Skip to main content

Manus Kharach Badalato ka? माणूस खरंच बदलतो का?

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : २१०
विषय क्रमांक : ४
विषय : माणूस खरंच बदलतो का?
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई

माणूस हा प्राणिसृष्टीचा एक महत्वाचा भाग आहे. पुढे त्याने प्राणिसृष्टीचा त्याग करून स्वतःची अशी एक मानव सृष्टी निर्माण केली. त्यात त्याने नैसर्गिक अडचणीवर मात  करण्याची शक्ती निर्माण केली. याप्रकारात त्याने स्वतःच्या बुद्धीचा विकास केला आणि स्वतःचे जीवन विवेकाने जगण्यास शिकला. त्या विवेकाच्या आधारे त्याने नुसत्या हत्यारांचा शोध लावला नाही तर स्वबळावर त्याने प्रगत विज्ञानाची आणि सभ्य संस्कृतीची निर्मिती केली. ते करताना त्याने भाषेची निर्मिती तर केलीच पण स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याने मिथकांचीसुद्धा निर्मिती केली. स्वतःला जगण्यासाठी त्याने शेतीची निर्मिती केली. त्यासाठी जंगलतोड केली आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संरक्षणासाठी राज्यव्यवस्था तयार केली आणि त्या राज्यव्यवस्थेला संरक्षण देण्यासाठी त्याने सैन्याची उभारणी केली. या त्याच्या विकास कामात तो एका ठिकाणी कुठेही थांबला नाही. मानवसृष्टी अनेक दृष्टीने विकास पावण्यासाठी तो सतत प्रयत्नशील राहिला. त्यासाठी त्याने अनेक कल्पनांचे यशस्वी प्रयोग केले. हे करताना त्याने कोणत्याही अदभूत शक्तीची मदत घेतली नाही. तो स्वप्रयत्नांनी स्वतःचा शिल्पकार बनत गेला. हे सर्व करताना त्याने माणुसपण प्राप्त केले आणि ते माणूसपण जपण्यासाठी तो स्वतःच्या प्राणाची बाजीसुद्धा लावायला तयार होत गेला. याचाच अर्थ मानव जसजसा उत्क्रांत होत गेला तसतसे त्याचे सिद्धांत विकसित होत गेले. त्यातून एक नविन सामाजिक असा मानवी समाज तयार झाला. हा प्रकार माणूस सोडला तर इतर प्राणिसृष्टीत नाही झाला. आजवर मानवाने माणूस म्हणून प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. त्यात प्रामुख्याने तत्वज्ञ, साहित्य व कला यांची निर्मितीसुद्धा केली. म्हणून जेव्हा माणसाचा आपण माणूस म्हणून विचार करतो तेव्हा माणसाचे बाह्य आणि अंतर्विश्व जाणून घेताना एक गोष्ट नेहमीच जाणविते ती म्हणजे निसर्गातील बदल आणि त्याचे स्वरूप समजून स्वीकारण्याची क्षमता फक्त मानवातच आहे. म्हणून माणसाचा उत्क्रांतीपासूनचा प्रवास पाहिला तर आपल्याला नक्कीच जाणवते की  माणूस खरंच बदलत असतो. 

वर म्हटल्या प्रमाणे माणसाला बदलणे फारच गरजेचे आहे. त्याशिवाय तो हवा असलेला सामाजिक बदल घडवू शकणार नाही. या सामाजिक बदलाची सुरुवातसुद्धा माणसापासूनच होते. याला कारण आहे त्याने घेतलेले शिक्षण आणि आत्मसात केलेल्या सांस्कृतिक गोष्टी. यामुळे माणूस मोठया मानवी समुदयांबरोबर कठीण संभाषण अगदी सोप्या भाषेत करू शकतो. म्हणून मानवी समूहात नुसते कायद्यात बदल करून सांस्कृतिक गोष्टी व पारंपारिक गोष्टी बदलू शकणार नाही. त्यासाठी माणसामाणसांमध्ये संवाद हवा, नातेसंबंध भक्कम हवे. कारण हे सर्व बदल सांस्कृतिक दृष्ट्या मानवी समाजावर दीर्घकाळ परिणाम करीत असतात आणि हे परिणाम चांगले आहेत की वाईट आहेत हे पुढे येणारा काळच ठरवत असतो. माणूस हा नेहमीच विद्यार्थी म्हणूनच गणला जातो पण जेव्हा तो झपाट्याने बदलणाऱ्या समाजाचा सदस्य होतो तेव्हा हे बदल पुढील काळात कसे प्रभाव टाकतात हे त्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर स्त्री शिक्षणाचे द्यावे लागेल. एकेकाळी महिलांना विद्यापीठात शिक्षण घेता येत नव्हते. आज सर्व वंशाच्या, धर्माच्या व पंथाच्या  स्त्रिया अभ्यास करून वैज्ञानिक विश्लेषण करतात आणि मानवी समाजाला सुसंस्कृत बनविताना दिसत आहे. म्हणून आज सामाजिक परिवर्तन होताना दिसत आहे. असा बदल घडविताना आपण इतर मानवी समाजाशी कसा आणि केव्हा संवाद साधतो हे फार महत्वाचे आहे. कारण हे वैचारिक बदल राजकीय, आर्थिक व सामाजिक गोष्टींवर  प्रेरित होत असतात. असे सामाजिक बदल माणूस तळागाळातील माणसांबरोबर सूरू करतो आणि पुढे जाऊन त्या बदलांचा परिणाम मोठया प्रमाणात राज्यकर्त्यांवर होतो व त्याचे रूपातंर कायद्यात होते. कधी कधी असा बदल उच्च स्तरावरून खालच्या स्तरावरसुद्धा होऊ शकतो. त्यासाठी माणसाला इतर माणसांची मते ऐकावी लागतात, दुसऱ्या व्यक्तींचा दृष्टीकोन अभ्यासावा लागतो व त्यांच्याशी संवाद करत आपली सामाजिक मते मांडून आवश्यक असलेला बदल घडवून आणू शकतो. सामाजिक बदल हा माणसांसाठी खूप वेगळा विषय आहे. तो घडवून आणण्यासाठी माणसाला स्वतःच बदलणे गरजेचे आहे. त्याने जोपासलेल्या अनेक पारंपारिक गोष्टींचा त्याग करणे जरुरीचे आहे. म्हणून माणसाला बदलणे गरजेचे आहे. त्याशिवाय सामाजिक बदल होऊच शकत नाही. आजवर झालेले सामाजिक बदल पाहता आपण म्हणू शकतो की माणूस खरंच बदलत राहिला आहे.

माणूस एक अजब रसायन आहे. तसे बघायला गेलं तर प्रत्येक प्राणिसृष्टी निसर्गाचे कैदी आहे. त्यात मानव प्राणीसुद्धा आहे पण तो विचाराने मुक्त आहे. या जगात माणसांची संख्या जवळजवळ ८०० कोटी असेल. यात प्रत्येकजण स्वतंत्र नमुना आहे. त्या प्रत्येक माणसात जबरदस्त इच्छाशक्ती, इरसालपणा, बेरीकीपणा यासारखी काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे माणसाबद्दल कोणतेही अंतिम विधान करणे शक्य होत नाही. कारण माणूस हा स्वतः उत्क्रांत होत गेलेला प्राणी आहे. त्याचा हा उत्क्रांती पासून आजपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. स्वतःच्या सामर्थ्यावर त्याने मानवी जीवनात विलक्षण क्रांती घडवून आणली. सुरुवातीला त्याने आगीचा शोध लावला मग शेतीचा शोध लावत स्वतःच्या संरक्षणासाठी अनेक हत्यारे बनविली. स्वबळावर त्याने औद्योगिकीकरण करून सर्व मानवी जगाला एकत्र आणले. रेल्वे, टेलिफोन, विमाने, रेडिओ, मोटरी, दूरदर्शन, संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन सारखे शोध लावून मानवी जीवन समृद्ध केले. त्यात त्याने स्वतःचा फायदा तर बघितलाच पण मानवी जीवन सुंदर बनविण्यासाठी मोठा त्यागसुद्धा केला आहे. म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत व लेखक रावसाहेब कसबे आपल्या धर्मग्रंथ आणि मानवी जीवन या पुस्तकात म्हणतात, "माणसाला निसर्गातून बाहेर काढण्यात, त्याला माणूस बनविण्यात आणि त्याच्या नव्या जगाच्या निर्मितीत त्याच्या हातांनी जी भूमिका पार पाडलेली आहे, तिला तोड नाही. हाताने केवळ बाह्य जगातील वस्तूंचीच निर्मिती केली असे नाही, तर हातांनी मानवी मनाच्या तीक्ष्ण धारेची भूमिकाही बजावलेली आहे. त्यामुळेच  संस्कृती म्हणजे केवळ कलाकुसरीने निर्माण केलेल्या सुंदर वस्तू नाही, तर ती मानवी कृतीतून घडलेल्या घडामोडी आणि हालचाली यांची सतत सुधारत जाणारी आणि विकास पावणारी घटनांची मालिका आहे. ती एक अविरत चाललेली प्रक्रिया आहे. शेवटी, माणसाने स्व-प्रयत्नाने कमावलेला हात सतत कामात गुंतवून ठेवल्यामुळे त्याची भविष्यातील आगेकुच आश्वासक बनली आहे ". यावरून लेखक आपणास सांगू इच्छितात की माणसाचा सारा प्रवास हा गुंतागुंतीचा जरी असला तरी तो मानवाला समृद्धीकडे नेणारा आहे. याचाच अर्थ माणूस नवीन निर्मिती करत राहणार आणि त्यासाठी त्याला स्वतःला बदलत राहावेच लागणार आहे.

आज माणसातील विवेक आणि जाणीव या गोष्टी भौतिकेच्या आधारे स्पष्ट करता येतात हे सिद्ध झाले आहे. मानवी अस्तित्वाच्या लढाईत निवडीला वाव असतो आणि त्यासाठी अनेक पर्याय असतात. जेव्हा आपण एखादा पर्याय निवडतो तेव्हा त्यातून आपण अस्तित्वताचे प्रश्न सोडवू इच्छित असतो. हे प्रश्न सोडविण्यासाठी भौवतालची परिस्थिती,  माणसाचे शारीरिक कौशल्य व त्याची बुद्धिमत्ता याचा वापर होत असतो. बऱ्याचदा हे प्रश्न सोडविण्यासाठी भावनेचा विचारसुद्धा केला जातो. यासाठी काही मनोवैज्ञानिक म्हणतात की माणूस ज्या गोष्टीचा शोध घेतो किंवा ज्या गोष्टीची निर्मिती करतो, त्या गोष्टी निसर्गातच असतात. याचा अर्थ नीटपणे समजून सांगताना विचावंत आणि लेखक रावसाहेब कसबे म्हणतात," माणूस आणि निसर्ग यांचे संबंध अतूट आहे आणि माणसात शोध घेण्याची एक सुप्तशक्ती अस्तित्वात आहे. माणूस सोडून इतर प्राण्यात ती शक्ती नसते. निसर्ग आणि माणूस यांचे नाते निसर्गमय आणि मानवी शोध यांचे संबंध ठरवित असतात. हे संबंध सर्वकाळी आणि सर्वांसाठी तंतोतंत एकसारखे कधीच नसतात. त्यामुळे विविध कालखंडात विविध प्रकारच्या प्रतिभावतांनी जी कलानिर्मिती केली, तिच्यात विपुल प्रमाणात विविधता आढळते. माणसाची प्रतिभा एकाचवेळी चिकित्सा आणि समन्वय अशा दुहेरी संबंधानी शोध घेत असते. निसर्गात काय आहे, याचा शोध घेण्याचे व तपशील जमा करण्याचे आणि त्यातून कच्चा आराखडा तयार करण्याचे काम चिकित्सा करीत असते. परंतु, हा सारा सुटा तपशील एकत्र करण्याचे, त्या कच्च्या आराखड्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सर्जनक्षमतेने त्याला एक नवे रूप, एक नवा आकार देण्याचे काम मात्र समन्वयच्या प्रक्रियेलाच करावे लागते. या सर्वातून साकार झालेली कला ही इंद्रियजन्य असते".  असे सांगून ते पुढे लिहितात, " माणसाचे एक वैशिष्ट्ये असे आहे की, माणूस त्याच्या प्रत्यक्ष जगण्याच्या प्रक्रियेत अधिक चांगला माणूस होण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करीत असतो आणि त्यात त्याला आनंद मिळत असतो. तो जी निर्मिती करतो, तिच्यावर त्याचे जीवापाड प्रेम असते. आपली निर्मिती अधिक कौशल्यपूर्ण कशी होईल, यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. आजही आपल्याला माणसाने निर्माण केलेली अनेक स्मारके दिसतात. ती स्मारके भलेही कुठल्या न कुठल्या तरी राजाच्या  धर्माच्या, महापुरुष किंवा रूढीपरंपरांची स्मृती जागृत करणारी असोत. त्यात आपल्याला दिसेल की ती स्मारके म्हणजे मेलेल्या पूर्वजांचे त्यांच्या आज जिवंत असलेल्या वंशजाशी असलेले संवाद आहेत. त्याचप्रमाणे माणसाने त्याच्या हातांनी निर्माण केलेली हत्यारे असो किंवा शिल्पे व मंदिरे असोत, ती सर्व त्याच्या दूरदृष्टीची अमूल्य अशी साधने आहेत ". याचाच अर्थ असा की माणसाला अधिक कौशल्यपूर्ण अशी निर्मिती करायची असेल तर त्याला स्वतः मध्ये खरंच बदल घडवावा लागेल.

माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे. समाजाशिवाय तो एकटा जगू शकणार नाही. जेव्हा आपण समाज असे  म्हणतो तेव्हा व्यक्तीचा समूह असे गृहीत धरत असतो. मग व्यक्ती म्हटले की त्याचा स्वभाव आला. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असू शकतात. जेव्हा माणसांचे विचार एकमेकांशी पटतात, तेव्हा काहीच प्रश्न नसतो. जेव्हा काही लोकांचे व्यक्तिमत्व आपल्याला आवडणारे असणार नाही किंवा आपले विचार त्यांच्याशी जुळणारे सुद्धा असणार नाही, तेव्हा काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. अशावेळेस अशा व्यक्तींना  शक्य असल्यास टाळू शकतो. जर अशा व्यक्तींना टाळणेही शक्य नसेल तर माणसाला काही तडजोडी करून बदलावे लागेल. अशा वेगवेगळ्या विचारांची आणि आपल्याला न आवडणारी माणसे आपल्या कार्यालयात, संघटनेत, घरात किंवा आपण ज्या भागात राहत असतो तेथे असतात, तेव्हा त्यांना नुसते टाळता येण्यासारखे नसते. आपल्याला त्यांच्याशी जुळवून घ्यावेच लागते. त्यासाठी माणसाला त्याच्या विचारांची आणि मनाची कक्षा विस्तारीत करणे जरुरीचे आहे. त्यात माणसाचे मोठेपण सिद्ध होत असते. याला कारण प्रत्येक मानवाला निसर्गाने त्याच्या स्वभावाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला आहे. म्हणूनच माणसाने बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याला त्याच्या विचारांमध्ये बदल करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचावी लागेल आणि आपली दिनचर्या बदलावी लागेल. प्रत्येक गोष्ट व्यवहारी दृष्टीकोनातून न बघता स्वतःला विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तेव्हाच जगात नवी निर्मिती होऊ शकेल. त्यासाठी माणूस खरोखरच बदलला पाहिजे. त्यासाठी तो ज्ञानी झाला पाहिजे. इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे ज्ञान केवळ माहिती नव्हे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहिती गोळा करणे सुलभ झाले आहे आणि ती मिळविण्यासाठी एक स्पर्धा सूरू झाली आहे. अशा स्पर्धेत माणसाला ज्ञान मिळत नसते. इथे परत एकदा मला रावसाहेब कसबे यांच्या धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह या पुस्तकातील एक उतारा आठवत आहे. त्यात ते म्हणतात, " ज्ञान ही माणसाने स्वतःची जबाबदारी स्वतःच स्वीकारण्याची जीवननिष्ठा असते". असे सांगून ते पुढे लिहितात, " आज माणसाची सारी शक्ती वेगाने बदलणाऱ्या वास्तवाशी संवादी राहण्यातच खर्च होत आहे.  त्यामुळे त्याचे जगणे नीरस आणि जटील बनले आहे. म्हणून त्याला आज माणसाच्या ज्ञानाची, स्वतःच्याच ज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. हे स्वत्वाचे ज्ञान त्याला यातून मुक्ती देऊ शकेल. त्याची वाट पाहत असलेल्या विविध कलांतील आनंद आणि साहित्याचे रस हे सत्वाचे ज्ञानच त्याला प्राप्त करून देतील आणि विज्ञानाचे स्पष्टीकरणही त्याला त्यातून लाभेल". म्हणून वैज्ञानिक पद्धतीने वैचारिक सिद्धांत मांडताना माणसाला खरंच बदलावे लागेल.

वरील केलेल्या विश्लेषणावरून असे म्हणता येईल की माणूस हा त्याच्या उक्रांतीपासून खरोखरच बदलला आहे आणि नव निर्मितीसाठी तो आजही खरंच बदलत आहे.

धन्यवाद 


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...