Skip to main content

Kharach Apan Jagato ka? खरंच आपण जगतो का?

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : २०८
विषय क्रमांक : ४
विषय : खरंच आपण जगतो का?
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई 
संकेत स्थळ :

मानवी जीवन म्हणजे चिरंतन असे न सुटणारे एक कोडे आहे. कारण या जगात प्रत्येक गोष्ट अर्थ पूर्ण असते. या सुंदर विश्वात चांगलं असे काहीच नाही असे म्हणणाऱ्या माणसांच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते. हे विश्व अनेक प्रकारच्या धनधान्यांनी भरलेले आहे. त्यातून आपण नेमके काय घ्यायचे आहे, हे प्रत्येकाने स्वतः ठरविले पाहिजे. सूर्य उगवल्यावर पशुपक्षी उत्साहाने बागडत आपला चारा शोधत असतात मग माणसाने सुद्धा त्याला निसर्गाकडून मिळालेल्या गोष्टींपासून आनंद व्यक्त करण्यास काय हरकत आहे. या जगात अशी काही माणसे आहेत की ज्यांनी अनेक यातना भोगून सुद्धा फिनिक्स पक्ष्यासारख्या उंच भराऱ्या मारल्या आहेत. जेव्हा आपण अशा लोकांची चरित्र पुस्तकातून वाचतो तेव्हा आपल्याला एक वेगळीच प्रेरणा मिळत जाते. मग आपण एखादा छंद जोपासू लागतो. त्यामुळे नवीन विचारांची निर्मिती होऊ लागते. रुक्ष,अर्थहीन जीवन जगताना नेहमी निराशाजनक विचार येतात, तेव्हा हे नवीन विचार आपल्याला आनंद देत राहतात आणि जीवनात सतत नवीन प्रयोग शोधाण्यासाठी आपल्याला तयार करतात. यासाठीच नियतीने माणसांसाठी अनेक गोष्टींची निर्मिती केली आहे. इथे मला सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी एरिक फ्रॉम यांचे 'To have or To be?' हे पुस्तक आठवते. त्यात त्यांनी जगण्याच्या दोन पद्धती आपल्याला सांगितल्या आहेत. त्यातील पहिली पद्धत अशी आहे की एकामागोमाग एक अशा असंख्य वस्तू हस्तगत करणे आणि त्या वस्तूंवर आपला मालकी हक्क प्रस्थापित करणे. दुसरी पद्धत सांगताना एरिक फ्रॉम म्हणतात की जीवनाच्या प्रत्येक वाटेवर वेगवेगळे अनुभव घेत जीवनाचा खराखूरा आनंद घेत जाणे. असे सांगून फ्रॉम आपणास सांगू इच्छितात की बहुसंख्य माणसे पहिल्या मार्गाने जातात आणि बऱ्याच गोष्टी कमावताना जीवनात मिळणारा खरा आनंद गमावून बसतात तर फारच कमी माणसे आपल्या सोयीपुरती कमावतात पण आनंदमयी जीवन जगत राहतात. इथे एरिक फ्रॉम यांनी सुखमय जीवन जगण्यासाठी वस्तूंची गरज नाकारलेली नाही. त्यांनी वस्तूंचे महत्व मान्य केले आहे. ते इथे एवढेच सांगतात की वस्तू हे साधन आहे, साध्य नाही. वस्तूंच्या मालकीची संख्या वाढवून मानवी जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होत नाही. त्यापेक्षा आपण आपले अनुभवविश्व निर्माण करताना किंवा आपल्याला हव्या असलेल्या वस्तू मिळविताना किती लोकांना मदत केली, किती लोकांना आधार दिला यासारख्या गोष्टींचा हिशोब करून आपल्या जीवनाची समृद्धी मोजावी लागते. तेव्हाच आपल्याला जाणवेल की खरोखरच आपण जगतो का?

मानवी जीवन कितीही स्वतंत्र असले तरीही प्रत्येक व्यक्तीची जीवन जगण्यासाठी वेगवेगळी कारणे असतात.  कोणी श्रीमंत होण्यासाठी जगतात तर कोणी आपल्या जबाबदारीची पूर्तता करण्यासाठी  जगत असतात. जीवन मूल्यांच्या सर्वोच्च शिखरांवर गेलेलं मन कसं असतं आणि अध:पाताच्या दिशेने ऱ्हास पावणारं मन कसं असतं याविषयी महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि लेखक अण्णाभाऊ साळुंखे आपल्या एका पुस्तकात म्हणजे 'मित्रांना शत्रू करू नका' मध्ये दोन सुंदर अनुभव कथन केले आहेत. एका अनुभवात ते सांगतात की मध्यप्रदेशातील भोपाळ या शहरातून विदिशाकडे जात असताना  एक म्हातारी व्यक्ती मक्याची कणसं भाजून विकत असताना दिसली. त्या म्हाताऱ्या व्यक्तीबरोबर अजून तीन-चार विक्रेते सुद्धा मक्याची कणसं भाजून विकत होती. अण्णाभाऊ साळुंखेना मक्याची कणसे लहानपणापासून आवडत होती म्हणून त्यांनी गाडी बाजूला उभी करून त्या म्हाताऱ्या विक्रेत्याकडेच कणसं घेण्यासाठी गेले. त्यांनी त्या म्हाताऱ्या गृहस्थाकडे मक्याच्या कणसांचे दर विचारले. तेव्हा त्या विक्रेत्याने सहा रुपयाला तीन कणसं असे सांगितले. तेव्हा त्यांनी घासाघीस करून ती पाच रुपयांना तीन अशी मिळविली. याचा अनुभव सांगताना लेखक म्हणतात की कणसं खाताना त्यांना केलेली घासाघीस अनुचित वाटली आणि त्यांचे मन बैचैन झाले. त्यासाठी त्यांनी ही चूक सुधारण्याचे ठरविले. कणसं खाऊन झाल्यावर त्यांनी त्या म्हाताऱ्या कणसं विक्रेताला सहा रुपये घेण्यास सांगितले पण त्या विक्रेत्याने तसे करण्यास नकार  दिला आणि पाचच रुपये घेतले. दुसरा अनुभव सुद्धा भोपाळ रेल्वे स्थानकावरचा आहे. ते सांगतात की चहा पिण्यासाठी ते एका हॉटेलसमोर टाकलेल्या खुर्चीत बसले होते. तिथे सुशिक्षित उत्तम कपडे घातलेले कोणीतरी दोन अधिकारी आले. त्यांनी दोन ग्लास चहा प्याल्यानंतर ते पैसे देऊ लागले, तेव्हा हॉटेल मालकाने आठ रुपये सांगितले आणि त्या दोन अधिकाऱ्यांनी भांडायला सुरुवात केली. वाद घालताना ते म्हणू लागले की आधीच्या दोघांकडून चार रुपये घेतल्याचे आम्ही पाहिले आहे. तेव्हा हॉटेल मालकांनी त्यांना सांगितली की आधीची माणसे गरीब होती. त्यांनी हाफ ग्लासच चहा घेतला होता आणि तुम्ही फुल ग्लास चहा घेतला आहे. तरीसुद्धा शिव्या घालत त्यांनी त्या हॉटेलचे बिल भरले. या दोन गोष्टींचा उल्लेख करून अण्णाभाऊ साळुंखे सांगतात की वृद्ध गृहस्थांसारखे लोक जवळपास काही नसून ही परिपूर्ण आणि तृप्त असतात! त्यामुळेच ते दरिद्री असतात असं कोणीही  म्हणतील. ते म्हणणे खरंही असू शकेल. परंतु त्यांना या दरिद्री परिस्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी ही आपलीच असते हे आपण विसरून जातो. म्हणूनच ही जबाबदारी पार पाडण्याची वाट त्या दोन अधिकारांच्या पाठीमागून मात्र जात नाही. ती वाट आपल्याला सापडेल त्या वृद्ध गृहस्थांच्या रक्तातून वाहणाऱ्या जीवननिष्ठेच्या प्रवाहातच! असे सांगून अण्णासाहेब साळुंखे मानवी जीवन जवळपास काही नसूनही ते परिपूर्ण असते याची जाणीव आपणास करून देतात. म्हणूनच आपण मनसोक्तपणे जीवन जगताना स्वतः प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. मग हे वाचून झाल्यावर आपल्याला असे जाणवीते की आपण आपले जीवन खरोखरच मनासारखे जगताना सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.

आपण जे जीवन जगतो याचा खरा अर्थ काय? असा प्रश्न जेव्हा आपणास पडतो तेव्हा आपले मन अस्वस्थ होते. त्याला कारणही बाहेरचे वातावरणसुद्धा असते. स्वस्त वातावरणात काही पुस्तके हळुवारपणे मनाला फुंकर घालून नवीन जीवन जगण्याची ऊर्जा निर्माण करत असतात. मग ती पुस्तके कुठल्याही भाषेतील असो. असेच एक विल डुरंट यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक माझ्या वाचण्यात आले त्या पुस्तकाचे नाव आहे, 'On the meaning of Life '. या पुस्तकात लेखकाने जीवनाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. इ.स. १९३२ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक आजच्या ही पिढीला फारच उपयुक्त असे आहे. विल डुरंट एक तत्वज्ञानी आणि इतिहासकार आहेत. १९३० च्या सुमारास चांगले कपडे घातलेला अनोळखी माणूस विल डुरंट यांच्या न्यूयॉर्क येथील घरासमोर आला. त्याने डुरंट यांच्याजवळ जीवन जगण्याचा अर्थ काय? असा प्रश्न केला. जीवन जगण्यासाठी काही तात्विक कारणे आहेत का? अशी  सुद्धा विचारणी केली. जर त्याला तात्विक कारणे मिळाली नाही तर तो आपले आयुष्य संपवून टाकणार असे त्याने विल डुरंट यांना सांगितले. डुरंट यांनी अनेक कारणे त्याला देऊन त्याला आत्महत्येपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मग तो मनुष्य तिथून निघून गेला आणि डुरंट यांना तो परत कधीच दिसला नाही. एका अनोळखी माणसाला आत्महत्येच्या विचारापासून दूर करणे आणि त्याला जीवनाचे महत्त्व समजून सांगणे  विल डुरंट यांना कठीण झाले होते. या कोंडीने अनेक प्रश्न निर्माण केले होते. जीवनाचा सोपा अर्थ आनंद होईल. तरीपण तो व्यापक पद्धतीने शोधाण्यासाठी विल डुरंट यांनी अनेक विचारवंतांना अर्थ समजून सांगण्यासाठी एका पत्राद्वारे आव्हान केले. हे पत्र त्यांनी कलाकार, लेखक, शास्त्रज्ञ, शिक्षक, राजकीय व धार्मिक नेते, खेळाडू, तत्वज्ञानी आणि कैद्यांनासुद्धा लिहिले. त्यात त्यांनी त्यांच्या जीवन जगण्याचा काय अर्थ आहे, तुम्ही कसे जगत आहात आणि तुम्हाला आयुष्याची कशी मदत होते. त्याचप्रमाणे तुम्ही काम करीत असलेल्या कामाचा तुम्हाला आनंद कसा मिळतो आणि त्यात तुम्ही कसे समाधानी आहात. याबद्दल नीट समजावून सांगण्याचे आव्हान केले. त्यांनी हे पत्र जगातील शंभर व्यक्तींना पाठविले. त्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बेट्रँड रसेल, जॉन एरिस्कीन,  जॉर्ज बर्नोड शॉ सारख्या व्यक्ती होत्या. यातील बऱ्याच जणांनी उत्तरे पाठवली आणि जीवनाचा आनंद कसा घेतला हे सुद्धा लिहिले आहे. या आलेल्या उत्तरातून विल डुरंट यांनी खूप चांगला निष्कर्ष काढला आहे. त्यांचा निष्कर्ष असा आहे की त्यांना जाणीवपूर्वक जगण्याची इच्छा आहे, ज्यांना कार्यें जाणून घेण्याची आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती करण्याची इच्छा आहे, त्यांनी शंकास्पद वागण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अस्वस्थ वातावरणामुळे आपण निराशावादी बनली नाही पाहिजे. आपली घरे किंवा संपत्ती रिक्त झालेली नसून आपली अंतःकरणे रिक्त झाली आहे. त्यासाठी मानवाच्या महानतेवर विश्वास ठेवून आपण माणसाला आत्महत्येपासून परावृत्त करू शकतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकतो. विल डुरंट शेवटी असेही सांगतात की ज्ञानप्राप्तीच्या सर्व गोष्टी विज्ञानात आहे आणि विज्ञान सर्व प्रकारच्या रिमिक्स साठी मुक्त आहे. विज्ञानाचा उपयोग सर्व मानव जातीसाठी करून मानवाला सुखी करता येऊ शकते. त्यासाठी तत्त्वज्ञानाची सुद्धा मदत होऊ शकते. म्हणूनच विद्यापीठे या आमच्या महान संस्था आहेत. त्या आम्हाला नवीन कल्पना, नवीन शोध लावण्यास मदत करते आणि आमची आशावादी दृष्टी विकसित करण्यासाठी मदत करीत असतात. म्हणूनच 'On the Meaning of Life' हे पुस्तक जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी फार उपयुक्त आहे आणि ते वाचून झाल्यावर वाटत राहते की खरोखरच आपण जीवन जगतो का?

बऱ्याच वेळा माणसे एक प्रश्न विचारीत असतात की बाहेर आज निराशेचे वातावरण असताना आपण कशासाठी जगायचे. असे प्रश्न मला नेहमी कोत्या मनाचे वाटतात. शंभर वर्षाचे आयुष्यसुद्धा कमी पडावे अशी ब्यवस्था परमेश्वराने निर्माण केली आहे. तरी सुद्धा असे प्रश्न का पडावेत याचे आश्चर्य वाटत असते. एखादा महात्मा जेव्हा लोकांचे अश्रू पुसत त्यांच्या मुठीमध्ये अहिंसेचे तत्वज्ञान भरून त्यांना बलाढ्य साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तयार करतो तर एक डॉक्टर बाबासाहेब बनून वर्षानुवर्षे पिडीत राहिलेल्या समाजाला शिक्षण आणि नवीन कार्यें देऊन भारतीय समाजाला आधुनिक बनविण्याचे प्रयत्न करतो. ज्या धर्मात कुठलाही बदल होणे शक्य नसताना आपल्या धर्माच्या भगिनींना न्याय मिळावा म्हणून हमीद दलवाई सारखा माणूस उभा राहतो. तेव्हा कशासाठी जगतो आहोत? असा प्रश्न का पडावा हे समजत नाही. आजही भारतीय समाजातील वातावरण निराशाजनक झाले असले तरी अशावेळीस आपल्याला जगण्यासाठी म्हणून कुणी गात असत, कुणी लिहीत असत, कुणी नवीन तत्वज्ञानाचा शोध लावीत असत. मग तेव्हा वाटत की जगण्यात खूपच आनंद आहे. जेव्हा मी झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम ऐकत असताना त्यांनी अशा काही अनवत मात्रा घेतल्या तेव्हा झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करूच शकत नव्हतो. अशावेळीस मी त्या उस्तादाने निर्माण केलेल्या गोष्टीला दाद देत परमेश्वराचे आभार मानत असतो कारण त्या परमेश्वराने मला तो आनंद घेण्यासाठी जीवन दिलेले आहे असे मी समजत असतो. असाच प्रकार मला बेगम अख्तर यांची गजल ऐकताना होतो. त्याचप्रमाणे कुमार गंधर्व, लता मंगेशकर यांचे गायन ऐकताना झालेला आनंद व्यावहारिक पातळीवर मोजूच शकणार नाही. क्रिकेट या खेळाने जीवन कसे जगावे याचे सुंदर विवेचन जगाला दिले आहे. कारण हा खेळ मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाने व्यक्त होत आहे. नुसती हार आणि जीत पाहणे म्हणजे क्रिकेट नव्हे. त्यापेक्षाही तो मोठा खेळ आहे. म्हणूनच सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, कपिल देव, अनिल कुंबळे, विव्ह रिचर्ड्स, इयान बोथम, वगैरे सारख्या खेळाडूंचा खेळ पाहताना  आनंद द्विगुणित करून गेला आहे. या सर्व  गोष्टीनीसुद्धा दिलेला आनंद सुद्धा आपले जीवन आनंदायी केलेले आहे याची जाणीव करून देत असतं.

सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक अण्णासाहेब साळुंखे आपल्या लेखात एके ठिकाणी म्हणतात की, "अंधाराची आणि प्रकाशाची लढाई तशी फार जुनी आहे. मानवी जीवनातही ती फार काळापासून चालू आहे. अज्ञान, द्वेष, मत्सर, हिंसा, दुसऱ्यावर वर्चस्व गाजविण्याची वृत्ती, निष्क्रियता असा किती तरी प्रकारचा अंधार आहे. ज्ञान, प्रेम, अहिंसा, इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर, उपक्रमशीलता अशा स्वरूपातील प्रकाशाचं त्या अंधाराबरोबर सतत युद्ध सूरू आहे. या युद्धात अंधाराचा पाडावं व्हावा आणि प्रकाशाचा विजयाने अवघे मानवी जीवन उजळून निघावे, यासाठी ही सगळी धडपड आहे". किती छानपणे त्यांनी जीवनाचा आनंद घेत जगण्यासाठी हा उपदेश केला आहे. जीवनाचे मोल जाणून माणसाने प्रत्येक क्षण मनापासून अनुभवावा म्हणून त्यांनी वरील वाक्ये शब्दबद्ध करत जीवनाचे सरळ साधं तत्वज्ञान ते आपल्या पर्यंत पोहचवत आहेत. अनेक वेळेस असे जाणवू लागले आहे की माणूस जीवनाचा अर्थच नीटपणे समजून घेत नाही. कुठल्याही कलेत जर आपल्याला पारंगत व्हायचे असेल तर त्याला  जाणीवपूर्वक स्वतःला घडवावे लागेल. जर कुणी असे जगत असेल तर त्याचे कौतुक आपण केले पाहिजे. म्हणूनच अण्णासाहेब साळुंके आपल्या,' चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून! या पुस्तकात म्हणतात," जीवनाच्या प्रवासात मला आलेले छोटे- छोटे अनुभव मी इथे नोंदवले आहे. पण वरवर पाहता छोट्या वाटाणाऱ्या अनुभवांमध्ये बरेचं काही महत्वाचे साठवलेलं आहे". असे सांगून ते म्हणतात, " जीवनाच्या वाटचालीत कमी महत्वाच्या गोष्टीमागे धावता धावता जीवन जगण्याचा खराखुरा आनंद मिळावायचा विसरून जातो ". याचा अर्थ समजवतांना ते सांगतात की शक्य तितके पैलू लक्षात घेऊन स्वतःची मते बनविली पाहिजेत, नावाच्या नात्यापेक्षा हृदयाचे नाते जपणे फार महत्वाचे आहे, पानगळ झालेली झाडेसुद्धा आपल्यामध्ये चैतन्य निर्माण करू शकतात आणि आपली फुलण्याची क्षमता वाढविण्यास मदत करतात. त्यामुळेच कितीही फुललो तरी फुलण्यास वाव मिळतो". ते पुढे एका ठिकाणी म्हणतात, "जीवनाच्या प्रवासात जे संघर्ष करायचे असेल तर ते जरूर केले पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. शोषणातून मुक्त होणासाठी धडपडले पाहिजे. फक्त हे करताना आपला विवेक जागा असला पाहिजे". किती छान पणे अण्णासाहेब साळुंखे यांनी सांगितले आहे. मानवी जीवन हे सहा ऋतूत बहरले पाहिजे. आनंदाने आणि उत्साहाने फुलून आले पाहिजे. या सहा ऋ्तूंचे अनुभव मानवी जीवनात प्रतिबिंबित झाले पाहिजे. तेव्हाच आपल्या निराश झालेल्या मनला नवीन पालवी फुटून नवीन जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. इथे मला कवी मंगेश पडगावकर यांनी लिहिलेली कविता आठवते. ती कविता खालील प्रमाणे आहे.
रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋ्तूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

या सर्व गोष्टीचे विश्लेषण केल्यावर सुद्धा आजचे मानवी जीवन बघितल्यावर असा प्रश्न पडतो की खरचं आपण जगतो का? तेव्हा जीवन आनंदाने जगण्यासाठी या मिळालेल्या जन्मावर शतदा प्रेम करूया आणि जीवन आनंदी करूया.

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...