रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १९८
विषय क्रमांक : ४
विषय : चैतन्य-श्रावणाचे देणे
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
श्रावण महिना हा हिंदू पंचांगाप्रमाणे पाचवा महिना असून चातुर्मासातील हा श्रेष्ठ महिना आहे. वैशाखाच्या उन्हाने आणि जेष्ठ आषाढातील पावसामुळे बेजार झालेल्याना वर्षा ऋतूत येणारा श्रावण महिना हा एक नवीन चैतन्य निर्माण करून देतो. आषाढांमध्ये भरपूर पडलेल्या पावसामुळे नदीनाले, तलाव भरभरून वाहात असतात. त्यामुळे श्रावणात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. रामायणात हेमंत ऋतूला, तर गीतेत मार्गशिष महिन्याला फार महत्व दिले असले तरी मला श्रावण महिनाच मानवी मनांमध्ये चैतन्य निर्माण करतो असेच वाटत असते. निसर्ग आणि मानवी मन यांचे एक अनोखे नाते आहे. निसर्गामध्ये होणारे बदल माणसामध्ये चैतन्य निर्माण करीत असतात. जेव्हा अशा निसर्गातील बदलाला सण- उत्सवांची जोड मिळते तेव्हा मानवी जीवन खूपच आनंदाने बहरून जाते. हे सर्वकाही आपल्याला श्रावण महिन्यात अनुभवायला मिळते. चैत्रादी वर्षातील या पाचव्या महिन्याला श्रावण असे नाव देण्याचे मुख्य कारण म्हणजे या महिन्यात पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो असा उल्लेख बऱ्याच पुराण कथेत आढळतो तर काही पुराण कथा सांगतात की या महिन्याचे माहात्म श्रवण करण्यास योग्य असे असेच आहे म्हणून या महिन्याचे नाव श्रावण आहे. शिवपुराणात भगवान शिवशंकर म्हणतात की सर्व महिन्यात त्यांचा आवडता महिना श्रावण आहे. म्हणून या महिन्यात दर सोमवारी भगवान शंकरासाठी एकभुक्त व्रत आचरले जाते. मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीचा उत्सव साजरा करतात. गुरुवारी दत्तभक्त गुरुचरित्राचे पठण करतात तर शुक्रवारी स्त्रिया लक्ष्मीची पूजा करतात. शनिवारी मारुती किंवा शनि देवाची आराधना करतात आणि रविवारी अनेक ब्राह्मण स्त्रिया सूर्याची पूजा करताना त्यास दुर्वा वाहतात. त्याचप्रमाणे नागपंचमी, नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पिठोरी अमावस्या व पोळा यासारखे सण साजरे करतात. म्हणूनच चैतन्य हे श्रावण महिन्याचे देणे वाटत राहते.
खरचं श्रावण महिन्यात हर्षाचा झंकार निनादत असतो. त्यामुळे मराठीमध्ये अनेक कवी आणि कवियत्रीने खूपच छान अशा काव्यरचना केल्या आहेत. रसिकांना वेड लावणाऱ्या या हिरव्या मनोहरी महिन्याचे रूप पाहून बालकवींसारखा निसर्गावर प्रेम करणारा कवी म्हणू लागतो,
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नमो मंडपी कोणी भासे
किती छानपणे या ओळी त्यांनी आपल्या श्रावणमासी या कवितेत मांडल्या आहेत. या श्रावण महिन्यात सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि ऊन पावसाचा चाललेला लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते तर वर आकाशात इंद्रधनुचा जो गोफ विणला गेला आहे ते पाहून असे वाटते की कोणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे. असे सांगून ते पुढे म्हणतात,
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा
बलाक माला उडता भासे कल्प सुमनाची मालाची ते
उतरून येती अवनीवरती ग्रह गोलाची की एकमते
फडफड करून थकले आपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
याचा अर्थ असा की ढग आल्यामुळे आपल्याला संध्याकाळ झाल्यासारखी वाटते पण जेव्हा ढग बाजूला होतात तेव्हा पिवळे ऊन उंच घरांवर किंवा झाडांवर पडते तेव्हा संध्यामयी ढगांवर असंख्य रंग उमटतात तेव्हा वाटते की हे ढग संध्याकाळचे राग गात आहेत आणि आकाशात कुणीतरी सौंदर्याचे महान चित्र काढले आहेत. एवढे सांगून बालकवी थांबत नाही आणि पुढे म्हणतात आकाशात उडणाऱ्या बागळ्यांची रांग कल्पफुलांच्या हारासारखी वाटते आणि हेच बगळे जेव्हा जमिनीवर उतरतात तेव्हा जमिनीवर ग्रहगोल उतरल्यासारखे वाटतात. नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे पक्षी आपले पंख सावरीत फडफड करीत आहे तर हरिणी आपल्या पाडसांबरोबर हिरवळीवर बागडत आहेत. शेवटी या प्रसन्न सोहळ्याचे वर्णन करीताना बालकवी म्हणतात,
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देव दर्शन निघती ललना हर्ष माईना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
फुलांसारख्या सुंदर मुली सजून हातामध्ये सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले तोडीत आहे आणि सुवासिनी देवदर्शन घेण्यासाठी देवळाकडे जात आहेत. त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद दिसत आहे आणि श्रावण महिन्याचे गोड गाणे त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले दिसत आहेत. श्रावण महिन्याचे किती सुंदर वर्णन बालकवीनी आपल्या कवितेत केले आहे ते वाचतानाच मानवी मनाला नक्कीच चैतन्य वाटत असणार.
श्रावण महिना म्हणजे सृजनाला आवाहन करणारा, कवींना भुरळ घालणारा महिना आहे. असा हा महिना कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेलासुद्धा बहर आणतो. त्यांच्या तनामनात चैतन्य फुलवितो. म्हणून ते म्हणतात
हासरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला
तांबूस कोमल पाऊल टाकीत,
भिजल्या मातीत श्रावण आला
मेघात लावीत सोनेरी निशाणे
आकाशावाटेने श्रावण आला
या कवितेत श्रावण महिन्याचे अतिशय सुंदर आणि विलोभनीय वर्णन केले आहे. या कवितेतील खेळकर आणि खोडकरपणा आपल्याला शाळेय जीवनाची आठवण करून देतात. त्याचप्रमाणे मंगळागौरीचा खेळ, श्रावणात पाहिलेले इंद्रधनुष्य या सर्वांची आठवण या कवितेतील खालील ओळी वाचताना येतात.
वाऱ्याच्या संगती खेळत लाटांशी
झिमझिम धारांशी श्रावण आला
लपत छपत हिरव्या रानात
केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधून कमानी
संध्याच्या गगनी श्रावण आला
असे वर्णन करून कवी कुसुमाग्रज ऊन पावसाच्या खेळाला आनंदाचे रूप देत सृष्टीमध्ये सुखाची पेरणी झाल्याचे म्हणतात,
लपे ढगामागे धावे माळावर
असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करुन पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला
इतके सुंदर वर्णन कवी कुसुमाग्रजानी केले आहे. तर कवियत्री इंदिरा संत यांना श्रावण महिना म्हणजे निसर्गाचे चंचल स्वरूप वाटते. म्हणून त्या म्हणतात
उन्हाचे पाटव नेसले टाकले |
वाऱ्याचे पैंजण घातले, फेकले |
घातले, धुतले, डोळ्यात काजळ |
लावले, पुसले, केवडा अत्तर ||
अशा कवितेच्या ओळी वाचत असताना अचानक कवियत्री शांताबाई शेळके आठवू लागतात. त्यांच्या मते श्रावण हा शृंगाराची भावना व्यक्त करणारा महिना आहे. म्हणून त्या म्हणतात की रिमझिम करीत श्रावण आला खरा पण त्याचा आनंद मन घेऊ शकत नाही कारण या श्रावणा बरोबर माझा साजण आलेला नाही. शृंगार आणि त्याच्याबद्दलच्या भावना त्यांनी आपल्या कवितेत मांडताना म्हटले आहे,
रिमझिम बरसत श्रावण आला
साजण नाही आला
काय करू या तरुण वयाला
फुलूनी उमेदी जाती लयाला
गेंद सुके अलबेला
झर झर झरती श्रावणधारा
शीतल गंधित ओला वारा
झोंबत ये पदराला
थरथरतं मी, मी वावरते
हृदय रिते हे करी सावरते
सांगा कुणी सजनाला..
किती छानपणे शांताबाईंनी श्रावण महिन्याला शृंगाराची उपमा दिली आहे.
शांताबाई शेळकेनी केलेले श्रावणाचे काव्य वाचल्यावर साहजिकच कविराज ग दि माडगूळकर यांची कविता आठवते. कारण जेव्हा शिरीष, पारिजातक, सोनचाफा, बकुळी, चमेली सारखी फुले दिसू लागली तेव्हा मला त्यांच्या या गाण्याच्या ओळी नकळतच आठवू लागतात. ते लिहितात,
श्रावण आला ग वनी, श्रावण आला |
दरवळे गंध मधुर ओला
एकलीच मी उभी अंगणी
उगीच कुणाच्या आणित स्मरणी
चार दिशांनी जमल्या तोवर गगनी घनमाला
बरसू लागल्या रिमझिम धारा
वारा फुलवी मोर पिसारा
हलू लागली झाडेवेली, नाच सूरू झाला.
श्रावण महिन्याचे सुंदर वर्णन अनेक कविनी केलेले आहे मग त्यात आमचे गोव्याचे कवी बाकीबाब म्हणजे बा. भ. बोरकर कसे मागे राहतील. ते म्हणतात,
आला गं श्रावण आला गं श्रावण |
सृष्टीराज, लावण्यराज, मोतीया वृष्ठीला घेऊन सोबत लेवून सुवर्णसाज || असे म्हणत ते पुढे लिहितात,
मनातले सल रुजून आता |
त्याचा झाला मरवा रे ||
असे वाटते की श्रावण आल्याचा आनंद त्यांना खूपच झालेला दिसतो. त्यांच्या खालील ओळी वाचून वाटते की ते श्रावण महिन्याच्या प्रेमात पडलेले दिसतात. श्रावणतात सृष्टीला त्यांनी पाचवा महिना लागलेल्या गर्भावती स्त्रीची उपमा दिली आहे. ते म्हणतात,
समुद्र बिलोरी आयना
सृष्टीला पाचवा म्हैना
वाकले माडांचे माथे
चांदणे पाण्यात न्हाते
किती सकारात्मक पद्धतीने बोराकारांनी श्रावण महिन्याची कल्पना आपल्या कवितेत केली आहे.
दरवेळी श्रावण येतो तेव्हा मला मंगेश पाडगावकर यांच्या श्रावणात घन निळा बरसला या कवितेची आठवण येते. उन्हाचे चटके शोषत झाडे उभी असतात, दूर दूरचे डोंगर उदास वाटतात आणि अवतिभवतीचा परिसरसुद्धा भकास होत असतो. अशावेळीस आकाशात काळे ढग जमू लागतात आणि काही क्षणात पर्जन्यधारा बरसू लागतात. त्याच्या गंधाचा दरवळ सर्वत्र पसरू लागतो आणि अवघे चराचर आनंदाने फुलून येत. मग पुढे येणाऱ्या श्रावणाचे सौदर्य कवीला दिसू लागते आणि ते हिरवळीला पाचू म्हणजे माणिकरत्नांची उपमा देतात आणि या पाचूच्या हिरव्या माहेरी आलेल्या उन्हाला उपमा देताना म्हणतात
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीमधारा
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोर पिसारा
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
खरचं श्रावण आपल्या कवींना आणि कवियत्रीना खूप आनंद देणारा महिना आहे तसाच तो अनेक लेखकांना सुद्धा चैतन्य वाटणारा महिना आहे. त्यातील उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास सुप्रसिद्ध लेखिका आणि विदुशी दुर्गा भागवत यांचे देता येईल. त्यांच्या ऋतूचक्र या पुस्तकात त्या म्हणतात, " आणि श्रावणातल्या पावसाची आणि ढगांची मजा किती आणि कशी सांगावी? सूर्यबिंब तर अगदी दिसत नाहीसे झाले आहे. हे पहा संध्याकाळचे ढगावर ढग पांगताहेत. जरा पाऊस थांबला आहे, वारा खूप सुटला आहे; ढग पांगताहेत आणि दूर जाता जाता सरड्याप्रमाणे रंग बदलत आहेत. किती हे रंग! पश्चिमेच्या क्षितिजाजवळ मोठे जांभळे ढग काळ्याकबऱ्या आकाशभर पसरलेल्या ढगांतून मुसळी मारतात. मग ते पांगु लागतात आणि त्यातून तांबूस जांभळे ढग निघतात. मग त्यांच्यातून तांबडे ढग निघतात आणि लिंबी रंगाचे पिवळे जर्द ढग हसू लागतात. पिवळा प्रकाश खुलतो. वातावरण उजळते. जवळजवळ अर्धातास ही रंगपंचमी चालू असते आणि मग जांभळे ढग फिरून आक्रमण करून लाल पिवळ्या छटा दडवतात, आणि काळ्या धूसर ढगांचे पांघरून घेऊन पावसांच्या सरींचे गाणे ऐकत ते झोपून जातात. " इतके सुंदर वर्णन करीत त्या पुढे लिहितात, " आणि श्रावणाचा हा बहर पूर्ततेला येतो नव्या फुलांच्या आगमनाने. फुलांच्या रुपात तो भाद्रपदात विलीन होतो. ग्रीष्मात झडलेली शिशिराची फुले फिरून अधिक टपोरी होऊन झाडांवर दिसू लागतात आणि पारिजातकाच्या मोत्या-पोवळ्यांच्य राशीतून श्रावणाचे हसू फुटते. आकाशातून पळून गेला असा वाटणारा सोनेरी रंग सोनचाफ्याच्या फुलांवर नाचू लागतो. सुफलित सृष्टीचे कृतार्थतेचे, सुखाने थबथबलेले अश्रूबिंदू बकुळीच्या फुलांच्या रूपाने टप टप रात्रंदिवस गळू लागतात. कृतार्थतेच्या भावनेमुळेच ही फुले चीर सुगंधी झाली असतील? सुवर्णपुष्पीची किंवा सोनटक्क्यांची नाजूक आणि विलक्षण सुवासिक पांढरी फुले उमलण्याचा हाच काळ. फुलांच्या पायघड्या वरून भाद्रपद भूतलावर पदार्पण करीत असतो".
खरचं श्रावण महिना हा मानवी मनाला नेहमीच आनंद देत असतो. जसे या महिन्यात वेगवेगळे सण उत्सव असतात जे मनाला चैतन्य देत असतात त्याचप्रमाणे अनेक कवीनी केलेल्या कविता वाचल्या किंवा लेखकाने लिहिलेले लेख वाचले तर नेहमीच असे वाटत असते चैतन्य हे श्रावणाचे देणे आहे. इथे कवी बोरकरांच्या कवितेच्या काही ओळी लिहून हा लांबलेला लेख संपवत आहे
मल्हाराची जळात धुन |
विज नाचते अधून मधून |
मनात गेला मोर भिजून
गोपी खेळल्या वनी थिजून
घुमतो पावा सांग कुठून?
कृष्ण कसा न उमटे अजून?
वेली ऋतुमती झाल्या ग |
सरीवर सरी आल्यावर |
सचैल गोपी न्हाल्या गं |
धन्यवाद
Comments
Post a Comment