Skip to main content

Vaishwik Satya -वैश्विक सत्य

रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २०४
विषय क्रमांक : ४
विषय : वैश्विक सत्य
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ : 

वैश्विक सत्य हे दोन शब्द आपण सर्वांनी बऱ्याचवेळा ऐकलेले आहेत पण त्यांचा नेमका अर्थ काय किंवा वैश्विक सत्य हे कुठल्याप्रकारचे सत्य आहे हे समजून घेतल्यानंतरच याची व्याख्या करावी लागते. वैश्विक सत्य हे एक सार्वत्रिक सत्य असून जे वैज्ञानिकदृष्ट्या मुळापासून स्वीकारले जाते किंवा ते एक असे सत्य आहे की जे काळानुसार बदलत नाही आणि त्यास आव्हानसुद्धा दिले जाऊ शकत नाही. मग वैश्विक सत्याची व्याख्या करताना आपण म्हणू शकतो की वैश्विक सत्य हे एक निर्विवाद तथ्य आहे की ज्याचा स्वीकार प्रत्येक मानवांनी केलेला आहे आणि ते कोणत्याही कल्पनेवर आधारित नाही. शिवाय हे सत्य कोणत्याही काळात बदलू शकत नाही. म्हणून वैश्विक सत्य हे नेहमी तार्किकदृष्ट्या वैध असले तरी ते सर्व काळ आणि वेळेच्या पलीकडे असते. हे सत्य भौतिक विश्वाच्या पलीकडे असल्याचे मानले जाते. इथे सत्य हे शाश्वत किंवा निरपेक्ष मानले गेले आहे. त्यामुळे वैश्विक सत्य हे सगळ्या मानवी जीवनाचे एक महत्वाचे अंग बनले आहे आणि त्याच्या अस्तित्वाशिवाय  मानवी जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. सूर्य नेहमी पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य आपल्याला प्रकाश देतो, पाणी हे चवहीन , गंधहीन आणि रंगहीन आहे, वगैरे उदाहरणे वैश्विक सत्याची देता येतील. अशी उदाहरणे जरी असली तरी एक गोष्ट इथे सांगितली पाहिजे ती म्हणजे वैश्विक सत्य हि एक भावना किंवा अनुभव असून त्याचा संबंध वाचक किंवा नाटक आणि चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकांशी जास्त प्रमाणात येतो. जेव्हा आपण भूतकाळात घडलेल्या महत्वाच्या गोष्टीबद्दल वाचतो किंवा एखाद्या महापुरुषांचे चरित्र वाचतो तेव्हा त्यात आलेल्या घटना वेगळ्या प्रकारे लेखकाने लिहिलेल्या असतात की त्यांचे वाचन करताना आपण त्या गोष्टी स्वतः अनुभवत आहोत अशी भावना तयार होते. जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वाचतो तेव्हा तो इतिहास लिहिणाऱ्या लेखकाने असे काही लिहिलेले असते की त्या लढ्यात घडणाऱ्या घटनांचे आपण स्वतः साक्षीदार आहोत असा अनुभव येऊ लागतो. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या महायुद्धाच्या कथा किंवा लेख वाचतो तेव्हा त्या भयंकर परिस्थितीचे वर्णन आपण प्रत्यक्षात त्या युद्धात भाग न घेता अनुभवत असतो. मग हे सर्व अनुभव आपल्या भावानांशी जोडले जातात आणि हेच अनुभव एक वैश्विक सत्य म्हणून ओळखले जातात. 

बहुतेक वेळा एक प्रश्न विचारला जात असतो की वैश्विक सत्य या गोष्टीची आवश्यकता आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक आहे. कारण वैश्विक सत्य हे एक असे सत्य आहे की जे काळ आणि स्थळाची पर्वा न करता सर्व मानवजातीला लागू होते. काल्पनिक कामे असो किंवा गैर- काल्पनिक कामे असो, वैश्विक सत्याची गरज नेहमीच असते. अन्यथा वाचक किंवा प्रेक्षक त्या कामांसाठी कसे जोडले जातील? वाचकाला किंवा प्रेक्षकाला भावनिकदृष्ट्या आकर्षित करण्यासाठी वैश्विक सत्य हवे असते आणि त्यातूनच सार्वत्रिक सत्याची मांडणी होत असते. याचा जास्त अनुभव आपणास एखादे साहित्य वाचताना होत असतो. कारण प्रत्येक साहित्य हे आपल्या कथेद्वारे वैश्विक सत्य सांगत असते. हे सत्य आपल्याला त्या कथेतील पात्रांच्या विचारातून , भावनेतून आणि कृतीतून जाणवत असते. मग ते पात्र चांगले असो कि वाईट त्याच्या वागण्यातून आपल्याला थोडेफार सत्य जाणवत असते. त्याच्या या कृतीमुळेच आपल्याला जगाची माहिती होत असते. त्यातूनच आपल्याला मानवी स्वभावाचे दर्शन घडत असते. नकळत आपण त्या कथेतील व्यक्तिरेखेशी जोडले जातो आणि त्याच्या संघर्षाचा अनुभव घेत स्वतःची चिंता आणि निराशा दूर करण्याचा प्रयत्न करित असतो. याचाच अर्थ चांगले साहित्य जे अजरामर होते ते वैश्विक सत्याशी जोडलेले असते. आपल्याला वाचल्यानंतर ते लगेच समजून येते. हे खरे आहे की मानवाला अतृप्त सत्याची फार इच्छा असते. १९ व्या शतकातील बहुतेक सर्व लेखक आपल्या लेखणीतून वैश्विक सत्याची ओळख आपल्या कादंबरी किंवा लेखाच्या सुरुवातीला करीत असत. याचे उत्तम उदाहरण बघायचे असेल तर Jane Austin या प्रसिद्ध लेखकाची Pride and Prejudice या कादंबरी मधील सुरुवातीचे विधान नीट वाचा. ते विधान असे आहे, "It is a truth universally acknowledged, that a single man in possession of a good fortune, must be in want of a wife". या वाक्याचा अर्थ असा आहे कि सर्व जगामध्ये एक सत्य सर्वमान्य झाले आहे की प्रत्येक नशीबवान पुरुषाला पत्नीची गरज नसते. त्याचप्रमाणे Leo Tolstoy या लेखकाने आपल्या Anna Karenina या पुस्तकात सुरुवातीलाच लिहिले आहे ," All happy families are alike; each unhappy family is unhappy in its own way". याचा मराठीत अर्थ आहे," प्रत्येक सुखी कुटुंबे सारखीच असतात ; प्रत्येक दुःखी कुटुंबे स्वतःच्या मार्गाने दुःखी असतात. अशाप्रकारे कुठल्याही लिखाणातून प्रत्येक वैश्विक सत्य हे सुरुवातीला दिलेल्या मजकूरामध्ये, पात्रांच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि कृतीमध्ये समावलेले असतात.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण चांगल्या पुस्तकांचे, जी आपल्या व्यवसायाशी  निगडित नसतात, त्यांचेही वाचन केलेच पाहिजे. तरच आपण वैश्विक सत्याकडे जाऊ शकतो. सोशल मीडियावार येणारे मेसेजेस, पोस्ट  किंवा विडिओ हे पूर्णपणे दिशाभूल करणारे असतात. जर आपले सखोल वाचन नसेल तर आपल्याला या दिशाभूल करणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य वाटू लागतील आणि  आपण मग त्यात नको ते तर्क लढवून आणि सत्य मानून खऱ्या वैश्विक सत्याकडे पाठ फिरवू लागतो. त्यामुळे नेहमीच कथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक लेख, तत्वज्ञानाची व इतिहासाची पुस्तके वाचली पाहिजे. कारण हेच साहित्य आपल्याला वैश्विक साहित्याशी जोडत असते.  तुम्ही जेव्हा एखादे चांगले पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही पहिल्यासारखे राहत नाही आणि वैश्विक सत्य शोधाण्या करिता नव्याने विचार करण्यासाठी तयार होतात. याबाबतीत मी माझे स्वतःचे उदाहरण देईल. सुरुवातीला मला महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सारख्या नेत्यांबद्दल काहीच माहित नव्हते. नुसत्या ऐकीव गोष्टीवरून ही माणसे चांगली नाहीत असे समजत होतो आणि त्या ऐकीव गोष्टी मला  वैश्विक सत्य आहेत असे वाटत होते. मी अकाऊंटन्सीचा विद्यार्थी. जसे अकाउंट्समध्ये तर्क लावत होतो तसाच इथे पण लावत होतो. त्यामुळे अशा महापुरुषांबद्दल आदर वाटत नव्हता. अशावेळेस मला अशी काही पुस्तके मिळाली आणि माझ्या विचारांची दिशा फारच बदलून गेली. इथे सर्व पुस्तकांचा उल्लेख करणे शक्य नसले तरी काही पुस्तकांनी मला वैश्विक सत्य शोधाण्यासाठी खूप मदत केली आहे. आचार्य शंकर द. जावडेकर यांचे आधुनिक भारत, नरहर कुरुंदकरांचे जागर, शिवरात्री आणि छायाप्रकाश, रणजित देसाई यांचे श्रीमान योगी, रावसाहेब कसबे यांचे गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा, मधु लिमये यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर: एक चिंतन, यासारखी अनेक मराठी पुस्तके आहेत त्यांनी इतिहासाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन दिला. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषेतील काही पुस्तकांनी वैश्विक सत्य शोधाण्यासाठी मदत केली. त्यातील सर्वात पहिल्यांदा एका पुस्तकाचं नाव आहे Sisir Gupta यांचे Kashmir : A Study in India-Pakistan Relations. या पुस्तकामुळे मला काश्मीर प्रश्न काय आहे याची जाणीव करून दिलीच पण या प्रश्नाचे सत्य समजून घेण्यास मदत झाली. मग माझा प्रवास काश्मीरचे वैश्विक सत्य शोधाण्यासाठी सूरू झाला. या पुस्तका प्रमाणे इंग्रजीतील काही पुस्तके अशी आहेत की ती आपल्याला वैश्विक सत्याकडे घेऊन जातात. Sunil khillani यांचे  Idea of India, रामचंद्र गुहांचे India After Gandhi, CLR James यांचे Beyond the Boundry, Mike Brearley यांचे Art of Captaincy, रवींद्रनाथ टागोर यांचे Nationalism, Louis Fischer यांचे The Life Of Mahatma Gandhi, डॉ. बाबासाहेब आंबेकरांचे Annihilation of Cast आणि The Problem of the Rupee : Its origin and Its Solution, George Orwell यांचे 1984 आणि Animal Farm वगैरे अशी काही निवडक पुस्तके आहेत की तुम्हाला वैश्विक सत्याकडे नेहमीच घेऊन जातात. कारण ही पुस्तके भूतकाळात घडलेल्या घटनांचे सुंदर विश्लेषण करून आपल्याला वैश्विक सत्य उघडून दाखवतात.

जसे वाचन करायला आवडते किंवा क्रिकेट या खेळाचा आनंद घ्यायला आवडतो, तसेच नाटक व चित्रपट पाहण्याची मौजसुद्धा वेगळी असते. मी कॉलेजमध्ये असताना पु. ल देशपांडे यांनी मराठीत रूपांतर केलेले 'ती फुलराणी' हे मराठी नाटक पाहिले होते. पु. ल. देशपांडेनी हे नाटक इंग्रजी भाषेतील बर्नार्ड शॉ यांनी लिहिलेल्या Pygmalion या नाटकावरून मराठीत रूपांतर केले आहे. तसेच या नाटकावरून माय फेअर लेडी हा चित्रपट बनविला गेला. एक गर्विष्ठ प्राध्यापक एका फुल विकणाऱ्या अशिक्षित मुलीला आपल्या घरी घेऊन येतो. तिचे वडील त्या गर्विष्ठ प्राध्यापकाकडून त्याबदल्यात पैसे मागतात. जेव्हा मी हे मराठी नाटक किंवा इंग्रजी चित्रपट परत पाहिले तेव्हा मला इथे एक वैश्विक सत्य जाणवले आणि ते वैश्विक सत्य म्हणजे एका स्त्रीला समाजात नसलेली किंमत. त्या मुलीचे वडील स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मुलीला त्या श्रीमंत माणसाला दासी म्हणून विकून टाकतात. जर पुढे कुठल्याही पुरुषाने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर त्या स्त्रीला वधूच्या किंमतीत रूपांतरित केले जाऊ शकते. हे एक सत्य त्यातून बाहेर येते. तो गर्विष्ठ प्राध्यापक त्या अशिक्षित फुलवालीला सुंदर शिक्षित स्त्री बनवितो आणि समाजात तिला मानाचे स्थान निर्माण करून देतो. पुढे ते तिच्याशी लग्न करतात असे नाटकात आणि चित्रपटात दाखविले आहे. जेव्हा आपण हा चित्रपट किंवा नाटक व्यवस्थितपणे पाहतो तर एक गोष्ट आपल्याला जाणवते की त्या कथेत अंतर्भूत एक वैश्विक सत्य लपले आहे. ते मानवजातीच्या विवेकामध्ये इतके खोलवर गेले आहे की ते केवळ अवचेतनाद्वारे ओळखले जाऊ शकते. या नाटकामध्ये किंवा चित्रपटात असे वाटते की या विश्वात समावलेली सर्व वैश्विक सत्ये आपल्या आत्म्यात उतरवलेली आहेत आणि ती कायमस्वरूपी अस्तित्वात आहे. अशी या वैश्विक सत्याची शक्ती आपण पूर्णपणे समजू शकत नसतानाही ओळखतो. म्हणूनच या नाटकातील पात्रे किंवा चित्रपटातील कलाकार आपल्याला जगण्यासाठी परवानगी देत असतात. जेव्हा आपण या कलाकारांमध्ये  आपल्याला पाहतो तेव्हा आपण काहीतरी स्वतःबद्दल शिकत असतो आणि वैश्विक सत्य जाणून घेत असतो. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे चांगले साहित्य हे कथेद्वारे वैश्विक सत्य सांगते याचे उत्तम उदाहरण ती फुलराणी हे नाटक आणि माय फेअर लेडी हा चित्रपट आहे.

दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी अश्विन पूर्णिमेच्या दिवशी कृषीनगर येथे भाषण करताना भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी म्हणाले, "बुद्ध वैश्विक आहे कारण बुद्धांची  शिकवण 'स्वतःपासून सुरुवात करा' अशी आहे. बुद्धांचे बुद्धीत्व आत्मिक जबाबदारीचे भान देणारे आहे". इथे भारताच्या पंतप्रधानानी गौतम बुद्ध यांनी मांडलेले वैश्विक सत्य समजवून सांगताना एक अपरिवर्तनीय उपदेश केला आहे. गौतम बुद्ध म्हणतात की सार्वभौमिक सत्याच्या एकवचनी स्वरूपाचा वापर चार उदात्त सत्याचे प्रतिनिधित्व करतो  ते परस्पररित्या वैश्विक सत्याच्या एकवचन वापराचे प्रतीक आहे. ती चार उदात्त तत्वे आहेत दुक्खा सक्का म्हणजे दुःखाचे उदात्त सत्य, समुदय सक्का म्हणजे दुःखाच्या उत्पत्तीचे उदात्त सत्य, निरोध सक्का म्हणजे चेतना समाप्त करण्याचे उदात्त सत्त्य आणि मॅग्गा सक्का म्हणजे योग्य मार्गाचे उदात्त सत्य. या गोष्टींचा अर्थ  समजून देताना बुद्ध सांगतात की प्रत्येक मानवाचा सत्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा त्याच्या समाजाच्या गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणून जगातील सर्व लोक सत्याकडे जाताना वेगवेगळ्या मार्गावर जात आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे सत्य धारण करणाऱ्यांचा दृष्टिकोन सारखा असू शकत नाही. सहाजिकच त्यांची विविध मते त्यांना वैश्विक सत्या कडे घेऊन जात नाही. कारण वैश्विक सत्याला कोणतेही प्रतिस्पर्धी सत्य नसते. असे सांगून ते म्हणतात की सत्य हे कधीच बदलत नाही. म्हणूनच गौतम बुद्धांनी दुःखमुक्तीवरचे आपले चिंतन धम्माच्या स्वरूपात मांडताना त्या चार उदात्त सत्यांचा सिद्धांत मांडला आहे. म्हणून ते म्हणतात, " चांगले व्हा चांगले करा. ईश्वर जर कुठे असेल तर, तुम्ही चांगले झाल्यानेच तो तुम्हाला प्राप्त होईल, आणि ईश्वर जर नसेल तर चांगले होणे हे केव्हाही चांगले आहे. मनुष्य जी दुःखे भोगतो तो त्याचाच दोष आहे. मनुष्याने जर सत्कर्मे केली त्याची स्तुती केलीच पाहिजे". असे सांगून ते पुढे उपदेश करताना सांगतात, " केवळ ऐकीव गोष्टींवर  विश्वास ठेवू नका; कोणतेही सिद्धांत पिढ्यानपिढ्या चालत आले आहेत म्हणून त्यांच्यावर  विश्वास ठेवू नका. बहुसंख्य लोक डोळे मिटून काही गोष्टींचे अनुकरण करतात म्हणून तुम्हीही या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. एखाद्या प्राचीन ऋषीने म्हटले आहे म्हणून ही त्यावर विश्वास ठेवू नका. वडील माणसे आणि गुरुजन सांगतात एवढ्यावरून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. विचार करा, विश्लेषण करा आणि तुमचे निष्कर्ष तर्कसंगत असल्यास व सर्व जगासाठी हितकारक असल्यास ते स्वीकारा आणि त्यांच्याप्रमाणे वागा". एवढा उपदेश केल्यानंतर ते वैश्विक सत्य सांगताना म्हणतात, " तुम्हीच तुमच्या दुःखाचे कारण आहात. दुसरा कोणीही तुमच्यावर दुःख भोगण्याची सक्ती करत नाही. तुम्ही स्वतःच  दुःखाच्या चक्रात  सापडून अनेक प्रकारच्या दुःखाचा अनुभव घेत असतात. त्यामुळे तुम्हाला केवळ अश्रू व शून्यत्वच प्राप्त होते. म्हणून स्वार्थ त्यागा आणि निःस्वार्थी बना". जेव्हा आपण गौतम बुद्धांचे चरित्र वाचतो तेव्हा जाणवते की वैश्विक सत्याची ओळख करून देताना जे सत्य संपूर्ण जगात दीर्घकाळ टिकणारे आहे त्याचाच उल्लेख करतात कारण हेच वैश्विक सत्य सर्वांना माहित  झाल्यावर मानवी जीवन समृद्ध होऊ शकते.

वैश्विक सत्य हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. जर वैश्विक सत्य नसेल तर मानवी जीवनाला काहीही महत्व राहणार नाही. त्यामुळे अराजकता निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून वैश्विक सत्य हे महत्वाचे आहे. कारण ते नैतिक सुधारणेचे एक साधन आहे.

धन्यवाद


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...