रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १९७
विषय क्रमांक : ४
विषय : त्याचा अभिमान वाटेल
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
एखादी चांगली गोष्ट यशस्वीपणे केल्यानंतर निर्माण होणारी भावना म्हणजे अभिमान. याचाच अर्थ ती गोष्ट गौरव करण्यास प्राप्त झाली आहे. अभिमान म्हणजे गर्व नव्हे. गर्व म्हणजे फाजील अहंकार. जर आपण काही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर त्याचा गर्व किंवा अहंकार बाळगण्या ऐवजी त्याचा अभिमान जरूर बाळगावा तरच त्या कामाचा गौरव केला जातो. याचा अर्थ असा की एखादे काम करताना प्रत्येक व्यक्तीने आपला अहंकार बाजूला ठेवला तरच उत्कृष्ट दर्जाचे काम निर्माण होण्याची शक्यता असते. अभिमान ही भावना नेहमी सुसंस्कृत समाजाचे लक्षण दाखवते तर गर्व किंवा अहंकार ही भावना असंस्कृत समाजाचे लक्षण दाखवत असते. म्हणूनच वैयक्तिक दृष्टया स्वतःच्या मानसिक व बौद्धिक कुवतीचा रास्त अभिमान असणे जरुरीचे आहे. कारण असा अभिमान आपल्याला प्रेरणा देतो आणि आपण काहीही करू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण करतो. त्यामुळे जी निर्मिती माणसांकडून निर्माण होते त्याचा उपयोग समाजातील प्रत्येक व्यक्तीस होत असतो. प्रत्येक मानवाला अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टी मानवानेच या भूतलावर निर्माण केल्या आहेत. भारतातसुद्धा अशा काही गोष्टी निर्माण झाल्या आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. मग तो प्राचीन भारत असो की मध्ययुगीन भारत, स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्यानंतरचा समकालीन भारत असो. प्रत्येक वेळीस अनेक भारतीयांनी जी काही कार्यें केली आहेत त्यांची आपण नावे घेतली तरी त्यांचा अभिमान वाटेल. जेव्हा आपण भारताचा स्वातंत्र्यपूर्व काळातील किंवा स्वातंत्र्यानंतरचा समकालीन इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला अशा काही वैज्ञानिकांची नावे आढळून येतात की त्यांनी केलेल्या निर्मितीमुळे भारतीय समाजाला जो काही फायदा झाला आहे आणि भारताचे नाव साऱ्या विश्वामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या मोठे झाले. अशा वैज्ञानिकांची नावे आहेत, डॉ. विक्रम साराभाई, एम. एस. स्वामिनाथन, प्रशांत महालनोबीस, डॉ. होमी भाभा, सतीश धवन आणि दादासाहेब फाळके. या सर्व वैज्ञानिकांनी जी काही निर्मिती केली आहे ती पाहता सर्व भारतीयांना त्यांचा जरूर अभिमान वाटेल.
डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांना आज भारतीय समाज पूर्णपणे विसरलेला दिसत आहे. या थोर वैज्ञानिकाचा उल्लेख भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या 'प्राईड ऑफ नेशन' हे पुस्तक वाचताना आला. तेव्हा परत एकदा त्यांच्या चरित्र्याची आणि कार्याची माहिती करून घ्यावी असे वाटू लागले. १२ ऑगस्ट १९१९ रोजी त्यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक उद्योगपती होते. त्यांच्या आईने म्हणजे सरलादेवीने स्वतःच्या मुलांसाठीच मॉनटेसारी पद्धतीची शाळा काढली होती. त्यासाठी युरोपमधून त्यांनी शिक्षक आणले होते. या शाळेतच विक्रम साराभाई यांचे शिक्षण झाले. लहानपणापासूनच त्यांना गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये खोलवर रुची निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी व्यावसायिक जीवन म्हणून विज्ञानाची निवड केली. अहमदाबादमध्ये विज्ञान शाखेतील इंटरमिजिएट पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी इ. स. १९४५ साली इंग्लंड येथील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. तिथे त्यांनी कॉस्मिक रे इन्वेस्टीगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्यूड्स वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. त्या अगोदर त्यांनी १९४२ मध्ये बंगलोर येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी व्ही रामण यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मिक किरणांचे टाइम डिस्ट्रिब्युशन या नावाखाली संशोधन करून एक प्रबंध प्रकाशित केला. कॉस्मिक रे वर आपली डॉक्टरेट पूर्ण करून ते १९४७ साली भारतात आले. तेव्हा भारत स्वतंत्र झाला होता आणि स्वतंत्र भारताला वैज्ञानिक संशोधन संस्थाची गरज होती. त्यासाठी त्यांनी अहमदाबाद येथे भौतिक संशोधन प्रयोग शाळा स्थापन करण्यासाठी आपल्या कौटुंबिक ट्रस्टला मदत करण्यासाठी सांगितले. भारतातील पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधरांना आर्किटेक्चर आणि तंत्रज्ञानामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने संशोधन करता यावे यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर दहा (१०) वैज्ञानिक संस्था उभारल्या. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या दोन मोठया संस्था ज्या प्रत्येक विद्यार्थ्यांना नियोजन आणि वैचारिक पद्धतीने संशोधन करण्यास मदत करते. या दोन संस्था आहेत इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्यांना आपण ISRO म्हणून ओळखतो. आपण भारतीय ज्यांना अणुकार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखतो त्या डॉ. होमी भाभा यांना १९६३ मध्ये भारतातील तिरुअनंतपुरमजवळ थुंबा येथे रॉकेट प्रक्षेपण केंद्र उभारण्यासाठी मदत केली. अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रियल रिसर्च असोसिएशन (ATIRA) आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थासुद्धा उभारण्याचे श्रेय डॉ. विक्रम साराभाई यांनाच जाते. आजपर्यंत भारताने अनेक अंतरिक्ष उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. १९७५ साली अवकाशात पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट सोडला गेला त्याची रचना करण्याची सुरुवात डॉ विक्रम साराभाई यांनी उभारलेल्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच झाली पण ते पाहण्यासाठी डॉ विक्रम साराभाई या जगात नव्हते. ३० डिसेंबर १९७१ रोजी त्यांचे अचानक निधन झाले. ते नेहमीच म्हणत असत, " To establish ourselves in the world, we have to be self sufficient and research for new ideas and techniques". त्यांच्याबद्दल लिहिताना डॉ. ए पी जे अब्दुल कलाम आपल्या प्राईड ऑफ नेशन या पुस्तकात लिहितात की विक्रम साराभाई यांनी डॉ कलाम यांची निवड केवळ दोन गुणांसाठी केली आणि ते दोन गुण म्हणजे मेहनत करण्याची तयारी आणि ज्ञान संपादन करण्याची क्षमता. त्यांनी निर्माण केलेल्या कार्यामुळे त्यांचा सर्व भारतीय समाजाला अभिमान वाटेल.
" I strongly believe Indians need to move from food security to nutrition securities, where not only calories and proteins but also micronutrients are taken care of. All that needs to be done is to bring agriculture, health and nutrition together in a triangular relationship". या शब्दांचे मराठीत भाषांतर केले तर शब्दांच्या मार्फत व्यक्त होणाऱ्या भावना नीटपणे मांडता येणार नाही म्हणूनच हे इंग्लिश भाषेतील शब्द तसेच ठेवत त्यातून व्यक्त होणारी भावना सर्वांपर्यत पोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे शब्द आहेत अशा व्यक्तिमत्वाचे आहेत की ज्यांनी भारतात गव्हाच्या उच्च जाती विकसित करून हरित क्रांती केली. त्या वैज्ञानिकाचे नाव आहे एम. एस. स्वामिनाथन. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अन्न उत्पादनातील कमतरता दूर करण्यासाठी कृषीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवली आणि त्यांनी सी सुब्रमण्यम यांची नियुक्ती अन्न व कृषी मंत्री म्हणून केली. तेव्हा सी सुब्रमण्यम यांनी दोन विद्वानांची नियुक्ती केली. त्यातील एक होते श्री. बी. शिवरामन आणि दुसरे होते एम एस स्वामिनाथन. एम एस स्वामिनाथन यांचा जन्म तामिळनाडू येथील कुंभकोणम येथे ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. त्यांचे वडील पेशाने डॉक्टर तर होतेच पण महात्मा गांधींचे प्रशंसक सुद्धा होते. त्यांनी तामिळनाडूमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले होते. त्याचा परिणाम एम एस स्वामिनाथनवर झाला आणि त्यांनीही वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्यासाठी प्रवेश घेतला. पुढे १९४३ मध्ये बंगाल येथे पडलेल्या दुष्काळामुळे त्यांनी वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी या विषयावर शिक्षण घेऊ लागले. त्यासाठी त्यांनी केरळ मधून कृषीक्षेत्राची पदवी घेतली. पुढे त्यांनी जगभरातील अनेक विद्यापीठातून कृषी क्षेत्रावर संशोधन करून बऱ्याच डॉक्टरेत मिळविल्या. त्याची संख्या ७३ असल्याचे म्हटले जाते. भारतात आल्यानंतर त्यांनी कृषी संशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयावर सुद्धा काम केले. १९६६ मध्ये भारतात हरितक्रांतीचा कार्यक्रम करीत असताना त्यांनी महत्वाच्या भूमिका घेतल्या. गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गहू आणि तांदळाच्या उच्च- उत्पादनाच्या बियाण्यांची लागवड केली आणि ती यशस्वी करून दाखविली. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा ही भारतातील राज्ये त्यांच्या योजनेमुळे अधिक लाभदायक ठरली. त्यांनी नेदरलँडमध्ये अनुवंशिक संस्थेमध्ये संशोधन करीत असताना सोलॅनमच्या जंगली प्रजातींच्या विस्तृत मशापासून लागवडीखालील बटाटा, सोलॅनम ट्यूबरोजममध्ये जीन हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेचे प्रमाणिकरण करण्यात यश मिळवले. हे सर्व शिकण्या मागील एकमेव दृष्टीकोन होता तो म्हणजे भारतीय शेतीला स्वावलंबी आणि सुसज्ज करणे. त्यासाठी त्यांनी एम एस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन या संस्थेची निर्मिती केली. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतीय समाजातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच कृषी व ग्रामीण विकासासाठी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर वेगाने करणे हे होय. आज जी संस्था ग्रामीण भागातील शेती, अन्न आणि पोषण आहारात शेतमजूर, महिला आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी योग्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध करून देते. त्यांनी राबवलेल्या योजनांमुळे भारत अन्नधान्यांमध्ये एक स्वावलंबी देश बनला. अशा या थोर माणसाचे कार्य पाहिले तर आम्हा सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान वाटेल यात कुठेही दुमत नाही.
इ स १९६४ मध्ये भारताला अणुबॉम्ब तयार करण्याची जरुरी वाटू लागली. याला दोन कारणे होती ती म्हणजे भारताच्या पूर्वेकडील असलेल्या नागा चळवळीने केलेली स्वतंत्र राष्ट्राची मागणी आणि दुसरे कारण म्हणजे चीनने केलेली अणू उपकरणाची चाचणी. अशावेळीस एका भारतीय वैज्ञानिकाने २४ ऑक्टोबर १९६४ रोजी ऑल इंडिया रेडिओवर भाषण करताना एक घोषणा केली की भारत स्वतः अणुरोधक विकसित करेल आणि त्या वैज्ञानिकाने आपल्या सामर्थ्याने आण्विक क्रांती घडवून आणली. म्हणून सर्व भारतीय त्या वैज्ञानिकाला म्हणजे डॉ. होमी जहांगीर भाभा यांना भारतीय आण्विक कार्यक्रमाचे जनक मानतात. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूनी नेहमीच भारतीय वैज्ञानिकांना संरक्षण दिले आणि डॉ. भाभानासुद्धा या संरक्षणाचा लाभ मिळाला होता. जवाहरलाल नेहरूंच्या मदतीने डॉक्टर भाभा यांनी नवीन अभियांत्रिकी शाळा स्थापन केल्या. त्यातली भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे Indian Institute Of Technology जी IIT म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे सर्व करताना त्यांना वैज्ञानिक तंत्रज्ञानात भारत स्वावलंबी असावा असे वाटत होते. डॉ होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी एका श्रीमंत पारशी कुटुंबात झाला. ते कुटुंब सर दोराब टाटा यांच्याशी संबंधित होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल स्कूल आणि एलफिस्टन कॉलेजमधून झाले. त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पण लंडनमध्ये असताना त्यांची आवड भौतिकशास्त्रात झाली. त्याप्रमाणे त्यांनी परत भौतिकशास्त्रामध्ये पीएचडी करण्यासाठी प्रवेश घेतला आणि इ. स. १९३३ मध्ये त्यांनी भौतिक शास्त्रातील वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले. भौतिक शास्त्रात डॉक्टरेट मिळाल्यानंतर ते परत भारतात आले आणि वैज्ञानिक संशोधनाची गरज ओळखून त्यांनी दोन वैज्ञानिक संस्था भारतात स्थापन केल्या. त्यातील एक आहे टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि दुसरी आहे ऑटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट संस्था ज्याचे नाव आता भाभा अनुसंशोधन केंद्र असे आहे. त्यामुळे भारतात अणू भट्टीची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर केवळ शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे डॉ भाभा हे पहिले वैज्ञानिक होत. डॉ भाभा यांनी युरेनियम ऐवजी थोरियम पासून तीन अणुऊर्जेची निर्मिती करण्याची यशस्वी योजना तयार केली. त्यांनी सूरू केलेल्या अणू भट्टयामुळे भारतात अनेक ठिकाणी वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी होऊ शकला. त्यांच्याच रचनेमुळे १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणु स्फोट घडवून आणला. डॉ होमी भाभा हे नुसते शास्त्रज्ञ नव्हते तर ते एक कलाकार सुद्धा होते. फावल्या वेळात ते शास्त्रीय संगीत, चित्रकला आणि वनस्पती शास्त्र यांचाही आनंद घेत असत. अशा या महान व्यक्तीचा मृत्यू २४ जानेवारी १९६६ रोजी विमान अपघातात झाला. त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टीमुळे भारतीय समाज नेहमीच त्यांचा ऋणी राहणार आणि त्यांच्या कर्तुत्वाचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.
सुप्रसिद्ध अमेरिकन गणितीय सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि प्रभावशाली आर्थिक सिद्धांतकार, हॅरोल्ड हॉटेलिंग यांनी एकदा म्हटले होते की, " No technique of random sample has, so far as I can find, been developed in USA or elsewhere which can compare in accuracy with that described by Professor Mahalanobis in India ". या शब्दातील सत्यता माहित करून घ्यायची असेल तर आपल्याला केंब्रिज विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि सांख्यिकीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळविलेले डॉ. प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे चारित्र्य वाचणे जरुरीचे आहे. प्रशांतचंद्र महालबोनीस यांचा जन्म २९ जून १८९३ मध्ये कोलकाता येथे एका जमीनदार कुटुंबात झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण कोलकाता येथील ब्राह्मो बॉईज स्कुल मध्ये झाले. १९०८ मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास करून त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि Bsc ची पदवी संपादन करून ते लंडनला केंब्रिज विद्यापीठांमध्ये भौतिक शास्त्रात पदवी प्राप्त करण्यासाठी गेले. तिकडे त्यांनी भौतिकशास्त्राबरोबर संख्याशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला. आपले शिक्षण पूर्ण करून ते भारतात परत आले आणि कोलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवायला सुरुवात केली पण सांख्यिकीशास्त्र त्यांना स्वस्त बसू देईना. त्यांच्यासाठी ते एक नवीन विज्ञान होते आणि त्यात त्यांना आव्हान वाटत होते. त्यांनी संख्याशास्त्राचे मोजमाप आणि विश्लेषण करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणवले की हवामानशास्त्र आणि मानववंशशास्त्रातील समस्यांसाठी आकडेवारीची उपयुक्तता शोधून काढता येईल आणि त्याप्रमाणे त्यांनी शोधूनसुद्धा काढली. १९३१ मध्ये त्यांनी कोलकाता येथे Indian Statistical Institution आणि Journal Sankhya यांची स्थापना केली. त्यांची खरी प्रसिद्धी महालनोबीस अंतर यासाठी आहे की एक संख्याशास्त्रीय एकक आहे. क्लस्टर विश्लेषणाच्या क्षेत्रातील अनेक परिणामामधील मोजमापांवर आधारित, वितरणापासून किती बिंदू वेगळे होतात याचा शोध त्यांनी आपल्या संख्याशास्त्रात घेतला आहे. भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावताना सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती आणि महत्त्व वाढून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या जलद वाढीवर भर दिला. २८ जून १९७२ रोजी त्यांच्या जन्म दिवशी वयाच्या ७९व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस २९ जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून भारत सरकारकडून साजरा केला जातो. अशा या कर्तुत्ववान वैज्ञानिकाचा सर्व भारतीयांना अभिमान वाटेल.
२८ डिसेंबर १८९५ मध्ये सिनेमॅटोग्राफच्या इतिहासातील पहिला चित्रपट ल्यूमियर ब्रदर्स, ऑगस्टे मेरी लुईस निकोलस आणि लुई जीन यांनी पॅरिस मध्ये प्रदर्शित केला आणि त्या चित्रपटाचे नाव होते वर्कर्स लिव्हिंग द ल्यूमिएर फॅक्टरी. पुढे १८ वर्षांनी येशू ख्रिस्ताच्या चित्रमय जीवनापासून प्रेरित होऊन पौराणिक राजकुमार राजा हरिश्चंद्र यांच्या कथेवर आधारित पहिला भारतीय चित्रपट ३ मे १९१३ रोजी बनविला आणि तो बनविण्याचे श्रेय जाते धुंदीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना. ३० एप्रिल १८७० रोजी जन्मलेले धुंदीराज गोविंद फाळके हे एक द्रष्टे होते. त्यांनी चित्रपट माध्यमाची क्षमता ओळखली होती. त्यांनी लोकांना या माध्यमाच्या संस्कृतीची ओळख करून दिली. त्यासाठी अभियांत्रिक आणि शिल्पकलेचा अभ्यास केला. त्यांनी आर्किटेक्चर आणि मॉडलिंगचाही अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळविले. फोटोग्राफीचे नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी ते जर्मनीला गेले. तिकडे त्यांनी जर्मन जादूगार कार्ल हटर्झकडून जादूच्या युक्त्या शिकल्या आणि त्यांचा वापर त्यांनी चित्रपट बनविताना केली. राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट भारतीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होता. या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला. पुढे १९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची निर्मिती केली आणि त्याचबरोबर २७ लघुपट बनविले. सत्यवान सावित्री, लंका दहन, मोहिनी भस्मासुर आणि कालिया मर्दन हे त्यांचे काही उत्कृष्ट चित्रपट होते. १६ फेब्रुवारी १९४४ रोजी त्यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने रचलेल्या चित्रपटसृष्टीचा पाया आज भारतीय संस्कृतीचा एक अपरिहार्य भाग बनला आहे. म्हणूनच भारत सरकारने १९६९ पासून भारतीय चित्रपटात अस्मरणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांसाठी दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ सर्वात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारांची स्थापना केली आणि दरवर्षी भारताचे राष्ट्रपती उल्लेखनीय व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करतात. भारतीय चित्रपटातील त्यांच्या योगदानामुळे भारतीय टपाल खात्याने १९७१ मध्ये दादासाहेब फाळके यांचा चेहरा असलेले टपाल तिकीट जारी केले. सुप्रसिद्ध इतिहास लेखक रामचंद्र गुहा त्यांच्या इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकात लिहितात की जो पर्यंत भारतात खास करून हिंदी चित्रपट सर्वत्र पाहिले जातात व त्यातील गाणी ऐकली जातात तो पर्यंत भारत या राष्ट्राचे अस्तित्व राहील. अशा या चित्रपट सृष्टीला जन्माला घालणाऱ्या प्रतिभावान वैज्ञानिकाचा अभिमान सर्व भारतीयांना वाटतच राहणार.
डॉ विक्रम साराभाई यांनी भारतीय संशोधन संस्था (ISRO) उभारली. या संस्थेला व्यवस्थापन पद्धतीने आणि संघटनात्मक संरचना तयार करून आपल्या कार्यक्रमाने वेगवान बनविले ते प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रो. सतीश धवन यांनी. ते गणितज्ञ आणि एरोस्पेस अभियंता होते आणि भारतातील प्रायोगिक द्रव डायनॅमिक संशोधनाचे जनक होते. त्यांनी ISRO मधील अनेक तरुणांना आकाशातील ताऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अंतराळ कार्यक्रम आखले आणि नवीन आलेल्या तरुणांसाठी ते एक योग्य मार्गदर्शक बनले. प्रो. सतीश धवन यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२० श्रीनगर, काश्मीरमध्ये झाला. त्यांनी लाहोर विद्यापीठातून अभियांत्रिकी, गणित आणि भौतिक शास्त्रात पदवी संपादन केली. त्याच विद्यापीठामधून त्यांनी इंग्रजी साहित्यात मास्टर ऑफ आर्टसचीसुद्धा पदवी घेतली. पुढे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा यूएसए मधून एरोनॉटिकल इंजीनियरिंग मध्ये पीएचडी केली आणि पुढील संशोधनासाठी ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये सामील झाले. पुढे भारतात आल्यानंतर ते इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विभागात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झाले आणि चार वर्षाच्या कालावधीत ते त्या विभागाचे प्रमुख बनले. तिथे सुद्धा त्याने आपले संशोधन कार्य आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी आपला वेळ समर्पित केला. १९४२ मध्ये वयाच्या ४२ व्या वर्षी ते इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्सचे संचालक झाले. सुपरसॉनिक वेग निर्माण करणारा पहिला सुपरसॉनिक पवन बोगदा केरळ मधील विक्रम साराभाई सेवा केंद्रात त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात बांधण्यात आला. त्यांनी AVRO(HS-748) प्रवासी विमानाच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत केली. त्यांनी भारतात फ्लूईड डायनॅमिक रिसर्च सेंटर ची स्थापना केली. भारतात अनेक वैज्ञानिक संस्था उभ्या केल्या. कारण त्यांना असे वाटत होते की आधुनिक अभियांत्रिक कामांमध्ये केवळ संस्था निर्णय घेण्याच्या रचनेत शिस्त आणतात. भविष्यात चालू प्रकल्पांसाठी विकास करण्यासाठी त्यांनी आण्विक बायोफिजिक्स विभाग आणि वातावरणातील विज्ञानातील संशोधन कार्य सुरू करून भारतातील तरुण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या गोष्टींचा उपयोग आज अनेक भारतीय उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वापरण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे आणि आपल्या कार्याला पूर्णपणे वाहून घेण्याच्या क्षमतेमुळे भारताला अंतराळ कार्यक्रमात मोठी प्रगती साधता आली. ते नेहमी तरुणांना त्यांच्या कार्याचे श्रेय देत आणि अपयशाची जबाबदारी स्वतः घेऊन तरुणांना प्रोत्साहन देत असत. भारताचे माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी प्रो धवन यांची आठवण सांगितली आहे. डॉ कलाम सांगतात, १० ऑगस्ट १९७९ रोजी भारतातील पाहिले प्रक्षेपण वाहन SVL-3 लॉंच करण्यासाठी प्रकल्प संचालक म्हणून डॉ कलाम काम करीत होते आणि हा प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरला. या अपयशाची जबाबदारी पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर घेऊन प्राध्यापक धवन म्हणाले, "If you do not have mission, no problem will occur, but if you do have a mission or task definitely problems of varying magnitudes will crope up. But problems should not become the master of the individuals ; individuals should become the master of the problems, defeat it and succeed ". अशा या महान वैज्ञानिकाचे निधन ३ जानेवारी २००२ मध्ये झाले. त्यांनी निर्माण केलेल्या कामांचा सर्व भारतीय समाजाला नेहमीच अभिमान वाटेल.
अशा प्रकारे मी सहा वैज्ञानिकांच्या गौरवशाली कामाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून आम्हा सर्व भारतीयांना त्याचा अभिमान वाटेल.
धन्यवाद
Comments
Post a Comment