रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १८९
विषय क्रमांक : ४
विषय : स्वराज्याभिषेक
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम मुंबई
संकेत स्थळ :
आपल्या असामान्य कर्तृत्वाने शिवाजी राजांनी आपले साम्राज्य जरी उभे केले असले तरी विजापूर आणि मोगल यांच्या दरबारी काम करणारे मराठे सरदार शिवाजी महाराजांना उपरे समजत असत. ते महाराजांना त्यांच्यासारखे मोगलांचे सरदार समजत असत. या कारणासाठी शिवराज्याभिषेक होऊन मराठी राज्याची स्थापना होणे फार गरजेचे होते. यासाठी पुढाकार घेतला होता काशी येथे स्थायिक झालेले पण मुळचे पैठण येथील रहिवासी गागाभट्ट यांनी. गागाभट्ट यांचे मूळ नाव आहे विश्वेश्वर दिनकर भट्ट. त्यांचे वडील दिनकर भट्ट त्यांना गागा असे म्हणत. वेद, शास्त्र, ज्योतिष व मांत्रिक योगाभ्यासाचे ते विद्वान पंडित होते. शिवाजी महाराजांच्या अभिषेकासाठी त्यांनी राज्याभिषेक प्रयोग व तुलापुरुष दानविधी या दोन ग्रंथाची निर्मिती केली. त्यांनी शिवाजी राजांचा व्रतबंध विधी करून वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना एक लक्ष रुपये दक्षिणा, वस्त्र व अलंकार देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सुप्रसिद्ध इतिहासकार बा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या शिवराज्याभिषेक या ग्रंथात गागाभट्ट यांनी लिहिलेल्या वरील दोन ग्रंथाचा उल्लेख करून म्हटले आहे की महाराजांच्या क्षत्रियत्वाला काय, अगर राज्याभिषेकाला जरा सुद्धा विरोध झालाच नव्हता. इथे बेंद्रे सांगतात की उत्तर पेशवाईतील बखरकारांनी अज्ञानामुळे आणि राज्याभिषेकाच्या काही वादाचे प्रसंग एकत्र जोडून एक काल्पनिक फड उभा केला होता. असे सांगून ते म्हणतात की शिवराज्याभिषेकास ब्राह्मणांनी विरोध केला होता याची इतिहासात कुठेही नोंद आढळत नाही. इतिहासकार बेंद्रे यांनी सांगितलेली ही गोष्ट खरी असावी कारण त्यावेळी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी हजर असलेला इंग्रज अधिकारी Henri Oksind आपल्या पत्रात लिहितो की या राज्यभिषेक प्रसंगी वीस हजार ब्राह्मण हजर होते. या समारंभाचे वर्णन करताना तो लिहितो, " सहा जून १६७४ ला सात किंवा आठच्या सुमारास मी दरबारात गेलो. तेव्हा राजा एका भव्य सिंहासनावर बसला होता. उत्तमोत्तम वस्त्रालंकार परिधान केलेले सरदार त्याच्यासमोर उभे होते. राजाचा मुलगा संभाजी, पेशवा मोरोपंत आणि मोठे प्रतिष्ठित ब्राह्मण हे सिंहासनाच्या पायथ्याशी एका बैठकीवर बसले होते. इतर मंडळी आणि त्याच बरोबर सैन्यातील अधिकारी वगैरे मोठ्या आदराने उभे होते. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुशोभित केलेले भाले उभे केले होते. भाल्यांच्या टोकावर मुसलमान पद्धतीप्रमाणे सत्ता आणि अधिकारी यांची निदर्शक अशी चिन्हे होती. उजवीकडच्या भाल्यावर दोन मोठे मासे होते. त्यांची डोकी सोन्याची होती. त्यांचे दात मोठे होते. डावीकडच्या भाल्यावर घोड्याच्या पुष्कळ शेपट्या होत्या. एका रत्नजडित भाल्याच्या टोकावर सोन्याचा एक तराजू होता आणि तो समतोल ठेवला होता. हा तराजू म्हणजे न्यायाचे द्योतक होय ". इतका सुंदर उल्लेख या इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात केला आहे. या पत्रावरून असे दिसते की महाराजांना राज्याभिषेकासाठी समाजातील कोणत्याही थरातून विरोध झाला नव्हता.
काही वेळेस लोकांना असे वाटते की शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची गरज होती का? सर्व प्रकारची जनता त्यांना आपला नेता मानत, आपला मुक्तदाता मानीत. त्यांना पुण्यपुरुष मानून त्यांच्यासाठी काही करण्याची तयारी दाखविली होती. त्यामुळे राज्याभिषेक करण्याची गरज नव्हती. या प्रश्नाचे उत्तर सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक नरहर कुरुंदकर देतांना म्हणतात की, "शिवराज्याभिषेकाची गरज तत्कालीन परिस्थितीत शोधायला पाहिजे. शिवाजी राजा हा जनतेच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षाचा प्रतिनिधी होता. ही स्वातंत्र्यकांक्षा त्याच्या ताब्यातील प्रदेशातच प्रज्वलीत होईल हे संभवत नव्हते. सर्व हिंदुस्तानात जागोजागी जनता होती. तिच्या अंतकरणात शिवाजीराजांनी दिलेल्या हाकेचे प्रतिध्वनी उमटत होते. जागोजागी या जनतेला सुयोग्य नेतृत्व मिळाले नसेल, त्यांचे उठाव फारसे यशस्वी झाले नसतील, परंतु ती खळबळ समाजात चालू होती. अशा खळबळी चालू असल्या म्हणजे जेते दडपणाचे नित्यापेक्षा अधिक अधिकार गाजवू इच्छितात व आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतात. त्यामुळे शिवराज्याभिषेक हे सर्व भारतीय प्रजेला आम्ही तुमचे मुक्तीदाता आहोत हे सांगण्यासाठी तर जरुरीचा तर होताच पण मोगल सत्तेला आव्हान देण्यासाठी सुद्धा जरुरीचा होता ". त्याकाळीसुद्धा सर्वसामान्य जनतेप्रमाणे गागाभट्ट यांना सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करावा असे सारखे वाटत होते. त्यांनी ही सूचना महाराजांसमोर मांडली. त्याचे वर्णन करताना बखरीचा एक सभासद लिहितो," पुढे वेदमूर्ती राजश्री गागाभट्ट म्हणून वाराणशीहून राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास आले. भट गोसावी, थोर पंडित, चार वेद, सहा शास्त्रे, योगाभ्याससंपन्न ज्योतिषी, मांत्रिक, सर्व विद्येने निपुण. कलियुगाचा ब्रह्मदेव, असे पंडित. त्यांस राजे व सरकारकडून सामोरे जाऊन भेट घेऊन सन्मानाने आणिले. त्यांची पूजा नानाप्रकारे, रत्नखचित अलंकार, पालखी घोडे, हत्ती देऊन द्रव्यही उदंड देऊन पूजिले. गागाभट्ट बहुत संतुष्ट झाले. भट गोसावी याचे मत, मुसलमान पातशाह तक्ती बसवून छत्र धरून पातशाही करितात. आणि शिवाजी राजे यांनीही चार पादशाही दबविल्या आणि पाऊण लाख घोडा, लष्कर, गडकोट असे मिळविले असता त्यास तक्त नाही. या करिता मऱ्हाठी राजा छत्रपती व्हावा असे चित्तांत आणिले आणि ते राजियासह मानिले. अवघे मातबर लोक बोलावून विचार करिता सर्वांचे मनास आले तेव्हा भट गोसावी म्हणू लागले की, तक्ती बसावे ". सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक सर यदुनाथ सरकार यांनीसुद्धा आपल्या शिवचरित्र्यात राज्याभिषेका मागील महाराजांचा हेतू आणि स्वतंत्र राज्य स्थापनेची गरज का भासली यांची कारणे देताना म्हणतात, " शिवाजी महाराज आणि त्यांचे प्रधान यांना महाराजांचा राज्याभिषेक न झाल्यामुळे प्रत्यक्षात होणारे तोटे कित्येक दिवसांपासून जाणवत होते. त्यांनी मुलुख काबीज केला, लष्कर जमविले आणि लोकांवर ते एका स्वतंत्र राजाप्रमाणे सत्ता गाजवत असले तरीसुद्धा मोगल आणि विजापूरकर त्यांना जहागीरदारिचा बंडखोर मुलगा समजत असत. दुसरे कारण सांगताना सरकार लिहितात की महाराजांनी स्वतःच्या सामर्थ्यावर राज्य संपादले पण ते टिकून राहण्यासाठी त्यांचा विधियुक्त राज्याभिषेक होणे गरजेचे होते. तिसरे कारण म्हणजे महाराष्ट्रात अनेक सरदार घराणी होती आणि त्यांना शिवाजी राजांचा उदय डोळ्यात सलू लागला होता. ते महाराज्यांच्या चाकरीत येण्यास नकार देत असत. त्यांना मोगल किंवा विजापूरचे सरदार म्हणून घेण्यात अभिमान वाटत असे. महाराज त्यांना पुंड आणि बंडखोर वाटत. त्यासाठी राज्याभिषेक हाच एक उपाय होता. म्हणून सुप्रसिद्ध इतिहासकार सेतू माधवराव पगडी म्हणतात की भारतीय अस्मितेच्या जागृतीचा आविष्कार म्हणजे शिवराज्याभिषेक.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला इतिहासात जे अनन्यसाधारण महत्व प्राप्त का झाले याचा विचार करताना त्यावेळेची परिस्थिती समजून घेणे जरुरीचे आहे. या बाबतीत इतिहासकार सेतू माधवराव पगडी लिहितात, "इ. स.१५२६ मध्ये बाबरने मोगल साम्राज्याची स्थापना केली पण त्याचा विस्तार झाला अकबराच्या काळात. १५५६ ते १६०५ या आपल्या कारकिर्दीच्या काळात त्याने आपल्या सम्राज्याच्या सीमा काबूल, काश्मीर, आसाम, गुजरात आणि अहमदनगरपर्यंत वाढविल्या. अकबराच्या राज्याचे स्वरूप मांडलिक राजघराणी शिल्लक ठेवायची नाही असा होता. त्यानुसार त्याने काश्मीर, सिंध, गुजरात, माळवा, बंगाल, ओरिसा, खानदेश इत्यादी राज्ये खालसा करून राजघराणी नष्ट केली आणि त्या राज्यांवर आपला अंमल बसवीला. पुढे शहाजहानने अहमदनगर तर औरंगजेबाने विजापूर आणि गोवळकोंडा ही राज्ये खालसा केली. त्यासाठी त्यांनी आपली नाणी आणि आपल्या नावाचा खुतबा मशिदीत पढला जाणे ही दोन चिन्हे सर्वत्र अंमलात आणली. सतराव्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत मोगल साम्राज्याला आव्हान देईल असे एकही हिंदू राज्य अस्तित्वात नव्हते". अशावेळीस त्यांना आव्हान देणारा एकमेव राजा जनतेतून शिवाजी भोसले या नावाने उभा राहिला. शिवाजी महाराजांच्या रूपाने जनतेच्या स्वातंत्र्यकांक्षेचा प्रतिनिधी लाभला होता. त्यांनी बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी सारखी माणसे शोधून त्यांच्यात लपलेले सुप्त सामर्थ विकसित करून त्यांना ध्येयनिष्ठ युद्धनेते बनविले. या सर्व निष्ठावान माणसांची फळी उभारून शिवाजी राजांनी त्यांचे युद्धनेतृत्व केले. जेव्हा शिवाजी राजांसारखा युगप्रवर्तक नेता ज्या युद्धाचा नेता बनतो तेव्हा ते युद्ध जनतेचे स्वातंत्र्ययुद्ध असते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा महत्वाचा ठरतो. या राज्याभिषेकाने महाराजांच्या राज्यनिर्मितीच्या कार्यावर कलश चढवीला गेला. राज्याभिषेका दिवशी त्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण तर केलेच पण या समारंभाचे ऐतिहासिक महत्व चिरकाल राहावे म्हणून राज्याभिषेक शक सूरू केला. शक सूरू करणे म्हणजे नवीन युग सूरू करणे. अखिल भारतीय हिंदू समाजात या शिवराज्याभिषेकामुळे नवीन युग निर्माण झाले होते आणि हा घटनात्मक बदल फार महत्वाचा होता. त्याचबरोबर त्यांनी स्वतंत्र राज्याचे नवीन चलन पाहिजे म्हणून नवी नाणी पाडावयास सुरुवात केली. त्यानुसार त्यांनी तांब्याचा पैसा, शिवराई व सोन्याचा शिवराई होन ही नाणी प्रचारात आणली.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श लोकनेता होते असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्यांना सर्व जाती जमातीचा नेता समजतो. त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यासाठी लढण्याची जिद्द असते. त्यासाठी ते स्वकीयांना तयार करून लढण्यासाठी पोलादी ताकद निर्माण करतात. महाराजांसारखे नेतृत्व स्त्रियांचा व समाजातील सर्व जमातीचा आदर करायला शिकवितात. ते सर्व धार्मियांना समान स्वातंत्र्य देतात. त्यामुळे त्यांचे नेतृत्व लोककल्याणकारी बनते. शिवाजी राजे एक कुशल प्रशासक सुद्धा होते. त्यांनी सरंजामशाही नष्ट केली आणि वतनदारांच्या जुलमातून जनतेला सोडविले. गुणवत्तेप्रमाणे राज्यकारभारात जागा निर्माण केली. लष्करी सामर्थ तयार केले आणि प्रशासनालासुद्धा महत्व दिले. भारतीय नौदलाची स्थापना करण्याचा पहिला मान त्यांनाच दिला जातो. त्यांच्या प्रशासनाचे एकच ध्येय होते ते म्हणजे लोककल्याण राज्य. म्हणूनच शिवाजी राजांबद्दल लिहिताना नरहर कुरुंदकर म्हणतात, " शिवाजी महाराजांनी केलेली राष्ट्रीय जागृती, इतर धार्मियांसंबधीचे त्यांचे धोरण आणि त्यांची प्रजेसंबंधीची कर्तव्यभावना यातूनच भूमिपुत्रांचा स्वाभिमान जागृत झाला. ते धर्मनिष्ठ होते. हिंदू धर्मावर त्यांची श्रद्धा होती. इतर धर्मीयांना ते भेदभावाने वागवीत नसत. त्यांनी सामान्य मावळा शेतकरी आपल्या राज्याचा आधार मानला. आपल्या नैतिक आचरणाने सामाजिक व्यवहारात आदर्श निर्माण केला. सत्प्रवृत्तीने राज्याचे हित पाहण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. या सर्व गुणांतच त्यांच्या यशाचे आणि लोकप्रियतेचे रहस्य सामावलेले आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले राज्य त्यांच्या मृत्यूनंतर सत्तावीस वर्षाच्या प्राण घेऊ प्रदीर्घ झुंजीतून शिल्लक राहिले. शिवाजी महाराजांनी पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापती नसताना प्रचंड फौजांच्या विरुद्ध सत्तावीस वर्षे अखंड झगड्याला पुरु शकली यातच त्यांच्या नेतृत्वाचे खरे यश आहे. असा हा राजा निर्दोष आणि सुखी कारभाराचा सावध प्रणेता होता, तसा तो या राज्याचा उपभोगशून्य स्वामी होता. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी असे म्हणतात ". अशा या युगकुशल शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३४८ वर्षाच्या निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा.
ग्रंथ संदर्भ
बा. सी बेंद्रे : शिवराज्याभिषेक
सेतू माधवराव पगडी : श्री छत्रपती नी त्यांची प्रभावळ
सेतू माधवराव पगडी : शिवचरित्र
नरहर कुरुंदकर : छत्रपती शिवाजी महाराज जीवन -रहस्य
नरहर कुरुंदकर : श्रीमान योगी मधील प्रस्तावना
प्रा. जयसिंगराव पवार : शिवाजी व शिवकाल
गोविंद पानसरे : शिवाजी कोण होता?
Dennis Kincaid : Shivaji The The Grand Rebel
Medha Bhaskaran : Challenging Destiny
Jadunath Sarkar: Shivaji and his times
धन्यवाद
Comments
Post a Comment