Skip to main content

Samantar : समांतर (लेख )

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक :१९३
विषय क्रमांक : ३
विषय : समांतर (लेख )
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ : 

समांतर हा शब्द आपण बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी वापरत असतो. समांतर म्हणजे समान अंतरावर असलेला किंवा सोबत चालणारा. हा शब्द जास्त प्रचलीत आहे तो भूमिती शास्त्रात. भूमिती शास्त्रानुसार समांतर म्हणजे समान अंतर होय. एकाच प्रतलात असणाऱ्या दोन सरळ रेषा एकमेकींना कोणत्याही बिंदूत छेदत नसतील तर अशा दोन रेषाना समांतर रेषा असे म्हणतो. पण समांतर हा शब्द बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आपण वापरलेला पाहतो. उदाहरण द्यायचे झाल्यास समांतर साहित्य संमेलन, समांतर अर्थ व्यवस्था, समांतर आरक्षण वगैरे. आपण सरकार, शासन आणि प्रशासनाचा उल्लेख करताना म्हणत असतो की प्रशासन ही एक समांतर व्यवस्था आहे. जेव्हा आपण प्रशासनाला समांतर व्यवस्था म्हणतो तेव्हा सरकार, शासन आणि प्रशासन यातील फरक जाणून घेतला पाहिजे. भारतीय संविधानानुसार दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. त्या निवडणुकीत आपण एखाद्या पक्षाच्या आमदार खासदारांना निवडून देतो, मग ज्या पक्षाचे आमदार किंवा खासदार बहुसंख्याने निवडून येतात ते सरकार स्थापन करतात. पुढे जाऊन ते सरकार जनतेच्या हितासाठी संविधानाच्या कक्षेत राहून कायदे आणि नियम बनवितात. नंतर हे नियम व कायदे अंमलात आणण्याचे काम शासन करीत असते. हे सर्व नियम व कायदे लोकांपर्यंत पोचविण्याच्या कामाला प्रशासन असे म्हटले जाते. यात उदाहरण द्यायचे झाल्यास आपण जिल्यातील अधिकाऱ्याचे देऊ शकतो. सरकारने निर्माण केलेले नियम आणि कायदे तोच जनतेपर्यंत पोचवत असतो. म्हणूनच प्रशासन ही एक समांतर व्यवस्था असते.

आपल्याला सर्वांना माहिती आहे की दरवर्षी अखिल भारतीय मराठी संमेलन भरत असते. त्यात मराठी भाषेला ज्ञान भाषा बनविण्यासाठी मराठी भाषेत वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण व्हावे हा मुख्य हेतू ठेवून न्या. महादेव गोविंद रानडे यांनी इ. स. १८७८ साली पाहिले मराठी साहित्य संमेलन भरविले. पण डिसेंबर १९८१ सालाच्या पहिल्या आठवड्यात मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्यात भरलेले साहित्य संमेलन राजकीय व्यक्तींनी खासकरून त्यावेळेचे केंद्रीय मंत्री वसंत साठे आणि त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंतूले यांनी गोंधळ घालून नासवले. तेव्हा राजकारणी लोकांशिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य होऊ शकते म्हणून डिसेंबर १९८१ सालाच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील रूपारेल कॉलेजच्या प्रांगणात मालतीताई बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली समांतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आले. या समांतर साहित्य संमेलनाचे उदघाटन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले. सरकार कडून कोणतेही अनुदान घ्यायचे नाही आणि पैशाची उधळपट्टी थांबवावी यासाठी हे संमेलन भरविले होते. याचाच अर्थ असा होतो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना बरोबर समान पद्धतीने साहित्य संमेलन भरविण्याची जी प्रथा सूरू झाली त्यास समांतर मराठी साहित्य संमेलन असे नामकरण झाले.

समांतर हा शब्द भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा प्रामुख्याने आला. कारण क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करताना सातारा व सांगली येथे प्रतिसरकार स्थापन केले. यालाच समांतर शासनाचा एक प्रयोग केला गेला असे म्हटले जाते.  नाना पाटील यांचे पूर्ण नाव होते नाना रामचंद्र पिसाळ. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. सांगली जिल्ह्यातील येडमच्छिन्द्र हे त्यांचे गाव. आपले प्राथमिक शिक्षण सातवी पर्यंत पूर्ण करून त्यांनी सांगली जिल्ह्यात तलाठी म्हणून काही काळ काम केले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीपासून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. त्यावेळेस महाराष्ट्रातील बहुजन समाजामध्ये आपल्या प्रभावी भाषणाने त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरणा निर्माण केली.  त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. पुढे १९४२ च्या चले जाव या चळवळीच्या निमित्ताने "आपला आपण करू कारभार" या सूत्राचा उपयोग करून ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन व्यवस्था उभी करून त्यांनी लोकोपयोगी कामे केली. या समांतर शासन व्यवस्थेत लोकन्यायालये, सैनिक व घटना, कर्ज निवारण, जमीनदारीचे प्रश्न, अन्नपुरवठा, आरोग्य, शिक्षण, जातीयतेला मूठमाती, बाजारी व्यवस्था  यासारख्या योजना होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी अंधविश्वास आणि अनिष्ट प्रथा बंद करण्याचे काम या समांतर शासनात आणले. असे हे समांतर शासन त्यांनी ब्रिटिश काळामध्ये स्थापन केले होते. तेव्हापासून नाना पाटील यांचे समांतर सरकार म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाले.

समांतर हा शब्द अर्थव्यवस्थेत सुद्धा अनेकदा वापरला जातो. त्यासाठी प्रथम अर्थव्यवस्था या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. देशातील व्यक्ती, कुटुंबे, उद्योगसंस्था, व्यवसाय संस्था यांच्या मार्फत उत्पादन, विभाजन, विनिमय व उपयोग या आर्थिक क्रिया पार पाडल्या जातात. देशातील विविध घटक आणि संस्थांना वळण लावण्यासाठी ज्या यंत्रणेचा वापर केला जातो त्यास अर्थव्यवस्था असे म्हणतात. अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण दोन प्रकारे होते. ते म्हणजे उत्पादक साधन संपत्तीच्या मालकीनुसार आणि विकासाच्या अवस्थेनुसार. भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती कायदेशीर पद्धतीने चालते. त्यात प्रत्येकाची किती कमाई आहे, त्यावर किती कर लागतो किंवा सरकारला द्यावा लागतो याची पूर्णपणे नोंदणी केली जाते. जेव्हा आपण समांतर अर्थव्यवस्था म्हणतो तेव्हा आपल्या समोर काळ्या पैशाचा उल्लेख होतो. काळा पैसा म्हणजे अनधिकृत किंवा चुकीच्या मार्गाने मिळविलेला पैसा याबद्दल सरकारला काहीही सांगितले नाही. अशावेळीस दोन प्रकारच्या अर्थ व्यवस्था देशात कार्यरत असतात. एक म्हणजे कायदेशीर आणि दुसरी बेकायदेशीर. जी व्यवस्था बेकायदेशीर असते तीच समांतर अर्थव्यवस्था म्हटली जाते ज्यात काळा पैसाच असतो आणि ज्याची माहिती शासनाला नसते.

समांतर अर्थव्यवस्थे प्रमाणे बऱ्याच वेळा समांतर हा शब्द आरक्षणाच्या बाबतीत वापरला जातो. तेव्हा प्रश्न पडतो की समांतर आरक्षण म्हणजे काय? त्यासाठी आरक्षण म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहे हे नीट समजून घेतले पाहिजे. एखाद्या समाजाला त्यांच्या सामाजिक इतिहासामुळे कुठल्याही चांगल्या कामात संधी नाकारली गेली, त्यांना समान संधी प्राप्त व्हावी म्हणून जी सोय आपल्या संविधानात केली आहे त्यास आरक्षण असे म्हटले जाते. इथे आर्थिक मुद्या येतच नाही आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आरक्षण पद्धत म्हणजे गरीब निर्मूलन योजना नाही. आरक्षणाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे उभे आरक्षण आणि दुसरे म्हणजे आडवे आरक्षण. जे काही आडवे आरक्षण असते त्यास समांतर आरक्षण असे म्हटले जाते. विविध जातींना मिळणारे आरक्षण म्हणजे उभे आरक्षण म्हटले जाते. त्यास इंग्रजीत Vertical Reservation असे म्हणतात. समजा कोणत्यातरी सरकारी संस्थेमध्ये एका पदासाठी १०० जागा भरावयाच्या आहेत. त्यात १५ टक्के अनुसूचित जातींना, ७ टक्के जागा अनुसूचित जमाती, १७ टक्के इतर मागास वर्गीय आणि बाकी इतर प्रवर्ग असतात. आडवे आरक्षण ज्याला इंग्रजीत आपण Horizontal Reservation म्हणतो हेच समांतर आरक्षण असते. यात विविध प्रवर्गातील जागा वाटप झाल्यानंतर त्या प्रवर्गातील महिला, खेळाडू, दिवांग्य यांच्यासाठी केलेले विभाजन म्हणजे समांतर आरक्षण असते.

समांतर या शब्दाचा वापर अनेक ठिकाणी कसा झाला आहे उदाहरण देऊन सांगितले आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण इथेच थांबणे योग्य होईल.

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...