रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक: २००
विषय क्रमांक : ४
विषय : आणि या देशाचे आपण देणे लागतो
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे देणे लागतो. इथे स्वातंत्र्यवीर आपणास सांगू इच्छितात की मानव या जगात जन्म घेतो आणि मृत्यू झाल्यावर हेच जग तो सोडून जातो. पण जन्मापासून ते मरेपर्यंत त्याचा जो प्रवास आहे तो ज्या देशात राहतो त्या देशाशी निगडित आहे. या दरम्यान मनुष्य जी कामे करतो ती करताना त्याने आपल्या मातृभूमीला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या देशाकडून मिळालेल्या अनेक गोष्टींपासून मग त्यात तुम्हाला मिळालेले अन्न, कपडे, वस्तू अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्यामुळे त्याला जे काही फायदे झाले आहेत त्यांचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव असायला पाहिजे. माणूस जेव्हा जगत असतो तेव्हा त्याला निसर्गातील अनेक गोष्टी त्याच्या उपयोगी पडत असतात, जेव्हा तो शिकत असतो तेव्हा कोणीतरी विद्वान माणसे त्याला ज्ञान देत असतात, तो करीत असलेल्या व्यवसायातून त्याची जी काही प्रगती करतो ती सर्व प्रगती समाजातील कोणाच्या तरी त्यागाने किंवा परिश्रमाने झाली आहे याची पूर्ण जाणीव माणसाला हवी. म्हणूनच स्वातंत्र्यवीर म्हणतात की या पृथ्वीवर जन्मभर जे काही आपण उपभोगतो त्याचे आपण काही देणे लागतो.
जेव्हा आपण म्हणतो की या देशाने मला भरपूर दिले आहे त्यामुळे त्यांचे ऋण आपल्यावर असते. त्यामुळे आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे देणे लागतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वातंत्र झाला याचा अर्थ आपण एवढाच घेतो की आपण परकीय सत्तेपासून म्हणजे ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र झालो. हे जरी खरे असले तरी स्वातंत्र्याची चळवळ चालू असताना त्यात भाग घेतलेल्या जवळ जवळ सर्व भारतीय नेत्यांना स्वातंत्र्याची ही संकुचित व्याख्या पसंद नव्हती. त्यांचे म्हणणे असे होते की जो समाज आज गुलामगिरीत अडकून पडला आहे किंवा समाजातील खालच्या थरातील माणसांना या गुलामगिरीत घाणेरडे जीवन जगावे लागत आहे ते जीवन भारत स्वातंत्र झाल्यानंतर असता कामा नये. कारण समाजातील सर्व प्रकारची माणसे त्यांच्या कुवतीनुसार प्रत्येक मानवाचे जीवन घडवीत असतात. त्यामुळे समाजातील सर्व लोकांनी आपल्या भारतीय समाजाचे व्यक्तीस्वातंत्र्य, गट स्वातंत्र्य, व्यवहार स्वातंत्र्य जपले पाहिजे. असे करीत असताना आपण सर्वांनी स्वातंत्र्याची व्याप्ती पूर्णपणे समजून घेतली पाहिजे. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास आज मुंबई शहरात अनेक नागरिक गाडी किंवा दुचाकी चालवितांना सिग्नलचे नियम धाब्यावर बसवितात. तेव्हा त्यांना या नियमाची गरज काय आहे आणि ते कशासाठी आहेत याची जाणीव नसते. मग ही माणसे व्यक्तीस्वातंत्र्य, गट स्वातंत्र्य आणि व्यवहार स्वातंत्र्य यांची किंमत ठेवतील का? असा प्रश्न पडतो. आज सोशल मीडियावर जर काही विचार वेगळे मांडले की त्यावर बरीच माणसे इतके घाणेरडे शब्दप्रयोग करतात तेव्हा त्यांना हे समजत नाही की त्यांच्या या कर्मामुळे ते सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याला खूप दूर करीत आहेत. एखाद्याच्या वेगळ्या विचारांमुळे आपल्या समाजात नवीन आणि चांगल्या प्रकारची निर्मिती होऊ शकते. एखाद्याचे विचार कितीही वेगळे असले किंवा एखादा माणूस वेगळ्या प्रकारचे विचार घेऊन नवीन गोष्टीची निर्मिती करीत असेल तर अशी संस्कृती आपण जपली पाहिजे. कारण या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य दिले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची निर्मिती लोकशाही मार्गाने केली व ती करताना व्यक्तीस्वातंत्र्य, गट स्वातंत्र्य आणि व्यवहार स्वातंत्र्य सर्वांना दिले, त्याचप्रमाणे शेकडो वर्षे गुलामगिरीतील माणसांना सन्मानाने जगायला शिकविले आणि भारताला प्रगतीचे अनेक मार्ग खुले केले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर जन्मालेली ही पिढी चांगल्याप्रकारे आपले शिक्षण पुरे करून सन्मानाने जगू लागली तेव्हा अशा निर्मिती केलेल्यांचे आपल्यावर बरेच ऋण आहे. त्यासाठी भारतीय समाजातील सर्व माणसांनी भारतातील व्यक्तीस्वातंत्र्य, गट स्वातंत्र्य आणि व्यवहार स्वातंत्र्य जपले पाहिजे आणि हे जपणेच म्हणजे या देशाचे देणे आहे हे समजून घेतले पाहिजे.
हा लेख लिहीत असताना मला अमेरिका या राष्ट्राचे ३५ वे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या एका ऐतिहासिक भाषणाची आठवण येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर ते म्हणाले होते, "And so, my fellow Americans : ask not what your country can do for you - ask what you can do for your country. My fellow citizens of the world, ask not what America will do for you, but what together we can do for the freedom of man ". खरचं हा त्यांच्या भाषणाचा सर्वात संस्मरणीय आणि चिरस्थायी भाग होता. यात त्यांनी त्यांच्या अमेरिकन बांधवाना आव्हान केले आहे की हा देश तुमच्यासाठी बरेच काही करत आला आहे तेव्हा तुम्ही या देशाचे काहीतरी देणे लागत आहे. तेव्हा तुम्हीच आम्हाला सांगा की तुम्ही या देशासाठी काय करू शकता? पुढे जाऊन केनेडी आंतरराष्ट्रीय श्रोत्यांना संबोधित करताना म्हणतात की माणसाच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेबरोबर आपण एकत्र काय करू शकतो हे सांगा. हे सांगताना जॉन केनेडीना सांगायचे होते की प्रश्न हा नाही की तुम्ही तुमच्या देशाचे काय देणे लागता; त्यापेक्षा तुम्ही राहत असलेल्या समाजाला काय देणे लागता याचाच विचार करा. कारण या समाजाच्या घटकानीच राष्ट्राची निर्मिती झाली आहे. त्यासाठी आपला देश एक सुजाण नागरिक असणे आणि सर्व पातळीवर म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत सर्वांना शिक्षित करणे या देशातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांने आपल्या देशात लोकशाही टिकून राहण्यासाठी जबाबदारी घेऊन मतदान करणे हेच प्रत्येकांचे आपल्या देशावरचे मोठे देणे आहे. त्यासाठी प्रातिनिधिक लोकशाहीचे कार्यक्रम राबविले गेले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा फायदा या देशाला कसा होईल हे पाहिले पाहिजे. आज भारत देशाचा विचार करताना जॉन केनेडीचे विचार जरुरीचे वाटत आहे आणि प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे की कोणत्याही शुल्लक गोष्टींमध्ये अडकून न पडता त्याचप्रमाणे पूर्णपणे विरोधात न जाता प्रसंगी तडजोड करून या देशाला सक्षम राष्ट्र बनविणे गरजेचे आहे. त्यासाठी आशावादाचे जीवन देणे भारताला फार जरुरीचे आहे.
आज बरेच भारतीय परदेशातील अनेक लोकांचे गुण गात आहेत आणि तिथे जाऊन स्थायिक होण्याचा संकल्प करीत आहेत. हीच माणसे जेव्हा भारतात असतात तेव्हा भारतातील पाणी आणि वीज वाया घालवत असतात. रस्त्यावर कचरा टाकतात आणि वाहतुकीचे नियम तोडतात. तेव्हा त्यांना काहीच वाटत नसते. समाजातील सर्वात खालच्या थरातील लोकांना हक्कापासून वंचित ठेवताना त्यांना कुठेही वाईट वाटत नाही. आपल्या देशातील गरीब लोकांना एक वेळेचे मुबलक अन्नही जेवायला मिळत नाही हे माहिती असूनही बरीच माणसे अन्नाची नासाडी करतात ते पाहून खूप वाईट वाटते. आयुष्यभर आपण आपल्या देशाची संसाधने वापरतो पण या देशाचे ऋण फेडण्यासाठी जेव्हा आपण सक्षम बनतो तेव्हा आपण परदेशी जाऊन स्थायिक होतो आणि त्या देशाची सेवा करण्यात धन्यता मानतो. अशा लोकांना हे माहित नाही की आपल्या भारत देशाला सक्षम बनविण्यासाठी विक्रम साराभाई, एम एस स्वामिनाथन, डॉ होमी भाभा, डॉ सतीश धवन, डॉ ए प जी अब्दुल कलाम, दादासाहेब फाळके सारखे अनेक शास्त्रज्ञ परदेशी शिक्षण घेऊन भारतात परत आले आणि आपल्या अमोघ कर्तृत्वाने या देशाचे प्रश्न वैज्ञानिक पद्धतीने सोडविण्याचे प्रयत्न केले. त्याचप्रमाणे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण सारखी माणसे परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेऊन भारतात परत आली आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन देशाला स्वतंत्र तर केलेच पण नवीन जन्मलेल्या भारत देशाची नवनिर्मिती करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. म्हणूनच आपण आज वैज्ञानिक पद्धतीचे शिक्षण घेऊ शकलो. प्रत्येक १५ ऑगस्टला हातात झेंडे घेऊन राष्ट्रीय गीत गायले म्हणून काही आपण आपल्या देशावर प्रेम करीत आहोत हे सिद्ध होत नसते. त्यासाठी प्रत्येक भारतीयांनी निस्वार्थीपणाने देशाची सेवा केली पाहिजे. आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा सर्व भारतीयांना झाला पाहिजे अशी भावना तयार झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक भारतीय लोकांवर प्रेम केले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि आजची संसदीय लोकशाही टिकविण्यासाठी जागृत राहिले पाहिजे. त्यासाठी सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. वाटेल तिथे कचरा टाकणार नाही, सर्वत्र झाडे लावून नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करु ही भावना आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे तरच आपल्या देशाचे ऋण समजून येईल आणि आपल्याला समजेल की या देशाचे आपण देणे लागतो
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment