रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २०९
विषय क्रमांक : ४
विषय : सणांना नावं ठेवणे योग्य आहे काय?
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
भारत हा बहुधर्मीय आणि बहुभाषिक देश असल्यामुळे या देशात प्रत्येक सण हे त्या प्रांताच्या पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या देशात काल मोजण्याचा प्रकार शक ज्याने परकीयांच्या स्वाऱ्या हटविल्या अशा पुरुषाच्या नावावरून ओळखण्याचा प्रघात पडला आहे. पुढे पुढे तर शक हाच शब्द काल म्हणून वापरण्यात येऊ लागला. सध्या आपल्याकडे सप्तर्षीकाल, विक्रमकाल, शालिवाहनकाल, बंगाली सन, अमली सन, हिजरी सन, फसली सन, सुरसन, मगीसन, परशुरामकाल, नेवारकाल, लक्ष्मणसेनकाल, राजशक, विलायती सन आणि ख्रिस्तीसन हे मुख्य काल किंवा शक आहेत. त्यापैकी हिजरी सन हा काल मुस्लिम अमदानीत तर ख्रिस्ती सन हा इंग्रजी राज्यात सूरू झाला. फसली सन हा अकबराने इ. स. १५५६ साली सूरू केला. हे सर्व प्रकार कालगणना मोजण्यासाठी भारतात रूढ झाले असले तरी हिंदूंचे सर्वात महत्वाचे सण नक्षत्र, मास, ऋतू वगैरेवर अवलंबून आहेत. ते समजून घेण्यासाठी ऋ्तूंचे, मासांचे, तिथिंचे व इतर गोष्टींचे ज्ञान असणे जरुरीचे आहे. ऋतुंवरून काही सण प्रचारात आणले गेले आहेत. गुढीपाडवा किंवा संवत्सरप्रतिपदा, अक्षयतृतीया, चातुर्मास, श्रावणी, नारळीपौर्णिमा, विजयादशमी किंवा दसरा, दीपावली, छात्रीपूजन, मकरसंक्रात, वसंतपंचमी, होळी व शिमगा हे सर्व सण ऋतुंवरून निर्माण झालेले आहेत. श्रीरामनवमी, परशुराम जयंती, कृष्णजन्माष्टमी, त्रिपुरा पौर्णिमा, महाशिवरात्री, गणेश चतुर्थी, वटसावित्री, मंगलागौरी, ऋषींपंचमी, अनंतचतुर्दशी, नृसिंहजयंती, रथसप्तमी वगैरे सण ऐतिहासिक सण म्हणून ओळखले जातात. हिंदू मध्ये चैत्र महिना हा वसंतऋतुच्या प्रारंभी गणला गेल्यामुळे कित्येक सण या ऋतूस योग्य होईल असे रूढ झाले आहे. याची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होते, त्या पाठोपाठ रामनवमी, दोलोत्सव, गौरीत्सव आणि हनुमान जयंती असे सण साजरे केले जातात. वैशाख महिन्यात अक्षय तृतीया, परशुराम जयंती, नृसिंहजयंती असे सण साजरे केले जातात तर जेष्ठ महिन्यात गंगा आणि सर्व नदिंचे महत्व सांगणारा गंगोत्सव आणि वटसावित्री असे दोन सण साजरे केले जातात. आषाढ महिन्यात महाएकादशी साजरी केली जाते आणि या महिन्यापासून चातुर्मासाला सुरुवात होते. श्रावणात नागपंचमी, मंगलागौरी, श्रावणी, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्णजन्माष्टमी, पिठोरी अमावास्या आणि पोळा हे सण साजरे करतात तर भाद्रपद महिन्यात हरितालिका, गणेशचतुर्थी, ऋषींपंचमी, अनंतचतुर्दशी सारखे सण साजरे होतात. अश्विन व कार्तिक या दोन महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, तुलसी विवाह आणि त्रिपुरा पौर्णिमा सारखे सण साजरे होतात. मार्गशिष महिन्यात दत्तजयंती आणि पौष महिन्यात मकरसंक्रात साजरी केली जाते. माघ महिन्यात वसंतपंचमी, रथसप्तमी, महाशिवरात्री तर फाल्गुन महिन्यात होळीचा सण साजरा केला जातो. या अशा सणांना जशी अध्यात्मिक दृष्टी आहे तसेच वैज्ञानिक महत्वसुद्धा आहेत. या सणांच्या दिवशी जे पदार्थ केले जातात ते सर्व निसर्गाच्या नियमांचे पालन करून केलेले असतात. जर आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार सणांची मांडणी केली तर आपल्याला समजून येईल की मकर संक्रांतीच्या दिवशी मानवी शरीराला योग्य असे गरम पदार्थ बनविले जातात. कारण यादिवशी सूर्याचे उत्तरायण सूरू होते आणि हवेत खूपच गारठा असतो. तर होळी पेटविल्यानंतर धुलिवंदनाच्या दिवशी रंगामध्ये न्हावून जणू काही आपण वसंतात बहरून आलेली फुले अंगावर घेत निसर्गाशी एकरूप होत असतो. असे हे प्रत्येक भारतीय सण वैज्ञानिक दृष्ट्याच नाही तर ऐतिहासिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा सुंदर आणि निपुण गुणांचा वारसा जपून ठेवत आहे. मग अशा सणांना नावं ठेवणे योग्य वाटेल का?
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समाजातील इतर माणसांशी त्याने भावनिक नाते निर्माण केले आहे. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला चाकोरी करावी लागते. हल्लीच्या काळात असे बऱ्याचवेळा दिसून येते की मानव हा चाकोरीमध्ये अडकून पडला आहे आणि स्वतःच्या गोष्टी सांगण्यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो. मग वर्ष्याचा एके दिवशी तो आपल्या चाकोरीतील सर्व कामे बाजूला ठेवून स्वतःच्या माणसांमध्ये आनंद साजरा करण्यासाठी तो अनेक सणांचा वापर करतो. असे सण जेव्हा तो साजरा करतो तेव्हा त्यात सामाजिक आणि राष्ट्रीय भावना प्रबळ असतात. वर उल्लेख केलेल्या धार्मिक सणांमुळे त्याला मानसिक आधार तर मिळतो पण त्याच्या मनात मूल्यांचे महत्व बिंबविले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे सण भिन्न भिन्न समाजातील माणसांना एकत्र आणते आणि एकमेकांबद्दल आपुलकी वाढविण्यास मदत होते. हे नुसते हिंदू धर्मातील सणांबद्दल नसून तर इतर धर्मीय म्हणजे मुस्लिम, ख्रिस्ती धर्माबद्दल सुद्धा म्हणू शकतो. ईद, नाताळ, दिवाळी सारखे सण माणसांमधील जिव्हाळा व बंधुभाव वाढविण्यास मदत करतात. त्यामुळेच स्वातंत्र्याचे रणशिंग जेव्हा लोकमान्य टिळकांनी फुंकले तेव्हा त्यांनी लोकजागृतीसाठी गणेशत्सव व शिवजयंती सारखे सण सार्वजनिक स्वरूपात आणले. त्यामुळे अनेक भारतीयांना खासकरून महाराष्ट्रात स्वातंत्र्याची चळवळ जोमाने पुढे नेण्यात मदत झाली. म्हणूनच आपण परंपरेनुसार आलेले अध्यात्मिक सण जसे साजरे करतो त्याचप्रमाणे राष्ट्रीय सण सुद्धा साजरे करीत असतो. १५ ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले आणि अनेक महापुरुषांनी स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचा त्याग करून आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले, त्यांचे स्मरण आपण करण्यासाठी हा सण साजरा करीत असतो. २६ जानेवारी हा असा एक दिवस आहे की भारत देश हा प्रजासात्तक देश म्हणून ओळखला जाऊ लागला आणि या दिवशी देशाला स्वतःचे एक संविधान मिळाले. ज्या लोकांच्या परिश्रमाने जे संविधान आपल्याला मिळाले आहे त्यांचे स्मरण करून हा सण आपण साजरा करीत असतो. त्याचप्रमाणे २ ऑक्टोबर, १४ एप्रिल, १४ नोव्हेंबर, १९ फेब्रुवारी, २३ जुलै सारखे राष्ट्रीय पुरुषांचे वाढदिवस आपण सण म्हणून साजरे करीत असतो. कारण त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण केल्याने अन्याय आणि अत्याचाऱ्यांवर लढा देण्यासाठी एक वेगळी प्रेरणा आपल्याला मिळते. त्यातून राष्ट्रीय चैतन्य निर्माण होऊन राष्ट्रभावना निर्माण होत जाते आणि भारतीयांच्या विविधतेतून एकतेचे दर्शन घडते. त्यामुळे भारतीय समाजाला आधुनिकतेकडे घेऊन जाण्यास मदत होत आहे. अशा सणांमुळे आपल्याला देशभक्ती आणि त्यागाचे संदेश मिळत जातात तेव्हा अशा सणांना नावं ठेवणे योग्य होईल का?
हे सर्व सण आपल्या मनाला चैतन्य देत असले तरी या सणांचे पवित्र्य विसरले जाऊ लागले आहे. त्यामुळे सर्व सण विलासिनतेचे पोषक होऊ लागले आहेत. या सणांच्या दिवशी बहुतेक लोक जुगार खेळतात व अनेक गैरवर्तन करतात. नको त्या गोष्टींमध्ये पैसा वाया घालवतात. हे खरे आहे की आजची आधुनिक जीवनशैली खूप बदलली आहे.परंतु याचा अर्थ काही असा नाही पारंपरिक सणांना आधुनिक रूप देऊन मूळ संकल्पना विसरून जावी आणि बेभान होऊन विचित्र गोष्टी करणे. प्रत्येक सण हे स्वतःच्या मनोरंजनासाठी केले जातात हे खरे. सण निश्चितपणे आनंदवृद्धीसाठी असतात. पण प्रत्येक सणामागे एक उदात्त कथा असते, तेजस्वी परंपरा असते, महान हेतू असतो, अलौकिक स्मरण असते. याची जाणीव प्रत्येक विद्वान माणसांनी समाजाला करून दिली पाहिजे. शिवाजी महाराज पूर्णपणे समजल्या शिवाय शिवजयंती सुंदरपणे साजरी होईल का? असे प्रश्न आपणास पडले पाहिजे. श्रीकृष्ण चरित्र नीटपणे समजल्यावरच दिवाळीचे महत्व कळेल. नाहीतर त्यातील मूळ तत्व बाजूला पडून जागोजागी अंधश्रद्धा आणि अवडंबर यांनी घेतली जात आहे. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास पितृपंधरवडा साजरा करणे. या दिवसांचा खूप बाऊ केला जात आहे. अनेक बंधने घातली जात आहेत. आपल्या पुराणात फक्त एवढेच म्हटले आहे की भाद्रपद महिन्यात पृथ्वी दक्षिणेकडील पितृलोकाजवळून जात असते म्हणून प्रतिपदा ते अमावस्या त्या तिथीला आर्यमा या पितरांच्या देवतेला वंदन करून मंत्राद्वारे पितरांना आव्हान केले जाते व पितर पिंड ग्रहण करतात असे म्हटले गेले आहेत. पण आपण या दिवशी पुरोहिताकडून सर्व धार्मिक विधी संपन्न करून घेतो व आपल्या पितरांची सेवा केली अशी भ्रामक कल्पना करून घेतो आणि अंधश्रद्धा पसरवत असतो. असाच प्रकार साडेतीन मुहूर्ताचा. यादिवशी आपण काहीही केले की यशस्वी होतो ही एक चुकीची भावना मानत बसविली गेली आहे. या दिवशी सह्या केल्या, घर किंवा वाहन खरेदी केली, स्वतःचा व्यापार सूरू केला म्हणजे यश लाभेल असे नाही. त्यासाठी श्रम, धाडस, कर्तृत्व लागते तरच आपण यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी अभ्यास, चिकाटी, अनुसंधान महत्वाचे असतात. साडेतीन मुहूर्त पापकर्माची फळे टाळू शकत नाही. म्हणून मुहूर्तावर विसंबून न राहता शुभकर्माची सुरुवात त्वरित करावी. आजचा गणेश उत्सव पाहताना असे वाटते की या उत्सवाचे पारंपरिक रूप बदलत जात आहे. सार्वजनिक उत्सव म्हणजे वर्गणी गोळा करून आजूबाजूच्या लोकांना होणाऱ्या त्रासाचा विचार न करता दिवस-रात्र मोठे ध्वनीक्षेपक लावून त्यावर विचित्रपणे नृत्य करीत हैदोस घालणे अशा कल्पना रूढ होताना दिसत आहे. होळी हा सण रंगाचा सण आहे. पण या दिवशी अंगाला घाणेरडे रंग लावून माणसांचे आयुष्य बेरंग करण्यास लोकांना काय आनंद मिळतो हे समजेनासे झाले आहे. होळी हा सण छेडछाडीचा, गलिच्छ द्रव्याने भरलेले फुगे मारण्याचा, अनोळखी व्यक्तींना खासकरून स्त्रियांना त्यांच्या इच्छेवरून रंग फासण्याचा एक विकृत प्रकार झाला आहे. तसेच राष्ट्रीय सणांच्या दिवशी काही ठोस कार्यक्रम न करता या दिवशी मिळणारी सुट्टी ही आराम करण्यासाठी आहे असेच समजतात. मग नवीन पिढीला या गोष्टींचे महत्त्व कधीच समजणार नाही. या सर्व गोष्टी पाहिल्या तर एक गोष्ट नक्कीच जाणवते सणांना उगाचच कोणी नावे ठेवीत नाही.
आज पूर्वीसारखे सण राहिले नाहीत असे वर म्हटले आहे. त्यातील प्रमुख कारण म्हणजे आमची साजरी करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी सणांना नविन कपडे घालून फिरत असू. त्यामध्ये एक वेगळीच भावना होती. या सणांचे दुसरे मोठे आकर्षण होते ते म्हणजे खाद्यपदार्थ. प्रत्येक सणांचे वेगवेगळे खाद्यपदार्थ होते आणि ते त्या सणांच्या दिवशीच मिळत असे. त्या पदार्थांच्या चवीचा एक वेगळा आनंद होता. या पदार्थांची आपल्या शेजारीपाजारी किंवा मित्रपरिवारात देवाणघेवाण होत असे. आता मात्र या सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. रोज मिळत असलेल्या कपड्यांमुळे किंवा पदार्थांमुळे त्याचे महत्व सणांच्या दिवशी राहिले नाही. दिवाळीला खायला मिळणाऱ्या करंज्या, चकल्या, बेसनचे लाडू यांची वाट दिवाळीपर्यंत पाहावी लागत नाही. पूर्वी सणांच्या काळात आपल्या मित्रमैत्रिणींना भेटत असू आता आपण सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जात असतो. तेव्हा सजावट, मिठाई व इतर खरेदी कशासाठी करायची असे प्रश्न तयार होतात. उपभोगच्या प्रचंड लाटेत आपण प्रत्येक सण साजरा करीत असतो. प्रत्यक्षात सण बदलेले नाहीत, लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. लोकांनी स्वतःचा मार्ग सण साजरे करण्यासाठी निवडला आहे. त्यासाठी त्यांना जनतेशी जुळवून घेण्याची गरज वाटत नाही. इथे सणांचा जरासुद्धा दोष नाही आहे. जोपर्यंत जडणघडणीला खिळ बसत नाही आणि सणांचे सार हरवले जात नाही, तो पर्यंत आपण बदलत्या काळाशी जुळवून घेतले पाहिजे. म्हणून सणांना नावं ठेवणे योग्य वाटत नाही.
असे म्हणतात की तरुण पिढी हीच उद्याची आशा आहे. आजची नवीन तरुण पिढी नविन दृष्टीकोन घेऊन पारंपरिक सण साजरे करताना दिसत आहे. सार्वजनिक सणांतून येणारा पैसा ते विधायक कार्यक्रमासाठी वापरताना दिसत आहेत. होळी सारख्या सणांला वृक्ष तोडण्यास मनाई करीत आहे आणि जुनी झालेली व उपयुक्त नसलेली लाकडे होळीत जाळण्यासाठी वापरावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. सार्वजनिक गणेशत्सवातून मिळणारा पैसा सामाजिक संस्थेसाठी वापरताना दिसत आहे. हे पहिल्यानंतर लोकांना या सणांतून ताजेपणा, आनंद आणि चैतन्य मिळताना दिसत आहे. त्यामुळे जातीयतेच्या आणि प्रांतीयतेच्या भिंती पडू लागल्या आहेत. अन्याय, अंध:कार मिटून सर्व भारत देश प्रकाशाने उजळून टाकण्याची क्षमता आपल्या सणांमध्ये आहे. ते तसेच चालू राहण्यासाठी आजच्या तरुण पिढीच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. तरच आपल्या सणांना कोणीही उगाचच नावे ठेवणार नाही.
धन्यवाद
Comments
Post a Comment