रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १९६
विषय क्रमांक : ४
विषय : अभिनय
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
"माणूस जन्माला येतो तो एक अभिजात नट म्हणूनच! तो तान्हा असताना रडण्याचा अभिनय करतो. त्याच्या डोळयांत पाण्याचा टिपूस देखील नसतो. कारण त्याला माहिती असते की रडण्याचा आवाज काढला की, त्याला कोमट दुधाचे घुटके प्यायला मिळतात! जेव्हा तो खरोखर रडतो तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यांमधून गंगा-यमुना वाहात असतात. त्यावेळी तो अभिनय करीत नसतो. " हा उतारा आहे सुप्रसिद्ध चित्रपट लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते श्री गजानन जगीरदार यांच्या 'अभिनय कसा करावा' या पुस्तकातील. यात त्यांनी अभिनय कला ही माणसाच्या जन्मापासूनच त्याला मिळालेली मोठी देणगी आहे आणि त्यातला अभिनय कसा ओळखावा याचे अचूक उदाहरण देऊन सांगितले आहे. अभिनय या शब्दाची व्याख्या अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. माझ्या वाचनात आलेली अभिनयाची उत्तम व्याख्या म्हणजे जो कलाकार नृत्य, नाटक, चित्रपट या सारख्या प्रायोगिक कलांमध्ये आपला आशय व्यक्त करण्यासाठी कृती, देखावा, भाषण आणि वेशभूषा या माध्यमांचा वापर करून आपली भूमिका व्यक्त करतो. तसे पाहावयास गेले तर अभिनय कधी शिकून येत नसतो. जर एखाद्या कलाकाराच्या अंगात जर कला असेल तर तो सहजपणे अभिनय कला विकसित करू शकतो. भरतमुनींनी अभिनयाचे चार प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजे आहार्य, आंगिक, वाचीक आणि सात्विक. आहार्य अभिनय कलाकाराच्या बह्यांगाच्या सजावटीला महत्व असते. या अभिनयात कलाकाराची कृती नसते. भूमिकेची ओळख पटण्यासाठी केलेली रंगभूषा आणि वेशभूषा म्हणजेच आहार्य अभिनय होय. आंगिक अभिनय हा खरा अभिनयचा पाया असतो. शरीराच्या हालचाली, अंगविक्षेप, चेहऱ्यावरील विकार दर्शन हे आंगिक अभिनयाचे मुख्य प्रकार असून त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी अनेक उपकारणांचा वापर केला जातो. या अभिनयाला शब्दांची जोड जरुरीची असते. वाचीक अभिनयात कलाकाराने अभिनय करताना शब्दांचा काव्यात्मक पद्धतीने केलेला उच्चार फार महत्वाचा असतो. सात्विक अभिनयात प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेचे आदर्श सत्व आणि त्यातील वैशिष्ट्ये पूर्णपणे समजून घेऊन ते प्रेक्षकांपर्यंत आपल्या अभिनयाद्वारे सहजपणे नुसता पोचवत नसतो तर त्या प्रेक्षकांनाही त्यात सहभागी करून घेत असतो.
अभिनयाचा वापर प्रत्येक प्रायोगिक कलांमध्ये जरी होत असला, तरी प्रत्येक कलाकाराच्या गरजा आणि त्याच्या मर्यादा समजून घेऊनच त्या कलाप्रकारातील अभिनयाचे स्वरूप समजून घेणे जरुरीचे असते. त्यासाठी आपण नाटक आणि सिनेमा या दोन माध्यमांचा विचार करू. जरी या दोन्ही माध्यमांची क्षेत्रे मोठी असली तरी त्यांची बलस्थाने आणि त्यांच्या मर्यादा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. नाटक हे जिवंत माध्यम आहे. त्यात प्रत्येक कलाकार त्याच्या समोर असलेल्या जिवंत लोकांसमोर आपली कला सादर करीत असतो. त्यामुळे कलाकार आणि रसिक प्रेक्षक एकमेकांचे भाग होऊन जातात. दोघेही एकाच वेळेत किंवा एकाच काळात वावरत असल्यामुळे त्यांना एकमेकांचे श्वास सुद्धा ऐकू येत असतात. त्यामुळे इथे अभिनय करताना सर्व प्रकारच्या शक्तीने किंवा सर्व अंगाने करावा लागतो. कारण त्यात सलगता असते. त्यासाठी कलाकाराला सर्व गोष्टींचे आकलन होणे जरुरीचे असते. चित्रपटात असे होत नसते. त्यात तांत्रिक पद्धतीने चित्रण केले जाते. एखाद्या चित्रपटात चित्रित केलेल्या हालचाली किंवा हावभाव पूर्णपणे अंतिम असतात त्यात बदल होऊच शकत नसतो. त्यामुळे चित्रपटामध्ये सलगता नसते. बऱ्याच वेळेला काही खास चित्रीकरणाच्या वेळेला मुख्य नटाऐवजी त्याच्या सारखा दिसत असलेला दुसरा नट ती भूमिका करत असतो. पण आवाज मात्र मुख्य नटाचाच ध्वनीमुद्रित केलेला असतो. त्यामुळे अभिनयाचे प्रकार दोन्ही माध्यमात वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नाटकात काम करणाऱ्या कलाकाराचे चेहऱ्यावरील भाव प्रकटन प्रत्येक प्रेक्षकाला स्पष्टपणे दिसेल असे नाही पण चित्रपटात छायाचित्रणतंत्राने कलाकाराच्या चेहऱ्यावरील भावप्रकटन सर्वांना दिसू शकते. नाटकात काम करणाऱ्या कलाकाराला रंगमंचाच्या कक्षेत स्वतःच्या आणि इतर कलाकारांच्या हालचालीच्या क्रियाप्रतिक्रियांची एकच गती उपलब्ध असते तर चित्रपटातील कलाकारांना इतर कलाकारांच्या हालचालीची आणि यंत्राच्या गतीचा लाभ होत असतो. इथे सर्वात महत्वाचा प्रकार म्हणजे चित्रपटाचे खेळ एकाचवेळी शंभर ठिकाणी होऊ शकतात पण नाटकाचा प्रयोग एकाच वेळी एकाच रंगमंचावर होत असतो. त्यामुळे नाटक किंवा नृत्य कलाकाराला त्याच्या किंवा तिच्या अभिनयाचे सामर्थ आणि त्याचे सादरीकरण करताना मर्यादा समजून घ्याव्या लागतात. ही दोन्ही माध्यमे एवढी मोठी आहेत की त्यातील कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या सामर्थाने सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारून सर्व प्रेक्षकांना नेहमीच आनंद दिला आहे यात कुणाचेही दुमत असता कामा नये.
असे म्हणतात की आजच्या काळात नाटक आणि चित्रपट या दोन्हीही बाबतीत अभिनय अधिकाधिक स्वाभाविक होत आहे. याचा अर्थ त्यातील नाटकीपणा कमी होऊन अभिनयात वास्तववादी अभिनय दिसू लागला आहे. असे म्हणतात पूर्वी अभिनय करताना कलाकार आक्रस्थाळी अभिनय करीत असत. कारण त्यावेळेस ध्वनीवर्धकांची कमतरता होती आणि तांत्रिक दोषांमुळे नाटकातील संवाद लोकांना नीटपणे ऐकू येत नसे. पुढे नंतर अनेक ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नाट्यगृहे उभारली गेली. तेव्हा कलाकारांना ओरडून बोलण्याची गरज वाटेनाशी झाली. तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी नाटक हे कृत्रिम संवादानी आणि अलंकारिक पद्धतीनेच होत असत. पण हा सारा प्रकार बदलला तो विजय तेंडुलकरांच्या नाटकांनी. त्यांनी नाटकातील संवाद दैनंदिन बोलीच्या पातळीवर आणले. त्यामुळे नाटक हे सामान्य माणसांच्या अधिक जवळ आले. त्यात काम करणाऱ्या कलाकारांचा अभिनयसुद्धा सहज होऊ लागला. आपला आवाज रंगमंचापासून शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकापर्यंत पोचला पाहिजे यासाठी प्रत्येक कलाकार दक्ष राहू लागले. काही उत्तम कलाकार सहज अभिनय करताना अचूक मेळ साधत. संवादाची हुकमी आणि खूप सहज वाटावी अशी फेक करत. त्यातील उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास सतीश दुभाषी, डॉ. श्रीराम लागू आणि अरुण सरनाईक यांचे देता येईल. आवाज, वाणी, संवाद फेक आणि आशय याचे विश्लेषण करताना डॉ श्रीराम लागू आपल्या, 'वाचीक अभिनय', या पुस्तकात सांगतात, " ओठ, जीभ, जबडा, दात, पडजीभ या आवाजाला अक्षरांचा आकार देणाऱ्या अवयवांचे कार्य नीट समजून घेणे आणि सततच्या व्यायामांनी त्यांना कार्यक्षम ठेवणे हे महत्वाचे आहे. आवाज कसा निर्माण होतो, आवाजापासून निरनिराळी अक्षरे कशी निर्माण होतात, त्यात कोणकोणत्या अवयवांचा सहभाग असतो, त्या अवयवांना कार्यक्षम करण्याकरता त्यांचे कोणकोणते व्यायाम केले पाहिजे या तांत्रिक बाबी नीटपणे प्रत्येक नटाने समजून घेतले पाहिजे". असे सांगून ते डॉ लागू पुढे लिहितात, " सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्त करण्याच्या आशयाचे स्वरूप नीट समजून घेतले पाहिजे. कारण ती फार खोलात घेऊन जाणारी प्रतिक्रिया आहे. ही प्रतिक्रिया फक्त एखाद्या वाक्याला किंवा परिच्छेदाला लागू होते असे नाही ; तर संपूर्ण व्यक्तीरेखेला, किंबहुना संपूर्ण नाटकाच्या आशयाला जाऊन भिडतात. आशयाचा सखोल शोध घेण्याकरता व्यायाम नव्हे ; व्यासंग करायचा तर तो चौफेर वाचन, मनन, चिंतन, सूक्ष्म निरीक्षण यांचा करायचा. म्हणजे बुद्धी, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि मुख्य म्हणजे धागेदोरे पिंजून काढणारी विश्लेषणशक्ती यांचा वापर सातत्याने करायचा ". खरोखर डॉ लागूने बंधमुक्त, दमदार,आणि पल्लेदार आवाजाचे तंत्र सांगताना शब्दांचे सामर्थ्य सांगितले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आशय व्यक्त करताना काही तांत्रिक नियम म्हणजे संवाद फेकताना कोणत्या शब्दावर अधिक जोर द्यावा, कुठे विराम घ्यावा, कुठे वाक्य कापणे हे पण व्यवस्थितपणे सांगितले आहे. हे सर्व सांगताना डॉ लागू कलाकारांना सांगतात की बोलण्याइतकेच ऐकणे सुद्धा जरुरीचे असते. खास करून नाटक करताना हा अनुभव अनेकदा येतो. कारण नाटकात नेमून दिलेल्या वेळेतच बोलावे लागते आणि ते अशा प्रकारे बोलावे लागते की ऐकणाऱ्या प्रेक्षकाला मात्र ते उत्स्फूर्त वाटले पाहिजे. त्यासाठी रोजची तालीम जरुरीची आहे.
आवाजातील फेक, स्पष्ट उच्चार, देहबोली, भावनिक आरेखन उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि नाट्य सादर करण्याची क्षमता या महत्वाच्या शैली अभिनय सादर करण्यासाठी प्रत्येक कलाकाराकडे असायलाच पाहिजे किंवा ती त्या कलाकाराची गरजच असली पाहिजे. कारण अभिनय ही एक संकल्पना आहे. तो एक विचार आहे. यासाठी निरीक्षण सुद्धा फार जरुरीचे आहे. काही वेळेस कुठलाही संवाद न करता केवळ शरीराच्या आणि हाताच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचा केलेला वापर सुद्धा एक अभिनय ठरू शकतो, आणि तो उत्तम अभिनय म्हणून सुद्धा गणला जातो. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर चार्ली चॅप्लिनचे देता येईल. ज्यावेळी चित्रपटाला वाचा फुटली नव्हती तेव्हा मुक्या जीवांची करूण गोष्टी सांगून या अभिनयसम्राटाने आपल्या मूक अभिनयातून लोकांना हसून बेजार केले. रस्ताच्या कडेला केविलवाण्या पद्धतीने जीवन जगणारा, सतत केविलवाण्या नजरेने पाहत असणारा, नेहम अन्नासाठी भुकेलेला आणि प्रेमासाठी आसूसलेला असा हा चार्ली चॅप्लिन जेव्हा फेंगड्या चालीने चालत एका हातात काठी लटकवत येतो तेव्हा लहान मुलांपासून ते थोरापर्यंत सगळ्यांना हसत हसत डोळयांत न कळत अश्रू उभे करतो. त्याच्या मूक अभिनयाने त्याने आपल्या चित्रपटाचा आशय सर्वांना नीटपणे समजून सांगितलेला आहे. पुढे अनेक कलाकारांनीसुद्धा आपल्या मूक अभियानाद्वारे चित्रपटाचा आशय समजून सांगितला आहे. इथे मला एका जुना हिंदी चित्रपट अंदाज या सिनेमाची आठवण येते. यात राज कपूर, नर्गिस आणि दिलीप कुमार यांनी सुंदर अभिनय केला आहे यात कुणाचे दुमत नाही. पण एका शेवटच्या दृश्यामध्ये मला राज कपूर यांचा मूक अभिनय खूप सुंदर वाटतो. त्यात त्याने आपल्या बायकोवर म्हणजे नर्गिसवर संशय घेताना आपल्या चेहऱ्यावर जो खलनायकी भाव दाखवलेला आहे तो सुद्धा एक अप्रतिम मूक अभिनयाचा भाग आहे. अजून एका अभिनेताचासुद्धा उल्लेख इथे केल्याशिवाय राहवत नाही. तो अभिनेता म्हणजे हॉलिवूड चित्रपटात आपल्या अभिनयाद्वारे रसिकांवर स्वतःची छाप घालणारा ग्रेगरी पेक. १९६०च्या दशकात रोमन हॉलिडे या नावाचा एक इंग्रजी चित्रपट आला होता. त्यात ऑड्री हेपबर्न आणि ग्रेगरी पेक यांच्या भूमिका होत्या. युरोपच्या दौऱ्यावर असलेली एक राजकुमारी ऍना दरबारी संस्कृतीला कंटाळेली असते. म्हणून ती एका रात्री राजवाड्यातून पळून जाते आणि तिची भेट एका पत्रकाराशी ज्यो म्हणजे ग्रेगरी पेकशी होते. पुढे त्यांच्यात जवळीक निर्माण होऊन त्याचे रूपांतर प्रेमात होते. पण शेवटी ऍना परत राजवाड्यात येते. जेव्हा तिला भेटायला पत्रकार म्हणून ग्रेगरी पेक जातो आणि ऍना ज्याप्रमाणे त्याची ओळख एक पत्रकार म्हणून करून देते तेव्हा ग्रेगरी पेकने त्याच्या चेहऱ्यावर प्रेमात हरल्याचे जे भाव दिले आहेत ते सुद्धा एक मूक अभिनयाचे सुंदर प्रतीक आहे.
अभिनय ही एक सुंदर कला आहे. प्रत्येक कलाकारांने केलेला अभिनय हा समाजामध्ये त्याचे नाते पक्के करीत असतो. आज अभिनय शिक्षणासाठी अनेक प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत. दिल्लीमधील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही एक संस्था अनेक प्रकारच्या अभिनयाचे शिक्षण देऊन अनेक कलावंत या भारतभूमीस देत आहे. ही फार मोठी समाधानाची बाब आहे. त्यामुळे अभिनय करणाऱ्या कलावंताला एक दिशा मिळत राहणार आहे. या दाखविलेल्या दिशांनी त्यांची वाटचाल होणार आहे आणि ती दीर्घकाळ चालणार आहे. सुरुवातीला ही वाटचाल कष्टाची असेल पण पुढे मात्र ती फलदायी ठरणार आहे. इथे मात्र एक गोष्ट कलाकाराला लक्षात ठेवावयाची आहे ती म्हणजे आपल्या अभिनयातून त्याला एक आशय व्यक्त करायचा आहे. त्यासाठी एक अनुरूप अशी बंदिश बांधायची आहे आणि ती बांधताना कुठेही सुरावटीच्या मोहात पडायचे नाही. कारण आपल्याला मैफिलीत वेगवेगळ्या बंदिशी पेश करून एक सधन आशय समर्थपणे व्यक्त करायचा आहे. अभिनयाच्या माध्यमातून कलाकार नेहमी सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यातून तो नेहमी आपल्या बौद्धिक भावना व्यक्त करत असतो. सामाजिक बदल घडून आणण्याची ताकद सुद्धा कलाकारांच्या अभिनयात असते. आपल्या अभिनयाद्वारे प्रत्येक कलाकार सर्व समाजाला जागतिक स्तरावर एकत्र आणण्यास मदत करतो आणि माणसांचा इतिहास नोंदवून जपून ठेवतो. जेव्हा एखादा कलाकार आपल्या अभिनय कृत्याद्वारे स्वतःला समर्पित करतो तेव्हा त्याला उत्कृष्ट अभिनयाचा दर्जा प्राप्त झालेला असतो.
धन्यवाद
Comments
Post a Comment