रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २०१
विषय क्रमांक : ४
विषय : धुंद झाल्या कातरवेळी
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
बऱ्याचवेळा माणसाला आपल्या कामानिमित्त बाहेरगावी प्रवास करावा लागतो. त्याचा दिवस कामात असल्यामुळे चांगला जातो. पण संध्याकाळी त्याला एकटेपणा जाणवू लागतो. तेव्हा त्याला घरामध्ये देवासमोर मंद तेवत राहणारी आणि अंधाराचे उजेडात परिवर्तन करणारी सांजवात आठवते. कारण ही सांजवातच त्याच्या सैरभैर मनाला साहाय्य करत असते. देवापुढे उभे राहून म्हणत असलेली रामरक्षा किंवा हनुमानस्तोत्र हे मनाला कशी उभारी देतात याची जाणीव होत जाते. या गोष्टी मनात किती सकारात्मक भाव निर्माण करतात याची जाणीव तेव्हा जाणवू लागते. अशाच एका संध्याकाळी मी स्वतः कामानिमित्त चेन्नईला गेलो असताना सायंकाळी मरीना बीचवर फिरायला गेलो होतो. तेव्हा संध्याकाळी मावळत्या सूर्याचे रूप बघून मला खूपच मजा वाटत होती. तो जसजसा पश्चिमेकडे सरकू लागला तेव्हा त्याचा तो मोहक रंग आणि हळूहळू कमी होत राहणारे त्याचे ते रूप पाहून खूपच मजा वाटत होती. रात्र झाल्यानंतर त्या बीचवरून चालत येताना हवेत पसरलेला फुलांचा मंद सुवास खूपच आल्हादायक वाटत होता आणि नकळत आपण चांगल्या सुखाच्या राज्यात परत येत असतो. याला कारण म्हणजे मी समुद्र किनाऱ्यावरून परत येत होतो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे समुद्र आणि मानव यांच्या स्वभावात कुठेही फरक जाणवत नाही. दोघांमध्ये कुठल्यातरी टप्यावर जशी अथांगता आढळते तसाच परकोटीचा एकांतपण सापडत असतो. जसे समुद्रात अथांगता आणि एकांत एकत्रित नांदत असतात तसे मानवी जीवनात सुखदुःख एकत्र वावरत असते. त्यामुळे सुख आणि दुःख एकत्र बघताना वेगवेगळ्या वेदना असतात याची जाणीव आपल्याला हवी. म्हणूनच समुद्र किनारी गेले की मानवी मन आपोआप शांत होते. सायंकाळच्या कातरवेळी विचारांच्या गुढतेचा उलघडा होण्यासाठी एका सुंदर क्षणाची गरज असते आणि हे सुंदर क्षण आपल्याला समुद्रकाठी फिरताना मिळतात आणि आपली कातरवेळ धुंद होऊन जाते.
हा लेख लिहीत असताना मला उंबरठा या मराठी चित्रपटची आठवण येत आहे. ते येण्याचे कारण म्हणजे त्या चित्रपटातील सुरेश भट यांनी लिहिलेले "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच गीत मी गात आहे " हे गाणे. कातरवेळी हे गाणे आपल्या मनाच्या कुपीतून अचानक बाहेर येते आणि कळत नकळत ते आपण गुणगुणु लागतो. हे गाणं असे आहे की त्यात आनंद आहे, दुःख पण आहे, विरह, मिलन आणि ममत्व सुद्धा आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेले गाणे ज्याप्रकारे लता मंगेशकर यांनी गायले आहे की ते आपल्या हृदयातील भावनांना नेहमीच साथ देत असते. या चित्रपटातील नायिका एका सुखवस्तू कुटुंबातील असते पण आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग पीडित झालेल्या मुलींसाठी करावा यासाठी ती आपल्या घराचा उंबरठा ओलांडते. हे करताना ती आपल्या सुखवस्तू कुटुंबापासून दूर जाते. अशाच एका सायंकाळी तिला आपल्या घरातील माणसांची आठवण येते आणि हे गीत तेव्हा सूरू होते. जरी हे गाणे उदास मनासाठी असले तरी हे ऐकताना मनाला कुठेतरी उभारी देत असते. पटदीप रागात गुंफलेले हे गीत ऐकताना किंवा पडद्यावर बघताना खूपच परिणामकारक होते आणि संध्याकाळच्या कातरवेळी मनाला वेगळ्याच धुंदीत नेत असते. याचप्रमाणे कातरवेळेस योग्य असे अजून एक गीत आनंद या चित्रपटामध्ये आहे. ते सुद्धा उदासवाणे गीत आहे. तरीसुद्धा मनाच्या कोपऱ्यात ते गीत खूपच परिणाम करून जाते. हे गीत लिहिले आहे योगेश यांनी, स्वरबद्ध केले आहे सलील चौधरी आणि गायले आहे मुकेशनी. त्या गीताचे बोल आहेत,
"कही दूर जब दिन ढल जाए, सांज की दुल्हन बदन चूराए
मेरे खयालोँकी आंगन मे कोई, सपनोके दीप जलाए ". किती छानपणे सायंकाळाच्या वेळेचे वर्णन करताना आयुष्याचे तत्व सांगितले आहे. दिवस संपत आलेले आहे आणि अशावेळीस मन अस्वस्थ आहे, त्यावेळी संध्याकाळ एका सजलेल्या नवरी सारखी येऊन हळूच माझ्या विचारांच्या अंगणात नवीन स्वप्नानांचे दिवे लावत आहे. खरोखरच हे गाणे कातरवेळी ऐकताना आपल्या मनाला धुंद करीत असते.
मुंबई आणि गोवा फिरताना मला नेहमीच आनंद होत असतो. दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने मुंबई शहरात काही ठिकाणी केलेली रोशणाई पाहण्यासाठी आंम्ही त्या दिवशी घराबाहेर पडलो. टॅक्सी करून थेट नरिमन पॉईंट गाठले तेव्हा सायंकाळ झाली होती. तिथून एअर इंडिया इमारतीसमोर उभे राहून मजा बघताना कातरवेळेची धुंदी अजबच होती. तेथून पुढे मंत्रालय, CST रेल्वे स्थानक, गेटवे बघत संध्याकाळपासून सूरू झालेला हा प्रवास फारच रोमांचकारिक वाटत होता. त्यादिवशी एक गोष्ट जाणवत होती ती म्हणजे कातरवेळी वातावरणात निर्माण झालेली सकारात्मक भावना. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर फिरताना खूपच आनंद मिळत होता. एकटेपणा कधीच दूर गेला होता. अनेक माणसे आनंदाने ती वेळ साजरी करीत होते. या कातरवेळी मिळालेला आनंद पुढची अनेक संध्याकाळ सकारात्मक पद्धतीने जाऊ लागली. अशाच काही कातरवेळा घालवलेल्या होत्या संगीत मैफिलेमध्ये. एका संध्याकाळी मुंबईतील विलेपार्ले या भागात एकदा सायंकाळी गाण्याची मैफिल होती. त्यात परवीन सुलताना यांनी कातरवेळी मारावा हा राग गायला होता. जेव्हा त्या रागाचे सादरीकरण आपल्या गायनातून करत होत्या, तेव्हा त्या रागाच्या स्वरामधून ती कातरता, व्याकुळता, हुरहूर व्यक्त करत होत्या. त्यामधून आपला प्रियकर आपल्या बरोबर नाही याची जाणीव प्रेयसीला होते तेव्हा तिची जी व्याकुळता त्या रागातून व्यक्त होताना आपल्या मनाला सहजपणे भिडत होती. इथे एक गोष्ट नक्कीच जाणवते ते म्हणजे कलाकाराचे संवेदनशील मन. त्याशिवाय कुठलाही कलाकार त्या भावना रागाच्या स्वरांच्या माध्यमातून व्यक्त करून रसिक प्रेक्षकांच्या मनाला सहजपणे भिडू शकले नसते. म्हणून संध्याकाळी कातरवेळी प्रेयसी म्हणू लागते, " पियाबीन जियरा निकसो जात, मै कैसे कहूं अपने मन की बात " तेव्हा माराव्याचे स्वर कानामध्ये गुंजू लागतात आणि मनाला वेगळीच हुरहूर देऊ लागतात. ते ऐकत असतानाच कुठूनतरी पुरिया धनश्रीचे स्वर ऐकू येतात आणि मग वाटू लागते की धुंद झाल्या कातरवेळी.
धन्यवाद
Comments
Post a Comment