Skip to main content

Nanyachya Don Baju-नाण्याच्या दोन बाजू

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : २११
विषय क्रमांक : ४
विषय : नाण्याच्या दोन बाजू
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई

जेव्हा आपण नाण्याच्या दोन बाजू असे म्हणतो तेव्हा आपण नाण्यावर असलेला छापा आणि काटा इतकाच मर्यादित विचार करीत नसतो. इथे एवढेच म्हणावयाचे असते की एकाच गोष्टीला दोन पैलू असतात. म्हणजे दोन्ही बाजू एकाच संदर्भाच्या चौकटीतून काम करताना एकमेकांच्या विरुद्ध शक्यतांचे प्रतिनिधित्व करीत असतात. याचा अर्थ असा आहे की ज्या दोन गोष्टी आपल्याला वरवर विरुद्ध दिसतात पण मूलभूतपणे त्या समान असतात. शोकांतिका आणि विनोद, शिक्षण आणि तत्वज्ञान, प्रेम आणि द्वेष, आस्तिक आणि नास्तिक, श्रद्धा आणि संशय, वेग आणि विस्थापन, अगतिकता आणि लवचिकता अशा  काही उदाहरणांचा वापर आपण नाण्याच्या दोन बाजूचा अर्थ समजून घेताना होऊ शकतो. आपल्याला दिसताना दोन गोष्टी खूप दूर असलेल्या दिसतात पण त्या खूप खोलवर एकमेकांना जोडलेल्या दिसतात. असे बघा जेव्हा आपण उत्साही असतो तेव्हा आपल्याला आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात आणि जेव्हा आपण एखाद्या तणावाखाली असतो तेव्हा खूप अस्वस्थ असतो. जेव्हा बऱ्याच दिवसानंतर आपण एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटायला जातो तेव्हा सुरुवातीला आपण अस्वस्थ असतो. मग भेटल्या नंतर आपण आनंदी होतो किंवा उत्साहित होतो. तेव्हा जाणविते की उत्साह आणि अस्वस्थता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक असलेल्या मानसशास्त्रज्ञ Kelly McGonigal आपल्या, 'The Upside of Stress' या पुस्तकात म्हणतात, "तणाव हा नेहमीच खलनायक नसतो. खर तर तो मौल्यवान संसाधनसुद्धा असू शकतो. त्यातून आपण चांगल्या वाटाघाटी करून आपल्या कामात यशस्वी होऊ शकतो ". असे सांगून ते पुढे लिहितात," तणावाची संवेदना काहीही असो, त्या दूर करण्याचा प्रयत्न करू नका. तणावामुळे तुम्हाला मिळालेली ऊर्जा आणि निर्माण झालेले सामर्थ्य यांचा वापर करून तुम्ही तुमच्या कामावरच लक्ष केंद्रित करा". (Stress is not always the villain of the piece. In fact, it can be a valuable resource. It helps us negotiate better and enhance our performance on test. She further says, " whatever the sensation of stress are, worry less about trying to make them go away, and focus more on what you are going to do with the energy, strength and drive that stress gives you).  म्हणून मला इथे माझ्या वाचनात आलेल्या एका इंग्रजी वाक्याची आठवण होत आहे. ते वाक्य असे आहे,' "Never let good crisis go to waste, the things we dread can be the thing that lift us up ".  याचा मराठीत अर्थ करायचा झाल्यास असे म्हणता येईल की, "चांगले संकट कधीही वाया जाऊ देऊ नका, आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटत असते तीच गोष्ट आपल्याला यशस्वी बनवत असते". याचाच अर्थ सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी सुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतात.

सुप्रसिद्ध तत्ववेत्ता विल्यम डेव्हिड रॉस यांच्या म्हणण्यानुसार तत्वज्ञान आणि शिक्षण हे सुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याचे विश्लेषण करताना रॉस लिहितात की तत्वज्ञान हा चिंतनशील भाग आहे आणि शिक्षण हा त्या नंतर येणारा सक्रिय भाग आहे. जर आपण बघायला गेलं तर एक गोष्ट जाणवेल की तत्वज्ञान आणि शिक्षण यांचा काहीच संबंध नाही. कारण तत्वज्ञान ही एक कला आहे आणि शिक्षण एक स्वतंत्र गोष्ट आहे. तरीसुद्धा त्यांचा संबंध खूप खोल आहे. तत्वज्ञान हे जीवनाचे सर्वोच्च उद्दिष्ट शोधण्याचा एक मार्ग आहे. तत्वज्ञान मानवाला आपले शिक्षण वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊन करण्यासाठी काही मूल्यांची निर्मिती करते. म्हणून तत्वज्ञान हा शिक्षणाचा प्रमुख विषय आहे आणि त्याच्यात घनिष्ट संबंध आहे. शिक्षण नेहमी विद्यार्थ्यांना आपल्या मूळ वर्तनात बदल करायला शिकविते आणि चांगल्या मार्गांवर जाण्यासाठी प्रयत्न करीत असते. त्यासाठी काही मूल्यांची गरज असते. ही मूल्ये आपल्याला तत्त्वज्ञानातून मिळू शकतात. कारण मुलांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा ही गोष्ट तत्वज्ञान शिकविते. शिक्षण ही एक प्रयोग शाळा आहे की ज्यात तात्विक अनुमान आणि सिद्धांत तपासले जातात. याचाच अर्थ तत्वज्ञान हा शिक्षण संस्थेकडे जाणारा मार्ग आहे. तत्वज्ञान ही एक सत्याचा शोध घेणारी कला आहे. विश्वाचे आणि माणसाचे वास्तविक स्वरूपाचे विश्लेषण तत्वज्ञान करीत असते. मग त्या विश्लेषणाचे रूपांतर कल्पनांमध्ये करून त्या लिखित स्वरूपात मांडल्या जातात. मग पुढे वादविवादातून आव्हान दिले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून समुदायामध्ये एकमत झाल्यानंतर ते व्यापकपणे स्वीकारले जाते. म्हणूनच तत्वज्ञान हा प्रथम चिंतनाचा भाग आहे तर शिक्षण त्यानंतरचा सक्रिय भाग आहे. सुप्रसिद्ध तत्ववेत्ता जॉन ऍडम यांनी एक सुंदर विचार मांडताना म्हटले आहे की शिक्षण ही तत्वज्ञानाची गतिशील बाजू आहे. ती तत्वज्ञान आणि शिक्षण यांच्यातील संबंधाना सुंदरपणे समाविष्ट करते. म्हणूनच सर्व महान तत्वज्ञानी हे स्वतः शिक्षक होते. सॉक्रेटिस आणि प्लेटोपासून अनेक महान तत्ववेते तर होतेच पण महान शिक्षकसुद्धा होते. त्यांनी शैक्षणिक योजनांवर त्यांचा तात्विक दृष्टीकोनही प्रतिबिंबित केला आहे. म्हणून शैक्षणिक चळवळीचे मूळ तत्वज्ञानी विचारसरणीच्या शाळांकडे आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की शिक्षण हा तत्वज्ञानाचा एक विस्तारीत भाग असून ज्ञान आणि वस्तुस्थितीचा सकारात्मक प्रसार करून जनमाणसात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याचे काम करीत असते.  थोडक्यात असे म्हणता येईल की तत्वज्ञान जीवनाचे ध्येय निश्चित करते तर शिक्षण ते ध्येय साध्य करण्याचे साधन आहे. म्हणून विल्यम डेव्हीड रॉस म्हणतात की तत्वज्ञान आणि शिक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

यानंतर आपण आस्तिक आणि नास्तिक या दोन गोष्टींकडे वळूया. आस्तिक हा देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो आणि त्याला या जगाचा निर्माता आणि शासक मानतो. नास्तिक असे मानतो की या जगात देव कुठल्याही रूपात अस्तित्वात नाही आणि विश्वाची निर्मिती मानवानेच केलेली आहे. नास्तिकाचे म्हणणे असे आहे की  माणूस हा उत्क्रांतीतून निर्माण झालेला प्राणी आहे. इथे माणसाला स्वतःची ओळख होणे फार जरुरीचे आहे. कारण मनुष्याचे सर्व वाद-विवाद, दुःख, चिंता  भय त्याने स्वतःबद्दल मांडलेल्या कल्पनेवर आधारित आहेत. जेव्हा आपण या दोन्ही गोष्टींकडे बारकाईने पाहिले तर आपल्याला जाणवेल ही नकारात्मक प्रणाली सुद्धा एक विश्वास प्रणाली आहे. आस्तिक आणि नास्तिक यांच्या सर्व विचारकरण्यांच्या विश्वास प्रणाली मेंदूपासून उगवतात आणि त्यांच्या मनात ते विचार घट्ट बसून राहतात. म्हणून ही समस्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून सोडविणे कठीण होत जाते. जीवन आणि प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व स्पष्ट करण्याच्या शक्यता अनंत आहेत. ते देवासारखे काळे किंवा पांढरे असू शकत नाही. लाकडाच्या अग्नीने उजळलेल्या गुहेच्या भिंतीवरील माणसाच्या सावली प्रमाणे सर्व भौतिक स्वरूपातील जीवनाचे केवळ अंदाज बांधता येतील. पण ते सत्य आहेत की नाही याचे  कुठलेही ज्ञान आपल्याला मिळू शकणार नाही. म्हणून देवासारख्या मोठ्या गोष्टींची उपस्थिती किंवा अनुपस्थितीचा पुरावा कधीही वैज्ञानिक मार्गाने एकमत होऊन मिळेल याची कुठलीही शक्यता आजतरी वाटत नाही. मानव स्वतःची निर्मिती कधीच पाहू शकत नाही. त्यावर तो फक्त विचारांचे लेबल लावू शकतो पण ते करताना तो काही नियम तयार करतो आणि त्या नियमाद्वारे तो विश्वासाने जीवन जगत जातो. हे नियम नास्तिक आणि आस्तिक यांना सारखेच असतात. जसे मानव स्वतःची निर्मिती पाहू  शकत नाही तसेच तो स्वतःचा चेहरा प्रतिबिंबाच्या पद्धतीशिवाय पाहू शकत नाही. त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी खऱ्या असल्याच्या  समजतो पण त्या खरेपणाची  खात्री आपण पूर्णपणे देऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वाची उत्पती ही शब्दश: असंख्य पर्याय आणि शक्यतांसह  नेहमीच एक प्रश्न बनून राहणार आहे आणि त्याची उत्तरे वैज्ञानिक दृष्टीकोनाचा उपयोग करून मानवी विचारातूनच होऊ शकेल. म्हणूनच नास्तिकता आणि आस्तिकता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यांचे दोन्ही समर्थक एकाच संगीतावर नाच करून एकमेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात की ते ऐकत असलेले संगीत इतरांपेक्षा अधिक वास्तविक आहे.

सुख आणि शांती या सुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवी जीवनात सुख आणि शांती असेलच असे नाही. याला कारण आहे एका मानवाला दुसऱ्या मानावापासून भीती आणि भय वाटत असते. त्यामुळे तो त्या मानव समूहाचा सतत द्वेष करीत राहतो आणि आसपासचे सलोख्याचे  वातावरण बिघडवून टाकतो. अशी माणसे आपणच फक्त हुशार आणि सर्वकाही स्वतःला शक्य आहे असे वातावरण तयार करून जीवन जगण्याचा मार्ग त्रासदायी करून टाकतात. अशा अशांत वातावरणाकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की मानावाचे मन अशांत होण्यास त्याच्या मनामध्ये विकृत विकार कारणीभूत आहे. असे विकार विकृत होण्याचे मूळ कारण म्हणजे माणसाच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना किंवा मनाविरुद्ध करावे लागलेले काम. या गोष्टीतून माणूस कधीच मुक्त होणार नाही कारण अशा अप्रिय गोष्टी घडत राहणारच. त्यासाठी माणसाने त्याचे मन त्याच्या आवडत्या गोष्टीमध्ये गुंतत ठेवणे फार जरुरीचे आहे. नाहीतर माणसाच्या मनात निर्माण झालेला विकार माणसाची विवेकबुद्धी नष्ट करून टाकेल. या गोष्टीचा परिणाम मानवाच्या शरीरावर होत जाईल. कारण मानवी शरीर आणि मन यांचेसुद्धा परस्पर संबंध असून ते सुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर आपल्याला सर्व विकारांवर मात करायची असेल तर सत्याला सामोरे जाणे किंवा सत्य समजून घेणे जरुरीचे आहे. तरच जीवन जगण्याची कला आपण आत्मसात करू शकतो. तेव्हाच मानवी शरीराला आणि मनाला सुख आणि शांती मिळू शकते. असाच प्रकार आपल्याला विनोद आणि शोकांतिका याबाबतीत सुद्धा म्हणता येईल. कारण विनोद ही शोकांतिका आणि वेळ आहे. विनोदी माणूस एखाद्या विषयावर विनोद करतो तेव्हा प्रेक्षक घेत असलेला श्वास हा शोकांतिकेचा प्रतीक असतो. सुप्रसिद्ध इंग्लिश कादंबरिकार आणि कवी थॉमस हार्डि यांचे एक सुंदर वाक्य आहे. ते म्हणजे, " All Comedy is tragedy, if you look deep enough into it". हेच मराठीत म्हणायचे असल्यास असे म्हणता येईल " जर बारकाईने विचार केला तर असे जाणवेल की सर्व प्रकारचे विनोद शोकांतिका असते". म्हणून शोकांतिका आणि विनोद एकमेकांशी परस्पर संबंधित आहे. यासाठी  सुप्रसिद्ध विनोदी कलाकार जॅक डी म्हणतात, "Comedy and tragedy are two sides of same coin. A talent in one area might also lead to a predisposition in the other". याचा अर्थ विनोद आणि शोकांतिका एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एका क्षेत्रातील प्रतिभा दुसऱ्या क्षेत्रातील पूर्वस्थिती असू शकते.

नाण्याला दोन बाजू असतात ही गोष्ट समजून घेण्यासाठी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे अगतिकता आणि लवचिकता. जेव्हा आपण लवचिकता म्हणतो तेव्हा त्यात अशी कल्पना असते की प्रतिकूल परिस्थितीत माणसाला पुढे जाण्यासाठी काहीं संरक्षणात्मकता कार्यरत असते. अगतिकता अगदी याच्या विरुद्ध असते. जरी लवचिकता शक्ती म्हणून समजली गेली तर अगतिकता अनेक ठिकाणी कमकुवत समजली गेली आहे. याचा अर्थ असा होतो की माणूस जीवनात कशाप्रकारे काम करतो यावर अगतिकता आणि लवचिकता अवलंबून असते. असे म्हणतात की मनुष्य जीवनाची वाटचाल करताना तो अधिक अगतिक बनतो तेव्हाच तो जास्त लवचिक बनत जातो. हे वाक्य जरा गोंधळात टाकणारे आहे.  त्यासाठी  माझ्या वाचनात आलेला एक संदर्भ आठवतो. तो संदर्भ असा आहे की कोणत्याही गोष्टीचा अतीरेक शून्यापासून होण्यासाठी चांगला आहे. कारण त्यात असुरक्षितता समाविष्ट असते. त्यामुळे आपण त्या गोष्टीशी जुळवून घेतो आणि पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करतो. म्हणून अगतिकता आणि लवचिकता या दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधात असून एकमेकांशी परस्पर संबंधित आहे. अगतिक असणे, बदल घडवून आणण्यासाठी तयार असणे आणि प्रतिकूलतेला लवचिक असणे या गोष्टी मुळामध्ये समानच आहे. कारण ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शक्यतेशी जुळवून घेण्यास मदत करते आणि आपल्याला सक्षम बनविते. म्हणून तुम्ही जितके अगतिक असाल तितक्या जास्त संधी तुम्हाला जीवनात वावरत असताना दिसतात, तेव्हाच तुम्ही जास्त लवचिक बनत जातात. कारण तुमच्या समोर येणाऱ्या परिस्थितीमध्ये अगतिकता आणि लवचिकता असण्याची दाट शक्यता असते. म्हणून अगतिकता आणि लवचिकता  एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटल्यास गैर ठरू नये.

एकाच नाण्याच्या दोन बाजू या अभिव्यक्तीमध्ये भिन्न असणाऱ्या पण प्रत्यक्ष संबंधित असलेल्या गोष्टींचा संदर्भ नीटपणे समजवून सांगण्याचा प्रयत्न वर केला आहे.

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...