रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १९४
विषय क्रमांक : ३
विषय : युगंधर ( लेख )
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
भारतीय इतिहासातील सर्वात महत्वाची व्यक्ती तिला आपण युगंधर म्हणत असतो ती व्यक्ती म्हणजे श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाकडे आपण पाहिले तर आपल्याला जाणवेल की त्याच्या जीवनातील अनेक घटना त्याला युगंधर ठरवित असतात. त्याने जीवन घडवीणारे कुठलेच कृत्य निषिद्ध मानले नाही. समस्त आर्यवर्तातील अनेक अन्यायी राजांचा त्याने नाश केला. अन्यायी कंसाचा वध करून त्याने आपल्या माता-पित्यांसह अनेकांची सुटका केली. नरकासुराचा नाश करून असुरांना देहदंड दिला आणि सर्व स्त्रिपुरुषांचे द्वारकेत पुनर्वसन केले. अर्जुनाला युद्ध करण्यासाठी तयार करताना त्याने भगवद गीतेचे तत्वज्ञान सर्व जगाला दिले. आपल्या कर्तृत्वाने त्याने नवीन पायंडे घातले. स्त्री आणि पुरुष यांच्या मधील निरपेक्ष आणि निखळ मैत्रीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रीकृष्णच आहे यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. जेव्हा द्रोपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा तिला वस्त्रे पुरवून त्याने स्त्री- रक्षणाची मोठी शिकवण दिली आहे. त्याची मैत्री सर्वांशी होती. मग तो गरीब सुदामा असो किंवा सारथी दारूक असो अगर पांडुपुत्र अर्जुन असो. या सर्व जणांशी निकोप मनाने बघणारा तो एक मित्र होता. युद्धाचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी तो शांतिदूत बनतो. जेव्हा युद्धा शिवाय पर्याय नाही याची जाणीव झाल्यामुळे पांडवाना युद्ध करण्यासाठी सज्ज करतो. असा हा श्रीकृष्ण आपल्याला त्याच्या वेगळेपणाने पूर्णपणे झपाटून टाकतो. तो कधीही राजा झाला नाही किंवा त्याने कोणतेही पद स्वीकारले नाही तरी सुद्धा श्रीकृष्ण हा सर्वांसाठी आदर्श ठरतो. म्हणूनच तो युगंधर होतो.
भगवान श्रीकृष्णाप्रमाणे भारतीय इतिहासातील युगंधर म्हणता येईल असे दुसरे व्यक्तीमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केले त्या राज्याविषयी सर्वसामान्य जनतेला नेहमीच प्रचंड आपुलकी वाटत असते. याचे कारण म्हणजे ते सर्व जाती जमातीचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यासाठी लढण्याची तयारी होती. त्यासाठी त्यांनी स्वकीयांना तयार करून त्यांच्या हातात लढण्यासाठी पोलादी ताकद निर्माण केली. त्यांनी समाजातील सर्व जमातीचा आदर करायला शिकविले. त्यांचे नेतृत्व नेहमी स्त्रियांचा सन्मान करीत असत. हिंदू धर्मावर त्यांची श्रद्धा तर होतीच तरीसुद्धा त्यांनी इतर धर्मियांनासुद्धा सन्मानानेच वागविले आणि त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य जपले. ते एक कुशल प्रशासक सुद्धा होते. त्यांनी सरंजामशाही नष्ट केली आणि जनतेला वतनदारांच्या जुलमातून मुक्त केले. त्यांच्या असामान्य प्रतिभेची झेप निरनिराळ्या क्षेत्रामधून नेहमीच जाणवत राहते. राजकारण मोहिमा, प्रत्यक्ष युद्ध्ये, शत्रुशी समादामांचे संबंध, राजकीय डावपेच हे गुण तर आम्हाला समजून घेण्यासारखे तर नक्किच आहेत पण कल्याणकारी राज्याची कल्पना ही सुद्धा त्यांच्याच प्रतिभेची महत्वाची बाजू आहे. हा सर्व व्याप सांभाळून त्यांनी विद्या आणि कला यांच्याकडेही लक्ष दिले. अनेक कलावंत, विद्वान, आणि पंडित यांचा त्यांनी सन्मान केला. राज्यव्यवहाराचे मराठीकरण करण्यासाठी त्यांनी फारसी आणि उर्दू भाषेतील शब्दांना पर्यायी संस्कृत भाषेतील शब्द वापरण्याची योजना आखली. तसे करताना ते स्वतःच उर्दू भाषेचे पाहिले कोशकार ठरले आणि संस्कृत-उर्दू भाषेच्या कोशाचे ते एकमेव प्रेरकही ठरले. भारतीय नौदल स्थापन करण्याचा पहिला मान त्यांच्याकडेच जातो. त्यांनी आपले सैन्य उभे केले पण त्यात मोगल सैन्या प्रमाणे मनसबदारी नव्हती. ते सैन्य पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाखाली होते. त्यांच्या सैन्यातील घोडे हे राज्यसरकारच्या मालकीचे होते. त्यांच्या सैन्याच्या हालचाली अतिशय चपळ ठेवण्यासाठी ते नेहमीच दक्ष असत. म्हणूनच त्यांनी निर्माण केलेले राज्य त्यांच्या मृत्यूनंतर सत्तावीस वर्षे कोणतेही कर्ते राजे आणि सेनापती नसताना मोगलांच्या प्रचंड फौजांच्या विरुद्ध लढू शकले. असा हा सुखी कारभाराचा प्रणेता खरोखरच युगंधर होता असे म्हणावे लागेल.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक वीरांनी आपले योगदान दिले आहे. त्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर वाटत आहे आणि पुढेही तो वाटत राहील. या सर्वांमध्ये जर युगंधर म्हणता येईल ते नेतृत्व म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे. त्यांना राष्ट्रपिता म्हणून भारतीय जनतेत जे स्थान मिळाले याला कारण म्हणजे महात्मा गांधीजींनी सूरू केलेला स्वातंत्र्याचा लढा हा भारतीय जनतेपर्यंत खासकरून ग्रामीण जनतेपर्यंत नेला. महात्मा गांधी भारतात येईपर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा चार भिंतीच्या चौकटीत लढला जात होता. कायमस्वरूपी महात्मा गांधी भारतात आले तेव्हा त्यांनी ना. गोखले यांच्या सल्ल्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व स्वीकारण्यापूर्वी भारतातील वेगवेगळ्या भागांचा, प्रदेशांचा दौरा केला आणि देशस्थितीचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने आढळून आली, ती म्हणजे भारत हा मूठभर सुशिक्षित शहरांचा देश नसून अविकसित, अडाणी खेड्यांचा देश आहे. त्यामुळे स्वातंत्र्य हे तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचले नाही तर त्यास काही अर्थ राहणार नाही. हिंसक मार्गाने स्वातंत्र्याचा लढा या खेड्यात राहणाऱ्या माणसाला शक्य होणार नाही हे त्यांनी पूर्णपणे जाणले होते. त्यासाठी महात्मा गांधींनी त्यांना अहिंसेचा नवीन मंत्र दिला आणि स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरुवात त्यांनी मजूर आणि शेतकऱ्यांवर होत राहिलेल्या जुलूम जबरदस्तीच्या उच्चाटनापासून केली. बिहारच्या चंपारण्यात त्यांनी मळेवाल्याना न्याय मिळवून दिला आणि सामान्यातील सामान्य माणसांचा त्यांनी विश्वास संपादन केला. पुढे त्यांचे कर्तृत्व चालूच राहिले. त्यांनी सर्व लढे अहिंसक मार्गाने देण्यावर जसा भर दिला तसेच सत्य, न्यायबुद्धी आणि सत्याग्रह या आधारावर करण्यासाठी अनेक योजना आखल्या. त्यामुळे त्यांच्या द्रष्टेपणाचा आवाका अखिल मानवजातीला व्यापण्याइतका मोठा म्हणजे आंतरराष्ट्रीय झाला होता. त्यामुळे ते महामानव, महान संत आणि विश्वव्यापक मानव झाले होते. हिंदू समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सुद्धा त्यांनी व्यापक आंदोलन भारतात उभे केले. वाणीचा संयम, सत्याचा आग्रह, सेवाभाव आणि विनय या गुणांमुळेच मोठमोठे लोक त्यांच्या समोर नतमस्तक होत असत. ते नेहमी आपल्या विरोधकांनासुद्धा त्यांची मते मांडण्यासाठी परवानगी देत. त्यांनी स्वातंत्र्याचा लढा उभारताना अनेक नेते निर्माण केले. त्यांनी राष्ट्र जागे केले आणि त्या राष्ट्रात लोकशाहीचा प्रयोग करणे शक्य होईल अशी परिस्थिती निर्माण केली. त्यांनी राष्ट्रवाद निर्माण केला आणि तो अनेक वर्षे गुलाम असलेल्या जनतेच्या स्वातंत्र्याचा आशय ओतला. असा हा महात्मा एक प्रकारचा युगंधर होता म्हणूनच त्यांचे विचार आजही बऱ्याच भारतीय जनतेला प्रेरणादायी वाटतात.
महात्मा गांधीप्रमाणे अजून एक नेतृत्व मला नेहमी महत्वाचे वाटते. म्हणूनच मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या युगातील युगंधर मानतो. समग्र दलित समाजाचे प्रेरणास्थान असलेले बाबासाहेब हे एक अर्थतज्ञ तर होतेच पण बुद्ध धम्माचे अनुवर्तक सुद्धा होते. ते जसे शोषित पीडित समाजाचे नेते होते तसेच ते स्त्रियांच्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे नेतेसुद्धा होते. भारतात कृषी क्षेत्र फार मोठे आहे, म्हणून त्यांनी त्यासाठी आवश्यक योजनाही कायद्याच्या रूपात आणल्या आहेत. भारतीय आर्थिक व्यवस्थेचा कारभार व्यवस्थित होण्यासाठी त्यांनी भारतात केंद्रीय बँक असावी यासाठी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली आणि त्याची परिणीती भारतीय रिझर्व बँक स्थापण्यात झाली. त्यांनी इंग्रजीत लिहिलेला ग्रंथ, " The Problem of the rupee: In origin and its solution वाचताना असे जाणवते की त्यांचा आर्थिक तत्वज्ञानाचा उद्देश सामाजिक न्यायच होता. त्यांच्या या तत्वज्ञानात शेतकरी हाच केंद्रस्थानी होता. त्यासाठी त्यांनी शेतकरी वर्गाला कशा पद्धतीने कर लावावेत याची योजना दिली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी प्राथमिक उद्योग आणि दुय्यम उद्योग करून उद्योगाचे दोन वर्ग तयार केले आहे. डॉ आंबेडकरांनी घेतलेले उच्च शिक्षण त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची साक्ष तर जरूर देते आणि तात्विक चर्चा करताना बुद्धीमत्ता ही कोण्या एका जातीची मक्तेदारी नाही याची साक्ष देते. कारण बाबासाहेबाना शिक्षण घेण्यासाठी कुठलेच मार्ग साथ देत नव्हते. तरी सुद्धा चिकाटीच्या जोरावर या महापुरुषाने आपले शिक्षण पुरे केले. डॉ. आंबेडकर हे प्रखर राष्ट्रवादी होते. या देशावर त्यांचे गाढ प्रेम होते. ज्या देशाच्या धर्मांने, परंपरेने त्यांच्या समाजाला शतकानुशतके गुलाम, दारिद्र आणि अस्पृश्य ठेवले म्हणून त्यांना त्या विषयी राग जरी असला तरी त्या देशातील संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते. म्हणूनच त्यांचे विशाल आणि करुणामय मन समाजाच्या या भ्रष्ट वागणूकीबद्दल राष्ट्राचा सूड घेण्यास तयार नव्हते. त्यांचा हिंदू धर्मावर राग होता पण त्यांनी धर्मांतर करताना बौध्द धर्माचा स्वीकार केला. कारण हा धर्म भारतीय धर्मच होता. म्हणून ते येथील धर्म, संस्कृती, परंपरा, कायद्ये यांच्या कक्षेबाहेर कधीच गेले नाहीत. भारतीय संविधान लिहिताना त्यांनी सर्व भारतीयांचा सामाजिक आणि आर्थिक विचार राजकीय विचारांबरोबर केलेला दिसून येतो. कायदे मंत्री असताना कामगारांसाठी ८ तासांच्या कामाची आखणी तर केलीच पण कामकरी महिलांना सुद्धा अनेक सवलती मिळवून दिल्या. आपल्या दलित समाजाला तसेच सर्व भारतीय लोकांना त्यांनी स्वातंत्र्यानंतर येणाऱ्या नवीन आव्हानांना सामोरे जाताना नव्याने विचार करण्यासाठी तयार केले. हजारो वर्षे दारिद्र, अंधश्रद्धा आणि गुलामगिरी यांच्या विळख्यात सापडलेल्या दलित समाजामध्ये स्वातंत्र्य समतेची ज्योत पेटवून भारतीय राष्ट्रवाद जागृत केला. यासाठी ते भारतीय समाजाचे युगंधर ठरतात. म्हणूनच त्यांचे नाव आधुनिक भारताचे निर्माते म्हणून जरूर घ्यावे लागेल.
भारतीय इतिहासात अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना आपण आधुनिक भारताचे युगंधर म्हणू शकतो. त्याबद्दल लिहायला गेलो तर मोठे पुस्तक तयार होईल. म्हणून फक्त चारच महापुरुषांचा उल्लेख युगंधर म्हणून मी केला आहेत.
धन्यवाद
Comments
Post a Comment