रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २०७
विषय क्रमांक : ४
विषय : उद्याचे दडपण येते
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
आजच्या एकविसाव्या शतकात माणसाने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाची काही वैशिष्ट्ये आहेत. या शतकाने संगणक, इंटरनेट, उपग्रह आणि मोबाईल सारख्या साधनांची निर्मिती करून देशादेशातील सीमा पुसट करण्याचे कामही चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यामुळे जागतिक व्यापारास एक नवीन दिशा मिळून त्यास चांगलीच गती मिळाली. पण त्याचा उपयोग मानव जातीचा विकास होण्यापेक्षा मानवी जीवनात खूप प्रमाणात विषमता वाढू लागल्याचे दिसू लागले. विज्ञानाने नवीन शोध लावले जरूर पण त्याचा उपयोग समाजातील तळागाळ्यातील माणसांना होण्यापेक्षा फक्त श्रीमंत वर्गाला होऊ लागल्याचे जाणवत आहे. आज सेवाक्षेत्र महत्वाचे बनले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती सेवाक्षेत्रात काम करून श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत आहेत. ती त्यांनी जरूर पाहावी, त्यासाठी कुणी नाही म्हणत नाही. पण ते होत असताना मूल्यांपेक्षा किंमत मोठी ठरू लागली तर भावनेपेक्षा भौतिक सुख मोठे वाटू लागले आहे. पूर्वी व्यवहार यापेक्षा माणुसकीला महत्व असायचे त्यामुळे नाती जपली जायची. आता व्यवहार मोठा मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीस अचानकपणे काही मदत हवी असेल तर ती देण्यापेक्षा हल्ली माणूस व्यावहारिक दृष्टीकोन उच्च मानून तो करू शकत असलेली मदत नाकारत असतो. इथे माणूस खोट्या भौतिक सुखाच्या मागे जात असल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ तो कमालीचा आत्मकेंद्रित झालेला वाटतो. मग तो समूहात न राहता फक्त व्यक्ती पूजक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुठल्याही विचारांपेक्षा कृती महत्वाची असे विचार सर्वत्र पसरू लागतात. कुठलीही कृती करण्या अगोदर त्यामागे एखादा विचार असावा लागतो पण तो विचार एका माणसाला बरोबर वाटला तसा तो दुसऱ्या माणसाला बरोबर वाटणार नाही. कारण प्रत्येक माणसातील संवेदना त्या माणसाला बरोबर वाटलेल्या विचारांमुळे सुखावलेल्या असतील असे म्हणता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक विचार कृतीत आणताना माणसा माणसांमध्ये संवाद असावयास हवा. असा संवाद आज आपल्याला हरवलेला दिसत आहे. त्यामुळे उद्या होणारी एखादी कृती जर कुठल्याही विचारांवर आधारलेली नसेल तर त्याचे दुष्परिणाम प्रत्येक माणसाला भोगावे लागतील याची जाणीव प्रत्येक मानवी समाजाला होत आहे. म्हणूनच माणसाला उद्याचे दडपण येत आहे.
एकविसाव्या शतकामध्ये प्रत्येक मानवाला विकास करायचा असेल तर त्याला शिक्षण हे महत्वाचे साधन वाटले पाहिजे. तसे बघावयास गेले तर शिक्षणाची गरज एकोणिसाव्या शतकापासून सतत भासत होती. महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षण फार गरजेचे आहे असे सांगून ते म्हणतात, " जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील". पुढे ते म्हणतात, " शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन कसे जगावे, जीवन का जगावे, जीवनाची सार्थकता कशात आहे, जीवन पूर्ण कसे कसे करावे या सर्वांची उत्तरे शिक्षणात आहे. म्हणून शिक्षण हे घेतलेच पाहिजे ". किती दूरदृष्टी महात्मा फुलेंच्या विचारांमध्ये आहे याची जाणीव त्यांचे चरित्र वाचताना होते. सर्व जमातीतील मुलांना ( खास करून पीडित समाजातील मुलांना) तसेच सर्व समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम पाहता थक्क व्हायला होते. म्हणूनच आज सर्व समाजातील मुले आणि मुली शिक्षण घेतात तेव्हा त्यांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही. आज आपल्याला सर्वांना शिक्षण देताना तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा आणि गुणवत्तेस प्राधान्य देणे या दोन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी आणि त्यांना शिक्षण देणारे शिक्षक यांच्यामध्ये बंध-अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे असायला हवे. कारण शिक्षक हा मुलांवर सुसंस्कार घडवीत असतो. ते करताना मुलांना नितीमूल्यांच्या गोष्टी सांगत त्यांना सकारात्मक जीवनदृष्टी देत असतो. त्यामुळे ही मुले उद्याचे आदर्श नागरिक बनून देशाचे भवितव्य ठरणार आहेत. प्रत्येक विध्यार्थी हा स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याला समजून घेऊन शिक्षकाने त्याचे अवगुण दूर तर केले पाहिजे आणि त्याचे सुप्त गुण लक्षात घेऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला पाहिजे. जर काही विद्यार्थी अभ्यासात योग्य प्रगती दाखवत नाही तर प्रत्येक शिक्षकाने स्वतः आत्मपरीक्षण करून त्या विद्यार्थ्यांच्या समस्यांचा मुळापासून अभ्यास जरून त्यांना चांगले विद्यार्थी बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणावरील जबाबदारी फार मोठी आहे. मुलांना शिक्षण देत असताना आपली कुठलीही वैयक्तिक मते मुलांवरती लादली जाणार नाही याची काळजी शिक्षकांनी घेतली पाहिजे. म्हणूनच साने गुरुजी म्हणतात की खरा शिक्षक असा असतो जो मुलांना पावसात भिजायला शिकवतो, आकाशाची दोस्ती करायला शिकवतो. पण आजची शिक्षणाची परिस्थिती वेगळीच आहे. इथे शिक्षक मुलांना गणिताची सूत्रे शिकवीतात, त्यांना कविता शिकवीतात, विज्ञानाचे प्रयोग करून दाखवतात पण गणिताची सूत्रे शिकताना मुले त्यामागची तर्कसंगती लक्षात घेत नाही. कविता शिकताना त्यातील सौदर्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. विज्ञान शिकतात पण विज्ञाननिष्ठा त्यांच्यात रुजत नाही. त्यामुळे कुठलीही पदवी ही पैशे किंवा नोकरी मिळविण्याचे साधन आहे असे आजचे विद्यार्थी मानतात. जीवन हे एक साध्य आहे, ज्ञान हे कौशल्य आहे असे ते समजत नाही. त्यासाठी ते पाठांतर महत्वाचे मानतात. हल्ली मुलांना खेळण्यासाठी सुद्धा त्यांचे पालक परवानगी देत नाही. बऱ्याच पालकांना खेळ खेळणे म्हणजे वेळ फुकट घालविणे असे वाटत असते. खेळ मुले लवकर शिकतात आणि खेळामुळे त्यांना पुढील आयुष्यात ताण तणाव सहन करण्याची शक्ती येते असे पालकांना समजवून सांगितले तरी कळत नाही. त्यामुळे परीक्षेत जास्त मार्क मिळविले म्हणजे ही मुले हुशार आहेत असाच समज सगळीकडे पसरत चालला आहे. ते पाहून असे वाटते की अशाने उद्या चांगले विद्यार्थी घडू शकणार की नाही म्हणून उद्याचे दडपण येणे साहजिक आहे.
आजच्या वर्तमान काळातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समाजकारणाची जागा राजकारणाने घेतली आहे. देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा पंचशील, लोकशाही राज्यपद्धती, समाजवाद, सत्य आणि अहिंसा या तत्वांचा प्रत्येक ठिकाणी जय जयकार होत होता. आजही तो होत आहे पण त्यात धैर्य नाही, उत्साह नाही. फक्त अहोरात्र शूद्र स्वार्थावार दृष्टी लागली असल्यामुळे आपल्या विचारांचा आणि आचारांचा भावी पिढीवर काय परिणाम होईल याचा विचार कुणीही फारसा करत असलेला दिसत नाही. इथे मला गोपाळ गणेश आगरकरांचे एक लेखन आठवते. ते म्हणतात, " कोणी किती व कसले अन्न खावे, कोणत्या घरात राहावे, कोणते कपडे घालावे, कोणता धंदा करावा, दानधर्म किती करावा, कोणते खेळ खेळावे, कशा प्रकारचा व्यायाम करावा वगैरे गोष्टींचा लोकांशी म्हणण्यासारखा संबंध नाही. अशा गोष्टीत ज्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. याच्या उलट कोणत्याही मनुष्याशी केलेले करार पाळणे, कोणासही निष्कारण त्रास न देणे, खरे बोलणे, शक्तीनुसार परोपकार करणे, कायदे पाळणे, कर देणे वगैरे गोष्टीत लोकांशी संबंध येतो म्हणून त्या रूढ राजकीय व सामाजिक नियमास अनुसरून कार्य करावे जरुरीचे आहे". किती छानपणे आगरकरांनी हे विचार मांडले आहे. आज महाराष्ट्रातील राजकीय प्रकार पहिला तर असे वाटू लागते की येथील विचावंताचे मनसुद्धा अंधाराने भरून राहिले आहे. त्यामुळे असे वाटते की धैर्य, कणखरपणा व झुंजार वृत्ती महाराष्ट्रातील राजकारण्यांमधून नाहीशी झालेली दिसते. प्रत्येक गोष्टीला अधिकारशाहीचा उपयोग होताना दिसत आहे. तेव्हा उद्याचे दडपण आल्याशिवाय राहत नाही. कारण अधिकारशाही प्रत्येक माणसांचे विचारस्वातंत्र्य नाहीसे करते. असा प्रकार फक्त राजकारणात आहे असे समजू नये. हल्ली हा प्रकार सर्वच प्रकारच्या सामाजिक बाबी मध्ये सुद्धा दिसून येत आहे. त्याचे प्रतिसाद आजचे सण साजरे करताना सुद्धा दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास दरवर्षी साजरे होणारे तीन महत्वाचे सण. दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र. हे सण जरूर साजरे झाले पाहिजे यात जरासुद्धा शंका नाही. त्यातून समाजात प्रबोधन होण्यास मदत झाली पाहिजे आणि सर्व समाज एकत्र आला पाहिजे. जेव्हा आपण सार्वजनिक उत्सव साजरे करतो तेव्हा हे उत्सव समूहजीवनाचे वस्तुपाठ बनायला पाहिजे. पण ज्या प्रकारे या सणांचे ध्रुवीकरण झालेले दिसत आहे, त्यातून नागरी जीवनाची शिस्त हरविल्यासारखी वाटत आहे. असे सण साजरे करणारे जी मंडळे आहेत त्यांनी आपली नोंदणी केली पाहिजे, आपला जमाखर्च सामान्य जनतेला उपलब्ध करून दिला पाहिजे. पण हे फारसे होताना दिसत नाही. वर्गणी खंडणी स्वरूपात होताना दिसत आहे. अशा गोष्टी भविष्य काळासाठी चांगल्या नाहीत. म्हणून उद्याचे दडपण आल्याशिवाय राहत नाही.
जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण यामुळे समता दृष्टीत समाज रचना उद्ध्वस्त होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे, कामगारांचे, स्त्रियांचे त्याचप्रमाणे दलित, आदिवासी समाजाचे प्रश्न वेगळे रूप धारण करताना दिसत आहे. प्रेमाने कुठलीही गोष्ट सांगण्यांऐवजी द्वे्षाचा वापर करून समाजाचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. हे सर्व त्वरित थांबले पाहिजे. केंद्रात आज कार्यक्षम सरकार आहे. ते यातून नक्की मार्ग काढतील अशी अपेक्षा आणि आशा आहे. नाहीतर त्यांचे परिणाम पुढील पिढीवर होत राहिले तर उद्याचे दडपण आल्याशिवाय राहणार नाही. जर भविष्यात दडपणा शिवाय जगायचे असेल तर महात्मा गांधींचा उपदेश महत्वाचा आहे. ते नेहमी सांगत असत, " Hate the sin and not the sinner' is percept which, through easy enough to understand, is rarely practiced, and that is why the poison of hatred spreads in the world". मराठीत याचा अर्थ असा होईल की पाप करणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्या पापाचा तिरस्कार करा. हा उपदेश समजण्यास सोपा असला तरी आचरणात क्वचित आणला जातो आणि त्यामुळेच जगात द्वे्षाचे विष पसरले जाते.
तेव्हा द्वेष सोडून प्रेमाची भावना समाजात निर्माण करा म्हणजे उद्याचे दडपण येणार नाही.
धन्यवाद
Comments
Post a Comment