रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २०३
विषय क्रमांक : ४
विषय : कॉपी की आयडेंटिटी
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
कॉपी आणि आयडेंटिटी हे दोन्हीही शब्द इंग्रजी भाषेतील असून या शब्दांचा अर्थ खूप ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यात येतो. कॉपी या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अनेक प्रकारचे अर्थ मराठी भाषेत सापडतात. कॉपी या शब्दाला प्रतिकृती, नक्कल, एकसारखे स्वरूप, अनुकरण, हस्तलिखित, नमुना, पुस्तकाची प्रत असे अनेक अर्थ असलेले शब्द मराठी भाषेत सापडतात. पण या शब्दांचा उपयोग पाहिजे तेव्हा योग्य रीतीने करता आला पाहिजे. एखादी गोष्ट दुसऱ्या सारखी तशीच्या तशीच बनवायची असेल तेव्हा आपण अनुकरण हा शब्द वापरू शकतो किंवा एखाद्याने वाचलेली किंवा लिहिलेली माहिती तशीच परत लिहून काढली तर आपण त्यास नक्कल केली आहे असे म्हणतो. बरीच माणसे कॉपी आणि डुप्लिकेट या दोन शब्दांचा घोळ घालतात. हे दोन्ही शब्द भिन्न आहेत आणि त्यांचा वापरसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने करतात. कॉपी हा शब्द आपण बहुतेक वेळेला पुनरुत्पादन या अर्थाने वापरत असतो तर डुप्लिकेट शब्द आपण समान प्रतिच्या अर्थाने वापरत असतो. कॉपी हा शब्द दस्तऐवज किंवा चित्रे त्या गोष्टींशी संबंधित आहे तर डुप्लिकेट हा शब्द बहुधा व्यक्ती किंवा वस्तूंच्या संदर्भात वापरला जातो. आजच्या संगणकाच्या काळात कॉपी, कट, पेस्ट हे शब्द आपण सहज पणे वापरत असतो. कॉपी, कट, पेस्ट या शब्दांचा प्रवास स्मार्टफोनच्या बाबतीत सुद्धा महत्वाचा बनला आहे. या पद्धतीचा ज्याने शोध लावला तो लॅरी टेस्लर याची ओळख म्हणजे आयडेंटिटी लोकांना एक संगणक शास्त्रज्ञ म्हणून झाली. आयडेंटिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या गुणांची ओळख, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये किंवा अभिव्यक्ती ज्या एखाद्या व्यक्तीचे किंवा समूहाचे वैशिष्ट्ये ठरवितात. समाजशास्त्रामध्ये आयडेंटिटी या शब्दाचा वापर करताना एखाद्या व्यक्तीची भूमिका, तिचे वर्तन आणि त्या भूमिकेचा व वर्तनाचा त्याच्या समूहावर झालेला परिणामाशी जोडला जातो. म्हणूनच माणसाला स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणे फार अवघड होत नसते. त्यासाठी त्याने समाजामध्ये मिळुन मिसळून वागायचं, दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे, स्वतःचे चांगले विचार दुसऱ्यांना सांगणे, प्रामाणिकपणे स्वच्छ कारभार करणे आणि माणुसकी या गुणांचा माणसां प्रति वापर करणे. त्यामुळे माणसांची स्वतःची आयडेंटिटी तयार होते.
इंग्रजीत असे म्हटले जाते की, "Do not copy rather create your own identity". याचा अर्थ असा आहे की कुणाचीही नक्कल करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करा. आपण जेव्हा शाळा किंवा महाविद्यालयात शिकत असतो तेव्हा कॉपी करणे आपल्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग झालेला असतो. एखाद्दे चित्र काढताना आपण प्रसिद्ध झालेल्या पेंटिंगची प्रतिकृती काढत असतो किंवा नृत्य करताना प्रसिद्धी पावलेली गाणी निवडत असतो तेव्हा आपण एक प्रकारची नक्कल किंवा कॉपीच करत असतो. पण हे करत असतानाच स्वतःची आयडेंटिटी त्यात शोधत असतो. आजच्या संगणकाच्या काळात किंवा व्यावसायिक जीवनात कॉपी करणे वाईट मानले जाते आणि दीर्घकाळासाठी हानिकारक समजले जाते. याचे कारण म्हणजे कॉपी, कट पेस्ट यामध्ये आपण गुंतत जात आहोत. तुम्ही एखाद्याचे शब्द, प्रतिमा चोरून आपला व्यवसाय करू शकता पण त्यातून तुमची ओळख पूर्णतः होणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्याच्या मेहनतीवर स्वतःचा व्यवसाय उभारणे हा यशाचा मार्ग नसून त्यात अपयशाचाच मार्ग आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्दी गोष्ट कॉपी करतात तेव्हा तुम्ही करीत असलेल्या कामाची माहिती तुम्हाला होणार नाही आणि त्यातील समस्या काय आहेत हे सुद्धा समजणार नाही. त्यामुळे तुम्ही कमकुवत व्हाल आणि अयशस्वीसुद्धा व्हाल कारण मूळ निर्मात्याने ज्या गोष्टी बनविल्या असतात त्यात त्याचे कठोर प्रयत्न आणि परिश्रम असतात. त्यामुळे जर काही चुका त्यात झाल्या असतील तर त्याचा आंतरिक तपशील तुम्हाला माहित असणार नाही आणि त्याचे विश्लेषण व्यवस्थित असणार नाही. मग तुम्ही निष्क्रिय स्थितीत जाल आणि कधीही नेतृत्व करू शकणार नाही. याचाच अर्थ तुम्ही नेहमी अनुकरण करता असा शिक्का तुमच्यावर बसेल. तेव्हा प्रत्येकाने मेहनत करून, कठीण मार्ग स्वीकारून स्वतः निर्माता होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही प्रभावित व्हाल आणि तुमच्या कृतीवर तुमचे नियंत्रण येईल आणि स्वतःची आयडेंटिटी बनवण्यास मदत होईल. प्रभावी परिवर्तन करण्यासाठी तंत्रज्ञान गरजेचे आहे पण त्या तंत्रज्ञानाची मालकी घेण्याचे स्वातंत्र्य, त्यात बदल करण्याची मक्तेदारी तुमच्याकडे असली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्दे काम करता, मग तो व्यवसाय असो, उत्पादन असो किंवा पुस्तक लिहिणे असो किंवा चित्र काढणे असो त्याचे तुम्ही निर्माते व्हा. त्यासाठी मेहनत घ्या. त्यामुळे तुम्ही कॉपी कट पेस्ट पासून दूर व्हाल आणि स्वतःच्या निर्मितीचा आनंद घेऊ शकाल म्हणूनच कोणत्याही गोष्टींची कॉपी करण्यापेक्षा स्वतःची आयडेंटिटी बनवा.
बऱ्याच लोकांना आयडेंटिटी अजून फार अवघड कल्पना वाटते तर बरेच लोक ही सोपी आणि निश्चित असलेली वस्तू समजतात. बऱ्याच लोकांना आयडेंटिटी योग्य प्रकारची न वाटता निंदनीय वाटते. हा केवळ गैरसमज आहे. आयडेंटिटी अशी गोष्ट आहे की आयुष्यभर एकसारखीच राहते. ती पूर्णपणे एकवचनीच असते. आयडेंटिटी ही कोणत्याही एका व्यक्तीद्वारे नियंत्रणात असत नाही म्हणून ती कोणत्याही एका घटनेद्वारे व्याख्येच्या अधीन नसते. जर आपण एखाद्या महापुरुषाची आयडेंटिटी घेऊन त्याची कॉपी करू लागलो तर ती गोष्ट काहीप्रमाणात यशस्वी होईल पण पूर्णपणे नाही. याचे उत्तम उदाहरण सुप्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारेंचे देता येईल. भ्रष्टाचाराबद्दल अण्णा हजारेंनी आंदोलन उभे केले आणि लोकपाल या संस्थेची स्थापना करण्यासाठी महात्मा गांधींचे उपवासाचे तंत्र वापरले. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीने दिलेल्या तंत्राचा वापर केल्यामुळे त्यांना जनतेची साथ मिळाली आणि सरकारसुद्धा त्यांच्यापुढे नमले व त्या संस्थेची स्थापना करण्याचे आश्वासन सरकारने दिले. त्यांनी सुरुवातीला या तंत्राचा वापर दिल्लीत केला आणि यशस्वी झाले. पण सरकारला दिलेल्या वेळेची पर्वा न करता दुसरे लोकपाल आंदोलन मुंबईत चालू केले आणि ते अयशस्वी झाले. कारण अण्णा हजारेंनी फक्त गांधींच्या उपवासाची नक्कल म्हणजे कॉपी केली. ते करताना त्यांना महात्मा गांधींच्या कार्यक्रमाची पूर्णपणे माहिती होती असे दिसले नाही. या विश्व मानवाला न ओळखण्याची चूक त्यांच्या हातून घडली होती. अण्णांनी हे आंदोलन २०१२ मध्ये केले होते. आज त्यांचे नाव लोक कुठेही आदराने लोक घेत तर नाहीच आणि त्यांचे आंदोलन हे लोकांच्या विस्मरणातसुद्धा गेले. त्यामुळे स्वतःची आयडेंटिटी तयार करताना कोणाचीही कॉपी न करणे हेच जरुरीचे आहे. त्यात महात्मा गांधींचे तर नाहीच नाही. कारण महात्मा गांधी जरी आज हयात नसले तरीसुद्धा त्यांचे विचारधन अक्षय आहे. ते जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारे आहे. नवीन समाज निर्माण करू शकणारे आहे. नव्या युगाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी शिक्षणाला महत्व दिले होते. त्यांनी विद्या म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि मुक्ती म्हणजे केवळ सुटका असा विचार न करता प्रत्येक माणूस गुलामगिरीतून सुटला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. सतत काम करण्याचा त्यांचा ध्यास पहिला तर थक्क होण्यास होते. त्यांचे चरित्र वाचताना त्यांनी हाती घेतलेली कामे पहिली की प्रभावित व्हायला होते. जीवनाचे महावस्त्र स्वतःच्या परिश्रमाच्या धाग्यांनी विणणारा असा हा महापुरुष जगाच्या पाठीवर कधी जन्माला नव्हता आणि पुढेही कधी जन्माला येणार नाही. त्यांनी जगाला दिलेल्या अहिंसेच्या मंत्राची नेहमी थट्टा केली जाते पण त्यांची अहिंसा प्रतिकारनिष्ठ होती. ते नेहमी म्हणत, " घातपाती कृत्याला रोखण्यासाठी शस्त्र उचलणे ही एक प्रकारची अहिंसाच आहे ". त्यामुळे त्यांना जनआंदोलन कधी करावे याची पूर्णतः जाणीव होती. म्हणून त्यांची आयडेंटिटी ही निर्मात्याची झाली होती. त्यांच्या आयडेंटिटी पासून प्रेरणा घेऊन जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, नेल्सन मंडेला, मार्टिन लुथर किंग आणि बराक ओबामा सारखे लोक स्वतःची आयडेंटिटी बनवू शकले. ते करताना त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचारांची फक्त साथ घेतली पण कॉपी केली नाही.
प्रत्येक मानवाची स्वतःची आयडेंटिटी त्याला लाभलेल्या परिस्थिमुळेसुद्धा बनली जाते. "तू आमच्या बरोबर चालू नकोस" असे जेव्हा महात्मा ज्योतीबा फुले यांचा सवर्ण मित्र म्हणाला तेव्हा महात्मा फुलेना नेतृत्वाच्या नात्यांचे अवमूल्यन करता आले आणि सत्य शोधण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यातून त्यांनी समाजात रूढ असलेली, कालबाह्य झालेली अनेक असत्ये मोठया संख्येने शोधून काढली आणि त्यांचा त्याग करून शिक्षणाची नवीन तत्वे निर्माण केली. स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी घातला. त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरात त्यांच्या पत्नीपासून केली. जर महात्मा फुले नसते तर भारतीय स्त्रियांचे काय झाले असते याचा विचार सुद्धा करवत नाही. हे सर्व समाजकारण करताना त्यांनी स्वतःची आयडेंटिटी निर्माण केली. त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःची आयडेंटिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली. त्यावेळेस डॉ आंबेडकरांनी फुलेंचा बुद्धीवाद आणि सत्यनिष्ठा आत्मसात केली. आपल्या पुराण कथेची चिकित्सा करत त्यातील दोष भारतीयांना दाखवून दिले. ते करताना त्यांनी मनुस्मृती कशी पक्षपाती आहे असे सांगून त्याचे दहन केले. इथे डॉ. आंबेडकर लिहितात, "जातीने समाज शतखंड होतोच, पण जातिजातीत शत्रूत्व निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला तडा जातो.या विषमतेमुळे भारतीय समाजाचे बरेच नुकसान होत आहे ". पुढे कायदा मंत्री झाल्यावर स्त्रियांना आणि त्यांच्या पीडित बांधवाना व्यवस्थित न्याय मिळवून दिला आणि भारताचे संविधान लिहून स्वतःची वेगळी आयडेंटिटी तयार केली. महात्मा फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःची आयडेंटिटी तयार करणारा दुसरा लोकनेता म्हणजेच छत्रपती राजश्री शाहू. स्त्रियांची, बहुजन समाजाची किंवा दलित समाजाची प्रगती केवळ शिक्षणाने होणार हे महात्मा फुले सारखे सांगत असत. त्यामुळे शाहूमहाराजांनी ' गाव तिथे शाळा " ही मोहीम उघडली. त्यासाठी त्यांनी सरकारी खजिन्याचा वापर केला. त्यांनी न्यायनिष्ठुर, समतावादी भूमिका घेऊन बहुजन समाजाची प्रगती साधली. त्यावेळेस त्यांना सनातनी लोकांनी खूपच त्रास दिला. काही कारणामुळे शाहुमहाराजांचे लोकमान्य टिळकांशीसुद्धा वाद झाले, पण जेव्हा लोकमान्य टिळकांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर 'मोठा माणूस गेला' म्हणून जेवणाचे ताट दूर करणारा शाहुमहाराज एक थोर पुरुषच होता यात कुठेही शंका नाही. महात्मा फुलेनी सर्वप्रथम बहुजन समाज, दलित समाज आणि स्त्रियांच्या प्रश्नाचा उल्लेख करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची आयडेंटिटी निर्माण केली. छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंकडून प्रेरणा घेऊन त्यांचे कार्यक्रम पुढे नेताना महात्मा फुलेंची कुठेही कॉपी केली नाही आणि स्वतःची आयडेंटिटी निर्माण करून बहुजन समाज, दलित समाज आणि स्त्रियांच्या प्रश्नांना न्याय दिला. म्हणून नेहमी कॉपी करण्यापेक्षा स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणे महत्त्वाचे ठरते.
आज पर्यंत जेवढ्या आयडेंटिटी निर्माण झाल्या, त्याचा उपयोग सर्व प्रकारच्या भावना, विचार, श्रद्धा, कृती इत्यादींसाठी करू शकतो आणि टिकवूनसुद्धा ठेवू शकतो. पण त्याचा उपयोग पुढील पिढीसाठी करताना त्या आयडेंटिटीची चिकित्सा होणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने किंवा विचाराने स्वतःची आयडेंटिटी बनवली, ती कशी बनविली, त्यासाठी त्यांनी काय त्याग केला याचे विश्लेषण जरूर व्हायला पाहिजे. तेव्हाच त्या व्यक्तींच्या आचार विचारांचे ज्ञान आपणास होण्यास मदत होईल. बहुतेक लोक आपले जीवन बुद्धिविना, विचाराविना, संशोधन न करता जमेल तसे जगत असतात. त्यात त्यांना कॉपी मास्टर होण्यास बरे वाटत असते. कुठल्याही गोष्टीचे मूल्यमापन करून नवी निर्मिती न करता आहे त्यातच ते समाधानी होत असतात. थोडक्यात ते कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यास तयार होत नाही. जगामध्ये विविध क्षेत्रात ज्ञान आणि विज्ञान प्रत्येकवेळी विकसित होत आहे. जर माणसाचे मन ग्रहणशील असेल तर ते स्विकारणे मानवाला सहज शक्य होईल. आज समाजामध्ये ज्ञान क्षेत्रातील अनेक विचावंत ज्याप्रकारे अज्ञानाचे प्रदर्शन करतात तेव्हा आपला समाज अधोगतीकडे चालला आहे का असे वाटू लागते. शिक्षक, प्राध्यापक, कुलगुरू, शास्त्रज्ञ ही माणसे पारंपारिक ज्ञानात अडकून पडू लागली तर नवी निर्मिती कशी होईल याचा विचार करणे फार जरुरीचे आहे. जेव्हा एखाद्दी व्यक्ती ज्ञानक्षेत्रात काम करण्यासाठी उतरेल तेव्हा त्या व्यक्तींनी प्रत्येक गोष्ट चिकित्सक पद्धतीने निर्माण केली पाहिजे. नाहीतर तथाकथित बुद्धीवान आणि अज्ञानी मनुष्य आपल्या समाजाचा ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच कोणतीही गोष्ट कॉपी न करता त्या गोष्टींची चिकित्सा करून सत्य लोकांपुढे आणले तरच या देशात विक्रम साराभाई, एम एस स्वामिनाथन, डॉ होमी भाभा, सतीश धवन, दादासाहेब फाळके सारखे वैज्ञानिक तयार होतील आणि त्यांची आयडेंटिटी सर्व जगाला प्रेरणा देत राहील.
धन्यवाद
Comments
Post a Comment