे. ई-मेलद्वारे सुद्धा अनेक अनौपचारिक पत्र व्यवहार चालू असल्याचा प्रकार फार कमी प्रमाणात जाणवतो.  तरीसुद्धा आपल्याला पत्र महत्वाचे वाटते, कारण आपल्या मनातील भाव व विचार दुसऱ्यापर्यंत चांगल्या भाषेत संक्रमण करण्याचे लिखित साधन म्हणजे पत्र होय.

पत्र लेखन ही एक अशी कला आहे की त्यात आपण एकमेकांशी संवाद साधताना माहितीची देवाणघेवाण करत असतो. एकमेकांची हृदये जोडण्याची ही एक उत्तम कला आहे. म्हणूनच पत्राला अभिव्यक्तीचे एक शक्तिशाली आणि सुलभ माध्यम मानले गेले आहे. अशी अनेक पत्रे लिहून एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्रकारावर अनेक पुस्तकेसुद्धा उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पुस्तक म्हणजे 84, Charing Cross Road. हेलन हँफ्फ यांनी हे पुस्तक इंग्रजी भाषेत लिहिले असून या पुस्तकात दोन पुस्तक प्रेमीचा संवाद आहे. त्यातील एक व्यक्ती स्वतः लेखिका आहे तर दुसरी व्यक्ती आहे फ्रॅंक डॉयल. आपण जाणतो की आजच्या संगणकाच्या दुनियेत पत्र व्यवहार जवळजवळ नाहीसा झाला आहे. हवी असलेली पुस्तके  पुस्तकप्रेमी संगणकाच्या माध्यमातून किंवा व्हाट्सअप सारख्या सोशल माध्यमातून मागवू शकतात. सुमारे ७० वर्षांपूर्वी असा संवाद करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पत्र लेखन करणेच होता. जेव्हा मी हे पुस्तक वाचले तेव्हा मला पत्र लेखानाचे महत्व समजले. हेलन हँफ्फ या नूयॉर्क येथे राहणाऱ्या एक जबरदस्त वाचक आणि लेखिका होत्या. त्यावेळेस त्यांना इंग्रजी साहित्याच्या चांगल्या आवृत्या नूयॉर्क शहरात सापडत नव्हत्या. त्यासाठी त्यांना नूयॉर्क सिटी पब्लिक लायब्ररीवर अवलंबून राहावे लागत असे. पण ही लायब्ररी त्यांच्या घरापासून खूप दूर होती आणि पुस्तके त्यांना वाचनालयात बसून वाचावी लागत असे. दुसरे असे की त्या लायब्ररी मधील पुस्तके योग्यप्रकारे छापलेलीसुद्धा नव्हती. त्यांच्या शेजारी एक ब्रिटिश गृहस्थ राहत होते. लेखिकेचे पुस्तक प्रेम पाहून त्यांनी लेखिकेला एक पत्ता दिला आणि तो पत्ता होता, " मार्क्स अँड कंपनी, ८४, चेअरिंग क्रॉस रोड, लंडन ".  तेव्हा हेलन हँफ्फ यांनी पत्र लिहून जुनी आणि दुर्मिळ पुस्तकांची यादी दिली व त्यासाठी लागणारी रोख रक्कम सुद्धा भरली. फ्रॅंक डॉयल जे मार्क्स अँड कंपनीमध्ये काम करीत असले तरी ते एक जबरदस्त वाचक होते. हेलन हँफ्फ यांनी दिलेल्या यादीनुसार सर्व पुस्तके फ्रॅंक डॉयल यांनी नूयॉर्कला पाठवून दिली. अशाप्रकारे दोन पुस्तकप्रेमी माणसांच्या पत्रव्यवहाराला सुरुवात झाली आणि हा व्यवहार जवळ जवळ वीस वर्षे म्हणजे फ्रॅंक डॉयालाच्या मृत्यूपर्यंत चालू राहिला. त्या दरम्यान लेखिकेची फ्रॅंक डॉयलच्या पत्नीशी सुद्धा चांगली मैत्री झाली. या पुस्तकातील पत्र व्यवहार आपल्याला सांगू इच्छितो की दोन अनोळखी माणसाचे एकाच ध्येयासाठी पत्राद्वारे एकत्र येतात आणि मित्र बनतात. म्हणून हे पुस्तक वाचताना पत्र या शब्दाचे महत्व समजते आणि पत्र लेखन एक कला असल्याचे जाणविते.

जेव्हा आपण पत्र लिहितो तेव्हा पत्रलेखनात संबंधित व्यक्तीबद्दल स्नेह, आपुलकी, परस्परांच्या भावानांबद्दल लिहीत असतो. महात्मा गांधी, विल डुरंट, पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, विल्यम हॅझलिट यांनी अशाप्रकारे पत्रे लिहून पत्राद्वारे साहित्य निर्मितीही केली आहे. काही लोक पत्रलेखन म्हणजे निरोपाची देवाणघेवाण समजतात पण इथे जेव्हा नमूद केलेल्यांचे पत्रलेखन वाचले की एक गोष्ट जाणविते की पत्रलेखन ही एक साहित्यिक कला असून ती आपण जपून ठेवली पाहिजे. त्यासाठी मी इथे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या नंतर पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या पुस्तकांचा उल्लेख करणार आहे. कारण पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकातून एक गोष्ट नक्की जाणविते त्यांनी आपल्या पत्रांचा मुद्दा व्यक्त करताना इंग्रजी भाषेचे कौशल्य खूप छानपणे वापरले आहे. त्यातून त्यांचा परस्परांशी संवाद खूप छानपणे रंगला असल्याचे सुद्धा जाणविते. त्यांची दोन पुस्तके म्हणजे, "letters from a Father to His Daughter" आणि "Letters for a Nation : from Jawaharlal Nehru to His Chief Ministers" खूपच वाचनीय आहेत. आपल्या मुलीला म्हणजे इंदिरा गांधीस लिहिलेल्या पत्रातून आपल्याला पृथ्वीची निर्मितीची आणि उत्क्रांतीची माहिती मिळते. त्याचप्रमाणे त्यांनी सिव्हिलायझेशन, ट्रेड, ग्रेट सिटीज, अर्ली मेन वगैरे अनेक गोष्टींबद्दल लिहिले आहे. ही पत्रे वाचताना एक गोष्ट सातत्याने जाणविते ती म्हणजे नेहरूनी आपल्या पत्रलेखणीतून एक प्रकारचे कुतूहल निर्माण केले आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळविण्यासाठी स्वतःची शोधक वृत्ती कशी तयार करावी याचीसुद्धा नकळत जाणीव होत जाते. त्यामुळे हे पत्रलेखनाचे पुस्तक शाळेत किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर जरूर वाचावे पण त्यांच्या पालकांनी किंवा प्रौढव्यक्तींनीसुद्धा जरूर वाचावे. या पुस्तकामार्फत एक महत्वाचा संदेश पंडित नेहरू देतात तो म्हणजे आपण ज्या निसर्गात राहतो, त्या निसर्गावर प्रेम करा. त्याच्याशी क्रूरपणे वागू नका. आपण निसर्गाची सुंदर झाडे आणि वनस्पती नष्ट करतो. तरीही निसर्ग आपल्यावर प्रेम करतो. नेहरूनी आपल्या मुलीला लिहिलेल्या या पत्रामुळे त्यांच्या मुलीच्या आयुष्याला नविन उमेद मिळाली आणि पुढे चालण्याचा मार्गही मिळाला. म्हणून हे ३० पत्रांचे पुस्तक वडील आणि मुलगी यांच्यातील अतूट नाते दाखवीत जाते. त्यांचे दुसरे पुस्तक, "Letter for a Nation : Jawaharlal Nehru to his Chief Ministers" हे पुस्तक राष्ट्राची उभारणी ही एक उत्कट घटना असल्याचे दाखवून दिले आहे. दर महिन्याच्या १ तारखेला आणि १५ तारखेला नेहरू आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहीत. या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या जवळजवळ ४०० पत्रांचा उल्लेख आहे. त्यात त्यांनी लोकशाहीची उभारणी, हिंसाचार, निर्वासितांचे संकट, भ्रष्टाचार, उजवे आणि डावे यांचे अतिरेकी विचार, आर्थिक नियोजन, देशांतर्गत समस्या आणि भारताचे जगाशी असलेले संबंध यावर लिहिलेले आहे. १९४७ ते १९६३ सालापर्यंतचा देशाचा प्रवास या पत्रांद्वारे आपल्याला मिळतो. अशावेळेस लिहिलेले पत्र एक साहित्यिक निर्मिती असून आपल्याला वेगवेगळ्या विषयांचे आणि लिहिणाऱ्या माणसाचे अंतरमन जाणून घेण्यास मदत होते. म्हणूनच पत्र लेखन ही कला असेच म्हणावे लागते.

वरील दोन पुस्तकांचा उल्लेख करताना अजून दोन पुस्तकांचा उल्लेख करावासा वाटतो. ती दोन पुस्तके आहेत, "Nehru and Saradar Patel : Comradeship and Contrast" आणि "Together They Fought : Gandhi and Nehru Correspondence 1921- 1948. पहिले पुस्तक म्हणजे सरदार पटेल आणि नेहरू यांचे मतभेद जरूर दाखविते पण त्याचबरोबर यांच्यातील परस्पर कौतुकांचे चांगले दस्तऐवजीकरण असल्याचेही जाणविते. यातील पत्रव्यवहार आपल्याला सांगून जातो की देशाची उभारण्यासाठी या दोन व्यक्तींनी आपले मतभेद बाजूला ठेवले आणि देश घडविण्यासाठी एकमेकांशी सहकार्य करून आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले आहेत. आजच्या पिढीने हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे. तेव्हाच या दोन व्यक्तींचे कार्य आपल्याला समजून घेता येईल. दुसरे पुस्तकसुद्धा नेहरू आणि गांधी यांच्यातील पत्र व्यवहार आहे. त्यात त्यांचे एकमेकांशी असलेला स्नेह, आपुलकी, आदर आणि त्यांच्यातील मतभेद या गोष्टी आपल्याला समजून घेण्यास मदत करते. वर उल्लेखलेल्या दोन्ही पुस्तकात गांधी, नेहरू आणि पटेल यांनी केलेले पत्र लेखन फार कौशल्यपूर्ण केले आहे असे म्हणावे लागेल. अशाने त्यांनी एक साहित्यिक निर्मिती केली आहे. त्यामुळे त्यांचा हा पत्र व्यवहार नीटपणे जपून ठेवला पाहिजे. 

प्राचीन इतिहासकार यांच्या म्हणण्यानुसार पहिले हस्तलिखित पत्र पर्शीयन राणी अटोसा हिने सुमारे ५०० BC मध्ये लिहून पाठविले होते. त्यामुळे संदेश पाठविण्याचा एक भाग म्हणून त्याची लोकप्रियता वाढली आणि पत्र व्यवहार सूरू झाला. असे ही म्हणतात की प्राचीनकाळी भारत, इजिप्त, सुमेर, रोम, ग्रीस आणि चीन या देशांमध्ये पत्र व्यवहार चालत होता. आधुनिक भारतात पत्र व्यवहार सुरळीत चालू झाला तो १७६४ ते १७६६ या कालखंडात. कारण याकाळात ईस्ट इंडिया कंपनीने टपाल प्रणाली तयार करून मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली या शहरात टपाल कार्यालये स्थापन केली. शतकानुशतके लिहिलेली पत्रे आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. ती वाचताना आनंद तर जरूर मिळतो पण त्याशिवाय त्या काळातील लोक, त्यांचे राहणीमान, त्यांचे जीवन याबद्दल भरपूर माहिती मिळते. त्याचप्रमाणे प्रसिद्ध व्यक्तींचा स्वभाव, त्यांचे विचार व ज्ञान यांची माहितीसुद्धा मिळत जाते. आजच्या काळात पत्र व्यवहार हा दुर्मिळ झालेला आहे. व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध असली तरी त्यांचा उपयोग आलेला संदेश पुढे पाठविण्यासाठीच होत असतो. आपण कोणता संदेश पुढे पाठवत आहोत याची जाणीव सुद्धा पुढे पाठविणारा माणूस करत नाही. त्यामुळे सोशल मीडिया म्हणजे अफवा वेगाने पसरविण्याचे एक महत्वाचे माध्यम बनले आहे. त्याचा परिणाम लेखन कलेवर सुद्धा होऊ लागला आहे. भाषिक कौशल्ये विकसित करून स्वतःचे व्यक्तिमत्व तयार करणे कमी होत चालले आहे. व्हाट्सअप, फेसबुक सारखी माध्यमे समृद्धी वाढविण्यासाठी चांगली होती पण त्यांचा गैरवापर होताना दिसत आहे. त्यात वापरलेली इंग्रजी, मराठी किंवा इतर भाषा इतकी अशुद्ध असते की लिहिलेला मजकूर वाचावासा सुद्धा वाटत नाही. अशावेळेस पत्रलेखन महत्वाचे वाटते कारण त्यात भाषा कौशल्य तर आहेच आणि आपल्याला नक्की काय सांगायचे आहे ते नेमकेपणाने व्यक्त होता येते. त्यामुळे आज कालबाह्य झालेला पत्र व्यवहार हवासा वाटतो कारण ते पत्र आपल्या विचारांच्या, प्रेमाच्या, आदराच्या भावना त्यात नमूद करीत असते.

धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...